मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ७६१ ते ७८०

दासोपंताची पदे - पद ७६१ ते ७८०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


७६० अ
खरु सोविळ, हे अघट बोली. महिमां तीर्थाची ते चि भ्रंशली. ॥१॥धृ॥
ऐसा मातें संगु न लगो गा ! देवा !
श्रमु भारी जीवा होतु आहे. ॥छ॥
दिगंबरीं क्रोधी कामी न सरे. तेणेंसीं बोलतां लागैल वारे. ॥२॥

७६१
वमनाचें अन्न; कायसी शुद्धि ? प्राणी सुटलयां न सूटे व्याधि. ॥१॥धृ॥
भूतशुद्धि वायां करितासि जना ! रजस्तमोमय अरे ! अज्ञाना ! ॥छ॥
दिगंबरेंवीण शुद्धि न दिसे. शरण जायीं तया मनोमानसें. ॥२॥

७६२
आला तैसा गेला येकला येकु.
वायां पाठिलागा होतुसे लोकु. ॥१॥धृ॥
तुह्मीं कवणें ? मी कवणाचा कायी ?
मूळीं वोळखीसि ठावो चि नाहीं. ॥छ॥
दिगंबरु येकु सोयेरा जनीं. जन झोंबताति तयां सोडूंनी. ॥२॥

७६३
शरीरा आडूंनि बोले तो कवणु ?
वोळखीवरि कां नेठवा मनु ? ॥१॥धृ॥
वायां वीण येकें झोंबा, स्वरूपार्थलाभा सांडूंनियां. ॥छ॥
दिगंबरु सर्वजनु सोइरा. कां तयां न धरा दुर्जन ! हो. ॥२॥

७६४
आपणां नेणोंनि पर भूलले. जन जनाप्रति झोंबत ठेलें. ॥१॥धृ॥
हीतवीहीत पडलें माघारें. देहो पडे; परि झोंबी न सरे. ॥छ॥
दिगंबरें ये कौतूक केलें. आपुलिया माया जन मोहीलें. ॥२॥

८६५
दृश्येंसीं आपणु द्रष्टा वीलक्षणु; हें वर्म बोलसी कांह्या ?
स्वप्निचें समग्र जागृती गोचर देहादि केउते द्रष्ट्या !
पवित्र तें तूं चि; दुसरें तुज नाहीं चि जाणतां चिदात्मया !
नरकाचा सागरीं निर्मळ पाहासी लहरी;
ऐसा गुणु शरीरीं सांडीं तया. ॥१॥धृ॥
रे ! कां भजसी पाल्हाळ ? सांडि तें सकळ कल्पनेचे जाळ; विस्तारिसी.
नीजज्ञानें धीरु असतां पवितृ; वायां अपवितृ बळें होसी. ॥छ॥
कवळाचिये दृष्टी शंखु ही पीवळा; ऐसी जाली तुतें परी.
दोषाचीये दृष्टी आभासु भासला; तया कवणु परिहारी ?
अज्ञानाचें कार्य स्वप्नाचि सारिखें; सकळ मिथ्या अधाधारी.
दिगंबरु आत्मां ब्रह्म सनातन; मायेसि न दिसे सत्य उरि. ॥२॥

७६६
दृश्य देखोंनियां भूललें हें जन; आत्मा चि मानींती देहो !
अर्थस्वार्थदीपीं दीपले पतंग; वायां वाढविती स्नेहो !
प्रमीत हें जीणें; वीनाशु न चुके; वायां पुत्रादीकीं मोहो !
नीदान पावता येकला चि जाये; मग पडे थोर संदेहो ! ॥१॥धृ॥
रे ! मना ! नको हा सत्संगु जोणोंनि सोडूं; होयील येथ निबाडु !
हातिचें पीयूषपात्र विसर्जूनि, कांजी कां ह्मणतासि गोडु ? ॥छ॥
द्रव्य सांचे; परि वय तें वेचलें; हानि कीं लाभु, विचारीं ?
आतां पाहें जासी ::- निमीष न लगता जन्मसी इतरां घरीं.
तैं हें तुझें तेथें काहीं होये ? आतां ऐसी का भजतासि हारी ?
दिगंबरें वीण आपुलें कव्हणी नव्हे ? कवणु तूं हा संसारीं ? ॥२॥

७६७
अस्थिमांसत्वचानाडीरोमादीक शरीरीं धातु सप्तक.
वीटाळाची मूस, मळपंकमांदुस; अंतरीं क्रीमकीटक.
शुक्लीतें शोणितें रचनेप्रति आलें; ते ही ते येक नरक !
पापाचें निर्माण, पापाचें चि स्थान, शरीर पापजनक. ॥१॥धृ॥
रे ! जना ! न धरी याचा संगु;
भज, भज, कां वीयोगु येणेंसीं ? तुज शुद्धि नाहीं !
देवातें संस्पर्शु झणें झणें करिसी. नानां कर्में तुझां ठायीं रे ! ॥छ॥
शुद्ध श्वेत वरी तीर्थीं प्रक्षाळिलें श्वान, तें पवित्र नोहे !
वरि वरि करूंनि स्नान मृत्तिकामर्द्दन चांडालु पवितृ काये ?
कांटाळा धरिसी; तरि सर्व ही कुश्चिळ कर्में चि पवितृ आहे !
सांडुनि आपसंदु, सांगितलें करितां, दीगंबरप्राप्ति होयरे ! ॥२॥

७६८
भूतांचें कारण; पृथ्वी लयस्थान; भूतें तीं तें, जाण, कुश्चिळ करिसी.
ती पासाव धान्य जीवरूप ते कण; करूंनि त्याचें पचन अन्नें ह्मणती.
जळचरीं व्यापिलें सलील कुश्चिळ; केलें मळमूत्र आपुलें; ते कोणें द्रवती ?
विचारितां देह परम कुश्चिळु; ज्ञेय, मळमूत्रआमय जेथें असती. ॥१॥धृ॥
रे ! करितां देवार्चन काटाळलें मन; संदेहा छेदन नव्हे पुडती.
पृथ्वीनां जीवन देहीं पवित्रपण; देव ते पाषाण अस्थि याती. ॥छ॥
तीर्थें दानें तपें व्रतें पुण्यरूपें वासना पवित्र कीजे.
वैदीक सकळ; कर्मांग पाल्हाळ; येणें चि निर्मळ येक दूजे.
योगाचें सेवन तेणें पवित्रपण; ऐसेपरिचें ज्ञान येका उपजो.
देहेंसीं इतरु आत्मा दिगंबरु; ऐसा साक्षात्कारु जरि कां नुपजे ? ॥२॥

७६९
विविक्तात्मज्ञानविचार वर्जीतु वासन या बहु देहीं.
देहो चि आत्मा, हें सिद्ध प्रतिपादी पापरूप संदेही.
वीतरागवृत्ति नुपजे हृदयीं; कल्पनेतें पारु नाहीं.
वेदश्वात्रवादप्रमाण न मनीं; पडला तो संसारडोहीं. ॥१॥धृ॥
रे ! मना ! नको सद्गुरुसंगु सर्वथा सोडूं; दिवसें दिवसें होसिल वाडू.
ब्रह्मानंदकंदु सेवितां श्रीदत्तु पीयूषाहीहूनि गोडू. ॥छ॥
देहभ्रमें जन बहूत नाशले अवलोकूंनि पुडतो पुडती.
अधिकारी सुजन श्रीदत्तु ह्मणती. कांटाळा उपजला चित्ती.
सद्गुरुवाचोंनि न भजनीं दूसरें; अखंड जाले तदव्रती.
दिगंबरेंवीण सूंटिका न दिसे. काइसा भ्रमु ये अर्थीं ? ॥२॥

७७०
विषयाची आसक्ति; वरि न दिसे विश्रांति; प्रवृत्ति आगळी देहीं.
माझें तुझें ह्मणौनि करितासी सोसणी; ब्रह्मज्ञान वदसी काई ?
मनस चंचळ; सकळकरणस्थीरता ते तेथ नाहीं.
हंसाचीया गती वायसु चमके. माळा गे ! गुणु तयातें काहीं ? ॥१॥धृ॥
रे ! बापा ! गुरुविण ब्रह्मज्ञान सर्वथा नाथी. कां लटिकां करिसी आधावती ?
अपरोक्ष ब्रह्मसायुज्य पावणें. रोकडी सद्यप्रतीति. ॥छ॥
दृष्टीचें देखणें दृश्याचा आभासु; देहसहीत सकळ माया.
मनसें भजसी; तरि कल्पना अवघी; स्वप्न जैसें देख तया.
बुद्धीहूंनि पर बुद्धीचें अंतर; द्रष्टा केप्रति द्रष्ट्या ?
दिगंबरे वीण सिधांतु नेणसी; शरण जायी योगीराया. ॥२॥

७७१
डाळिकाचें पाणि मूळीं केंसरें सारणी
सुख तें राजणीं कांहीं चि नाहीं.
पाहातां तरणी बाष्प लागलें नयनीं;
तेथें द्यावो मा सांडणी त्या भाळ्याचा ॥१॥धृ॥
माये ! वासुवोन तरणें, प्रकाश मालवणें,
उभयत्वें लेणें लेउनि वाड. ॥छ॥
तेथें जाये ते जगति; जलाशय ते फांकति;
भोगा भोग्य गति हे मनोरथा.
तेथें अंगना तो दोरु; फणिकेंसरें आदरु;
न भासे तें मारूं काय मीं तेथें ? ॥२॥
चांदुवो चांदिणें गुणिकें येसणें कें झेंपवैल ?
तेथें श्रुति ते सांडणीं; गुण अगुण आतणि;
शिव ! शिव ! मन लागणी तें दिगंबरीं. ॥३॥

७७२
मोतियांचें पाणीं मीं भरीन ये रांजणीं; विमळे गगनीं घालीन सडा.
आभासु येकला; वीचित्र रंगमाळा;
दोहींच्या मंडळा येथूनि काढा. ॥१॥धृ॥
माये पाहुणा शंकरु येइल आदिगुरू, गुणाचा विस्तारु येथूंनि सारा.
अवस्था लागली; माझी मति पांगूळली;
मूळ मीं चूकली; मज भेटि करी. ॥छ॥
पारखी नाडले, तें चिद्रत्न पाजळे; आश्रया वेंगळे वो आश्रयत्व.
दिगंबरें भेटी माये ! मीपणा शेवटीं. भेदाचीया तूटी संपूर्ण तत्व. ॥२॥

७७३
वाघाचा गोठणीं मज ठेविलें वो !  गुणीं. आपणु निदानीं सांडूंनि गेला.
वाटुली पाहातां, भूलि पडली जाणतां,
मना ही परुता वो ! अंतरला. ॥१॥धृ॥
माये ! कयी मीं लाहीन ? मुख नयनीं पाहीन ?
गुणीं गूणगूण गुंपोनि गेले. केलियासारिखा नव्हे नव्हे वो ! पारिखा.
भेटीचिया सुखा प्राशन केले. ॥छ॥
गुणाची लावणी माये ! केली वो ! आंगणीं.
सडींचां कांडणीं के कणु आहे ?
अंतर भोगितां मज लागली अवस्था; दिगंबरें द्वैतां कें ठाॐ ? माये ! ॥२॥

७७४
सोनयांची वानी मीं घेईन पीळूंणी. मोतियांचें पाणीं मज आणिजा कां ?
गगनाचें बीज मनीं रूपलें वो ! मज;
सांडणी सहज करीन माये ! ॥१॥धृ॥
रे ! गुणीया ! स्वजना ! तूं परिस रे ! सुजाणा !
मुळीचा मीपणा वीटाळु जाला.
तें पाहोंनी वाळिलें; वागधाण उपणिलें;
सद्गुरूचेनि बोलें पालटु जाला. ॥छ॥
डोळांची बाहुली म्यां नयनीं देखिली; देहें वोळाळिली; परि आवडेना.
आंग हें चालणी मीं चळली यें गुणीं.
दिगंबरध्यानीं विश्रांति जाली. ॥२॥

७७५
॥ चालि भिन्न ॥
करितां वो ! गुणश्रवण माझें वेधलें हें मन.
वियोगवृत्तीबाण मज बाधिताती. ॥१॥धृ॥
मज न साहे चंदन, माये ! चंपकसूमन.
सुरस ही गायन कठीण लागे. ॥छ॥
हा वो ! डोळ्यांचा डोळा माये ! जीवाचा जीवाळा
दिगंबरू येकु वेळां कैं देखईन ? ॥२॥

७७६
कामाचा अतिवेगु; मज न साहे वियोगू.
झणें हा मनोभंगु करील माये ! ॥१॥धृ॥
तुह्मीं जा, जा वो ! झडकरूंनि; त्यासि येइ जा घेऊंनी.
मग त्याचा गुणीं आसक्त जालें. ॥छ॥
हा वो ! मनाचें नीजमन माये ! प्राणाचें ही प्राण.
दिगंबराचे चरण कैं देखयीन ? ॥२॥

७७७
योगियाचें ध्येय, हा वो ! सत्यतत्त्वज्ञेय,
ब्रह्म सच्चिन्मय भासे अवधूतु. ॥१॥धृ॥
येणें हरिलें वो ! मन माझें; मज आपपर नूमजे;
करणगण सहजें ते पांगुळलें. ॥छ॥
हा वो ! विश्वाचें कारण; मये ! स्ववृत्तीचें धन;
दिगंबरु निधान कैं सांपडैल ? ॥२॥

७७८
निजमायेचा गुणी गुणगुप्त वो ! साजणी !
श्रीदत्तु लावणी या स्वसुखाची. ॥१॥धृ॥
हा न दिसे वो ! गुणकरणी. मी काये करूं साजणी ?
पाहीन यातें नयनीं कैसेनि आतां ? ॥छ॥
हा वो ! बुद्धीचें कारण; माये ! ब्रह्म सनातन.
दिगंबरू निर्गुण सगूण जालें. ॥२॥

७७९
निडळी ठेउंनि बाहे मीं पंथु याचा पाहे;
न दिसे येतां; माये ! मीं काये करूं ? ॥१॥धृ॥
माये ! न धरीं वो ! हे प्राण; माझे तपती करचरण;
वियोगाचे बाण बहु वेधिताती. ॥छ॥
करा वो ! उपकारू; द्या शब्दाचा आधारू;
मज तो दीगंबरु भेटीसि आणा. ॥२॥

( वैराटिका )
हा वो ! जीवाचा जीवनु; माये ! प्राणाचा ही प्राणू;
परब्रह्म तनु श्रीदत्त माये ! ॥१॥धृ॥
येणें भरलें वो ! अंतर; मज नलगे आपपर;
आपुलें शरीर विसरली माये ! ॥छ॥
हा गुणाचें कारण; या मनाचें ही मन; दिगंबर चैतन्यस्वरूप माये ! ॥२॥

७८०
हा वो ! प्रकाशाची खाणी; चिद्दीपु वो ! दिनमणी;
मायातमोहरणीं उदीतु जाला. ॥१॥धृ॥
येणें हरिलें वो गुणभान; माये सगूण हें मीपण;
आतां द्वैतभान दुर्लभ माये ! ॥छ॥
आत्मा निर्विकारू परमात्मा वो ! श्रीगूरू,
योगी, दिगंबरू, श्रीदत्तु माये ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP