६४१
गनना चि ऐसा आहे. दुजे वस्त्र मातें न साहे.
नेसवावें कैसें काये ? तया पुरेसे काय आहे ? ॥१॥धृ॥
आतां असावे स्वस्थिती, वस्त्राची सांडूंनि भ्रांति. ॥छ॥
आछाने नाछादे, आछादन रूपीं छादे,
अवघा चि पूर्णानंदें, दिगंबरु वस्त्रा भेदे. ॥२॥
६४२
देश - काल - वस्तु - त्रय - माजि जया वतें ज्ञेय;
पूर्ण पद निरामय अवघें चि मीं अद्वय. ॥१॥धृ॥
आतां सोविळें कैसें बैसावें निराभासें ? ॥छ॥
गुण छेदलें अनुपायें. स्पर्शु मायेचा न साहे.
दिगंबरा ! व्यक्ती न ये. तया सोविळें ते काये ? ॥२॥
६४३
मंडल न दिसे ज्ञेय. लोपलें कालत्रय.
ब्रह्म अवघे अद्वय, स्व - स्वरूप, अव्यय. ॥१॥धृ॥
आतां करणें कैसी संध्या ? मातें विद्या, नां अविद्या ! ॥छ॥
गुण क्रियेचां संलोपीं, स्थिती असतां निर्विकल्पीं,
संध्याचि गेली लोपीं, दिगंबरीं आप रूपीं. ॥२॥
६४४
निरवैव, गुणातीतू, अवघाचि सदोदीतु.
दृश्य छेदिलें वीवर्त्तु. यज्ञाची काइसी मातु ? ॥१॥धृ॥
आतां असावें स्वस्थिति, क्रीयेची करूंनि विभूती. ॥छ॥
हव्य, होतां, ना आचरण. अग्निमंत्रु, ना वीधान.
ब्रह्माग्नी करितां हवन, हेंचि केलें म्या अवदान. ॥२॥
अन्वयें न थरे भाॐ. व्यक्तिरेके सर्व अभाॐ.
दिगंबरु ठायें ठाॐ. यज्ञु भोक्ता कर्त्ता देॐ. ॥३॥
६४५
देॐ ह्मणौनि आलों पासीं, मूळ आठवे मनासी.
तेथें देॐ पडला ग्रासीं. वाॐ न दिसे क्रियेसी. ॥१॥धृ॥
आतां पूजावें कां देवा ? वीसरलें भिन्न स्वभावा. ॥छ॥
देॐ भक्तु ना वीधान. पदार्थ कैचें आन ?
स्वस्थीतीचें पूजन. दिगंबरीं निश्चळपण. ॥२॥
६४६
नित्य चंचळ जळ वाहे सरिता. क्षण क्षणा वय दिसताहे सरतां.
तद्विषयीची न करिसी चिंता. प्राणु देतासि, अर्थु वो सरतां. ॥१॥धृ॥
जन ठकलें ये संसारीं. लाभु थोडा; हानीचि भारीं. ॥छ॥
अर्थ वेचितां आपार कोटी. गेलें आयुष्य; न पडे दृष्टी.
दिगंबराची कासेनि भेटी ? प्रति जन्मीं तूं ऐसाचि कष्टी ! ॥२॥
६४७
अस्थी हाणिजे जैसें श्वान; ते अस्थि चि जाये घेउंन ?
तैसें पापे देह निर्माण; तें चि धरूनि बैसताहे जन ! ॥१॥धृ॥
आतां दंडावें ते कैसें ? अवकाशु दंडा न दिसे. ॥छ॥
मळपंकाहूनि काहीं आतां दंडु उरला नाहीं.
देहीं आसक्तु होता देही, दिगंबरु न पडे ठायीं. ॥२॥
६४८
वय जातसे सरसरां. आंगीं संलग्न जाली जरा.
तापत्रयाचा उभारा. मनें सांडियेलें विचारा. ॥१॥धृ॥
जना काये पाहातासि आंग ? कुंठले च्या - र्ही मार्ग. ॥छ॥
काम - क्रोध नित्य वैरी. अहं ममता भत शरीरीं.
तरसील कवणे परीं ? रीघ शरण दिगंबरीं. ॥२॥
६४९
मन चंचळ, भ्रमित, विकारी, हीताची सोये न धरी.
अविवेकु तयावरी काम - क्रोध हे भ्रामक वैरी. ॥१॥धृ॥
ऐसी अडचणि जाली जीवा. वायां गेला जन्मु अघवा. ॥छ॥
देह प्रारब्धा अधीन. वरि लौकीक पाश गहन.
देह गेलें वायां वीण. दिगंबराचें नटके ध्यान. ॥२॥
६५०
विषयांचें करितां ध्यान, जन्म गेले वायां वीण.
पुढें परति न धरी मन. दुःखा न दिसे अवसान. ॥१॥धृ॥
कट्टा मर ! मर ! रे ! अज्ञाना ! किती भोगिसी जन्म - मरणा ? ॥छ॥
पुर्वीचें कोठें आतां ? आताचें तैसे पाहातां, ॥ रे ! ॥
येकला तूं येतां जातां. दिगंबरु स्मरें भ्रमीता. ॥२॥
६५१
चर्म रोमाचें आवर्ण; मासाचें परिपुष्टपण;
उभयात्मक सुंदरपण; अस्थि लाउंनि केलें कठिण. ॥१॥धृ॥
याचा भीतरु पाहें पां कैसा ? काये पाहातासी आरिसां ? ॥छ॥
द्वरें नव ही द्रवती मळ. रक्तमय चि सकळ.
पाकीं द्रवे परम कुश्चीळ. नाम, रूप मिरविति बरळ. ॥२॥
प्राणसंगें चंचळपण तेथें घातलें तुतें जाण.
देह येणें रूपें पतन. दिगंबरा प्रति रिघ कां शरण. ॥३॥
६५२
देह कुश्चिळ तुझा ठायीं. तें बा ! जीवेसीं धरितासि कायी ?
हासे; तयासि बोलूचि नाहीं. क्रोधु येतुसे हें भांडायी. ॥१॥धृ॥
आतां हासावें तें कित्ती ? तुझी तुज आंगी न कळे प्रतीती ! ॥छ॥
कर्म करितांसि, तें सर्व खोटें. काम - क्रोध नरकप्रद मोटें;
दिगंबरु तुजप्रति कोठें ? धिग्य ! ह्मणतां, परम दुःख वाटे ! ॥२॥
६५३
सिमुरा प्रति दर्पुणु गेला. तेणें पाहावा ही अवगुणु आपला.
तया क्रोधु कां तेथें आला. तैसा उपदेशु न रुचे खला. ॥१॥धृ॥
आतां हासावे तें कित्ती देवराया ! पुडतो पुडती ? ॥छ॥
अवगूणु तो आपुलां ठायीं. तेथें दर्पणें केलें कायी ?
दिगंबरा ! कळलें ये देहीं ::- ऐस्या मनुजासि लाजचि नाहीं ! ॥२॥
६५४
कंठु हरणीं वस्त्र गळालें ! तेथ पाहाणारीं काये केलें ?
वर्म - वादें आपणूं चि बोले. ध्यानी निद्रया तैसेंचि घडले. ॥१॥धृ॥
आतां हासावें तें कित्ती ? डोळे ध्यानी उन्मत्तु हस्ती. ॥छ॥
अवगूणु आपलां आंगीं. तरि साहावी मरमर अवघी.
क्रोधु काइसा ते प्रसंगी ? दिगंबरा ! हे देखिलें जगीं. ॥२॥
६५५
कथा पुराणीं लागे डोळा. कैसा हालुतसे हिदोळा ?
बैसलीया अमृतकळ, तत्व न घोटे चांडाळा. ॥१॥धृ॥
तया उपदेशु कीजे कैसा ? झणे येईल रोषावेषा. ॥छ॥
दुर्लभ मनुज - शरीर; तेथें आरोग्य तें ही थोर;
वरि पडलें श्रवणसार; कैसे वंचताति पामर ? ॥२॥
तूज कैंचा रे ! सत्संगु ? दैवें सांपडला सूमार्गू !
वाया जातसे अवघा योगू ! दिगंबरेंसीं न तुटे वियोगु. ॥३॥
६५६
विषनिद्रे सुखकर शिवणां ! काये भजतासि परम अज्ञाना !
पालासि, जाण, निदाना. ॥१॥धृ॥
रे विषविषयांचें सेवन प्रीति - रसीं सिके अंतःकरण. ॥छ॥
संसार, सुखदुःख, सकळ रस, रागु, रमन, तळमळ,
भ्रमु बाधकु मायाजाळ, दिगंबरेंवीण दुःखासि मूळ. ॥२॥
६५७
ग्रह जळे; तेथ सार विसरा कां ठेवितासि ? रे ! गव्हारा !
क्षीण जातसे वय सरसरां. येथ काइसें सोसणें उपचारां ? ॥१॥धृ॥
जना ! तूं कां रे ! नीदसूरा ? धरीं परति न धरीं अविचारा. ॥छ॥
जीणें परमीत; देह जाइजणें. येथ ममता वोखटी लाहो करणें.
दिगंबरु गुरू साधे येणें जरि; तरीचि कृतकृत्य जीणें ! ॥२॥
६५८
रिक्त भरे झरे; भरली उमरे. नाहीं उसंतु तेचि ते विचरे रे !
राहाटी जैसी घटिका वा ! रे ! कर्म - भोगें तद्वतें देहांतरें. ॥१॥धृ॥
जना विश्रांति पावसी केधवां ? जन्म, मरण न सुटे यया जीवा. ॥छ॥
देह कर्मज, कायज. कर्म -- माजि सुखदुःख भोग परम.
तेणें बळवंत परतले काम. जन्म कर्मद प्रसवती धर्म. ॥२॥
ऐसे बद्ध जाहाले जन सकळ. जीवा कित्ती करिसी तळमळ ?
दिगंबरेंवीण दुःखासि मळ तुझें तुज चि कर्म सकळ. ॥३॥
६५९
तारुं बुडताहे भव नद सरसीं ! येथ कवण तारक माया तमसीं ?
त्याची सोय न कळे; भ्रमु मनसीं !
जना ! जन, धन वायां कवळीसि ! ॥१॥धृ॥
रे ! जन बुडालें ! बुडालें ! गुरुचरण न धरी; काहीं केलें !!! ॥छ॥
जडु जडपणें बैसे तळीं क्रियापरजनु पडला ढाळीं.
दुर्जनाची गति काये जाली ? ते न कळे ! कवणें भरी भरली ? ॥२॥
काम तळपती जळीं जळचरें ! आघातु, गुणवेग मुर रे !
येथें न तरिजे दिगंबरें. जना ! न कळे वीहित; हीत विसरें. ॥३॥
६६०
कोलिसांचें न सरे काळें; तैसें भरलें देह विटाळें.
तया काइसें वरि सोविळें ? अस्थि - मास - चर्मज वोळें ! ॥१॥धृ॥
जनां धरि कां रे ! कांटाळा ? देह सोडूंनि होईं निराळा. ॥छ॥
नानां देहिचें क्रियमाण संचीत पातक, जाण;
तेणें प्रलिप्त जालें मन. काये करितासि वरि वरि स्नान ? ॥२॥
पापवासना न धुपे जळें. केवि सुटसी तूं कर्ममळें ?
दिगंबरें मन सोवीळें आतां होयिल कवणें काळें ? ॥३॥