राजेलोक जाले तरी अवगुणांचा त्याग आणि गुणांचा संग्रह येकदांच होतो यैसे नाहीं. याजकरितां राजकुमाराजवळील शिक्षा करणार सभ्य मनुष्यें येक, दोन, च्यार यैसी ठेवावी. नित्य त्यांचेच सहवासें वर्तवावें. शास्त्राभ्यास, लेखनाभ्यास, अनालस्यपणे निष्ठुरवादें करवावा. तैसेच भेजणें, परजणें, कुस्ती घेणें, तालीम करणें या विद्येचे राजगुरु, जेठी व पहलवान व बंकाईत, पटाईत, दंडाईत आदिकरुन या विद्येत निपुण यैसें पाहून ठेवावें. त्याकडून त्या त्या विद्येचा अभ्यास करवीत जावा. माया धरुन अभ्यासास अंतर करूं नये. किंनिमित्त कीं, ईश्वर सर्व जनांचा गुरु. सकळांचे कल्याणाकल्याणाचा इंदू नृपती कल्पिला आहे. तो सगुण असला तरी बहुतांचे कल्याण. अवगुणी जाहलियावरीं बहुतांचे अकल्याण. अत येव ‘राजा कालस्य कारणम’. याकरिता राजेलोकीं बहुत सगुण असावें लागतें.
यद्यपि सर्व विद्या अधीन, सर्वगुणसंपन्नता जाहली, श्रीकृपें राज्यहि प्राप्त जालें. सर्वजण स्तुतीहि करिते. तथापि, त्यावर न जाणें. नित्यानित्य स्वकीय गुणदोष विचारणा करीतच असावी. किंबहुना येक-दोन सभ्य मनुष्य भिडेचे, विचारवंत, प्रामाणिक, सुज्ञ यैसे नित्य सहवासीं वागवावें. त्याजीं वरचेवर पडले अंतरविषयी सावध करीत असावें. त्यासी यैसी परिच्छिन्न आज्ञा करावी. त्यांस वडीलपणासारिखा मान देऊन त्यांची भीड बहुत वागवावी. सावध करतील त्यांचा वीटा न मानिता ते समयीं त्यांचे प्रोत्साहनानिमित्त संतोषी होऊन त्यांची खुशामत करीत जावी. म्हणजे ते लोक चित्तप्रशस्तेनें अंतर पडिलें सांगत जातील. त्या त्या अंतराचा परित्याग करावा. म्हणजे जैसें वृक्षाचें मुळ दृढ भूमींत, तो वृक्ष विस्तारातें पावतो, तद्वत राज्यमूळ तो नृप, तो गुणवंत असतां तें राज्य विस्तारातें पावतें.
राजेलोकीं बहुत सोसक असावें. किन्निमित्त कीं बहुत जनांचा स्वामी राजा. चांगले गुण सर्वात सारखेच असतात यैसें नाहीं. कोण्हांत कांही तरी दोष असतच आहे. किंबहुना गोरगरिबांपासोन सरकारकुनांपर्यंत समयीं संतापहि पावतात. संतापलेपणें अवार्च्यवाद कार्यकर्म करितात. ते समयीं शांतता धरुन त्यांचे संतोषास्तव कांही हास्यवदन होऊन त्यावर धण्याचे कृतोपकारी होऊन फिरोन तैसा अवगुण करीत नाहीं. इत्यादि सेवकलोकांपासोन दोश संदवावयाच्या युक्ति सहिष्णुपणाविरहित होत नाहीत.