या अर्थे तीर्थरुप कैलासवासी महाराज साहेब यवनाश्रयें असतां त्यापासोन पुणें आदिकरुन स्वल्प स्वास्ता स्वतंत्र मागोन घेऊन पंधरा वर्षाचें वय असतां त्या दिवसापासोन तितकेच स्वल्पमाचे उद्योग केला,
॥ श्लोक ॥
अर्जुनस्य प्रतिज्ञे द्वे न दैन्यं न पलायनम्
आयू रक्षति मर्माणि आतुरत्नं प्रयच्छति
इति गाण्डिवनो बुद्धिनं दैन्यं न पलायनम् ॥१॥
तैसेच उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी: या दृढ बुद्धीनें शरीरास्था न पाहतां केवळ अमानुष पराक्रम, जे आजपर्यंत कोण्हें केले नाहीत व पुढे कोण्हाच्यानें कल्पवेना यैसे स्वांगे केले. मनुष्य-परीक्षेनें नूतन सेवक नवाजून योग्यतेनुसार भार वाढवून महत्कार्यापयोगी करुन दाखविले. येकास येक असाध्य असतां स्वसामर्थ्ये सकळांवरी दया करुन येकाचा येकापासोन उपमर्द होऊ न देतां, येकरुपतने वर्तवून त्या हातून स्वामिकार्ये घेतलीं. दक्षिणप्रांते इदलशाही, कुतूबशाही, निजामशाही ही महापराक्रमी सकलार्थे समृद्धिवंत संस्थानें, तसेच मोगल येकेके सुभा लक्ष लक्ष स्वारांचा, याविरहित, शामल, फिरंगी, इंगरेज, जवार-रामनगरकर, पालेकर, सोंधे, बिदनूर, म्हैसूरवाले, त्रिचनापल्ली आदिकरुन संस्थानिक तैसेच जागां जागां पुंड पाळेगार व चंद्रराव, सुरवे, सिर्के, सावंत, भालेराव, दळवी, वरघाटे, निंबाळकर, घाटगे, माने आदिकरुन देशमुख कांटक सकलहि प्राक्रमी, सजुते, सामानपुर असतां बुद्धिवैभवे व पराक्रमें कोण्हाची गणना न धरितां, कोण्हावरी चालोन जाऊन तुंबळयुद्ध करुन रणास आणिलें. कोण्हावरी छापे घातिले, कोण्हांस परस्परें कलह लाउन दिल्हे, कोण्हाचे मित्रभेद केले, कोण्हास परस्परें कलह दिल्हे, कोण्हाचे मित्रभेद केलें, कोण्हाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोण्हास आपले दर्शनास आणिलें, कोण्हास परस्परे दगे करविले, जे कोण्ही इतर प्रयत्नें नाकळेत त्यांचे देशांत जबरदस्तीनें स्थळें बांधोन पराक्रमे करुन आकळिले. जलदुर्गाश्रयित होते त्यांस नूतन जलदुर्गच निर्माण करुन पराभविले. दुर्धटस्थळीं नौकामार्गे प्रवेशले. यैसे ज्या ज्या उपायें जो जो शत्रु आकळावा तो तो शत्रु त्या त्या उपायें पादाक्रांत करुन साल्हेरी अहिवंतापासून चंदी कावेरीतीरपर्यंत निष्कंटक राज्य शतावधी कोट किल्ले, तैसेचि जलदुर्ग व कितेक विषम स्थळे हस्तगत केली. चाळीस हजार पागा व साठ-सत्तर हजार सिलेदार व दोन लक्ष पदाती, कोट्यावधी खजाना तैसेच उत्तम जवाहीर सकळ वस्तुजात संपादिलें. शहाण्णवकुळीचे मराठ्यांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरुन छत्रपती म्हणविलें. धर्मोद्धार करुन देव-ब्राम्हण संस्थानीं स्थापून यंजन याजनादि षटकर्म वर्णविभागे चालविलीं. तस्करादि अन्यायी यांचे नांव राज्यांत नाहींसे केलें. देशदुर्गादि सैन्याचे बंद नवेच निर्माण करुन येकरुप अव्याहत शासन चालविलें. केवळ नूतन सृष्टिच निर्माण केली. औरंगजेबासारिखा महाशत्रु स्वप्रतापसागरीं निमग्र केला. दिगंत विख्यात कीर्ति संपादिली ! ते हें राज्य !