७२१
अर्थवेग बहु खरतर बाण. प्रखर मांडलें येथ संधान. ॥१॥धृ॥
आला वृत्तिवेगु; निवारूं जाणे. आपणां मारूंनि यशस्वी होणे. ॥छ॥
आत्मा दिगंबरु धरूनि वर्म, जिंकिलें सन्मात्रचित्परब्रह्म. ॥२॥
७२२
देह तें पासीं गेला तो कवणु ? त्याचें नाम नेणा, रूप, नां गूणू. ॥१॥धृ॥
वायां वीण दुःख करिसी गव्हारा ! वेषु देखोनियां झोंबसी सैरा. ॥छ॥
दिगंबरु आत्मा वोळखि. पाहे ::- जैसा तैसा विश्व व्यापूंनि आहे. ॥२॥
७२३
आधीं तो कवणु ? मग तो तुझा; हा येकु संदेहो फेडि कां माझा. ॥१॥धृ॥
असत्य तें; लाभु हानि ते कायी ? सत्या नाशु नाहीं. भूल झणें. ॥छ॥
आत्मा दीगंबरु तुं जगब्रह्म सांडीं. दुःख, सुख लाहे पर. ॥२॥
७२४
नाना देशिचीं मीनलीं सांतें तीं काये झोंबती येकमेकांतें ? ॥१॥धृ॥
वायां वीण जग मेहुणें करिसी. खूणे तें सांडूंनि भलतया धरिसी. ॥छ॥
दिगंबरु आत्मां तयासि पाहे. नरकाचें मोटाळें झोंबसी काये ? ॥२॥
७२५
कवणाचा देवा ! मीं ? येथें कां आलो ? मूळ चुकलों; भ्रमतुसें. ॥१॥धृ॥
मर. मर. कर्मा. हें काये जालों ? मूळ मीं आपुलें केवि लाहें ? ॥छ॥
दिगंबरेंवीण स्वप्न हें मृषा. ये गा ! परमपुरुषा ! भेटि देयीं. ॥२॥
७२६
चित्रिंचिया देवा वळिताहें गायी.
हा ! हा ! मातें काइ भ्रमु जाला ? ॥१॥धृ॥
पावें गा ! देवा ! गुणमतीहरणा !
तुझी माया कवणां दूरि करवे ? ॥छ॥
दिगंबरा ! मीं जवळूनि चूकला. कर्माधीन जाला; भ्रमतुसें. ॥२॥
७२७
स्वप्नीचा ठेवा करितां हे खनन. अवस्थाजनीत लटिकें हें भान. ॥१॥धृ॥
लाजीरवाणें जालें समर्था ! त्राही श्रीअवधूता ! कृपाळुवा ! ॥छ॥
दिगंबरा ! आतां इतुलेनि पुरे. वायां मायापुरें लोटितासि. ॥२॥
७२८
कवणाची जननीं ? कवणाचा जनकु ?
कवणाचीं तनुजें ? मीं मुळिचा येकु. ॥१॥धृ॥
कैसें माझें जीणें जालें ? गा ! देवा !
करिता हें जनसेवा कवणे हेतूं ? ॥छ॥
दिगंबरा ! आतां येतुसे शरण. पुरे जन्म मरण; कृपा कीजे. ॥२॥
७२९
द्राष्टादृश्य जेथें देखणें वाॐ; शुद्ध निरंजन ठाइकें ठा ॐ. ॥१॥धृ॥
तेथें माझें मन लागो गा ! देवा ! यया भेद भावा सांडूनियां. ॥छ॥
दिगंबर परब्रह्म, निर्गुण, सत्य, सर्वगत, चैतन्यघन. ॥२॥
७३०
ज्ञाताज्ञानज्ञेय त्रिपुटी नाहीं. ज्ञेय तें संचलें मी माजि देहीं. ॥१॥धृ॥
ऐसें माझें रूप अरूप आहे. गुणाची प्रवृत्ति आंगीं न साहे. ॥छ॥
दिगंबर निजत्व, निर्वाण, निःशब्द, केवळ, आनंदघन. ॥२॥
७३१
स्थूळसूक्ष्म जेथें कारण वाॐ; महाकारणासी न दिसे ठा ॐ; ॥१॥धृ॥
ऐसें माझें रूप मी चि मीं जाणें. जाणतें जाणणें जाणोंनि नेणें. ॥छ॥
दिगंबर निराभास, चिन्मय, सत्य, सदोदीत, पूर्ण, अव्यय. ॥२॥
७३२
जागृति ना स्वप्न, सुषुप्ति तुरीया;
कार्य ना कारण, अविद्या, माया; ॥१॥धृ॥
ऐसें माझें रूप निर्मळ जाणा.
जाणतां चि ठाॐ नाहीं मींपणा. ॥छ॥
दिगंबर परब्रह्म, अव्यय, तत्व, निरंजन, अज्ञेय, ज्ञेय. ॥२॥
७३३
सत्व, रज, तम, ना शुद्ध सत्व;
पूर्ण, गुणातीत, विमळ, तत्व; ॥१॥धृ॥
ऐसें माझें रूप जाणोंनि पाहातां, पाहाणें सर्वथा पारूषलें. ॥छ॥
दिगंबर गुणरहीत, ब्रह्म, सर्वगत, शिव, विषमी सम. ॥२॥
७३४
बहिरवी
सुन रे ! गुणिया ! हामकी बात.
धन जोबन कोई न आवे संगात. ॥१॥
किसकी दुनिया ? किसकी मवेसी ?
दिन दो रहिंगे; फीर उठ, चले परदेशी. ॥२॥
आये सो न रहिंगे; गये सो और आवे.
मेरा मेरा कहे; भुली हात झार जावें. ॥३॥
कहां भीम, अर्जुन, कृष्ण, रावण, साई !
कोई न छुडावे तन. भुलां मेरे भाई ! ॥४॥
दिगंबर ! कह्यियो एक विचार.
उनके चरणीं हमे दियो है शरिर. ॥५॥
७३५
सखया ! सादु घालितां बहु श्रमली. अझुणी न येसी.
विकळ माझी मति जाहाली. सखया ! कवणा, काये, नेणें चूकली ?
कठिण धेलें. दूरि बहू दिवस पडली. ॥१॥धृ॥
आत्मयां ! येकु वेळा पाये दाखवीं.
वियोग तापु हरूनि माझा जीउ जीववीं. ॥छ॥
सखया ! हें चि आरत बहू मानीसीं ::- पाहिन पाये.
स्वरूप आपुलें कयीं दाविसी ?
सखया ! करुणा मेघु केव्हां वोळसी ? संतापु देवा !
दिगंबरा ! दूरि करिसी ? ॥२॥
७३६
कमळनयनरूप आठवे; मनीं आठवे; रूप आठवे. पाहिन माये;
पाहिन पाये केधवां ? सैये ! कवण दुरित माझें नेणवे; वो ! माझें नेणवे;
माझें नेणवे. न देखें पाये. करूं काये ? वो ! ॥१॥धृ॥
अवधूतेंवीण क्षणु न गमे; वो वीण न गमे;
वीण न गमे. विजन माने साच जाणें वो ! ॥छ॥
अतिक्षीण डोळे बहु सीणले; बहु सीणले;
हे सीणले. श्रीदत्तु न ये. वाट पाहें वो !
दिगंबरा ! तुझा पंथ न कळे; देवा ! न कळे;
तो न कळे. दाखवीं सोये; दाखवीं सोये; सादु देईं रे ॥२॥
७३७
मायाअविद्या हें उपाधिद्वय अतिक्षीण जेथें विवर्तमय, ॥१॥धृ॥
तें मीं परब्रह्म सहज अदेही; संचलें निर्गूण ठाइंचें ठायीं. ॥छ॥
दिगंबर सर्व अतीत गुणा, देवत्रय, जेथें नुरे कल्पना. ॥२॥
७३८
उत्पत्ति नां जेथ स्थिती, प्रळयो; पारविवर्जीत, पूर्ण, अव्ययो; ॥१॥धृ॥
तो मीं परब्रह्म आत्मा अदेही, अवघा चि प्रपंचु ज्याप्रति नाहीं. ॥छ॥
दिगंबरु निराधारु, निःकामू, सर्वरूपीं देॐ, सहजसमु. ॥२॥
७३९
योगुवियोगु हा प्रसंगु जेथें न वर्ते निर्गुणीं निर्गुण मतें; ॥१॥धृ॥
ते मीं निजानंदघन चैतन्य, पूर्ण, अखंडितपद, निर्गूण. ॥छ॥
दिगंबर सारविसार, ऐसें जेथें निरस्तही भान संग्रहे. ॥२॥
७४०
अंधाचें पाउल मघांचि कळे. जन हांसती, तें तया न कळे. ॥१॥धृ॥
नाहीं अनुभउ; वोळसी काह्या ? डोळां कालव धरवें; धांवसी वायां. ॥छ॥
येकाचा आधारु धरिसी कायी ? आत्मां दीगंबरु, जाण, ये देहीं. ॥२॥