६२१
दंभ, दर्प, देहगत मद - मत्सरें हृदय लिप्त.
आशा धरूंनि भ्रमे चित्त. तया साधन नव्हे उचीत. ॥१॥धृ॥
जना ! न करीं रे ! आयासू, तेणें योगें चि पावसी नाशु. ॥छ॥
पात्रशुद्धीविण साधन, योग तप सुक्रिया ज्ञान,
होय अनर्था कारण. दिगंबरचें नलगे ध्यान. ॥२॥
६२२
हर्ष विषाद भरलें मनीं. संपादी वैराग्य वदनीं.
जन मोहक वर्ते जनीं जळो ! जळो ! जळो ! तयाची करणी. ॥१॥धृ॥
आतां कैसें पद पाविजे ? साधनीं आघातु वाजे. ॥छ॥
दीपु न धरे वाव घणी. ज्ञान चंचल गुण वारणी.
फळ काये त्याचां वचनीं ? दिगंबर प्राप्ती वांचूनी. ॥२॥
६२३
योगहीन करचरण, प्राण, शरीर, श्रवण, नयन,
ऐसया आलें मरण. झणें घेतु तया श्वान. ॥१॥धृ॥
धीग्य शरीर तयाचें. श्वाना हीन करी सुखाचें. ॥छ॥
कडू तुंबा; वरि नाशला; श्वानाचा वमनी पडिला.
तैसा तो येकू वायां गेला. दिगंबरातें चूकला. ॥२॥
६२४
श्रमु न मनी भ्रमतां; नीचाची सेवा करितां.
मन गुणहीन करितां वेथा, मानी तो येथ सर्वथा. ॥१॥धृ॥
देवा न पाहे मीं पृष्ठी. झणें होयील तुजसीं तूटी. ॥छ॥
नेणे पापाचा कांटाळा. बहु ग्रामणींचा चाळा.
शांति न धरी चांडाळा जळो ! जळो ! त्याची कळा. ॥२॥
वेषु दंभाचि कारणें. धूपो हृदय निखळ तमोगुणें.
दिगंबरा ! सत्य जाणे ::- त्याचें वदन नाहीं पाहाणें. ॥३॥
६२५
चार्ही वाचा गळती घाणा. जाला शब्दाचा उगाणा.
आतां बोलैन मनिचीया खुणा. क्षणें आडळु होये श्रवणा. ॥१॥धृ॥
ऐसें विनवीं मीं साधूतें. भरले ते रीते भरितें. ॥छ॥
गगनाहूंनि पातळ आहे. परिशून्यत्व आंगीं न साहे.
देखणया मारूनि पाहे. दिगंबराचें दुसुरे खाये. ॥२॥
६२६
गगनाची परतली दृष्टी. पाहे ब्रह्मांडाचिया कोटी.
देहाची काइसी गोष्टी ? प्रपंचु कवणे कपाटी ? ॥१॥धृ॥
माझें मीपण उरले तेथें. तें सरेल माझेनि हातें. ॥छ॥
मूळ पाहातां काहीं चि नाहीं. येथ पुरुषार्थु प्रलपन कायी ?
दिगंबरीं वीवर्त्तु वायी. शुद्ध ब्रह्म सकळ अदेही. ॥२॥
६२७
गगनाचें फळ तोडीलें ! आंधारें धरूनी पिळिलें !
वंध्येचें बाळ वधिलें ! मृगजळ निर्दव केलें ! ॥१॥धृ॥
तैसें अविद्या - गुण - भान बोलों नीराकरण ! ॥छ॥
छायेचा केला वधू ! सर्प नव्हे फरकटि छेदु !
दिगंबरी द्वैतोच्छेदु. बोलिलों मिथ्या - वादु. ॥२॥
६२८
प्रळयार्णव; आलें भरितें. व्योम भरींव; परी तें रीतें.
नीरस छिछद्र; नीरंतर तें. वाॐ नेदी निजगुणातें. ॥१॥धृ॥
जन बुडालें ! बुडालें ! जीत, जीवत्व ठायीं निमालें ! ॥छ॥
जाणवलें जाणीव खाये. नेणीवा जाणवत आहे.
जाणों, नेणु, जाणे काये ? नेणों जाणे, तो रूप न लाहे. ॥२॥
जाणवलें तरि ते नोहे. नेणवे तै बोलणे काये ?
दीगंबरीं मन न रहए. ते जाणत जाणणें न साहे. ॥३॥
६२९
युक्ति करितां निर्वीकल्पी, स्फूरे तें आपुलां लोपी.
लोपेना सच्चिद्रूपीं. प्रकाशेना प्रलापीं. ॥१॥धृ॥
आतां बोलावे ते कायी ? संकल्पा ऊरिचि नाहीं. ॥छ॥
बोलणें चि अबोलणें. अबोलें बोलु बोलणें.
दिगंबराचें करणें आकाश पावलीं भरणें. ॥२॥
६३०
जया कारणें सकळ विषय; जया कारणें जन, धन प्रीय रे !
वेद वैदीक सकळ ही कार्य, तत्वज्ञा आणि ब्रह्मज्ञेय; ॥१॥धृ॥
ऐसा आत्मा तो देखावा, आइकावा, मननीं भजावा. ॥छ॥
जया कारणें भजिजे गुरू; नित्य अनित्य वस्तु विचारू;
आराधावा दीगंबरु; जयाहुनि नाहीं परु प्रियतरु. ॥२॥
६३१
आत्मा देखिजे; हें बोलणें बोलावें. जना अभिमुख मात्र करावें.
परि देखिजे ऐसा नव्हे. दृश्यमान तें प्रपंच अघवे. ॥१॥धृ॥
सर, सर, रे ! सर, पामरा ! लक्ष तुझें नव्हे; काइसी मुद्रा ? ॥छ॥
दृश्य, दर्शन साक्षी जाणें ::- आत्मा तो कासेनि पाहाणें ?
दीगंबरा सुचरु ह्मणे. डोळा पाहाती ती अज्ञानें. ॥२॥
६३२
दर्शनाचें खंडन करितां, साक्षात्कारु नये प्रळपता.
रे ! संप्राप्ति कैसी आतां ? येथ विषयीं श्रवण कीजे श्रोतां. ॥१॥धृ॥
दे ॐ तो के नयनी प्रकाशे. देखावा हृदयीं सुमनसें.
देहादि दृश्य निरासे. मने आत्मा मननी प्रकाशे.
मना वांचूंनि देखणें चि नसे. दिगंबरें वर्म उपदिष्ट ऐसें. ॥२॥
६३३
मन गुणीक, सगुण, गुण - कार्य. तयानिर्गुण - पद कैसें ज्ञेय ?
यया बोलाचें तात्पर्य; इंद्रियातीत पद सेवनीय; ॥१॥धृ॥
जेये परतलें मन वाचेंसी; गुणी नेणत परम पदासी. ॥छ॥
इंद्रियाचे निसुटलें संगें मन मननी भरे अंतरंगे.
प्रति विराली तेणेचि अंगें. दिगंबर मग सहजचि अवघें. ॥२॥
६३४
मन मारूंनि तत्व बुझावें. स्वसंवेद्य तत्व भजावें.
ऐसेंही प्रलपन नव्हे. येक येकपणें जाणतचि नेणवे. ॥१॥धृ॥
गुंति पडली कवणा पुसावें ? सद्गुरूप्रति सह्रण रिघावें. ॥छ॥
एकत्त्वें जाणणें न घडे. चिन्मयत्वें नेणपण उडे,
येणें वचनें संदेहो पडे. दिगंबरेंविण तो न खडे. ॥२॥
६३५
गुरुकृपेसि अंकुरु जाला. तेणें देहात्म भाॐ गळाला.
प्रपंचा भासु निमाला. आधीं प्रबोधु इतुलाचि जाला. ॥१॥धृ॥
आतां दिवसा दिनमान सरलें. शशिसूर्य, नेणें, काये जाहाले ? ॥छ॥
अवनी, जळ, वायो, ना गगन, दहनाचें ही जालें दहन.
दिगंबराचें ऐसे वचन अनुभवाची यावरि खूण. ॥२॥
६३६
देहीं टकमक जाली करणा. धर्मु कव्हणातें स्फुरेना.
नीमाली गुण - चेतना. भजे भजनी मनस नीज मरणा ॥१॥धृ॥
आतां उघडूंनि कित्ती वदावें ? प्रळयाचेचि मान अघवे. ॥छ॥
शून्य लागे शून्यांपाठीं; आभासु घालूंनि पोटीं,
दिगंबराची ये भेटी. अविसरु नावीसरु ऐसी गोष्टी. ॥२॥
६३७
डोळां होतें तें देखणें नेलें चोरी. तेथ टकमक पडली बाहेरा.
बुद्धी परुते आपुला गुण करी. नेघे परि तें चतुरु आंगावरी. ॥१॥धृ॥
ऐसें प्रकटचि बोलताहे वचन. खुण जाणती चतुर महाजन. ॥छ॥
जीत जीवासि अंतर पडिलें. मन मरोनि मनचि सर्व भरलें रे !
दिगंबरें हे कैसें केलें ? गोची उगऊनि उगवीं गोविलें. ॥२॥
६३८
जागतां मज जागृति नाहीं. स्वप्न निवटलें ठाइंकें ठायीं.
जाली सुषुप्ति; नेणवे कायी ऐसी तुरीया; नुमटे चि हे ही. ॥१॥धृ॥
परि मीं आनंदु कवणां सांगों. मीपण मेलें; कवणा मागों. ॥छ॥
मीं आहें; तेथ मज मीं नाहीं. मी नाहीं; तेथ ठाइंचा ठायीं.
दिगंबरा पडले ठायीं. बोलावया अवकाशु नाहीं. ॥२॥
६३९
कैसा तपणी तपला अंधकारू ? तेणें लोपिला शशि - दीनकरू.
पाहे तयाचीला वृत्ति - चोरूं. ऐसा वैरी तो आमुचा मित्रु. ॥१॥धृ॥
आतां कैसें जी बोलावें ? गगनातें पदरीं भरावें. ॥छ॥
तमसाची वळिली वाती. ते जालियेली स्वज्ज्योती.
दिगंबरातें आरती समर्पीली स्वसंवित्ति. ॥२॥
६४०
प्रपंचु ना जीवन देह न दिसे सगूण. आप जाणोनि कैसें स्नान
करावें अघमर्षण ? ॥१॥धृ॥
आतां असावें स्वस्थिति. क्रियेची न चले युक्ती. ॥छ॥
अन्वयें निर्विकल्पीं बूडालें गांग स्वरूपीं.
दिगंबरु न भिजे आपीं. स्फुरे तो गंगालोपीं. ॥२॥