१
भवदुःखपर जनी, वणवा जळतां मनी, ऐसें मज सांडूंनि, कैसा जासी ?
कामक्रोधगुणीं, व्याघ्राचा गोठणीं, ऐसें मज सांडूंनि, कैंसा जासी ?
कर्मत्रयमिळणी जिउ पडला काचणी ऐसें मज सांडूंनि कैसा जासी ?
विषयविषहरणी निष्ठुरता धरूंनि ऐसें मज सांडूंनि कैसा जासी ? ॥१॥
देहाचा निर्वाणी दोषत्रयमिळणी ऐसें मज सांडूंनि कैसा जासी ?
भवजन्मबंधनीं पिडलों तृष्णागुणीं ऐसें मज सांडूंनि कैसा जासी ?
विकळ जालें प्राणीं सुटैन ये क्षणीं ऐसें मज सांडूंनि कैसा जासी ?
दिगंबरा ! मरणीं स्वहस्तें लोटूंनि ऐसें मज सांडूंनि कैसा जासी ? ॥२॥
२
तुझा पुत्र जनीं पडलों मीं बंधनीं; आतां मजपासूंनि परुता न वच्रें.
मिनले रोग तीन्ही; वरि पडलों निदानीं. आतां मजपासूंनि परुता न वच्रें.
भव - नद - घालणी तृष्णा वाहे पाणी. आतां मजपासूंनि परुता न वच्रें.
पाय धरीतु दोन्हीं; लागैन चरणीं; आतां मजपासूंनि परुता न वच्रें. ॥१॥
विकळ जालों गुणी; न चळे माझी करणी; आतां मजपासूंनि परुता न वच्रें.
मन चंचळ त्रिगुणीं पडों चि पाहे मरणी. आतां मजपासूंनि पुरता न वच्रें.
पीता ना मज जननी; निरास ज्ञाली मनीं; आतां मजपासूंनि पुरता न वच्रें.
दिगंबरा ! जनीं तूं माझी जननी. आतां मजपासूंनि परुता न वच्रें. ॥२॥
३
नळनीं दळगतजळ चंचळ चळ ढळतां; मा तैसें श्रीअवधूता ! माझें जीणें.
माध्यान्हीची छाया वसवी ज्या आश्रया; तैसें योगिराया माझें जीणें.
तरत के तरंगु तरले पावे भंगु; तैसा हा प्रसंगु; माझें जीणें.
कर्मज साकार शरीर हें क्षर; आतां कें साचार माझें जीणें. ॥१॥
धरितां मृगजळ जैसें तें पोकळ; तैसें हें केवळ माझें जीणें.
स्वप्नाचीया परि क्षणिक भान तरि, स्थिर नाहीं संसारीं माझें जीणें.
दुःखाचें कारण, दुर्मतीचें स्थान, तुज येकेवांचून माझे जीणें.
दिगंबरा ! जाण, तुझी मातें आण; तूं; तरि चि हें धन्य माझें जीणें. ॥२॥
४
कल्पांतीचें पाणी न गणवे गणितां; मा तैसें श्रीअवधूता ! सगुण तुझें.
लीन विरळ नभ नये हातीं धरितां; तैसें श्रीअवधूता ! सगुण तुझें.
केवळ परब्रह्म न ये दृष्टी भजतां; तैसें श्रीअवधूता ! सगुण तुझें.
बुद्धीचें कारण न ये अवगमिता; मा तैसें श्रीअवधूता ! सगुण तुझें. ॥१॥
दृष्टीचें चैतन्य न ये तें पाहतां; मा तैसें श्रीअवधूता ! सगुण तुझें.
जळ धरूं जैसा बाहीं न ये कवळीतां; तैसे श्राअवधूता ! सगुण तुझें.
चैतन्याची सोये नलगे प्रगटतां; तैसे श्रीअवधूता ! सगुण तुझें.
निर्विकल्प ब्रह्म; साकार खलुता; दिगंबरा ! सत्ता सगुण तुझें. ॥२॥
५
आत्मा तूं; तुजहूनि नाही देवा ! मज कव्हणीं; तनु मनु ठेउंनि चरणीं, नमन तूतें.
संसार - परजनीं तूं माझी जननी; तनु मनु ठेउंनि चरणीं, नमन तूतें.
मोक्षार्थसाधनीं विद्येची तूं खाणि; तनु मनु ठेउंनि चरणीं, नमन तूतें.
ज्ञानचिंतामणीं, प्रबोधु दिनमणी, तनु मनु ठेउंनि चरणीं, नमन तूतें. ॥१॥
तुझा मूर्ति - ध्यानीं पांगुळ जाली करणी; तनु मनु ठेउंनि चरणीं, नमन तूतें.
गुणद्रष्टा तूं गुणी; गुण ते तुज पासूंनि. तनु मनु ठेउंनि चरणीं, नमन तूतें.
नित्यानित्यज्ञानी स्मरती तुजलागुनी; तनु मनु ठेउंनि चरणीं, नमन तूतें.
दिगंबरा ! तूजहूंनि नाहीं त्राता निर्वाणीं; तनु मनु ठेउंनि चरणीं, नमन तूतें. ॥२॥
६
विज्ञानसागरा ! भक्तकरुणाकरा ! लीलाविश्वंभरा ! नमन तुतें.
देवदेवेश्वरा ! पुरपती ईश्वरा ! लीलाविश्वंभरा ! नमन तुतें.
परब्रह्मसाकारा ! अनुसूयेकुमरा ! लीलाविश्वंभरा ! नमन तुतें.
परात्परतरा ! सद्विद्याजळधरा ! लीलाविश्वंभरा ! नमन तुतें. ॥१॥
मायातमसंहारा ! स्वानंदसागरा ! लीलाविश्वंभरा ! नमन तुतें.
अलक्ष्य अगोचरा ! गुरुमूर्त्ती दातारा ! लीलाविश्वंभरा ! नमन तुतें.
अद्वयगुणविस्तारा ! योगानंदकरा ! लीलाविश्वंभरा ! नमन तुतें.
बापा ! दिगंबरा ! मी नेणें दूसरा; लीलाविश्वंभरा ! नमन तुतें. ॥२॥
७
तूं माझें साधन; तूंचि योगधन; सम करूनि करचरण, नमन तूतें.
न करवे चिंतन; न तुठें मातें ध्यान; सम करूंनि करचरण, नमन तूतें.
ज्ञान कीं विज्ञान मीं न मनीं तुजवीण; सम करूंनि करचरण, नमन तूंतें.
निर्जीवां जीवन, तूं माझें चैतन्य; समकरूंनि करचरण, नमन तूतें. ॥१॥
जपतपअनुष्ठान हेंचि देवार्चन; समकरूंनि करचरण, नमन तूंतें.
स्वानंदचिद्धन पद परम कल्याण; सम करूंनि करचरण, नमन तूंतें.
सर्वांचें कारण तूं तरी देवा ! जाण. सम करूंनि करचरण, नमन तूंतें.
दिगंबरा ! तुजविण दुजा नाहीं जाण; सम करूंनि करचरण, नमन तूतें. ॥२॥
८
मन सुमनसुवणीं समर्पिलें ध्यानीं; आतां तें परतोनि न मगें ! न मगें !
बा ! हे दृष्टिदर्शनीं समर्पिली वदनीं; आतां तें परतोनि न मगें ! न मगें !
बापा ! शरीर संकीर्तनीं हें दिधलें नर्तनीं; आतां तें परतोनि न मगें ! न मगें !
वाणी तव स्मरणीं दिधली प्रगर्जनीं; आतां तें परतोनि न मगें ! न मगें ! ॥१॥
हे पैं हस्त दोन्हीं दिधले तव भजनीं; आतां तें परतोनि न मगें ! न मगें !
बा ! मति हे तुझा गुणीं अर्पिली निर्वाणीं; आतां तें परतोनि न मगें ! न मगें !
क्रिया - फळें चरणीं अर्पिलीं पूजनीं; आतां तें परतोनि न मगें ! न मगें !
दिगंबरस्थानीं आत्मत्व ठेउंनि, आतां तें परतोनि न मगें ! न मगें ! ॥२॥
९
करितां विषयध्यान वय गेलें निघोन; आतां मज तुजवीण कव्हणी नाहीं.
भवदुःख दारुण वरि पडलें निर्वाण; आतां मज तुजवीण कव्हणी नाहीं.
कर्में भवबंधन न तुटे सहसा, जाण; आतां मज तुजवीण कव्हणी नाहीं.
मन माया सगुण नव्हेचि योगें क्षीण; आतां मज तुजवीण कव्हणी नाहीं. ॥१॥
बोलतां शब्दज्ञान सुख ना तें साधन; आतां मज तुजवीण कव्हणी नाहीं.
मुक्तीचें साधन तूंचि तत्वज्ञान; आतां मज तुजवीण कव्हणी नाहीं.
आत्मां तूं चैतन्य माझें ध्येय ध्यान; आतां मज तुजवीण कव्हणी नाहीं.
दिगंबरा ! ज्ञाण, मातें तुझी आण; आतां मज तुजवीण कव्हणी नाहीं. ॥२॥
१०
अनुमान येथ सांडूंनि, लागैन दोन्हीं चरणीं ॥१॥धृ॥
नावडे येर साधन; आवडि मनिची तूं; जाण. ॥छ॥
दिगंबरा ! तुं तारकु; तुजवांचूनि नेणें आणीकु. ॥२॥
११
अरे ! अरे ! शुद्धमयामळा ! तुझें रूप पाहीन या डोळां. ॥१॥धृ॥
जीवाचे वो ! माये ! जीवन; न सवे वो ! तेणेंवांचून. ॥छ॥
योगु काय कैसा ? तो नेणें. दिगंबरु आत्मा, हें जाणें. ॥२॥
१२
न यें, न यें आतां शरीरा; भेटि दुर्लभ दत्ता ! माहेरा ! ॥१॥धृ॥
पाउलें मज दाखवीं; ठेविलें मानस नूठवीं. ॥छ॥
काय करूं येर साधनें दिगंबरा तुझेनि दर्शनें ? ॥२॥
१३
आरे ! आरे ! आरे ! शंकरा ! देवदेवा ! करुणसागरा ! ॥१॥धृ॥
पाउलें मज दाखवीं; ठेविलें मानस नूठवीं. ॥छ॥
काय करूं येर साधनें दिगंबरा तुझेनि दर्शनें ? ॥२॥
१४
लक्षलाभु तो मी न पाहें; अवधूतु आत्मां कें आहे ? ॥१॥धृ॥
पाहीन मीं माझारी, सांडूंनि अवस्था च्यार्ही. ॥छ॥
दिगंबरु आत्मा देखिला मीं; आपणु अवघाचि जाहाला ॥२॥
१५
नेति नेति ऐसें बोलणें, तें मीं विसरलों तुझेनि सेवनें. ॥१॥धृ॥
भुललें मन दातारा ! अर्थुचि न गमे दुसरा. ॥छ॥
दिगंबरा ! तूं मीं सर्वही आतां निरसूं येथे तें कायी ? ॥२॥
१६
मोक्षु नेणें; बंधु न कळे; अवधूतीं मीपण मावळे. ॥१॥धृ॥
भुललें मन सखिये ! आंगीं मीपण नसाहे. ॥छ॥
दिगंबरु ब्रह्म निर्गुण; तेथें मोक्षु कैचें बंधन ? ॥२॥
१७
देह गेह सर्व सांडूंनि, मीं रातली तुझां गुणीं. ॥१॥धृ॥
चाडूं न धरीं लौंकिकें; हासतु कां जन पारिखे. ॥छ॥
दिगंबरीं मन गुंतलें; तें परतोनि आप भूललें. ॥२॥
१८
अरे ! अरे ! अरे ! आत्मयां ! अवधूता ! न दवीं हे माया. ॥१॥धृ॥
तूंचि ब्रह्म साकार, जड नेणती जन पामर. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें सगुण गुण ग्रासक केवळ निर्गूण. ॥२॥
१९
नाट. चालि भिन्न.
जाईन, जायीन; दोहीं बाहीं कवळीन. ॥१॥धृ॥
दत्तु पढिये मानसीं जीवहुंनि, आत्मारामु, अद्वयमती, विश्वंभरु,
आसक्त आसक्त दिगंबरीं जालें चित्त. ॥२॥
२०
आरत आरत; हेंचि माझें दृढव्रत. ॥१॥धृ॥
दत्तु कीर्तनीं गायिन, निरंतरु; आत्मावो !
माझा, श्रीयोगिराजु, परमप्रियु. ॥छ॥
सिद्धीवा दातारु सिद्धराज दिगंबरु. ॥२॥छ॥