आज्ञापत्र - पत्र २२
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
॥श्लोक॥ त्यजेत्स्वामिनमत्युग्रमत्युग्रात्कृपणं त्यजेत
कृपणादविशेषज्ञं ततोऽपि कृतनाशनम ॥१।
हे गुण व मनुष्याचे दाटीचा कंटाळा व मनुष्यासी बोलण्याचा अभाव हे गुण सर्वथैव असूं नयेत. येणेंकडून स्वामीं - सेवकाचें चित्त-यैक्य न होतां सेवकलोक पडदियानें राहून निखालसपण पडत नाहीं. मनुष्याचे गुनदोष ध्यानांत न येतां मनुष्यसंग्रह होत नाहीं. याकरितां या गुणांचा परिच्छिन्न परित्याग करुन जेणेंकडून निखालसपणे मनुष्य-संग्रह होय तें करावें. जाल्या मनुष्य - संग्रहांत येथाधिकारें सर्वांची भीड वागवीत जावी. थोरा मनुष्यास साधारण मनुष्याबरोबर होऊं न देतां येकाचा यकापासोन उपमर्द होऊं न द्यावा. आपल्या हितकार्यावर दृष्ट ठेऊन साधारण मनुष्य आणि कार्यकर्ते असलिया त्यास नवाजोन त्याची भीड स्वतां वागऊन त्याणें केला अर्ज चालऊन त्यास भारी करुन दाखऊन जेणेंकडून आपलें हितकार्य होय तें करावें. कोण्ही येक चाकर नूतन ठेवणें त्याचें ठिकाण, भाऊबंद, पहिली चाकरी संपूर्ण पुसोन जर लबाड, लच्याळ अथवा परकियांकडील पाळती, खूनी, शराबी, बदअसली, केवळ वृद्ध, कार्यातून गेला, यैसा नसेल, बरा मर्दाना पाहून त्यास चाकरीस ठेवावें. परंतु, कोण्ही येक चाकर जामिनाव्यतिरिक्त न ठेवावा. चोरी-मारी, हरामखोरी करुन पळून गेला तर जामिनास तगादा करावा. मुलाहिजा न करावा. म्हणजे माणूस खबरदार असतें; बेलगाम होत नाही, सांगितली चाकरी दुरुस्त करितें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP