आज्ञापत्र - पत्र ३३
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, फरांसिस, डिंगमारादि टोपीकर हेहे लोक सावकारी करितात. परंतु ते वरकड सावकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्यच करितात. त्या ६ चे हुकमाने त्यांचे होत्सातें हे लोक या प्रांती सावकारेस येतात. स्वमत प्रतिष्ठावें हा पूर्ण अभिमान. तदनुरुप स्थळोस्थळीं कृतकार्यहि जाले आहेत. त्याहिवरि हट्टी जात, हातास आले स्थळ मेलियाने सोडावयाचे नव्हेत. यांची आमदरफ्ती आले-गेले यैसीच असो द्यावी. त्यांसी केवळ नेहमीं जागा देऊं नये. जंजिरेचा समीप या लोकांचे येणें-जाणें सहसा होऊं देऊं नये. कदाचित वखारीस जागा देणें जालेंच तर खाडीचे सेजारीं समुद्रतीरीं न द्यावा. तैसे ठाई जागा दिधलियावरी आपले मर्यादेनें आहेत तोवर आहेत. नाहीं ते समयीं आरमार दारुगोळी हेंच त्यांचे बळ. आरमार पाठीसी घेऊन त्याचे बळे त्याबंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. तेव्हां तितकें स्थळ राज्यांतून गेलेंच. याकरितां जागा देणेंच तरी खाडी लांब गांव दोन गांव राजापूरसारखी असेल तेथें फरांसिसास जागा दिल्हा होता, त्या न्यायें दोन-च्यार नामांकित शहरें असतील त्यांमध्ये जागा द्यावा. तोहि नीच जागा, शहराचे आहारीं शहराचा उपद्रव चुकऊन नेमून देऊन वखारा घालवाव्या. त्यासहि इमारतीचें घर बांधो देऊं नये. या प्रकारें राहिलें तरी बरें. नाहींतरी याविनाहि प्रयोजन नाहीं. आले-गेले त्यांचे वाटें आपण न वजावें, आपले वाटें त्यांणी न वजावें इतकेच पुरे.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP