८४१
कवण साधन, पुण्य पूर्वकृत ? न कळे
श्रीदत्ताचें रूप; मन माझें तेथ मीसळे. ॥१॥धृ॥
योगधन माझें, अवो ! योगधन माझें,
श्रीदत्तासारिखें रत्न ! योगधन माझें. ॥छ॥
नावडे सखिये ! मज देह, गेह सकळ.
दिगंबरीं मन माझें वेधलें केवळ. ॥२॥
८४२
सदन, स्वजन माये ! बहुगुणवेथा.
श्रीदत्तेंवांचूंनि अर्थु दुःखाची सरिता. ॥१॥धृ॥
दिनें दीनु क्षीणू, अवो ! दिनें दीनु क्षीणू,
माप लागलें वया, दिनें दीनु क्षीणू. ॥छ॥
स्वप्नासारिखें माये ! सुखदुःख सकळ.
दिगंबरें वीण मृगजळभान केवळ. ॥२॥
८४३
कवण स्वजन मज ? मी कवणाचा कवणू ?
येतां जातां दुजें नाहीं; येकला मी आपणू. ॥१॥धृ॥
अरे ! अरे ! मनसा अरे ! अरे ! अरे ! मनसा !
विषयसंभ्रमें काये करितासि वयसा ? ॥छ॥
मागिल गेलें तें कोठें ? पुढिलाचा सोसू !
दिगंबरेंविण सकल सांडिपां आयासु. ॥२॥
८४४
निदान पावलें; जरा संचरली देही.
देह चि जाईल; मग, येर कवणें ठायीं ? ॥१॥धृ॥
सावधानु होइं रे ? अरे ! सावधानु होयीं;
कां तुं निदसुरा ? मना ! सावधानु होइं रे ! ॥छ॥
वन्हि लागला घरा करिसी कां सोसु ? रे !
दिगंबरा स्मरें आतां; मांडला विनाशु रे ! ॥२॥
८४५
चाली भिन्न.
धन, धनद, कनक, वनिता, दुःखद रे ! अरे श्रीदत्ता !
तुजवीण मीं न भजें दुसरें; मायावी सर्वथा. ॥१॥धृ॥
अरे ! प्राण ! अरे प्राण ! अरे ! प्राणा ! अरे ! प्राणा !
तुझा ठायीं गुंपली वासना. ॥छ॥
भयभयदभान भजतां श्रमभ्रमु जाला चित्ता.
दिगंबरा ! भवतमहरणा ! निवारीं ते वेथा. ॥२॥
८४६
जळ चंचळ चाले सरिता; वोसरेल ते मुहूर्ता.
क्षणक्षणां क्षिण क्षणभंगुर हें शरीर सर्वथा. ॥१॥धृ॥
अरे मना ! अरे मना ! अरे मना ! अरे मना ! न करी कल्पना. ॥छ॥
मन कामाकुळ न धरी स्थिरता; दमनीं परम वेथा;
दिगंबरा ! तव चरणस्मरणें नयें मीं मागुता. ॥२॥
८४७
गुणचंद्रामृतधारा द्रवती अपरांपरा.
चरणीं मोक्षद चिन्ह विज्ञानसागरा ! ॥१॥धृ॥
क्षणक्षणा, क्षणक्षणा, क्षणक्षणा, क्षणक्षणा,
क्षणक्षणा, क्षणक्षणा, पाहीन चरणा. ॥छ॥
चरणजजळसार मोक्षबीज निरंतर
दिगंबरा ! मागताहे; देयीं निरंतर. ॥२॥
८४८
परिपूर्णसुखमाना ! अरे ! कमळनयना !
पाहिन श्रीमुख तुझें; पूरवीं कामनां. ॥१॥धृ॥
प्राणु प्राणा, प्राणु प्राणा, प्राणु प्राणा, प्राणु प्राणा,
अवधूता ! परमनीधाना ! ॥छ॥
अनुसूरागर्भरत्ना ! योगीमनसरंजना !
दिगंबरा ! भेटि देयीं स्वरूपें सगुणा. ॥२॥
८४९
अनुभवितां मुखशेष माया हरले तमस.
पुडती संसारु नाहीं शरीरें. ॥१॥धृ॥
आन नेणें, आन नेणें, आन नेणें, आन नेणें,
आन नेणें, अवधूतेंवीण मीं साधनें. ॥छ॥
मुखशेष मागें द्वारीं; दिगंबरा ! मीं भीकारी.
झणें कठीण बोलसी; क्षुधीतू मीं भारी. ॥२॥
८५०
तुंडी.
आत्मया केवि जासील तुं मज सोडूनी दूरी ?
जेथ तेथ चि मी धरीन; तुझी कळली चोरी. ॥१॥धृ॥
येइं रे ! भेटि देइं रे ! देवा ! देवा ! झणें मोहिसी भावा.
भावा ! तुझी न करी सेवां, सेवा. भेद नाशना ! ॥छ॥
भान सत्येंवीण न स्फुरे; तरि तुं चि सकळ.
दिगंबरा ! परब्रह्म तूं; येर हें मृगजळ ! ॥२॥
८५१
आपुला ना मज पारिखा, तूं मीं चि मीं जरी.
त्रिपुटीचें रूप पारिखें, तें राहिलें दूरी. ॥१॥धृ॥
मोहिसी मज कासया कामें ? कामें गुण गुंपती कर्मे;
कर्में भवसागरीं श्रमे; श्रमे तुझें रूप न गमे. ॥छ॥
हातिचें हरूंनि चिद्घन, काये लाविसी चाळां ?
येकु वेळ दिगंबरा ! तुज पाहिन डोळां !
८५२
कमळनयनु सावळा दत्तु पाहीन डोळां.
मन माझें उताविळ; तेणें हर्षु वो ध्येला. ॥१॥धृ॥
सखिये ! मज नेइं गे ! माये ! माये ! वो ! तुझे धरिन पाये.
पाये ते मज जोडती काये ? काये मीं करूं ? मन न राहे. ॥छ॥
दिगंबरा प्रति जाइन; मी वो ! दासी होयीन.
दुर देशीं मज न सवे; माझें व्याकुळ मन. ॥२॥
८५३
अरे ! अरे ! परमात्मया ! तुझी कळली माया !
चातकु तूं गुणां अंतरीं आह्मां लाविसी क्रिया. ॥१॥धृ॥
राहीं रे ! देवा ! उगला राहीं; राहीं. तूं निज आपुलां ठायीं;
ठायीचा तूं सकळ देही; गुनु लाविसी कायी ? ॥छ॥
अरे ! अरे ! दिगंबरा ! तुझें कळलें आह्मां. अज्ञानें मोहिसी मायया.
येरा न चले तें मा. ऐसा लाघवी तुं मा.
आताम तें न लवी गा ! मा. ॥२॥
८५४
चाली भिन्न तुंडी.
गुणश्रवणें जाली सिराणी; ऐसा सुंगु घडला जनीं.
सुखकर काहीं न दिसे नयनीं. पुरे संसारु दत्तें वांचुनी. ॥१॥धृ॥
अवो ! मज वीषाचा मेघुळा; येणें दत्तेवीण योगधर्म गेला. ॥छ॥
संसारु हा भुजंगु माये ! मज लागला; वीष न साहे.
दिगंबरु कव्हणीं आणा उपायें; तेणेंवीण मज राहिलें न जाये. ॥२॥
८५५
भवदुःख हें सागर; माये ! पडलियें; अंतु न पाहे.
दुःख बहूत कैसेनि साहे ? पुरे, पुरे, देवा ! धरीन पाये. ॥१॥धृ॥
अरे ! मज पायाचें पायवणी देयीं; देवा ! मज सोडवी येथूनी. ॥छ॥
कर्मवेगु हा लोटीतु आहे; येथें तारक दृष्टी न पाहें.
दिगंबरा ! तुझी अंतरली सोये; आणिकाची वास न पाहें. ॥२॥
८५६
पूर्वकर्म कवण ? मीं नेणें. बोलता ही लाजीरवाणें !
मन माझें स्थीर नव्हे येणें ध्यानें;
त्यातें निग्रहितां त्रासू चि माने. ॥१॥धृ॥
देवा ! तुझें काये पां मीं चूकली ? अपराधें तेणें तुज अंतरली. ॥छ॥
शब्द जातें बाधिती बाण; काय करूं शास्त्रश्रवण ?
स्थीर करिजे केवि चंचल मन ? दिगंबरा ! किती पाहसी निदान ? ॥२॥
८५७
शब्दवाद मीं नेघें श्रवणीं, रूपगूणू दोहीं नयनीं.
तुझा वेधु मज अंतःकरणीं; येरा अर्थाची मी करीन सांडणी. ॥१॥धृ॥
अरे ! तव नामाची जपमाळामणी चाळीन हृदयीं वेळोवेळां.
दुजनाची साहीन वाणी. पुण्य पाप येथ न मनीं.
संकीर्तन तुझें घेईन कानी. दिगंबरा ! नित्य नाचैन रंगणीं. ॥२॥
८५८
चालतां पंथु वीसली रे ! बोलु बोलता माये !
देहगेहभान सकळ येणें जाहालें काये ?
मन माझें गुणीं वेचलें, तें मानसें खाये.
हें चि निमित्य वो ! आठवे; याचे पाहिले पाये. ॥१॥धृ॥
अरे ! रे ! कमळनयना ! तुझी न कळे माया.
मज माझेपण नाडले; गुणी राहिली क्रिया. ॥छ॥
चंद्र, सूर्य दोन्हीं लोपले; मज न कळे काहीं.
भूतपंचक हें सखिये ! नेणें; न पडे ठायीं.
योगवियोग हे कल्पना मन न धरी तें ही.
दिगंबरें येणें मोहिलें; आतां करणें कायी ? ॥२॥
८५९
शब्दु न साहावे श्रवणीं मज नयनीं रूप.
बोलतां कुंठली वैखरी; नेणें पुण्य कीं पाप.
देॐ तो कवणु ? न कळे; अवघे चि चिद्रूप. ॥१॥धृ॥
काये, नेणों, मज जाहालें ? पालटली काया.
गुणाचें मुख मीं ने देखें; ऐसी कवण माया ? ॥छ॥
पुसतील मज बाइया, हें वो ! जाहालें काये ?
सांगतां ही पडे वीसरू; खुण बोलतां न ये.
दिगंबराचे वो ! येकुदां होते देखिले पाये. ॥२॥
८६०
लक्षितां लक्षणें गोमटीं तुझा चरणीं आरे !
काये, नेणों, मज जाहालें ? संचरलें वारें !
पूर्णपणें वावो न दिसे; अवघी चि मीं स्फुरें. ॥१॥धृ॥
अरे ! अरे ! गुणगोवळा ! तुझी न कळे कळा.
दाउनीयां जग मोहिसी; ऐसा सांडीं हा चाळा. ॥छ॥
भान तें सर्व अभावलें; कैसें जाहालें ? माये !
मीपण नाडळे सर्वथा; आतां करणें काये ?
दिगंबराचे कवण आतां पाहिल पाये ? ॥२॥