मुख्य हुजुरात म्हणजे देशदुर्गादि सैन्यरक्षणाचें आदिकारण ते अगदी गळाठून हुजुरात यैसे नांव अवशिष्ट राहिलें, ते हुजुरांत लष्कर, हशम, बंदुखी, तिरंदाज, आदिकरुन परम शूर, विश्वासू, ‘हुकूम बारदार’ यैसे लोक ठेऊन देखील सामान त्यांची उस्तवारी करुन हुजुरात बरी सजली. तमाम किल्लेकोटांची राहिली इमारत चालीस लाऊन, गल्ला, दारुगोळे, बाण, होके, भांडी इत्यादी सामान चढऊन देशदुर्ग सामानपुर केलीं. राज्यातील पागा व हशम यांचा बंद अगदी ढासळोन गेला होता तो पुन्हा नीट करुन अरबी, इराखी , ताजी, कच्छी धड सामान व मारक आस्कारियाचें माणूस ठेऊन पागा केली. मावळे, आडाव, इटेकरी, पटाईत, बांकाईत, यावेगळे बंदुखी दुरुस्त-अंदाज कानडे-तोरसाळी व जांगडे, बंदुखी यांची सांचणी करुन हशम मेळविलें. रामचंग्या, दुराट्या, फिलनाळा व सुरतनाळा यांखेरीज थोर गाडयांवरील भांडी व करोल यैसा तोफखाना सजला, राज्य आबादन केलें.