गडावरील झाडें जीं असतील ती राखावी. यांविरहित आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपळ, आदिकरुन थोरवृक्ष व लिंबे व नारिंगे आदिकरुन लहान वृक्ष, तैसेच पुष्पवृक्ष व वल्ली, किंबहुना प्रयोजक, अप्रयोजक, जें झाड होत असेल तें गडावरीं लावावे, जतन करावें. समयीं तितकेहि लाकडे तरी प्रयोजनास पडतील. गडोगडी ब्राम्हण, ज्योतिषी, वैदिक व्यत्पन्न तसेच रसायने वैद्य व झाडपाल्याचे वैद्य, शस्त्रवेद्य,पंचाक्षरी व जखमा बांधणार, लोहार, सुतार पाथरवट, चांभार यांचाहि गड पाहून येक-येक, दोन - दोन असाम्या संग्रही ठेवाव्या. लहानशा गडास या लोकांची नित्य कामें पडतात यैसें नाहीं. याकरितां त्या त्या कामाचीं हत्यारें जवळ असो द्यावीं. जे समयी काय पडेल ते समयी करतील. नाही ते समयीं आदिकरुन तहसील तलब चाकरी घ्यावी. रिकामे न ठेवावें गडोगडीं तनखा, दास्तान, इस्ताद आदिकरुन गडाच्या प्रयोजनाची वस्तुजात गडास संग्रह करुन ठेवावेंच लागते. याविरहित गड म्हणजे आपल्या कार्याचे नव्हेत, यैसे बरें समजोन आधी लिहिलेप्रमाणें गडाची उस्तवारी करावी.