धर्मार्थ भूमिदान देण्याचें पुण्य अनंत आहे. परंतु, धर्मांत अधर्म, अधर्मात धर्म हे धर्माची सूक्ष्मता बरी शास्त्रत: विचारुन धर्मार्थ भूमि देणें ते देश, काळ, पात्र पाहून द्यावी. जोगी, जंगम, वेशधारी इत्यादि जे स्वसामर्थ्ये मेळवावयास सामर्थ्य धरितात, ज्यांस भिक्षार्थ फिरवयास कार्यास येतें, यैशांस अथवा ज्यांचे वंशज दुष्ट दुराचार्यप्रवर्तक होऊ शकेत, यैशांस, तैसेच स्वधर्मविरोधी, पाषांडी, यांस ग्राम अथवा भूमि न द्यावी. जे श्रोत्री, कुटुंबवत्सल, वेद्शास्त्रसंपन्न, अनुत्पन्न, ज्यांणी घर सोडून भिक्षेस जातां ज्यांचा कर्मलोप होतो, यैसे सदब्राम्हण पाहून पाहून पर्वादि पुण्यकाळीं अथवा महाक्षेत्री सदक्षणिक धारादत्तें ग्राम अथवा भूमि देणें, ते द्यावी, तैसींच थोर थोर जागृत देवतायतनें, सत्पुरुषांचे मठ, समाधिस्थाने, जेथे पूजा, नैवेद्य, यात्रादि अन्नशांती नियमित आहे यैसे स्थळींही ग्राम अथवा भूमि देणें ते द्यावी. आणि दिधिलियावरी कैसाहि आपत्काळ पडो, प्रानपर्यंत संकटे पडोत, परंतु, यहलोकीं सुख क्षणैक आहे हे जाणून, परलोकभय संपूर्ण चित्तांत आणून दिधलियामध्यें आचमनभर उदक, तेहि लीलाप्रसंगेकडूनहि अभिलाषू नये. यैसे जे पापभीरु राजे आहेत त्या ६ चे संकट तो ईश्वरच परिहार करितो. यद्यपि, होणार ते पापबुद्धि धरलियानें चुकतें यैसे नाहीं. किंबहुना पापबुद्धीनें विघ्नांचीच अभिवृद्धि होते. याकरितां हा लिहिला अर्थ बरा चित्तांत आणून त्याप्रमाणें वर्तणूक करावी.