आज्ञापत्र - पत्र २
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
ज्या राज्यावर औरंगजेबासारिखा सबळ शत्रू चालोन आला असतां हतप्रभ होऊन गेला, तें हें राज्य, औरंगजेब यांणे याराज्यानिमित्त आपला संपूर्ण पराक्रम व अर्थवैभवादि सर्व शक्ति वेचिली; तथापि श्रीकृपाकटाक्षवीक्षणें सकलहि निर्फळ होऊन परिणामीं हतोद्यम, हतोत्साह होत्साता पराड्मुख होऊन यमालयास गेला. परंतु, औरंगजेब चौपन्न पादशाहीचा धणी; सैन्यादि देशकोशविषयीं अद्वितीय बुद्धिमान; किंबहुना, या पृथ्वीतलाचे ठायीं ‘दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो’ वा यैसी ज्याची प्रख्यात आख्या, यैसे महाशत्रूशी संग्रामप्रसक्त जाहलियावर त्याचा पराजय विनाश्रम, स्वल्प सायासें होणे परम कठिण, तदनुरुप परस्परें समर प्रसंगातिशयामुळें संपूर्ण राज्यांतील प्रजा पीडा पावली. कित्येक देशनिराश्रयित जाहले. संपूर्ण मार्गावरोध होऊन इतर देश-द्विपांतरीहूंन वस्तुजात येणें राहिली, तैसेंच सैनिक कितेक
॥ श्लोक ॥ मुनयोऽपि न गच्छंति या गतियों गिनोऽपि च
स्वामिकार्यगतप्राणास्तां गति यान्ति सेवका: ॥१॥
या दृढ बुद्धीने शरीरावस्था न पाहतां स्वामिकार्यावरि क्षात्रधर्मे शाश्वतलोकाश्रयित जाहले. कितेक हतसैन्य होत्साते कुंठित पराक्रम होऊन शत्रूस मिळोन गेले. कितेक स्वामी शत्रुसमरव्यसनासक्त पाहून दुर्बुद्धितिमिरांधतेनें स्वाधीन केलीं देशदुर्गे स्वतंत्रवादें आक्रमून वैसले. राजशासन स्वल्पतेमुळे प्रत्यक प्रत्यक स्तोमें होऊन परस्परें कलहास प्रवर्तले. या विषम संधीमध्ये शामलादि क्षुद्रांस अवकाश पडून बद्धमूल जाहले. अवशिष्ट देश व उदवस व दुर्गे सांग्रमिक सामग्रीविरहित जाहलीं. राजमर्यादा राहून गेली.
पाहता येकेके प्रसंग अनर्थाचेच कारण, तथापि, श्रीस या राज्याचा व स्वामीचा पूर्ण अभिमान. पुढे प्रतिपच्चंद्रन्यायें दिनप्रतिदिनीं या राज्याची अभिवृद्धि व्हावी हे श्रीइच्छा बलवत्तर. तदनुरुप या संभावितवंशी स्वामींचा जन्म जाहला आहे. तीर्थरुप थोरले कैलासवासी स्वामी यांणी हें राज्य कोणें साहसें वा कोणें प्रतापे निर्माण केले. याच वंशी आपण निर्माण जालों असतां या राज्याचा पैसा विस्कळित प्रसंग गोष्ट परम अनुचित.
N/A
References : N/A
Last Updated : January 29, 2019
TOP