आज्ञापत्र - पत्र १२
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
राजलोकीं निदान युद्धाव्यतिरिक्त स्वशरीरसंरक्षणाविषयी सर्वकाळ अत्यंत सावध असावें. पाकालय, जलस्थान, फलस्थान, वसनागर आदिकरुन जे नाजुक महाल, याविरहित आणखी कारखाने यांमध्यें जे लोक ठेवणेम ते पर्म विश्वासू, पारंपर्यसेवक, अलालुची, प्रामाणिक जे असतील ते परिक्षा करुन ठेवावे. ज्या कार्यास जो येथायोग्य तो तेथेच ठेवून त्याचा उपयोग घ्यावा. ज्यांचा अधिकार जो असेल तो त्याचेच हातून घेऊन अधिकारपरत्वें सकलांवर सारखा लोभ करुन त्यांस आपले योगक्षेमविषयीं अपेक्षा न पडे यैसा स्वतां परामर्ष घेऊन चालवावे. कोणेविसीं आपला संशय त्यास किंवा त्याचा संशय आपणास न पडता आपापले सेवेवरी राहात तें करावें. कदाचित यकाचा संशय प्राप्त जाला तरी त्यायत: तेच समयीं शोध करुन नि:संशय प्रशस्त चित्तें कार्यास प्रवर्तेत तें करावें. संशयनिवृत्ती नव्हेंच तरी त्यास परिच्छिन्न दूर करुन इतर सेवा सांगावी. शासनार्ह असल्यास शासन करावें. ये गोष्टीची उपेक्षा न करावी. तैसेंच जवळील सेवक अत्यंत विश्वासू, सुज्ञ आपला मनोदय जाणून वर्तेते, इंगित संज्ञा जाणते आणि शूर दर्शनी यैसे लक्षणीं होत असता निर्दय आणि दुराग्रही दुष्टचित्त नव्हेत यैसे परीक्षून ठेवावेत. त्यांस योगक्षेमविषयी कोण्हाचे अर्जव न पडे तें करावें. स्वाभाविक ते कोण्हाचे घरीं धण्याचे आज्ञेवेगळे न जात आणि अंतस्थ प्रकार बाहेर न बोलेत, तैसेंच धण्याचे संनिध उर्मीनें कोण्हावरी अन्याय न करु पावेत, थोर लोक, कारभारी यांची अमर्यादा न करीत, कोण्हाची चाडी न बोलेत, या रीतीनें मर्यादेने ठेवावें. त्यांमध्ये तो तैसा भार धरील तैसी त्याची सरफराजी करावी.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP