दासोपंताची पदे - पद ५६१ ते ५८०
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥
५६१
गुणकीर्तन श्रवण करितां रूप आठवलें श्रीदत्ता ! ॥१॥धृ॥
भारी तळमळ लागली जीवा. भेटि होइल केव्हां केव्हां ? ॥छ॥
दिगंबरा ! तुझें गूण वियोगें दुःखद, जाण. ॥२॥
५६२
मीनु पडिलासे थडिये, त्याचा सहसा प्राणु न जाये ! ॥१॥धृ॥
तैसें तुजवीण मातें जालें. प्राण न धरिती काहीं केलें ! ॥छ॥
दिगंबरा ! प्राणबूली नीदानी जेवि कवळी. ॥२॥
५६३
गुरू चूकलें खिरारां; दश दीशा धांवे सैरा. ॥१॥धृ॥
तैसे तुजवीण माझें मन. श्रमलें ही करी भ्रमण. ॥छ॥
दिगंबरा ! ये ! गा ! ह्मणतां कइं पावसील अवचीता ? ॥२॥
५६४
कवणाची वास पाहों ? कैसा निश्चळ उगला राहों ? ॥१॥धृ॥
दत्ता ! सांडूंनि जक्केळीं जासी, आळवितां ही न येसी. ॥छ॥
दिगंबरा ! तुझा पुत्रु. कवणाचा पलउ धरूं ? ॥२॥
५६५
आठवसी प्रतिक्षणी. तुझा वीसरु न पडे मनीं. ॥१॥धृ॥
दत्ता ! कैसे रे ! करावें ? तुज सोडूंनि भिन्न न सावे. ॥छ॥
दिगंबरा ! सत्य जाण ::- तुझा वियोगु मातें मरण. ॥२॥
५६६
हातीं घेऊनियां खांडें करीं शरीर खंडे खंडे. ॥१॥धृ॥
मग तूं पासूंनि होइं परुता योगिराया ! श्रीअवधूता ! ॥छ॥
दिगंबरा ! तुजवीण बहु होत असे कठीण ! ॥२॥
५६७
कवळीन दोहीं बाहीं; ऐसी आवडि होतसे देहीं. ॥१॥धृ॥
दत्ता ! नीरास करिसी काह्या ? परमात्मया ! योगिराया ! ॥छ॥
दिगंबरा ! दर्शन देई. प्रेम दाटीतसे हृदई. ॥२॥
५६८
गुणीं गुंपलें नुगवे मन. काये करिसील ? तें साहीन. ॥१॥धृ॥
दत्ता ! न वचें रे ! परुता. न साहे वियोग वेथा. ॥छ॥
दिगंबरा ! तुझां ठांइं गुंपलयां विवाडु नाहीं. ॥२॥
५६९
नेत्रकमली करणें पूजा, ऐसा हा संकल्पु माझा. ॥१॥धृ॥
दत्ता ! कैसा पडसी दृष्टी ? रूप घालीन मनसापोटीं. ॥छ॥
दिगंबरा ! गुणनिधाना ! विधें तुझें विधरिलें मना. ॥२॥
५७०
रूप भरलेसे अंतरीं. देह नृत्य करी बाहेरी. ॥१॥धृ॥
दत्ता ! न धरिं रे ! आतंका. मी न मनी यया लोका. ॥छ॥
दीगंबरा ! तुझें रूप प्रेमवर्धन सुखस्वरूप. ॥२॥
५७१
मन परतउं माघारें तुजपासुनि कवणें विचारें ? ॥१॥धृ॥
दत्ता ! तुं माझें जीवन, जीउ, आत्मा, पांचही प्राण. ॥छ॥
दिगंबरा ! तुजवीण कांहीं हीत वीहीत दुसरें नाहीं. ॥२॥
५७२
मन करितासी कठीण; तरि तूं माझें जीवन. ॥१॥धृ॥
आतां कवणा पैं सांगावें ? नव्हे, नव्हे, तैसें नव्हे. ॥छ॥
दिगंबरा ! तुं पैं माये ! येथें बुझावितें कोण आहे ? ॥२॥
५७३
मायेबापु तुं सद्गुरू. घालुं कवणावरी मी भारू ? ॥१॥धृ॥
आतां कठीण मन न करावे. भवबंधन हें छेदावें. ॥छ॥
दिगंबरा ! तुं सारथी, अंकाकाळिचा सांगाती. ॥२॥
५७४
जननी चि लांब होये. तइ कवणा पै सांगोनि काये ? ॥१॥धृ॥
तैसें मज कां करिसी ? देवा ! देवा ! दावितासि प्रपंचु मावा. ॥छ॥
दिगंबरा ! तुझां ठांईं दुःखदातें कांहीं चि नाहीं. ॥२॥
५७५
तुतें नाहीं माया ममता. आह्मी कैसेन जीजे आतां ? ॥१॥धृ॥
मायेबापु तुं जनेशा. बहु धरिली तुझी आशा. ॥छ॥
दिगंबरा ! मी अज्ञानू. तुतें हांसइल परजनु. ॥२॥
५७६
वासनेचे पर्वत जाले. दुःखे हृदय भरलें. ॥१॥धृ॥
तें सांगोंनि कवणा काई ? तुज वांचुंनि स्वकीय नाहीं. ॥छ॥
कइ भेटसी ? दीगंबरा ! श्रमु सांगैन माहेरा. ॥२॥
५७७
तुं गुणाचें निधान; योगभुमिके प्रगुप्त धन. ॥१॥धृ॥
दैवें सांपडलासी देवा ! हृदई ठेविन ठेवा. ॥छ॥
दिगंबरा ! तुं सुरतरु, स्वभक्त, करुणाकरु. ॥२॥
५७८
बहु जन्म गेले वायां. आजी देखिलें श्रीगुरूराया. ॥१॥धृ॥
आतां प्राणू वोवाळीन. मन मारूंनि रूप धरीन. ॥छ॥
दिगंबरा ! तुं तारकु. नेणें परमार्थु मी आणीकु. ॥२॥
५७९
भवचक्रीं भ्रमण करितां नाहीं विश्रांति बा ! श्रीदत्ता ! ॥१॥धृ॥
आतां झडकरी यावे भेटी. मन होताहे परम कष्टी. ॥छ॥
दिगंबरा ! तुं विसांवां. ऐसा भेटसील केंधवा. ॥२॥
५८०
भवसमुद्रीं तुं तारुं; मायेबापा ! श्रीसद्गुरू ! ॥१॥धृ॥
कैसा पासूंनि होसी परुता ? जीउप्राणु तुं अवधुता ! ॥छ॥
दिगंबरा ! तूं तरि जीणें. आतां वियोगे न राहाणें. ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 17, 2016
TOP