आज्ञापत्र - पत्र ८
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
यावर यवनाक्रांत राज्य आक्रमावें, अवनी-मंडळ निर्यावनी करावें हा निगूढ चित्ताभिप्राय प्रगट करुन पूर्व, पश्चिम, दक्षिण या प्रांती जे जे यवनस्तोमें बद्धमूल जाहलीं होतीं त्यांवरी सेनासमुदाय प्रेरुन मारुन काढिलें. साल्हेरीअहिवंतापासून चंजी कावेरीपर्यंत गत राज्य संपूर्ण आक्रमिलें. विजापूर भागानगरादि प्राचीन महामंडळें त्यांजवर खासा चालोन जाऊन तेथील यवनसंबंधी सेनानायकांस हतसैन्य करुन मारून काढून तें स्थळ व तत्संबंधी देशदुर्गेसहित स्वशासनवश्य केलीं.
अनुपदे औरंगाबाद-बुर्याणपुर म्हणजे या दक्षिणप्रांती यवनेशाचे मुख्य गुल्म, त्यावरीं चालोन घेतले असतां अपरिमित यवनसेना समरोन्मुख जाहली. तुमुल युद्धप्रसंग प्राप्त जाला. यवनांनी जीविताशा सोडून अतिशयित पराक्रम दर्शविला. तथापि त्याचा नाश व स्वामीचा जयप्रभाव वर्धिष्णु व्हावा हे श्रीइच्छा बळिवंत. तदनुसार स्वामींच्या प्रतापानलें अशेष यावनीसेना शलभन्यायें विदग्ध होऊन पराजय पावली कितेक सैनिक यमसदनास गेले. कितेक पराड्गमुख जाहले. कितेक हस्तवश्य केले. अश्वगजादी तत्संबंधी संपदा हातास लागली. औरंगाबाद बुर्हानपूर आदिकरुन संपूर्ण या प्रांतीची स्थळे हस्तगत होऊन स्वामींचे विजयध्वज सुशोभित जाहलें. नर्मदेपासून श्रीरामेश्वरपर्यंत स्वामींचे राज्य निष्कंटक जाहलें. हा स्वामींचा मनोदय चित्तीं होता तैसा श्रीदयेने व तुम्ही लोक स्वामींचे हिंदुराजकार्यधुरंधर राज्याभिवृद्धिकर्ते, तुम्हा सेवक लोकांचे अंगेजणीनें सिद्धिस पावला. तुम्हां सेवक लोकांच्या सेवेचे सार्थक जाले.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP