आज्ञापत्र - पत्र ९
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
या उपरीं इतकियावरीं कृतार्थता व श्लाघ्यता मानून राहीन म्हणतां पुढील उद्योग राहून जातो. मुख्य शत्रू अवाई खावोन व्यग्र जाला आहे तो सांवर धरितो. फौजांचा बंदेज करितो. देशदुर्गादि मजबूदी करुन तत्प्रांतीचे संपूर्ण मांडलिक नयभयें हाताखालीं घालोन तमाम देशींच्या फौजा एकत्र करुन अगदी आपला देश पाठीसी घालोन येतो, तेव्हां जुंज या प्रांतीच घडतें. तमाम हिंदुस्थान निरुपद्रवी राहतें. स्वामीने हा नूतन संपादिला देश त्यावरिच कसला पडतो. हे विचारांची वाट नव्हे. आपली सलाबत शत्रूवर पडोन शत्रूने अवाई खादली आहे, संपूर्ण मांडलिक द्विधाभाव पावले आहेत, यांजमधे शत्रुस अवकाश घेऊ न देतां आपण सेनासमुदायसनीं चालोन जाऊन शत्रूचा पराभव करावा हाच स्वामींचा दृढ विचार करुन तमाम प्रांतीचें रजपूत एकत्र करुन करविले. स्वामी सुमुहुर्ते नर्मदापार जाहले. श्रीकृपें अचिरकालेंच मुख्य शत्रूचा पराभव करुन दिली, आगरें, लाहोर, ढाके, बंगाले, ढंकामकर आदिकरुन संपूर्ण तत्संबंधी देशदुर्ग हस्तवश्य करुन श्रीवाराणसीस जाऊन स्वामी विश्वेश्वर स्थापना करीत; तावत्काळपर्यंत दक्षिण प्रांत संरक्षणार्थ श्रीमत्सकलतीर्थौकतीर्थ श्रीमन्मातुश्री राहिली आहेत. त्यांसनिध श्रीयासह चिरंजीव प्रियतम राजश्री राजकुमार ठेविले आहेत. त्या उभयतांच्या सेवेसी तुम्हांस ठेविलें आहे. तुम्हां कृतकर्मे सेवक. तीर्थरुप कैलासवासी स्वामी कर्नाटक प्रांती गेले, तुम्हांवरी हा राज्यभर दिधला असतां तुम्ही यथोचित राज्यभिवृद्धि केली. तुम्हांस राजकार्ये नीतिमर्यादा अवगतच आहेत. तथापि, चिरंजीव राजकुमार तदनुसार या राजकार्यी सुशिक्षित व्हावेत, वरकड देशोदेशीं ठेविले देशाधिकारी व पारपत्यगार यांणी नीतीनें वर्तोन चिरंजीव राजकुमार तदनुसार अधीत होत यैसें करावें व सकल सेवकलोकीं त्याप्रमाणे यथाधिकारें वर्तोन राज्य-संरक्षण करावें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP