मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद २८१ ते ३००

दासोपंताची पदे - पद २८१ ते ३००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


२८१
बोला सारिखी करणी कांहींचि न दिसे ! कां बोलु बोलसी सेरा; रे !
ज्ञानहीन परिबोलके पक्षी न पवती तत्वनिर्द्धारा रेया ! ॥१॥धृ॥
आपआपणा पाही; खुण जाणोनि उगलाचि राहीं; बापा ! ॥छ॥
कर्दमरसें मांतुले दुर्दुर शब्द करिती ! कानु देउंनि तेथ कायी रे ?
दिगंबरेवीण शास्त्राचे जाळ श्रमकर होये देहीं. ॥२॥

२८२
बगाचा तपु काये मानितासी रे ! मना ? तया हृदयीं कुश्चिळ आहे रे !
देहीं ध्यान; मन विषयांचा ठायीं; नरु येरु ऐसाचि पाहे रेया ! ॥१॥धृ॥
हातीं सहज चाळा; मणि वाळितुसे जपमाळा; रे बापा ! ॥छ॥
मानसीक तेंचि केलें; येर अवघेचि वावे. जपु ना समाप्ती रे !
दिगंबरा ! जन वायां गेलें; व्यर्थचि पडिले भ्रांती. ॥२॥

२८३
विषाचां गुसळां अमृत निघाले. मना ! करि करि कां वर - पडो रे !
तैसा संसारू मायीकु; भजतों सद्गुरूची जाली जोडि रेया ! ॥१॥धृ॥
सावळें रूप डोळां मी पाहिन वेळोवेळा श्रीदत्तु. ॥छ॥
वारूळ खणतां निधान लागलें. साटवीता गगन न पूरे रे !
दिगंबरु गुरू आत्मा सन्मय; नेणती या पामरें रेया ॥२॥

॥ भिन्न चालि ॥
२८४
बहु जन्म गेले वायां गुणी गूण भजतां.
श्री दत्तस्मरण काहीं केलेंचि नाहीं. ॥१॥धृ॥
सखिये ! मन माझें कयी लागयील सद्गुरू पायीं ? ॥छ॥
देह गेह सर्व माया तेणेवीण पाहातां.
दिगंबर ध्यान माये ! जीवन देहीं. ॥२॥

२८५
कमळनयनरूप हृदयीं मीं साटवीं;
तेणें संजीवन अवो होईल जीवीं. ॥१॥धृ॥
बाईये ! मन माझें कयीं निश्चळ होइल हृदयीं ? ॥छ॥
दिगंबरु दीनत्राता हृदयीं भरला माये ?
तेणें माझें मन अवो ! वीरोनि जाये. ॥२॥

२८६
हृदयकमळ कोश सदीप जाहालें.
तमस मीपण तें वो नाशोनि गेलें. ॥१॥धृ॥
बापा ! तुझें ध्यान देहीं आपपर नूरवी कांहीं. ॥छ॥
दिगंबरु दीनमणी उदयातें पावला;
गुणाचें बोधन भान नाशूनि ठेला. ॥२॥

२८७
आपुला तूं कैसा होसी ? चरण झाडीन केंसीं.
अवधूता ! सांग मातें तें पद देसी. ॥१॥धृ॥
बापा ! तुझें ध्यान कयी अनुश्रुत लागैल हृदयीं ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझी माया, सूर मोहले जीयां,
न तरवे, जाण, आह्मां साधन - क्रीया. ॥२॥

२८८
अनुकंपामृतधारीं घनु वोळला अंतरीं.
निमालें मीपण मन त्रिगुण विकारी. ॥१॥धृ॥
देवा रे ! भेदभावना नाहीं तुझा रूपीं अगुणीकहीं. ॥छ॥
दिगंबरा ! तूं चीदात्मा; प्रपंचु कैंचा आह्मा ?
पुडती बोलणें नाहीं पूसणें तुह्मां. ॥२॥

२८९
विषयांचा भासू गेला. गुण भान नाशलें.
सुखाचें स्वरूप मन मोहूंनि ठेलें. ॥१॥धृ॥
देवा ! तुझें नाम जपो. रूपें तव स्वरूपीं हारपों. ॥छ॥
दिगंबरा ! सत्य तें तूं, मजप्रति मानलें.
आणीक साधन भ्रमु होउंनि गेलें. ॥२॥

२९०
॥ माळ गौडा ॥
सुरतरु चिंतामणी यीं जालीं ठेंगणीं.
ते गुरुचरण दोन्हीं ध्याईं; मना ! ॥१॥धृ॥
हें मोक्षसाधन मंत्र अनुष्ठान न करीं न करीं. ध्यान अतःपर ॥छ॥
दिगंबरा ! तुझें ध्यानचि तारक. नरमती चरणीं मूर्ख पामर ते. ॥२॥

२९१
अवनीतळगत जळ नदिया नद कल्लोळ;
परि तें ने घे जळ चातकु जैसा :: ॥१॥धृ॥
तैसा मी चातकु तुझा विश्वंभरा ! करुणामयजळधरा ! कैवोळसी ? ॥छ॥
दिगंबरा ! जाण, तूं माझें जीवन. तुजवीण पंचप्राण वायां जाती. ॥२॥

२९२
पुराण ! पुरुषेश्वरा ! गुरुमुर्ती ! दातारा !
लीला - विश्वंभरा ! दत्तात्रेया ! ॥१॥धृ॥
तुझें चरणस्मरण मायादहन. भवहर संकीर्तन बखताहे. ॥छ॥
अखिळविश्वधरा ! धर्मज्ञा ! ईश्वरा !
शिव ! शिव ! दिगंबरा ! योग - मूर्ती ! ॥२॥

२९३
गगन घालुंनि पोटीं गुणाची त्रीपुटी,
सबरा भरीत दृष्टी पडतासि कां ? ॥१॥धृ॥
चंचळ माझें मन करितों तेथें लीन.
कायसें भवबंधन तयावरी ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझें स्वरूप असंग. बुद्धी अंतरंग भासतें का ? ॥२॥

२९४
रूप नाहीं तया दृष्टी कें पाहील ? मनकरण सकळ भांबावले. ॥१॥धृ॥
ऐसें तें विज्ञान तत्त्वात्मदर्शन. बुद्धीचें कारण बोद्ध्य नव्हे. ॥छ॥
दिगंबर परब्रह्म निरायम. ज्ञातें ज्ञान ज्ञेय तेथें कैचें ? ॥२॥

२९५
जाणीव नाहीं; परि जाणणें साचार;
मीपण मारूंनि परब्रह्म आत्मा. ॥१॥धृ॥
ऐसें हें वचन मानिती सज्जन. सहजीं सहजपण तेही नाहीं. ॥छ॥
दिगंबर ! ऐसें गुरुगम्य तत्वता. या डोळां पाहता न लाहिजे. ॥२॥

२९६
पूर्वी आह्मी काये ? कवणाचे कैसे ?
हे तुजप्रंति मी पुसे; सांगे देवा !
आतां तुजसी आन आह्मीं विलक्षण;
प्रकट अघट घटण कैसें घडलें ? ॥१॥धृ॥
करि कां मजसी वादु ? जालों मी सावधु;
कायीसा भवबंधु दावितासी ? ॥छ॥
मीपण माझें काये ? मजप्रति कें आहे ?
सिवैन तुझे पाये यये अर्थीं. सकार्यकारण तूंचि सर्व भान
दिगंबरा ! जाण, जाणीतले. ॥२॥छ॥

२९७
अंतर्यामीं तूं करण - नियंता;
तरि कर्मफळभोक्ता मीं तो कैसा ?
सर्वांचें निदान तूंचि, उपदान;
तरि कें भवबंधन परमपुरुषा ? ॥१॥धृ॥
वर्म हें निर्वाण बोलिलों वचन;
सकळ साधूजन परिस - तूं का ? ॥छ॥
तुं आत्मा अंतरीं; तरि मीं कवणु दूरीं ?
सर, सर, तूं संसारीं कैसा ह्मणसी ?
दिगंबरा ! जाण, सांपडली खूण;
आतां मजपासून कैसा जासी ? ॥२॥

२९८
भवदुःखे गादलें, तुतें शरण जाये; झडकरि त्याते पाये दावावे कीं !
कर्मांचा अधिकारीं घातलें तें दूरि;
हे पै तूझी थोरी कैसी लोकीं ? ॥१॥धृ॥
वायाविण निर्वाण पाहातासि देवा; सत्य सकळ तुवा सांडियेलें ! ॥छ॥
अविद्या कैसी ? कवणे सिद्ध केली ? आह्मां कां लाविली खरतर माया ?
दिगंबरा ! तूंवीण दुजे कैचें स्थान ? गुंपलें अज्ञान नुमजे तया. ॥२॥

२९९
जळ चंचळ जाये; सागरीं सामाये; सर सरितां कें लाहे पूर्व - रूप ?
तैसें तुझां रूपीं मिनलों निर्विकल्पां !
आतां कें पुनरपि आया गमन ? ॥१॥धृ॥
सर्वाचें कारण, ह्मणौनि तुझे ध्यान, प्रेम संकीर्तन, दत्तात्रया ! ॥छ॥
घटीं घटपण अघट जालें तें अस्पष्ट;
नभि नभ नभसे स्पष्ट भिन्नपणें.
तैसें माझें मन नुरउंनियां मीपण तव चरणीं सूलीन दिगंबरा ! ॥२॥

३००
योग - विज्जन हृदय - भूषण स्वरूप सगुण सावळें.
नित्य निर्मळ केवळ भक्त जेथ विसांवले.
साधुवंदित सुरनरार्चित नित्य युक्त विराजले.
हृदयमळ भवबंधमोचन, भेदु ज्याप्रति नातळे. ॥१॥धृ॥
देखिलें ! देखिलें परमपद शिव देखिलें !
नित्य निर्गुण स्वरूप सगुण दत्तरूप विराजलें. ॥छ॥
पुण्यकीर्तन, परमकारण, सत्य, सद्गुण - भाजन,
पाप - ताप - विलाप - नाशन, साधकां सुखसाधन,
भवभयांतक, मुक्तिदायक, ब्रह्म, एक, निरंजन,
दिगंबर, निजमायया गुणगुप्त, पंकजलोचन. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP