किला संरक्षणाचें कारण तें भांडी व बंदुखा, याकरिता किल्यांत हशम ठेवावे. ते बरकंदाज ठेवावे. तटसरनोबत,हवालदार यांसहि बंदुखीचा व तोफा गाडावयाचा अभ्यास असावा. संपूर्ण जागा व गडाचे उपराचे जागां यासारिखीं भांडी, अंबुरे चरक्या आदिकरुन यंत्रे बुरजाबुरकास, तटोतट टप्पे मुजरे साधून ठेवावी. भांडियांचे गडे, चरक, भांडे पाहून मजबूद लोखंडी कट देऊन त्यावरीं ठेवावी. दारुच्या खलित्या व गंज व भांडे निववावयाच्या कुंच्या, गोळे आकिकरुन रेजगारीसुद्धां सुपारीप्रमाणें लहान-थोर नदीतील खडे, बाणाच्या पलाखा, जामग्या तरफा, काजे दुरुस्त करावयाचे सामाने, आदिकरुन हा जिन्नस भांडियाजवळ हमेशा तयार असावा. दगडी जिन्नस दारुचे अंतरे ठेवावे. होके - बाण हेहि पाहरे-पाहरियास तयार असो द्यावें. दरम्यान मुलकांत गनीम कोठें आहे ? येईल ते समयी कोठींतून आणून तयारी करीन म्हणेल तो मामलेदार नामाकूल, आळसी तैशास मामला सांगो नये. येक वेळ केली आज्ञा त्याप्रमाणे अंधपरंपरेनें निरालस्यपणें उगेंच वर्तावें. तरीच समयीं दगा होत नाहीं, लाऊन दिल्हा काइदा अव्याहत चालतो.
पर्जन्यकाळी भांडियास व दरवाज्यांस तेल - मेण देऊन, भांडियाचे काने मेणानें भरून भांडियावर भांडियापुरती आघोडी घालून जायां होऊ न द्यावी. वरकडहि जिन्नस सरदी न लागे यैसा अबादान ठेवावा. इमारतीचें काम आदिकरुन तयार जालेंच असते. तथापि, तट, पाहरे, बुरुज, कोट कांही जाया होतच आहेत ते वरचेवर मजबूद करावे लागतात. तटास झाड वाढतें, ते वरचेवर खणून काढावें. तटाचे व तटाखालील गवत जाळून गड नाहणावा लागतो. या कामास गडोगडास गड पाहून इमारतीचा कारखाना नेहमीं ठेऊन मुद्राधारी याचे स्वाधीन करावा. तैसेच गोलंदाज, विश्वासू, कवीलदार, नेहमीं लागा दुरुस्त मारणार यैसे मर्दाने गड व गडाची भांडी जितके लागत असतील तितके ठेवावे.