१२१
अद्वयस्थाना ! योगनिधाना ! परमगुरो अंगुणा ! ॥१॥धृ॥
दत्तात्रया ! सानंदा ! ॥छ॥
विसारसारा ! दिगंबरा ! सुरपतिमाहेरा ! ॥२॥
१२२
अनादिसिद्धा ! स्वयंबोधा ! सदा स्वजनवरदा ! ॥१॥धृ॥
योगिराजा ! राजेशा ! ॥छ॥
चित्तविश्रामा ! मंगळधामा ! दिगंबरा ! सर्वसमा ! ॥२॥
१२३
गुणीं गुण गुंपलें चेतन मनी रूप बैसलें सगुण.
दत्ता ! तुज केधवां पाहिन, उताविळ दर्शना लागुन. ॥१॥धृ॥
देवा ! तुझें पाउल गोजिरें, सकुमार सुंदर साजिरें.
छांदस वाद स्पंदती नोपुरें. मोक्षबीज सेविती चतुरें. ॥छ॥
नावडे जप तप - सू बाइ - ये ! योगें नाहीं भान वो ! गोरिये !
दिगंबरु पाहिन सखिये ! मानस येणें हरिजत आहे ! ॥२॥
अहिरी चाल मल्हार
१२४
भवसर्पु लागला अंतरीं. प्रमादु वो ! येतिसे लहरी.
विकळ जाली; कवण सावरी ? स्वजन दूरि राहिले बाहेरी. ॥१॥धृ॥
दत्ता ! तूं रे ! केधवा पावसी ? आतां धीरू न धरे मानसी.
विषयविष केधवां हरिसी ? स्वरसें चित्त माझें निवविसी ? ॥छ॥
अंतर बहु पडलें मानसीं. मातु पावे तुजवरि कैसी ?
दिगंबरा ! अझुणी न येसी ? हृदयगतदुःख कां नेणसीं ?
१२५
अंध मूक बधिर जाहाली; तुझा पंथु न कळे, भूलली;
भवदुःखसागरीं पडली; विषयजळचरीं विसंचिली. ॥१॥धृ॥
दत्ता ! तूं केउता गेलासी ? कठिणपण धरिलें मानसीं.
काय मीं करूं ? जरि न पवसी. कुंठली गति आजिचा दिवसीं. ॥छ॥
जनकु तूं रे ! तूं माझी जननी, आत्मा गुरु नारद ह्मणौनी;
न स्मरे मीं दुजया लागूनी, संकटीं परम निर्वाणी. ॥२॥
चंचळ मन मानसें दुस्तरें माझें मज चित्त न संवरे.
दिगंबरा ! तूझेंनि अंतरें भवार्णवीं जात असें पुरें. ॥३॥
१२६
खरतर तपती किरण; भवदुःख दुस्तर हें वन.
छाया नाहीं; न दिसे जीवन; क्रोध - व्याळ काम - कांठ - वन. ॥१॥धृ॥
दत्ता ! मज करिरे ! साउली; बाळकु तूझें, तूं माझी माउली.
हृदयावरि घेउंनि कवळीं; उपेक्षिसी झणें अंतकाळीं ? ॥छ॥
चिंता ते मी सांडूनी देयिन; जीवें जिउ जीवि आळंगिन.
दिगंबरु माझें योगधन. काये करूं अपर साधन ? ॥२॥
१२७
परतोनि दाखवी वदन. न करी बहु मानस कठिण.
न करीं हें मानस कठिण.
तुझां ठाईं गुंपलें हें मन. वियोगदुःख न साहे दारुण. ॥१॥धृ॥
दूर देसीं मज कां दीधलें ? भेटीलागीं अंतर पडिलें ?
दोन्ही डोळीये पाणियें भरले. लल्लाट पीटीं करतळें. ॥छ॥
मूळ कयी येसिल मागुता ? मजप्रति; सांग अवधूता !
दिगंबरें हरिली ते चिंता. आत्मारामु नव्हे येता जाता. ॥२॥
१२८
आमुतें कर्म कासया लाविलें ? गुणीं गुण आमुचे गोविलें ?
ऐसें आह्मीं, सांग, काय केलें ? अंतर का तूज मी पडलें ? ॥१॥धृ॥
कैसा, नेणें, साधु वो ! ह्मणती. तैसा गुणुं नाहीं ययाप्रति.
अगुणीं गुण भासताहे व्यक्ती. मायामय ययची आकृती. ॥छ॥
आह्मी तुझे क येरे कवण ? सत्य बोल प्रमाण वचन.
दिगंबरा ! जाणितली खुण. आतां वरि न पडे मोहन. ॥२॥
१२९
दिसे तैसा नव्हे वो ! साजणी ! न कळे तुह्मां ययाची करणी.
प्रकटपण तें यया लपणी. लपे स्वयं प्रकटले - पणी. ॥१॥धृ॥
योगीजन श्रमले जाणतां. शास्त्र मती कुंठली वदतां.
आत्मारामु सेवटीं आइता. सहज भोगी सकळ अवस्था. ॥छ॥
नयन दोन्ही राहिले अपरा; मना बुद्धी न कळे तें घरा.
दिगंबर ! स्वरूप अक्षर; सकळ दृश्य मायिक नश्वर. ॥२॥
१३०
ऐसें वर्म बोलतां सखिये ! शब्दवादु ययाई न साहे.
रुसला; वृत्ती अवृत्ती न पाहे. अतःपर करणें वो ! काये ? ॥१॥धृ॥
आतां मौन धरीन साजणी ! ययाप्रति नचले करणी.
रूसला; या करूं बुझावणी, जींत बळी जीवत्व देउंनी. ॥छ॥
मौन ते ही बाण वो ! लागती; शब्दाहुनि आगळे रूपती.
दिगंबरु मजात्मस्थिति बुझावील जाणता - जाणती. ॥२॥
१३१
देहेंवीण तूमचें भेटणें. त्रिपूटीसि वेगळ पाहाणें.
भेदेंवीण अवृत्ती भेटणें. गगन कैसें पाईं वळघणें ? ॥१॥धृ॥
असी मज नलगे करणी. तुझें रूप पाहिन नयनीं.
परब्रह्म सावळें येथुनि. हाचि योगु आवडला मनीं. ॥छ॥
मीपण कैसें गालिजे येथूनी ? शून्य केवी देइजे सांडूनि ?
दिगंबरा ! ते पुरे करणी; आत्मया तुज मीं मज पाहोंनी. ॥२॥
१३२
स्वजन जन वीजन स्वजना तेथें माझी नलगे वासना.
क्षणीं कवयक्षीण, क्षण - क्षणा, विषम काव्यु मांडली वेदना. ॥१॥धृ॥
आतां कैसे काये रे ! करणें ? कवण काळ दुःख हें भोगणें ?
तुझी सोये सहसामी नेणें. चंचळ मन न भजे साधनें. ॥छ॥
शरिरीं पंचप्राण हे विकळ. करणगण कुंठले केवळ.
करणी माझी न चळे; तें बळ दिगंबरा सोडिता, हें स्थूल. ॥२॥
१३३
हा सुखाचा सागरू. नाहीं अंतु यया पारू.
निजभक्तां कल्पतरू. दत्त योगियां आधारू. ॥१॥धृ॥
माझें सर्वस्वसाधन योगिराजू योगनिधान. ॥छ॥
सर्व देह हाचि देही. सर्व बाळकु हृदयीं.
दिगंबरीं दुजे नाहीं. चाल्य चाळक येथ काई. ॥२॥
१३४
हा साराचें ही सार, अज, अव्यय, अक्षर,
निजरूप, निरंतर; येथ न सरती विकार. ॥१॥धृ॥
काये कीजे स्तवन ? कुंठलें प्रळपन ! ॥छ॥
भेदमतीचा संहारु; ज्ञानगुणें दीवाकरू;
आत्मा हा दिगंबरू; योगीयां परमगुरू. ॥२॥
१३५
कर्मभ्रमु जाला चित्ता. आंगीं लागली अहंता.
केवि निवारीसी आतां ? माये - बापु तूं अवधूता. ॥१॥धृ॥
आतां यावे; भेटावें; स्वरसें नीववावें. ॥छ॥
भवतापु खरतरू; विषविषय नदपूरू;
दिगंबरा होई तारूं; मातें पाववीं परपारू. ॥२॥
१३६
वासनेची करूनि होळी, भान उडवूंनी अंत्राळीं,
देह अभावे पोकळी, आत्मा तूं हृदयकमळीं. ॥१॥धृ॥
ऐसा कै येसील भेटी ? मीं सामावैन पोटीं. ॥छ॥
द्रष्टत्वा देउंनि पाणीं; बुद्धीचा लय स्थानी;
मन जाये हारपोनी; दिगंबरा जी निर्वाणी. ॥२॥
१३७
गगनाहूनि वाड, पीयूषापरिस गोड,
द्वैताची मोडी चाड, ऐसे भरलेले नीबीड. ॥१॥धृ॥
आतां काये ते बोलावें ? बोलें न बोलवें स्वभावें. ॥छ॥
कांहीं नाहीं; हेहीं नाहीं; आहे तें नव्हे कांहीं.
दिगंबरा ते जाणयीं; बैसलें माझा हृदयीं. ॥२॥
१३८
दिनु हारपे दिनमानी; निसिमान निसीमानीं;
शशी सूर्य ही दोन्हीं; वीरे प्रपंचु गगनीं. ॥१॥धृ॥
ऐसें देखणें देखावें. नलगे योगें सिणावें. ॥छ॥
हे निमाली त्रीपुटी; अवलंबा केवळ तूटी;
नभ जीरे नभा पोटी; तइं दिगंबरीं भेटि. ॥२॥
१३९
जीउ जीवाचा कारणी, मनाचा लयस्थानी,
बलि दीधला निर्वाणीं. अवधूता पाव निदानी ॥१॥धृ॥
कृपानीधी ! दातारा ! कइ प्रकटसी ? माहेरा ! ॥छ॥
अहंमतीचा वीलयीं अये ! ठाॐ ठाइंचा ठायीं.
दिगंबरा ! प्रकट देहीं. भेदु मारुनि, स्वरूप पाहीं. ॥२॥
१४०
अखंड, प्रचंड, गुणवीरहीत, अमळ, अगूण, परब्रह्म सदोदीत. ॥१॥धृ॥
भासलें, प्रतिभासलें, रे ! स्वरूपें स्वरूप स्वयं निवळलें रे. ॥छ॥
असंग, अभंग, गगनसमान, दिगंबररूपीं अस्ति भाति सुखभान. ॥२॥