स्वेदवहस्त्रोतस - परिचय
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.
स्वेद हा मेद या धातूचा मल असल्याचे चरकानें सांगितलें आहे. प्रकृत स्थितींत त्वचेचा ओलसरपणा टिकवून धरणें हें स्वेदाचे कार्य आहे. क्लेद विधारणाच्या रुपानें हा ओलसरपणा टिकविला जातो. क्लेदविधारण हे स्वेदाचे श्रेष्ठ कर्म असल्याचे वाग्भटानें सांगितलें आहे.
स्वेदस्य क्लेदविधृति: ।
स्वेदस्य क्लेदविधारणं श्रेष्ठं कर्म, क्लेदाभावे हि शोष:
स्यात्, मध्यमत्वक्स्नेहकचरोमधारणमपि ।
वा. सू. ११/५ पान १८३
क्लेद विधारण याऐवजी केश विधारण असा पाठ हेमाद्रीनें घेतला असला तरी अरुणदत्त वा हेमाद्री या दोघांनीही क्लेदविधारणाचा व केशविधारनाचा उल्लेख स्वेदाच्या इतर कर्मात केला आहे. त्वचा, त्वचेचा स्नेह, केंस व रोम यांचे धारण हे स्वेदावरच अवलंबून आहे.
स्वेदवहानां स्त्रोतसां मेदो मूलं रोमक्पाश्च ।
च. वि. ५-१६
मेद व रोमकूप ही स्वेदवह स्त्रोतसाची मूल स्थाने आहेत.
साग्रे शतसहस्त्रे द्वे बहिरंतश्चकृपक: ।
रोमकूपानि तावन्ति जातान्नेकैकशो यदि ।
वृद्धिर्हासौ निषेकात् च स्वभावात् विश्वकर्मत: ।
चतुर्भाग विहीनानि स्त्रीणां विद्धि स्वभावत: ।
कूपके कूपके चाऽपि विद्यात् सूक्ष्मं सिरामुखम् ।
प्रस्विद्यमानस्तै: स्वेदं विमुचति सिरामुखै: ।
का. सं. पान ७८
पुरुषाच्या शरीरावर सुमारे दोन लाख सूक्ष्म छिद्रे असतात. तीच छिद्रे रोमकूप म्हणूनही मानली जातात. स्त्रियांच्या शरीरावर यांची संख्या सुमारे दीड लाख असते. ही संख्या जन्माचे वेळीच निंश्चित झालेली असते. वाढत्या वयामुळे त्यांत फरक पडत नाहीं. याच छिद्रांमध्यें सूक्ष्म सिरांचे एकेक मुख असते. त्यांतूनच कोणत्याही कारणाने उष्णता वाढली सतां घाम हें द्रव द्रव्य बाहेर पडते.
स्वेदवह स्त्रोतसाच्या दुष्टीची कारणें -
व्यायामादतिसंतापाच्छीतोष्णाक्रमसेवनात्
स्वेदवाहीनि दुष्यन्ति क्रोधशोकभयैस्तथा ॥
च. वि. ५/३० पान ५२८
अतिव्यायाम, स्वेद सूर्य प्रकाश व अग्नि यांच्यामुळे होणारा अतिसंताप वा ज्वरादि व्याधी शीत व उष्ण यांचे क्रमविरहीत सेवन, क्रोध, शोक व भय या कारणाम्नीं स्वेदवह स्त्रोतसें दुष्ट होतात.
स्वेद-वृद्धी
स्वेदोतिस्वेददौर्गंध्य कण्डू: ।
वा. सू. ११-१४
स्वेदवृद्धीमुळे फार घाम येणें, शरीराला दुर्गंध येणे, अंग खाजणें अशी लक्षणें होतात.
स्वेदक्षय
स्वेदे रोमच्युति: स्तब्धरोमता स्फुटनं त्वच: ॥२२॥
वा. सू. ११/२२ पान १८६
स्वेद क्षयामुळे अंगावरील केस रोम गळणे, रोमांच उभे रहाणे, त्वच फुटणे अशी लक्षणे होतात.
दुष्टीची लक्षणें
अस्वेदनमतिस्वेदनं पारुष्यमतिश्लक्ष्णतामड्गस्य परिदाहं
लोमहर्ष च दृष्ट्वा स्वेदवहान्यस्य स्त्रोतांसि प्रदुष्टानीति
विद्यात् ॥८॥
च. वि. ५/८ पान ५२७
स्वेद दुष्टीमुळे घाम मुळीच न येणे वा पुष्कळ घाम येणे, त्वचा अतिशय खरखरीत, गुळगुळीत बनणे, अंगाची आग होणे, रोमांच उभे रहाणें अशीं लक्षणें होतात. सुश्रुताने क्शोष व स्पर्शवैगुण्य अशी लक्षणे अधिक सांगितली आहेत.
(सु. सू. १५-११)
स्वेदवह स्त्रोतसांत व्यानवायु हा कार्यकारी दोष असल्याचे गु. वै. गोखले यांनीं शारीरक्रिया विज्ञानांत सांगितले आहे. (पान२४९)
N/A
References : N/A
Last Updated : August 08, 2020
TOP