त्यास आधीं किल्ल्याचा जीव तो किल्ल्याचा हवालदार, तैसाच सरनौबत. हे नि:स्पृह, कोण्हाचे निसबतीचें अथवा येकाचे आर्जवामुळें ठेवावे यैसे नाही. जे कुळीवंत मर्हाटे आणि शिपाई, जे शरम धरीत असतील, कबीलदार, विश्वासू, अलालुची, अनिद्र सकल लोकांचेव समाधान रक्षून यथोचित रीतीनें सर्वांपासून स्वामिकार्ये घेत, हे स्थळ म्हणजे धण्यानें हे आपली परम प्रिय ठेव दिल्ही आहे, आपले प्राण वाचले असतां त्यास दगा होऊं नये यैसे पूर्ण चित्तांत आणून जे धण्याने लाऊन दिल्ही मर्यादा यास तिलांश अंतर पडो न देतां, दिवसाचा उद्योग दिवसां, रात्रींच उद्योग रात्रीं, निरालस्यपणे करून सर्व प्रेत्नें स्थळ जतन करीत यैसे ठेवावें. तैसेच सबनीस व कारखानीस हे कारकून धण्याने लाऊन दिल्हे मर्यादेचे प्रेरक, स्कल उचितानुचित कार्याचे सूचक, जैसे हवालदार-सरनौबत खावंद, तैसेच हिहि खावंद त्यांणीहि त्याच न्यायें सकलास वर्तऊन आपण वर्तावें लागते. याकरितां तेहि याच गुणांचे आणि लिहिणार, अमीन, निर्भिड यैसे पाहून ठेवावे. तैसेच तटसरनौबत, बारगीर, नाईकवाडी, रजपूत ठेवणें ते बरे मर्दाने कबीलदार विश्वासू यैसे पाहून नजर गुजर करुन ठेवीत जावे. किलियांत दहा टक्क्यांचा प्यादा ठेवणें तोहि हुजूरचे सनदेखेरीज न ठेवावा.
किलियामध्ये मनुष्य ठेवणे तें चालक, चोर, खुनी, तर्हेवाईक, भ्याड, अवाई खाणार, सरेखोर, कैफी, फितवेखोर असे सर्वथाहि ठेऊं नये. जे ठेवणें ते परीक्षा करुन ठेवीत जावें. त्यांतहि तीन वर्षांनी हवालदार काढावा, चहुं वर्षांनीं सरनोबत काढावा, पांचां वर्षांनी सबनीस-कारखानीस काढावे आणि त्या मामल्यावरी त्या त्या मामल्यायोग्य आणखी मामलेदार पाठवावे. जे काढावे त्यांचेहि त्यांचे स्वरुपानुरुप समाधान करुन कांही येक दिवस समागमें वागऊन स्वामीसेवक भावाची त्यांची बुद्धि मलिन जाली असली तरी सहवासामुळें पुन्हा सोज्वळ करुन, श्रमी होऊं न देतां, त्यांचे आटोपानुसार आणखी मामले सांगावे. तैसेंच तटसरनोबत-बारगीर हेहि नवे-जुने करीतच असावें. नाईकवाडी-रजपूत अन्यायी अथवा कार्यकर्ता असलिया त्यास काढून ज्यास जें शासन जें शासन अथवा सर्फराजी करणें ते करीतच जावी.