मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १५८१ ते १६००

दासोपंताची पदे - पद १५८१ ते १६००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१५८१
नारिकेलें आदिकरूंन दान केणें भरा कांचन ! ॥१॥धृ॥
अर्थाचि करूंनि संसाटि, पद जोडा मरणा सेवटीं ! ॥छ॥
दिगंबरासि बहुगुण आवडी; तुह्मीं करा कां येथ वरपडी ! ॥२॥

१५८२
अग्निमुखि जलोंनि उजले, ऐसें केणें असे येक आणिलें ! ॥१॥धृ॥
तेथें कां न करा वरपडी ? देवा बहुसाल त्याची आवडी. ॥छ॥
दिगंबरा ऐसा अर्थु लाहिजे; घेतलें चि तरि तें पाहिजे ! ॥२॥

१५८३
मनातें नुरउंनि ध्यानें चित्ता हरूंनि,
रतु कवीमनसनिकेतनिया देव दिगंबरु
अनसुयाकुमरु श्रीकृष्णश्याम निरंजनु सगुणु. ॥छ॥

१५८४
॥ उजू ॥
येणें वो ! गुणी गोविलें वो ! परति ने घे, रातलें मन वो ! सैये ! ॥१॥धृ॥
आतां येणेंसीं भेदु मज क्षणु न साहे ! करूं काये ? वो ! सैये ! माये ! वो ! ॥छ॥
जाइन सवें जाइन; देॐ दिगंबरू मीं काये सोडीन ? ॥२॥

१५८५
॥ जति ॥
वदनप्रभा देखोनिया दिपले सुर, नर, माया !
पावनगुण चरणांवरि लोलति योगेश्वर;
सामगायनें गर्जती; येक मुखशेष मागती; अरे !
नाना गीतीं वर्णिती; अरे ! सेविती ! आलवीती ! ॥२॥

१५८६
॥ भिन्न प्रबंध ॥
साधक कर्षले वळितां न वलें संदिग्ध हीत संगति रे ! ॥१।
वादसमुद्र पार पावति नावरिती दुर्मन
तामसवृत्तिसंयोगसक्तैक रे !
संपादी विवादी अनुवादीं प्रतिशब्दीं गुणावीण न दीसे. ॥छ॥
स्मर ज्ञान वक्रगति सगि वेधु तो विकारु रे !
दिगंबरें भाव नुरे ! ॥२॥

१५८७
॥ धानाश्री. ॥
अवधूता ! तुझी आण मज आतां ! तुझा वियोग न साहे ! ॥१॥धृ॥
नको दुरि धरूं रे ! वरदा ! निवारिं बा ! संसार आपदा ! ॥छ॥
नयन क्षीण जाले दिगंबरा ! येइं देवा ! नको दूरि ! ॥२॥

१५८८
इष्ट संगु त्यावरि नाहीं माझी मज चिंता त्यावरि तुं ऐसा. ॥१॥धृ॥
काये नेणों तूं रे ! अझुणी ? पाहासी पैं दिनाची करणी ? ॥छ॥
नलगे क्षणु तुवां मानसीं धरितां ! दिगंबरा ! जाण देवा ! ॥२॥

--------------------------------

श्री
॥ श्रीमदादिगुरवे दत्तात्रेयाय नमः ॥

प्रबंध
( श्रीमद् भगवत्भक्त दासोपंत कृत. )

१५८९
अजा ! निर्गुणा ! निर्जना ! निर्विकारा ! परा ! पूर्णबिंबाद्वया ! योगसारा !
सुर, सिद्ध संसेविती पूर्णपरा ! तुतें वर्णितां पैसु नाथी विचारा ! ॥१॥
अमायात्मका ! चिद्घनानंदमूर्ती ! परब्रह्म सर्वांसि तूं आदि अंती.
तुतें वर्णितां, वेद न येति व्यक्ती.अतद्वादता शंकले ‘ नेति नेति. ’ ॥२॥
दयामंदिरा ! विश्वबीजा ! पुराणा ! निराकार साकार तूं, विश्वभाना !
तुझा बोलतां योगु वाचेसी ये ना ! कईं भेटसी देवदेवा ! निधाना ! ॥३॥
शिवा ! श्रीधरा ! श्रीकरा ! सिद्धिराजा !
धरूं केवि मीं आत्मयां ! भाव दूजा ?
स्वयें नूरणें, हेचि निर्वाणपूजा. जपें जपु तो निर्विकल्पें चि वोजा ! ॥४॥
ऐसा तूं परमात्मयां ! पुरपती ! मायांधकारांतका !
सर्वज्ञा ! सकळार्थदा ! सुरगुरो ! सद्योगियां सेवका !
तूझा किंकरु होय जो निजमनें सांडोंनि अर्थादिकां
पाता तूं भवरोगियां शिवशिवा ! तया प्रिया बाळका. ॥५॥
वासरमणि तमसार्कु ते नाशी स्वजनदयाकर माया तैसी.
जाणिवं नेणिव न ढळे मनसी गुरु प्रज्ञा मीं वर्णुं कैसी ? ॥६॥
विषपरि पियुषें मय तव वचनें अवधूता ! परमार्थें जाणें.
नावडती मज आणिक ज्ञानें ज्ञान नव्हे ज्ञेयाचें जेणें ॥७॥
चंचळपण मन ह्मणिजे वारा वारुनि वेदन धांवे सैरा
सैरपणें कर्मा दे थारा थारेना सर्वज्ञा ! धीरा ! ॥८॥
तैसें मन मज न वळे देहीं देहेंसीं दुरि धरितां पाईं
वरदा ! तें तुज दिधलें घेईं मन माझें वश कीजो पाईं ॥९॥
ऐसा मीं तुजमाजि भेद भजतां, भेदें चि निर्भेदता
सत्याचा गुणगायनीं श्रुतिपरू रूपाचियां शुन्यता
सर्वत्रैकरसाद्वयाव्ययमती ब्रह्मैकरूपाच्युता !
दत्ता ! दीनदयाकरा ! जय गुरो ! तूं येक माता पिता. ॥१०॥
धनाची जना वासना भ्रांति मोटी उपायार्थ संपादिती बुद्धि खोटी
वय वेंचलें सर्व ही त्या चि पाठीं अघ सांचलें कर्म हें लक्ष कोटी ॥११॥
दयाधर्म नेणें सदा दीनवाणा धनलोभिया अर्थ भोगासि ये ना.
तेथें वासना येकि ते सांडवे ना जडे पाप तें दाखवीं जन्म नाना. ॥१२॥
धन सांडुनी पाप केणें पसारा भरी तो नरू उद्यमी येक खरा.
विनाशू चि त्या आवडे निर्विचारा.
कसा जातसे येकला देशांतरा. ॥१३॥
असा जन्मुंनी वंचला येक प्राणी अवीहीत तें सर्व हीत चि मानी
देवा ! विश्व हें मोहिलें याच गूणीं
तुतें नेणती नेघती शब्द कानीं. ॥१४॥
ऐसी हे धनवासना जय गुरो ! सर्वज्ञनाथा ! शिवा !
हीतार्थीं विपरीत भाव भजवीं अज्ञानबद्धा जिवा.
माया हे भवभूमिका गुणमयी कां सिद्ध केली तुवां ?
तूझां पंथु गणाश्रया गुणराया मोडला आघवा. ॥१५॥
नदिनदगत जळ झळझळ वाहे पाणी परतें ना स्थिर राहे
तनुगत चळ वय तैसें आहे लव त्रुटि पळ पळ क्षिणता होये. ॥१६॥
जन, वन, यौवन, तनु, धन, जाया बंधन हे वरि पडली माया.
श्रमला जिउ न पवे त्या ठाया तूं तेथें वससी गुरुराया ! ॥१७॥
चंचळ चळ द्रव द्रवती धारा नदिनदगत जळ धावे सैरा.
चातक वरपडि न करी धीरा बिंदु भजे परि न भजे येरां. ॥१८॥
तैसा मज तुजवांचुंनि दुसरा तारकु न मने, ऋषिकुळमुकरा !
दत्ता ! गुणमयु वाजे वारा; तव रूपीं मज देपां थारा ! ॥१९॥
सर्वत्री तनु मानियां बहु जडां आस्थानसे निर्गुणी
सारासार विचारसार भजतां संयोजिती खावणी
शब्दीं दोष विशेष पाहुनि बळें निभ्रंशिती दाटुंनीं
आतां ते जन वंदिले बहु गुणें गुरुत्व म्यां ठेउंनीं ॥२०॥
जनाचा जना द्वेषकर्त्यास वैरी अहंकार तो हाणतां खड्गधारीं
मदें मत्सरें मातला; काय करी ?
कटा घेतला कामक्रोधें विकारीं ॥२१॥
वदे तामसें शब्द वादा चि वारी जळे सर्वांग संगु शांतीसि वैरी
तयाचा जना देवदेवा ! निवारीं उपदेश तो ऐसिया काय करी ? ॥२२॥
अहो ! काष्ठिचा वन्हि काष्ठासि खाये भला तेथ जो सलिल होऊनि राहे.
कसा जिंकिला सत्वयोगें उपायें मरे तामसें मंत्र तो हा चि लाहे. ॥२३॥
देवा ! हें चि मागतुसें सत्व देईं बुडो चित्त विश्वंभरीं ! शांतिडोहीं ।
दयामंदिरा ! भाव ठेवेन पाईं झणें मीं चळें पारिकांचा ळीलां हीं ॥२४॥
आत्मा तूं परमात्मयां ! सुरपती ! संसारदावानळा !
संदिग्धां भंवरोगियां शिवशिवा ! कैं भेटसी ! श्यामळा !
ऐसा कें परमार्थ भक्त कवणां कृपा तुझी ये फळा ?
त्राता तूं करुणार्णवा ! पुरपती ! होईं जडां व्याकुळां ! ॥२५॥
चित्त रमे धनदगिमध्यानीं पाद निरंतर तीर्था करणीं
श्रमु देहीं बहु निद्रा नयनीं. तव गुणगायन कैंचें श्रवणीं ? ॥२६॥
रस विषयांवरि धावें रसना ! शांति पळाली ! गेली राना !
रानट कुंजरु भ्रमतां मदना क्रोधी गुरुगुरु करितो, सूना ! ॥२७॥
हृदयीं बळ कामाचें मोटें घे दे तरि खरियाचें खाटें
निंदकु दुर्जनु घाता पेटे निर्न्नाशक वरि शंका न वटे. ॥२८॥
ऐसा तो नरु परति न लाहे पळ पळ चळ वय वायां जाये
तो ही जरि धरि गुरुचे पाये पावन मग तो पहिला नोहे. ॥२९॥
ऐसा सद्गुरु सेवितां कविजनां संप्राप्ति जाली कळा
योगानेकविवेकसार पदवी कैंची जडां व्याकुळा ?
देहीं देह विदेह योगभजनें सर्वज्ञ संत्रासला !
ऐसा तो गुरुराजता अनुभवें संवेदनें पावला. ॥३०॥
महितळगत जळ चंचळ सरिता पावतु जलधरु भरिली भरिता.
तन्मय निश्चळ जळिं जळ जळता पूर्वोपाधी ने घे खलुता. ॥३१॥
 तैसा अनुभउ जाण सुजाणा ! मन मुळ जाणुंनि ये जो स्थाना,
भेदु नसे कव्हणेंसीं कव्हणा विनाशु तनुगुण गणितां भाना. ॥३२॥
घट मठ पट तत्तत्तन्नाशें गगनि गगन न गमे गमितां तैसें
ब्रह्म निरंतर द्वैत विनाशे सहज सनातन नभ नभ ग्रासे ! ॥३३॥
जाणितलें मग ते खणु नाहीं नेणिव ठाइंचि पडली घाईं
मीपण गाळुनि ठेला ठाईं सहज्न दिगंबरु येक अदेही. ॥३४॥
ऐसा तूं सुरनायका ! सुरपती ! दीनार्तिसंन्नाशना !
मायामोहनिवारणा ! दिनमणी ! जग तुझी ईक्षणा.
संसारीं भवरोगियामृतकरा ! देवादिसंदीपना !
दत्ता ! तूं गुणगायनीं प्रकटसी; संपादिसी कामना. ॥३५॥
शिवा ! अव्यया ! सर्वसंदेहनाशा ! परब्रह्म तूं विश्वभासा ! उदासा !
परिव्राजका ! येक तूझी चि आशा
दयामंदिरा ! श्रीगुरो ! जी ! महेशा ! ॥३६॥
अजा ! निर्मळा ! निष्कळा ! निर्विकारा ! परा ! पूर्णबिंबाद्वया ! योगसारा !
परब्रह्म तूं विश्वभासा ! अपारा ! कईं भेटसी ? योगिराजा ! उदारा ! ॥३७॥
अहो ! सच्चिदानंद संपूर्णपणें असे व्यापिलें विश्व येकें चि येणें !
खुण अंतरीं जाणता तो चि जाणे
बळी दीधला जीव जीत चि येणें. ॥३८॥
परब्रह्म नीरंजना आत्मयातें भजा रे ! भजा श्रीगुरो योगियातें !
जग तन्मय आतले विश्व जेथें नुरे त्रीपुटी शुन्य आकाश रीतें. ॥३९॥
ऐसा सज्जनसंगमीं सुखकरीं विश्रांति पावे मना !
नाहीं रे ! परमार्थ तीर्थभ्रमणीं कां मोहिसी आपणां ?
मायाविभ्रम सांडिकां श्रम करीं देवाचियां कल्पनां
तूं द्रष्टा खुण हे चि जाण हृदयीं दीगंबरीं वेदना ॥४०॥
अमळ शिव गुणवर्जितात्मज ज्ञेय ध्येय निरंजना !
पारवर्जित पदसदोदित सत्य येक सनातना
स्फुरण वर्जित वन निराकृत कारणा प्रति कारणा
वर दिगंबर आदिशंकर जनीं भ्रमशमनाशना ॥४१॥

१५९०
नामावली.
अमरगुरो ! जय लोकेशा ! मुनिजनहृदयविलासा !
साधुपते ! जगदाभासा ! परमानंदा ! जगदीशा !
साधकजनप्रतिपुर्णज्ञा ! कर्माकर्मविकारहीना !
आवधूता ! गुणनिधाना ! तुजविण आणिक माने ना !
शोकददोषह ! विकाशा ! त्रिगुणेशा ! त्रिगुणाभासा !
दत्तात्रेया ! लोकपती ! तुजहूंनि नाहीं त्रीजगती !
परमगुरो ! करुणामूर्ती ! पुण्यकराद्वयगुणकीर्ती !
अवधूता ! जय माहेरा ! मुक्तिदसाधनविस्तारा !
निर्गुण ब्रह्म ! निराकारा ! योगदयागुणउदारा !
आत्मज बोधन विश्रामा ! शिवरूपा ! जय निःकामा !
निगमागमगुणगंभीरा ! सुखमूर्ती ! सुखदाधारा !
आत्रेया ! अमरेशा ! रे ! पाहिन तुज मीं ! बा ! ये, रे !
श्रमहर कीर्त्तनगुणनामा ! करूणामूर्त्ति ! घनश्यामा !
विमळानंदा ! जय रूपा ! साकारा ! शिवस्वरूपा !
कल्पितभेदविनाशकरा ! गुणकृतभवतमसंहारा !
मायामुक्ता ! पूर्णपरा ! दिगंबरा ! जय दिगंबरा ! ॥१॥धृ॥

१५९१
योगीजनवल्लभा ! लीलाविश्वंभरा श्रीदत्ता ! सद्गुरो ! कृष्णवर्ण ! सुरेश्वरा !
अत्रीवरदा ! अवधूता ! अनुसूयानंदना !
विज्ञानसागरा ! शिवशिव कालाग्निशमना ! ॥१॥
योगिराजा ! राजेशा ! फरशधरप्रिया !
कार्त्तिवीयवरदमूर्त्ती ! जय जय दत्तात्रेया ! ॥२॥
देवदेवा ! सर्वज्ञा ! मायाविवर्जिता !
सिद्धेशा ! जनमानसहरणा ! मायागुणयुक्ता ! ॥३॥
विश्वंभरा ! अवधूता ! जय जय दिगंबरा ! चित्कीर्त्तिभूषण !
दत्ता ! सर्वज्ञा ! उदारा ! ॥४॥

१५९२
अवनी कण गणने प्रति आली तिया चि ते अनुमेया.
श्यामळ सुंदर स्वरूप तुझें न कळे दत्तात्रेया !
सझरा झरझर पाझर झरती जळें चि जळ गणताहे.
अगणित गणिता गणिता न धरे, सगुण हें परि माये ! ॥१॥धृ॥
सुरतरु तरूवरु परु चरु न घडे गणिजे मानें येणें.
दत्ताचें रूप सर्वग; गमितां जाणीव पांगुळे तेणें.
पळ पळ चळ वय गेलें वायां ! काये करूं मीं आतां ?
देवगुरो ! तुजविण जगजनका ! दत्ता ! रे ! अवधूतां !
घेउंनि गुणबळ पळ पळ करि; चल, चंचळ न वळे मन.
अवधूता ! तव पायीं न धरे ! धरितां स्थिराओंन. ॥२॥
जन धन, जन धन, वन वन करितां मन हें जालें श्वान;
गुणगत मळमय वळिजे जेणें तद्वत तें ही ज्ञान.
मनें मन बहुगुण कुंठित जालें; न लगे मातें ध्यान !
दिगंबरें विण न चले करणें केवळ पडलें मौन. ॥३॥

१५९३
॥ नाट. ॥
प्रथम योगामृतसारदा, ब्रह्मात्मज्ञानसुखसंपदा,
विज्ञानकळा नमिजे सदा या भवबंधा छेदावया. ॥१॥धृ॥
मंत्रविद्या हे सरस्वती श्रीसिद्धराज गुण संस्फूती;
जीणें पाविजे निज निवृत्ति स्वरूपशांति चर्मदशा ! ॥२॥
अनंत सिद्ध वरले जिया, संप्रदायिकां परमक्रिया,
सुवर्णमयी महदव्यया, श्रीयोगिरायाची प्रतिमा. ॥३॥
प्रथम योगीं हें चि साधन मंत्र आगम अनुष्ठान
तेवी चि नामामृतसेवन संकीर्तन दिगंबरीं. ॥४॥

१५९४
प्रथम नमो अविघ्नकरा गुरु सर्वज्ञा आदि ईश्वरा
स्वभावशून्या लोकशंकरा बोधसागरा श्रीदत्तातें. ॥१॥धृ॥
तुझेनि नामामृततुषारें हृदयीं वस्तुज्ञान अंकुरें;
कार्यकारणमति संहारे प्रेम महू रे ! स्वरूपस्थिती ॥२॥
स्वानंदु स्फुरे श्रोतया जना ! वक्तया देहभावो गमेना !
स्वरूपसिद्धा ! नमो निर्गुणा ! स्वसुखपूर्णा दिगंबरा ! ॥३॥

१५९५
॥ नाट, भिन्न चाली. ॥
न ये पुडती संसारा; देवा ! न करी येरझारा;
मन श्रमलें बहु गुणमतीचंचळ; दत्तात्रेया ! अवधरा !
विचारा ! माझेरा ! ॥१॥धृ॥
आत्मयां ! आत्मयां ! देवराया ! तुजसीं अंतर मज बहुगुणें बाधक;
वरि पडली महामाया ! ॥छ॥
देवा ! न कळे मज क्रिया; नेणें भजन योगिराया !
योग, तपस, देहें येणें मज न होती, दिगंबरा ! गुणवीर्या ! ॥२॥छ॥

१५९६
वृथा श्रवण काये नाना ? वृथा मनन गुण दे ना !
गृथा श्रमद काये ? शम, दम, साधन,
गुरुविण फल दे ना ! उमजेना ! ॥१॥धृ॥
आरंभीं आरंभीं आरंभीं पदलाभीं
गुरुमुख पावोन अनुभविजे खुण.
मिसळे जेवि नभ नभीं स्वयंभीं, ॥छ॥
देहभान चि जेथ नाहिं, पदीं दर्शन दृश्य काहीं, ॥
शिवस्वरूप सम सहज निराकूळ
दिगंबर अवघें हीं पर नाहीं केव्हां ही ॥२॥

१५९७
॥ अहिरी ॥
जन्म वेचले कोटी ! काळ क्रमले पाठी ! भेटी भेट न योगियां !
भक्तकरुणाकरा ! श्रीगुरो ! माहेरा ! केवि पाहों मीं ? आत्मयां ! ॥१॥धृ॥
आरे ! तुझें नामस्मरण भेषज तापत्रय हरण मोक्षबीज ॥छ॥
जळो हें विषयसुख ! तुजवीण सर्व दुःख ! मूर्ख भजती तैसिया !
दिगंबरा ! तुझें नाम नित्य स्मरण प्रेम साध्य परम प्राणिया ! ॥२॥

१५९८
॥ कल्याण ॥
मीं काये भजों ? परि तूं चि कृपाला ! घेउंनि आंगीभार स्वल्पावलीला !
संपूर्ण मोहें करि तूं उतावीला !
येउंनी केला भवतमा वेगला. ॥१॥धृ॥
तूं बा ! माझा ! मीं रंकु तूझा ! सर्वज्ञा तारियलें बरविया वोजा ! ॥छ॥
नेणें मीं साधनातें, विरक्तिहीनु; विषय पशु देहबुद्धि मीं अज्ञानु.
ऐसिया मातें मोहिलासि आपणु. साध्यतें केलें मज मीं चि निर्वाणु. ॥२॥
भजों मीं नेणें; परि दासत्व दिल्हें !  नेणें मीं, केव्हां रूप स्वरूप केले ?
उत्तीर्णपणें येथ काय उरलें ? तुवां चि अंगीकृत सेवक केलें. ॥३॥
तुझेन पादबलें संपूर्ण जालों ! त्रैलोक्य ग्रासूंनि मीं चि उरलों !
कालु ही कालुलीलाविग्रहें केलों ! वेद्यत्वें वंद्य स्वयें स्वभावें जालों ! ॥४॥
प्रकटे तैं रूप मायेसि नूरे; ऐसें कृपाबलें कां घडे ? बा ! रे !
अनादिसिद्ध मीं चोज स्फुरे माया हें मृगजल कैंचें मा विरे ? ॥५॥
तूं कीं मीं मीं तूं ना मिसे तुझेनि मातें बोलतां ऐसें परि बोला परुतें.
विचारु पाहे तवं तें उपाधिपंथें ऐसें चि दिगंबर तूं चि आइतें. ॥६॥

१५९९
॥ मल्हार ॥
श्रीगुरुपदारविंदें प्रेम परमानंदें तीं तेणें मकरंदें टवटव करिती.
परि तोष परिमलें रंगीत रातोत्पलें योगीजन अलिउले रूणुझुणु करिती
संत सनकांदिक साधक जन अनेक दास निज सेवक लाहो घेती
पाहातां पैं लोचन ध्यातां निववी मन बुद्धी समाधान तेथ
गे ! बाइये ! ॥१॥धृ॥
श्रीदत्तु निर्वाण माझें जन्मस्थान शिव परम कल्याण अगुण गे ! बाइये ! ॥छ॥
श्रीगुरूमुखांभोज चंद्रकोटीबीज प्रकटी तेजातेजे तेजीकातें.
तात्विकें मकरंदें अर्थाचेनि स्पंदें मधुकरें ईष्टदें गुण गुणु करिती.
वेधले ब्रह्मादिक पाहातां तें श्रीमुख भूलले येकानेक तन्मयत्वें
ज्ञाता ज्ञेय ज्ञान जेथूंनि जनन स्फुरलें समाधान तेथ गे ! बाइये ! ॥२॥
सर्वांगें सुंदरु उपमानतें परु लेणें विश्वाकारु करूंनि ठेला !
दाउंनि जग लपवी; लपउंनि विश्व दावी सर्वांगें मायावी सर्वही जाला.
सत्वादि गुणमयु, गुणाते अज्ञेयु, गुणदृष्टी ज्ञेयु जाला गे ! माये ! ॥३॥
अगुणगुणभर्ता, निर्गुण न ये ह्मणतां गुणभावें आइकतां सगुण नव्हे.
व्यक्त ना अव्यक्त परि जो व्यक्ताव्यक्त मूर्त्तू ना अमूर्त्तू ऐसा भावें.
छंदे गुण भूललीं ! पुराणें परतलीं ! शास्त्रें थोटावलीं ! न चोजवे !
दिगंबरु गुणवशें न भासतु भासतु भासे भदा मारूंनि असे
सर्वांगे गे ! माये ! ॥४॥

१६००
मल्हार
सत्य वाहातुसे आण, संता सन्मुख होऊन,
दत्तात्रय हें स्मरण, ध्यान, धारण, मज.
दुःखदायएं साधनें क्लेशकरें काहीं नेणें;
मेदु गलिला भजनें, येणें दाविलें नीज.
बापु भजन सोयरें, येर लटिकें दुसरें;
रूप ध्याइजे आदरें नामगजरें बीज.
तेणें तैसें चि होइजे सत्य ह्मणोनि जाणिजे
अन सारिखे भाविजे निज सहज गुज. ॥१॥धृ॥
आतां काये करणें ? कासया न करणें ?
स्वयें चि असणें होणें स्वपदपूर्ण.
अवधूत हा येसणा द्वैतु न लवी आपणा
भेदु जिरविला खुणा ध्याना आलियांवरी ॥छ॥
नामें स्वरूप आठवे मनीं धरिजे स्वभावें
ज्ञानइंद्रियां नेणवे जीवीं जीवा परुतें
नित्य भजतां केवल मनीं विसरिजे स्थूल;
चित्त जाहालें निर्मळ; मूल आठवे तेथें.
आधीं दृश्याचें हरण होये सुलीन दर्शन
दृश्य द्रष्टत्व सांडूंन ध्यान ध्येयासि जेथें
स्वयें प्रकटे निर्गुण ग्रासी समाइक स्फुरण
दिगंबरीं हें भजन ज्ञान अपर जेथें. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP