स्वशौर्य - पराक्रम करण्याचें साधन व सैन्यादि देशदुर्गाचे संरक्षणाचें आदिकारण ते हुजरात आहे. जे जे राजे व सेना - नायक मागें होऊन गेले व वर्तमान आहेत, त्यांणी आधीं हुजरात सजोन त्या बळावर पुढें साधीत विशेष जमाव मेळविले, देशकोश संपादिले. ज्यांचे पदरी हूजरात बळकट नाहीं ते सत्ता पराधीन. त्यांच्यानें कोण्हा येका कार्याचा स्वतां अंगेज पुरवत नाहीं. त्यामुळे केवळ सेवकाधीन होऊन राहावें, म्हणतील तें उगेंच यैकावें, कार्यभागी लोक व सरदार योजिले कार्यास मन:पूर्वक प्रवर्तत नाहींत. तेणेंकडून कार्यनाश होतो. यैसे जालियानें राज्याभिवृद्धि काये होणें आहे ? याकरितां जो स्वतां उद्योगी, शूर, ज्यास नित्य नूतन संपादीन हे हिंमत त्यांणी आधीं हुजरात सजावी.
लश्कर, हुशम, आडाव, बंदुखी, तिरंदार, करोल यैसा पंचरुढ जमाव ठेवावा. हुजरातींत माणूस ठेवावें ते परम शूर, अस्कारियाचे, निवडक, निव्वळ हुकुमबारदार, ज्यांचे नांव यैकिलियाने लस्करांत व मुलकांत सकळहि पसंद करीत, समयीं दहशत वागवीत. तर्हेवाईक, सरेखोर, अमर्याद, बालभाष्य, व्यसनी, कुचोदय, कुचाळ्या करणार, येका धण्यापासून हरामखोरी करुन आला असेल, यैसा लोक हुजरातीत येकंद्र ठेऊंच नये. काये म्हणोन कीं, हुजरातीचे भरवसियावर सकलविषयीं निश्चिंत असावें लागतें, समयीं जिवावर होड करावी लागते. वरकड सरदारांस मर्यादेने ठेविजेते यैसे लोक असलिया इतक्याहि गोष्टी अनुकूल पडणार. नाहींतर अंतर पडलिया शासन करावेंच लागतें. तेव्हां इतर सोबती दिलगीर होतील, किंवा खाशावरींहि बनो शके. याकरितां यैसे लोकांचा संग्रह हुजरातींत न करावा. लाक्षणिक मनुष्य एकावच्छेदें मिळतात यैसें नाहीं. याकरितां देशांत, लस्करांत, गड-किल्ले यांत फिरतां मनुष्याची आस्था धरुन कारभारियाविरहित जेथें जें उत्तम मनुष्य आढळेल तें समागमें घेऊन लाऊन परीक्षा करुन मग हुजरातींत ठेवावें.