आज्ञापत्र - पत्र १८
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
सेवक लोकांची वेतनें नेमस्त करून बिलाकुसूर पाववावी. कार्यविशेष केलिया अथवा कुटूंबस्त असलिया कांही बक्षीस म्हणोन द्यावें परंतु ज्या हुद्यावर जे वेतनाची मोईन असेल त्याच हुद्दयावर कार्यविशेष केल्याने अधिक वेतन न करावें. काय म्हणोन कीं, येकाचे वेतन अधिक केलियाने त्या प्रतीचे वरकड सेवक आहेत ते आपले अधिक वेतनाचे मुदे घालितात, दिलगीर होतात. कदाचित येकाचे भिडेनें त्यास अधिक केलियाने सारेच चाकर त्या प्रतीचे येकासारखे येक आहेत, तेव्हां तितकियांसहि अधिक वेतन करावे लागेल. मग साराच बंद ढासळोन जातो. हे गोष्ट बरी नव्हे. याकरितां कोण्ही येका कार्यास जो मोईनचा बंद केला असेल त्यास न्युनाधिक सर्वथैव करु नये. कार्यकर्ते मनुष्य आणि कार्य विशेष केलें यैसें जाहलियाने, त्या थोर हुद्दा सांगोन त्याचें चालवावें. इतकियानें मनुष्य उमेदवार असते. कार्यावर बक्षीक दिल्ह्याने दुसरियाच्यानें आड घालवत नाहीं. दुसरी गोष्ट बक्षीस न दिल्हे म्हणोन, जैसें वेतनाकरितां चाकर लोकांस रुसावयास जागा आहे, तैसें बक्षीस द्यावेंच म्हणून बोलावयास जागा नाहीं. आणि कार्यावर धणी बक्षीस देतो या उमेदीवर वरकड चाकर जिवाची तमा न पाहतां स्वामीकार्यावर अंगेजणी करितात. याकरितां सिरस्तेप्रमाणें तन करुन कार्यावर बक्षीस द्यावें. परंतु जे मोईन असेल त्यास न्यूनाधिक्य सर्वथैव न करावें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP