बस्तिमेहनयो: शूलं मूत्रकृच्छ्रं शिरोरुजा ।
विनामो वंक्षणानाह: स्याल्लिंगं मूत्रनिग्रहे ॥६॥
च. सू. ७-६ पान १०२
शिस्न व बस्ति या ठिकाणीं शूल होतो, ताठ उभे रहाणें, बसणें, वा पाय लांब करुन निजणें या क्रिया शक्य होत नाहींत. त्यामुळें वांकून बसावें लागणें, वंक्षणभागीं गुबारा धरल्यासारखे वाटणें, मूत्रप्रवृत्ति कष्टानें होणें, डोळे दुखणें अशी लक्षणे मूत्राच्या निग्रहामुळें उत्पन्न होतात. वाग्भटानें अंगमर्द अश्मरी, वंक्षणभागी शूल वातपुरीषसंग, हृद्शूल अशीं अधिक लक्षणे सांगितली आहेत. ( वा. सू. ४-४)
चिकित्सा
स्वेदावगाहनाभ्यड्गम् सर्पिषश्चावपीडकम् ।
मूत्रे प्रतिहते कुर्यात्त्रिविधं बस्तिकर्म च ॥७॥
च. सू. ७-७ पान १०२
अवगाहस्वेद, अभ्यंग, घृताने अवपीडन, स्नेहन,निरुह, अनुवासन व उत्तरबस्ति असे उपचार करावे. शिलाजतु, चंद्रप्रभा, गोमूत्रहरीतकी, तृणपंचमूळ, पुनर्नवा, दशमूळ, एरंडस्नेह कारस्कर, ही द्रव्ये वापरावी.