२६१
चंद्रू वो ! चांदिणें चंदन आंगी न साहे.
वियोग - तापु तपे; तपिया तापनु सुमन सेज; करूं काये ? ॥१॥धृ॥
सखिये ! सावळ्या ! सुंदरा ! वेधलें माझें मन वो !
गुंपले अंतःकरण देह गेह सुख सांडुनि सर्वही लागलें अखंड ध्यान ॥छ॥
दीपक निर्द्दीप; गायन खोंचती बाण वो ! शब्द खरतर बाण !
दिगंबरेंविण शरीर आपुलें सांडीन, हें मीपण. ॥२॥
२६२
परवशा डोळुलया ! स्पंदन करिसील काह्या रे !
उद्बोधु करिसील काह्या रे !
मायेबापु दूरदेशीं स्वजन; सांडियेलि तेहीं माया. ॥१॥धृ॥
बाइ - ये ! मने माझें उन्मळले. तदंग लागले ध्यान वो ! तन्मय जालें वेदन.
कृष्णरूप निरजाकृत लीचन कै कयी पाहीन ? ॥छ॥
देखियेला दुरूनि; पालटु जाला हृदयीं वो ! संतोषु वाटे देहीं !
दिगंबरु परमात्मा सखिये ! आळंगीन दोहीं बाहीं. ॥२॥
२६३
पालऊ न सोडीं; येयिन मी तुजसवें रे ! येईन मीं सवें, सवें !
मायबापु तूं दत्तात्रेया; सांपडलासि दैवे. ॥१॥धृ॥
आतां कठीण न करावें. पाये मीं साडीन केसीं रे! चरण झाडीन केंसीं !
अवधूता ! मीं बाळक धाकुले; सांडूनि कैसा जासी ? ॥छ॥
मन माझे परतेना. करीन येथे निदान रें ! करीन मीं निर्वाण !
दिगंबरु तूं आत्मा सगुणु; माझें पांचही प्राण. ॥२॥
२६४
पाडसा ! चूकलिया कुरंगिणी वन पाहे रे ! हरिणी वन भ्रमताहे ! ॥०॥
वत्सालागि वन सांडुनिया धेनु धांवतीसे लवलाहें. ॥१॥धृ॥
ऐसा कै येसी मजलागी ? उचलूनि च्यार्ही भूजारे ! पसरूनि साही भूजा.
अवधूता ! माझी माये तूं; जरि न धरीजो भावो दूजा. ॥छ॥
चांचु वा कण वेंची; पिलया पक्षिणी धांवे रे ! चारा घेऊंनि धांवे.
दिगंबरा ! मी पोटिचें बाळक; स्नेह कवणें लावावें ? ॥२॥
२६५
करुणामृत धारा झरझर झरती निसारा रे ! द्रवती सैरावैरा ! ॥०॥
सद्गुरु - मेघ वोळला; हृदयीं वीराली तेथ धरा. ॥१॥धृ॥
सखिये ! मन माझें वीरालें. देहासि ठावोचि नाहीं वो !
दृश्य तें काहींचि नाहीं. आदि - अंत - मध्य - वीहिन केवळ
मीचि मी तत्व अदेहीं. ॥छ॥
जाणपणें सूटलिये; गुणगण अगुणी विराले वो ! ॥०॥
गुणगण ब्रह्मचि जालें. दिगंबरें माझें हरिलें
मीपण. कळतचि कांहीं न कळे. ॥२॥
२६६
अवधूतु आत्मा गुणतंतु माये !
सखिया बोलती काये ययाला ? ॥१॥धृ॥
प्राणु देयीचे मनधी, ययाला, ययाला. ॥छ॥
अवृत्ती पाहें. गुणवंतु नोहे. जाणपण आंगीं न साहे ययाला.
दिगंबरु माये ! रंजवीतु आहे. विसरली मी मज सोये. ॥२॥
२६७
स्पर्शसुख माये ! अगणीत आहे.
हृदयीं भेदु न साहे ययाला. ॥१॥धृ॥
बाहीं धरूनि कवळा, ययाला, ययाला. ॥छ॥
अभिनव माये ! बाळक पाहे; रूपीं रूप सर्व समाये,
ययाला. दिगंबरु आत्मा ज्ञाणीतली खूण.
द्वैतमती येणें न राहे ययाला. ॥२॥
२६८
रूपीं चित्त माये ! अनिवड होये.
जालिया परति न साहे तयाला. ॥१॥धृ॥
स्वजन वीजन नावडे, तयाला, तयाला. ॥छ॥
गुणस्पंदु राहे, ऐसें मी न पाहें. चित्त दुश्चित्त. करूं काये ययाला ?
दिगंबरु देहीं देहेसीं अदेही. विरे मन, परति न साहे तयाला. ॥२॥
२६९
अर्थसुख माये ! क्लेशकर आहे.
विषयीं चित्त न साहे तयाला. ॥१॥धृ॥
धनें स्वजनें वेदना, तयाला, तयाला. ॥छ॥
क्रियाबीज होये; अर्थु मीं न पाहें. मनस विकृति घेत आहे तयाला.
दिगंबर मायेवीण न राहे. लागली मी माजि सोये ययाला. ॥२॥
२७०
सर्व सुखदाता सद्गुरुमाये हृदयीं केवि स्थीरु होये ? बाइये ! ॥१॥
चळे चंचळ मनस, बाइये ! बाइये ! ॥छ॥
दिगंबर तत्व चित्सुखमान तुरीयां भेदूंनि पाहें; बाइये ! ॥२॥
गौडी [ चालि भिन्न ]
२७१
गेलें वो ! माये ! क्षीण पळ पळ.
मनुज शरीर सेतु, माये ! अर्थ भोगू करू काये ? ॥१॥धृ॥
माये ! वो ! विकळ वो ! मन त्रिगुणी भूत हैं. ॥छ॥
साधन पर चेतन देखैन हें कैं के ? नित्य लागैन ध्यान मज कै कै ?
दिगंबरु हा गुणगोचरु नव्हे; गुण भाव रूप अगूण; माये वो ! ॥२॥
२७२
विषयांची मति अति प्रीति; तळमळ करूंनि कवणि हेतु तेथें ?
योग भंगू बाधिताहे. ॥१॥धृ॥
माये वो ! न कळे वो ! मन विकळ जातसे. ॥छ॥
श्रवणसुख सेवन साधन हें कै कै ? नित्य मनन भजइन कै कै ?
दिगंबरु हा माये ! मी माजि देही श्रवणाश्रय रूप अगूण. ॥२॥
२७३
न गणवे माये ! क्षिती - तळ - गत - जळ. पाहोनी कवण काज तेणें ?
अर्थु तोची मुख्य होये. ॥१॥धृ॥
माये ! वो ! आपलें चेतन आपण लाहिजे. ॥छ॥
श्रवण बहु साधन श्रमद तें है है. तत्व - वीषयीं गुणहीन है है.
दिगंबरु वो ! द्वैते - वांचूनि आहे.
न दिसे वो ! खूण अखूण माये ! वो ! ॥२॥
२७४
सत्य - प्रिति, श्रवण, भजन, तें अनुश्रुत, तद्रूप मानस करीं. ॥१॥धृ॥
नये अनुमाना ज्ञाना परी. ॥छ॥
गुण - गण - सिद्धया ज्ञानें तळपतिल. करणें न जाति सरी. ॥छ॥
दिगंबर परब्रह्म न भजवें घेतांचि गुणवरि. ॥२॥
२७५
दिनु गेला व्यापारें; निषा निद्राभरें; कांहीं मज येणेप्रकारें घडेचिना.
तुझें मुख मीं आतां केवि पाहों ? श्री दत्ता !
करूंनि करूंनि वेधा, देईन प्राणु. ॥१॥धृ॥
काये बोलें तर्हि; मीं निर्वाण. चंचळ माझें मन.
हितविषयीं वेदन स्फुरेचिना. ॥छ॥
काम, क्रोध मज भारी बाधिति ये संसारीं. मनसा मदमत्सरीं वेढाविलें.
दिगंबरा ! जाण, वरि आलें निर्वाण; आतां
तुजविण आन नाहीं मातें. ॥२॥
२७६
बाळपणें क्रीडणें; यौवन विषयध्यानें;
जरा अतिक्षीणपणें वेचली माझी.
येणें देहें, जाण, नटकेचि तुझें ध्यान;
काये करूं स्मरण ? वाटे शंका. ॥१॥धृ॥
काये विनउं रे ! तुजप्रति; पडली हे भवभ्रांति;
अतिविषयीं आसक्ति सुटेचिना. ॥छ॥
जन, धन, यौवन, जाया; भ्रमु जाला आत्मया.
न घडे, ते ते क्रिया घडली मातें.
दिगंबरा ! जाण; वरि पडलें निर्वाण;
कंठीं ठेउनि प्राण स्मरण करीं. ॥२॥
२७७
नरदेह वेचूंनि जोडिलें भवबंधन; दुर्गतिपतन सिद्ध केलें.
वेचूनि धन पीयूष; जोडी भरिलें वीष;
मरमरपर अविनाश लागेचिना. ॥१॥धृ॥
काये करी रे ! उपदेशु ? आपुला आंगी दोषु;
नरु मी नव्हे पशु जालों ! देवा ! ॥छ॥
दिवसाचि आंधारे, कामक्रोधवारे, श्रमतांही व्यापारें, श्रमु न वटे.
दिगंबरा ! आतां किती करणे वेथा ?
तुजविण आतां त्राता दुसरा नाहीं. ॥२॥छ॥
२७८
दिवसा अस्तमान हृदयीं पडलें खा;
नेलें माझें चिद्रत्न; काये करूं ?
बाहेरि ना अंतरीं गेलें कवणेपरी ?
माये ! माझी मजवरि चोरी आली. ॥१॥धृ॥
माये ! धरा वो ! हें मन माझें; नव्हते येथें दुजे; सारी
आली धनगुण धनकाजें; येणें नाशिलीं. ॥छ॥
गुरुमुद्रा रंगिली; असिद्धि कळसा नेली; समाधि विसंचिली येणें मनें.
दिगंबरा ! जाण; दिधलें तें तुज मन;
योगधन चिद्रत्न अवघेनसीं. ॥२॥
२७९
किरणांचा अंतरीं जळ भासु भासला; तेथें हरणु पाणियाम आला रे !
जळ वाॐ; परि आशा न तुटे; तोचि न्याॐ मज जाला रेया ! ॥१॥धृ॥
विषयीं मन भ्रमताहे. सत्य नेणें; परति न साहे माझें. ॥छ॥
दिपावरि पतंगु आपणूंचि पडिला. किं तो परवशु प्राणो गेला रे !
दिगंबर तैसा सावधु नव्हता; मीं येकुं वायां गेला रेया ! ॥२॥
२८०
विषाचा अरुवारीं सुखाची निद्रा; मरमर करिसी गव्हारा रे !
सुख तोचि भ्रमु वृथा; मरण न भूल; या संसारा रेया ! ॥१॥धृ॥
मन्ना परतोनि पाही. सुख पावसील तूं, ठाइचें ठाइं, आतां. ॥छ॥
कामाचेनि बोलें कां भ्रतासि मनसा ? सेषी कामुचि तुझा वैरीरे !
दिगंबराप्रति रिघ कां शरण; ब्रह्माची पावसी थोरी रेया ! ॥२॥