आज्ञापत्र - पत्र २३
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
राजेलोकीं परिमित बोलत जावें. कार्यविरहित हर कोण्हासी भलत्याच गोष्टी बोलत बैसो नयेत. यैसे बोलो लागलियावरीं मनुष्य सलगीचे होऊन अमर्याद होतें. राजकारण - प्रसंग, कार्याकार्य-विचार, प्रसंगाचे गुणदोष, ज्या लोकांसि बोलणे तें आधी त्या लोकांचे प्रोत्साहन प्रगल्भपणे अगत्यागत्य करुन त्याजकडून बोलवावें. आपण चित्त देऊन यैकावे. आपले युक्तीस समर्पक आलें तरी उत्तम म्हणोन मान्य करावें. आपले विचारास त्या लोकांची नजर पावली नसली तरी आपण त्यांची अवहेलना न करितां, स्फुटवक्तेपणें साहित्य योजोन, उतावळी न दर्शवितां, सावकाश संपूर्ण कार्य विवंचना गुण-दोष बोलावें. त्या लोकांच्या प्रत्ययास आणून द्यावें. वरकड नित्य कार्ये साधारण सेवकांस सांगणे ते प्रायशा इशारतीनेंच सांगत जावें. इशारत म्हणोन सर्वकाळ मुखनेत्र हस्तपादादि अंगविकार-चांचल्य सर्वथैव न दाखवावे. बैसले ठाई स्थाणु किंवा मेरु यैसा आसनजय बरा अभ्यासावा.
राजेगावीं लहान अथवा थोर कोण्ही येक सेवकाचा दोष मुखे उच्चारित जाऊं नये; आढळल्या दुसर्याजवळ बोलो नये. आपल्याच चित्तांत ठेऊन त्याचे परिहाराचा उपाय योजीत जावा. कोण्ही येक पडिले अंतर धण्यास कळलें नाहीं इतका पर्दा आहे तोच बरे. इतकियानें माणूस मर्यादवंत असतें. किंबहुना या प्रकाराविषयीं सावध राहातें. तेणेंमुळे त्याचा प्रतिकार करावया आपणांस सुलभ पडतें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP