१०२१
धर्म अधर्मु जाला; उगला राहीं रें !
संगू चि न लगावा तुझा यये देहीं रे ! ॥१॥धृ॥
न स र ज नी ऐसी करणी रे ! ॥छ॥
सर्वस्व हानि जाली; कुंठली क्रीया रे !
दिगंबरा ! अझुणी न सोडिसी काह्या रे ! ॥२॥
१०२२
लागटपण कैसें न दिसे डोळां ? वो !
जीवीं जिवा न कळे अकळ कळा वो ! ॥१॥धृ॥
कैसी मीं करूं ? यया केवि धरूं ? वो ! ॥छ॥
सोडितां भेटि बळें, न चले माये ! वो !
दिगंबरु जडला; वेगळा नोहे वो ! ॥२॥
१०२३
रूप अरूप घेतां, धरितां न ये वो !
येतु जातु न कळे; करणें काये ? वो ! ॥१॥धृ॥
मोहिलें मावा; हरिलें जीवा वो ! ॥छ॥
धरितां यासि माये ! मज मीं लाहें वो !
दिगंबरु न कळें; कळणे खाये वो ! ॥२॥
१०२४
स्वभक्तजनबंधू परमानंदू वो ! अवधूतु सखिये ! करुणासिंधु वो ! ॥१॥धृ॥
पाहिन डोळां माये ! वेळां वो ! ॥छ॥
विज्ञानजळधरू अपरां परू वो ! दिगंबरु सखिये ! स्वसुखकरू वो ! ॥२॥
१०२५
श्रीगुरो ! योगिराया ! अमितवीर्या ! रे !
मुनिजनवरदा ! दत्तात्रेया ! रे ! ॥१॥धृ॥
कमळनयना स्मरें क्षणक्षणा रे ! ॥छ॥
श्रीपती ! त्रीपुदेशा ! परमपुरुषा ! रे !
दिगंबरा ! दुसरी न करीं आशा रे ! ॥२॥
१०२६
त्रिगुणातीतरूपा ! स्वरूपानंदा ! रे !
जय ! जगजीवना ! अभयवरदा ! रे ! ॥१॥धृ॥
तुजविण नेणें येणें निजमनें रे ! ॥छ॥
चिन्मयानंदघना ! सगुणा ! येइं रे !
दिगंबरा ! येकुदां दर्शन देईं रे ! ॥२॥
१०२७
क्रमले जन्म कोटी; नव्हे चि भेटी.
सखया ! देखयीन कैं कैं दृष्टी ? रे ! ॥१॥धृ॥
सद्गुरुराया ! दत्तात्रेया ! रे ! ॥छ॥
हृदय फूटताहे; भेदु न साहे. दिगंबरा ! येकुदां दाखवीं पाये रे ! ॥२॥
१०२८
मागणें नाहीं दत्ता ! न करीं चिंता रे !
येकुदां भेटि देयीं; जायीं अवधूता रे ! ॥१॥धृ॥
न राहे मन रे ! देवा ! तुजवीण रे ! ॥छ॥
आणीक बोलयीन तरि मज आण रे !
दिगंबरा ! तूज मीं सवें असईन रे ! ॥२॥
१०२९
नावडे मज योगू, पदिये संगू वो !
नयन क्षीण जाले पाहातां मार्गू वो ! ॥१॥धृ॥
लागलें ध्यान निरंतर स्मरण रे ! ॥छ॥
नावडे ज्ञानवादु अद्वयबोधू वो ! दिगंबरु भेटवा परमानंदू वो ! ॥२॥
१०३०
माये तूं बाप माझा मुनिजनराजा ! रे !
योगिजनवल्लभा ! सुतु मीं तूझा रे ! ॥१॥धृ॥
न बोलें भावा ! अरे ! देवदेवा ! ॥छ॥
तूजसीं दूरि होतां नुरे तत्वता रे !
दिगंबरा ! तुझेनि कळलें चित्ता रे ! ॥२॥
१०३१
तूं तेथ मीं कवणू होयीं पां ! जाणू रे !
मज मीं निर्धारितां तुझा अनुमानू रे ! ॥१॥धृ॥
आत्मया ! रामा ! रे ! कळलें अह्मा ! ॥छ॥
सत्यासि द्वैत नाहीं वेगळें काहीं रे !
दिगंबरा ! नेंदिजे अंतर काहीं रे ! ॥२॥
१०३२
सरसर सैरा श्रवती धारा जळिं जळ जळधरु जैसा;
श्रवणीं पडिला शब्धु भजे, परि भाॐ गमे मज तैसा.
निष्ठेची खुण बाहेरि पडतां नुरवी ते आकाशा.
ऐसें गुणसंकीर्तन श्रवणीं जालें मज महेशा. ॥१॥धृ॥
दत्ता ! सांगपां ! झडकरूंनी, कैसी हे करणी ?॥छ॥
जळधरु सरिते चाले, भरितें निरें निर परतें जैसें;
दृश्याचें सुख दृष्टी घेतां होताहे मज तैसें.
अधिष्ठान सत्तेचें अन्वित भिन्न पडे तें कैसें ?
अवधूता ! तुझी पाहातां प्रतिमां कां होताहे ऐसें ? ॥२॥
जळीं जळ चळ ढळे, चंचळ लहरी निमे ते जळधरीं.
गुणी गुणगण गुणसाधन करितां माने मज तेपरी.
चित्त विचंचळ करणी तरलें, निमालें तें अविकारी.
दिगंबरा ! तुजकरितां हें मज दृढतर जालें भारी. ॥३॥
१०३३
वय चळ चळतां तैसी सरिता वाहातां दीसे पूरू.
गेलें पानिय न वळे पुडती, टाकी तें जळधरू.
देहाची गति तैसी चाले, मरण ययाचा पारू.
इतुलें जाणोंनि कैसें करणें ? न कळे तो वीचारू. ॥१॥धृ॥
दत्ता ! कैं येसी ? सांगपा श्रमलों मायेबापा. ॥छ॥
धन धन ह्मणतां जन जन वनिता चिंतेचा पुर वाहे.
दैवाधिन तें यत्नें करणें तेणें श्रमलों उपायें.
सेवटीं प्राचीन भोगीं न चके; तृष्णा गगनीं न माये.
क्रियमाणेंविण उगलें न सवे, बंधन तें दृढ होये. ॥२॥
चंचळ हें मन स्थिरता न धरी; करणगणान्वित जाये.
कामाचें बळ सहसा न चळे; न कळे कळलें नरा हें.
रोषावेषविधानें सरिता अहिता लोटिति आहे.
दिगंबरा ! तुझें न टके स्मरण; धाव घेइं लवलाहें. ॥३॥
१०३४
थिल्लरिचें जळ खरतर तपिया ! मीना ! तळपसी कायी ?
अवसु ये तवं चिंती जळधरु, सागरु टांकुंनि जायी.
संसारिक हें तैसें मनसा ! वय तव निश्चळ नाहीं.
अवधूतें विण कैंचें रे ! सुख ? यत्नु करीं लवलाहीं. ॥१॥धृ॥
आतां कैं होईल दर्शन ? उताविळ मन; ॥छ॥
प्राणु वोवाळीन; लागलें वो ! ध्यान. ॥छ॥
मृग तळमळिती, मृगजळ भजती, काये ते निवती तेणें ?
स्वप्रधनास्तव चाळी भूमिका, धनीकु तो न गणणें.
विषयाचें सुख तद्वन्मनसा ! भान अवस्थागुणें.
दश दिशा परिभ्रमण करितां अर्थु विनाशा जाणें. ॥२॥
सद्गुरुविण गति न गमे; गमितां श्रमितां तो विश्रामू.
संसाराचें बीज करपवी निर्मळु आत्मारामु.
प्रथमावस्थे साधन भुमि सांडिपां ! गुरुधर्मु.
दिगंबराचें चिंतन करितां न पवसि खलुता श्रमु. ॥३॥
१०३५
चंचळ हें मन निश्चळ करितां मुनिजन श्रमले बापा ?
अवधूता तुजवांचूनि न कळे; यत्नु नव्हे तो झोपा.
भक्तीचें बळ लाहोंनि जडती; योगा भजती विकंपा.
तें निश्चळलें तुझें चि ह्मणवी; ऐसी हे तव कृपा. ॥१॥धृ॥
आतां झणें जासी दुरि धरितां; आत्मा तूं अवधूता ! माझा. ॥छ॥
तापस ह्मणती, दुर्जय पुडती सन्यासी सन्यासें.
ब्रह्मा तो परि अधीनु मनसा; हारविलें कैलासें.
ईश्वरु त्रिगुण गोप्ता तो; तो परि चाळविला मनसें.
सत्याचें मुख असोनि नेणें माझें विषयरसें. ॥२॥
मन स्फुरे तवं आधी स्थिरता; जडलें तें अविनाशीं.
चंचळ परि तें सत्यें दह्रिलें भानाचा विनाशीं.
सहजें आसन बंधन मुद्रा मन चि पडलें ग्रासीं.
दिगंबरा ! तुझी ऐसी चि करणी; केवि कळे येरांसि ? ॥३॥
१०३६
कुकर्म आधीं करणें. केलें तें विसरणें.
पाठीं फळ भोगणें. अचुक ठाकैं ! ॥१॥धृ॥
काये सांगों ? देवा ! भक्ताचीया मावा !
वायां विण गवगवा करिती मूर्ख ! ॥छ॥
आलें भाग्य पुरे; मग देवा वीसरे; इष्टमित्र सोयेरे तें धांवती.
त्यांचें चित्त धरी; देवाचें न धरी; वरैल कवणे परी ऐसा बहु ? ॥२॥
क्षणीक भाग्य सरे; मग दरिद्र संचरे; देवा देवा स्मरे पुडतोपुडती !
नवसी सेरें गुळें राज्य चि सगळें. दिगंबरा ! कळलें भक्तप्रेम ! ॥३॥
१०३७
करितां देवार्चन फळपत्रजीवन, आपण षड्रंस अन्न भक्तु भक्षी.
वस्त्र अलंकार नित्य नवे उपचार; देवा ! जुनें वस्त्र जर्जर जालें. ॥१॥धृ॥
काये सांगों नवल भक्तांचें केवळ ? देवार्थ पोफळ वेचणें नाहीं. ॥छ॥
तस्करु सर्व हरी; राजा दंडी जरी; मग तो त्या देवावरि घाली भारू.
पूर्वकर्में तेणें न तुटती बंधनें; मग देवाकारणें दे गालिया. ॥२॥
सुटला तरि ना गुता भाग्य भवन चिंता; तत्प्राप्ती सर्वथा विसरे देवा !
दिगंबरा ! कुश्चिळ ऐसें भक्त खळ; तयांचें कुशळ कवण चिंती ? ॥३॥
१०३८
देहीं अहंकारु, क्रोधाचा सागरु, दंभु, मद, मत्सरु आंगीं जया;
कामनेचा पुरु, स्वस्वार्थीं तत्परु, तयाप्रति गुरू वदती काये ? ॥१॥धृ॥
काये सांगों येक शिष्याचें चेटकपण ?
गुरुहुनि अभिमानु दह्रिती देहीं ! ॥छ॥
सर्वस्व मागणें; नवें नवें पूसणें; आपुलें काहीं देणें; तें नावडे.
विद्याबळ होतां, आणि समानता,
काहीं न कळतां, गुरुवरि क्षोमे. ॥२॥
स्वस्वार्थावांचूंन न भजे काहीं मन;
त्या शिष्या ते च वन कैसें नव्हे ?
दिगंबरा ! जाण, ऐसें कुश्चित जन !
तया तुझें स्मरण ज्ञान कैचें ? ॥३॥
१०३९
गुरुमुर्ती ! दातारा ! भक्तकरुणाकरा !
लीलाविश्वंभरा ! स्मरण तुझें विज्ञानाचें सार, भक्तां प्रेमकर,
विश्रांतीचें घर, जीवन माझें. ॥१॥धृ॥
काये मागों तुतें याहुनि ? दातारा ! तें चि सर्वेश्वरा नित्य देयीं. ॥छ॥
कमळाकृतलोचना ! भवदुःखसंहरणा ! दत्ता ! निर्गुणगुणा ! निरोपाधी !
तुझेनि स्मरणें दिगंबरा ! जाणें, भस्म होती क्षणें द्वैतबुद्धी. ॥२॥
१०४०
परब्रह्मअवतारा ! विज्ञानसागरा ! न कळे सर्श्वेरा ! माया तूझी.
करितां गुणश्रवण, नामसंकीर्तन कुंठित जालें मनप्रज्ञा माझी. ॥१॥धृ॥
काये सांगों ? सहजें मीं मज माझें नुमजे,
केवळ स्वरूप तूझें निर्धारितां. ॥छ॥
योगियांचें ध्येय, शिवरूप अव्यय, स्वरूप तूझें ज्ञेय सर्वेश्वरा !
विश्वाचें कारण, कर्मत्रयदहन, त्रीपूरपावन, दीगंबरा ! ॥२॥