११६१
आत्मज्ञानें म्यां संसारु केला. नवलाॐ येथें येक घडला.
दत्तु ह्मणौंनि भजें आत्मा आपुला. भेदु माया परी संप्रतिष्ठीला. ॥१॥धृ॥
तसा चि लेखा घडला तूह्मा. अधिकारें हाणतासी,
वियोगें हाणतासी, कर्मजें हाणतासी, कासया आह्मां ? ॥छ॥
तूं मज गुरु, देॐ, श्रीदत्ता ! कास याकरूं मीं आपुली चिंता ?
दिगंबरा ! वारि बा ! हे वेथा ! नाहीं तुतें गुरु, माता, पीता. ॥२॥
११६२
तूं माझा आत्मा, तरि हे आशा ? दोघां लाजिरवाणें हें जगदीशा !
कामक्रोधाचा देहीं नित्य वळसा; अशक्त जालों मीं; काये तूं तैसा ? ॥१॥धृ॥
आतां हें कव्हणा सांगोंनि कायी ? हृदयीचें दोघां असो हृदयीं. ॥छ॥
तुझा मीं अंशु, तरि तूं माझा अंशी; मध्यें अंतर तें कां ठेवितासि ?
माझेनि दासत्वें तूं येकदेशी. दिगंबरा ! दोषु लागे दोघांसी. ॥२॥
११६३
तुझें देवा ! आह्मीं दास ? कीं पुत्र ?
अंश ? कीं काहीं न हो सत्यस्वतंत्र ?
कैसी मर्यादा धरूं ? बोल उत्तर.
ईतरु काये जाणे घरिचें क्षुद्र ? ॥१॥धृ॥
कमळनयना ! कां बोलसी ना ?
वर्मीं लागला शब्दु माझा साहे ना ? ॥छ॥
दिगंबरु बोले ::- वदतासि उणें; हृदय तुझें मीं सकळ जाणें.
उभेषांसि तुटि पडली वचनें. येथें तुवां चि येकें कां म्यां चि असणें. ॥२॥
११६४
तुज देखतां मी माझा ठायीं मज पाहातां तूं अससी काई ?
नामारूपाचा तुतें ठाॐ चि नाहीं.
माणूसपण वर्ते आमुचा देहीं. ॥१॥धृ॥
देवा ! मजसीं वादा न यावें वर्म जाणोनि मौनें उगे रहावें. ॥छ॥
जाणतां तूंतें तूं देॐना भक्तु; मातें लक्षूंनि जाहालासि समर्थु
उपकारू येसणा हा नेणसी कां तूं ?
वादीं दिगंबरा ! नव्हसी स्वशक्तु. ॥२॥
११६५
बोलतां बोलतां बोलु सेवटा गेला. श्रीदत्तु बोले ::- अरे ! भला भला,
लोकीं कुधर्म तुवां सर्व सांडीला.
देवत्व आहे येक, घेसी तयाला. ॥१॥धृ॥
तुझ माझें तूटलें, जाण. बोलोंनि काये आतां वृथा वचन ? ॥छ॥
दिगंबरू बोले ::- तूं तो कवणु ? देहो ? की मन ? जीउ ? कीं प्राणू ?
बहूं प्रलपन सांडी अवगूणू. अकिंचनाहुंनि तूं अकिंचनू. ॥२॥
११६६
रूसला देॐ. हा वो ! प्राणविसावां,
जीवाचा जीउ तुह्मीं कोण्ही बुझावा.
आत्मत्वें गुप्तु दृष्टी न पडे ठावा.
पाहीन नयनीं मीं या देवदेवा. ॥१॥धृ॥
कमळनयना ! तुझी आण रूप भजैन; मातें न लगे ज्ञान
बुद्धी ही परुता ठेला, रूसला माये ! मना नेणवे; माझी दृष्टी न साहे.
आकृति आणूं कैसी ? व्योमीं न स्माये.
दिगंबराचे दावा येकु वेळ पाये. ॥२॥
११६७
द्रष्टत्व आड, तेथें दृष्टि न पवे.
जीवत्व धार म्यां वो ! घातली जीवें.
प्राणाचें मज नाहीं जाणा बरवें.
सावळें रूप मातें भेटी आणावें. ॥१॥धृ॥
दत्ता तुमचे सीवैन पाये.
निर्गुण तुझें रूप दृष्टी न पायें. ॥छ॥
जाणतां ज्ञान तें तें बाहेरि पडे. धरिजे तें तें नव्हे; हा न संपडे.
पाहों मीं वाट आतां कवणीकडे ? दिगंबराचें सैये ! लागलें वेडें. ॥२॥
११६८
संसारसुख सकळ गोरिये ! मज परतलें सुविष.
कमळनयनें विण क्षणुभरी परि न धरवे मनस.
मातु अवधारिं वो ! बाइये ! झणें करिसी उदास.
भेटि कवणेपरि होइल ? बहू लागले दिवस !
प्रतिक्षणीं मज अनुस्मरण तें; गुणीं गुंपले गुण;
आठवे स्वरूप सावळें; नित्य लागलें ध्यान; ॥१॥धृ॥
सर्वथा मज सुख ने दिती अर्थ विण तेणें आन;
भारु जाले मज गोरिये ! माझे पांच हीं प्राण. ॥छ॥
गुणश्रवण परि मज बाइये ! जिवीं सुखकर नोहे.
वियोगदुःख संस्मारक बळें तें चि तें होये.
नावडे मज संगु परि कां चित्त स्थीर न राहे ?
दिगंबरु येथें आणिसी सांग कवणें उपायें ? ॥२॥
११६९
बोले सखी ::-- अवो ! सखिये ! वेगु सावरीं माये !
परब्रह्म निराभास; तें गुणीं जाणतां नये.
मनसें मनसाप्रति जाणतां भेटि तेथें चि आहे.
त्रीवीधभेदविवर्जित त्याचा वियोगु काये ? ॥१॥धृ॥
दृश्य जाणों करी द्रष्ट्या तेथें जाणता तो द्रष्टा.
दर्शनाचा संगु काइसा ? भ्रमु सांडिपां खोटा.
त्रीपुटी वेगळें लक्षितां लक्ष्य लाउंनि वाटा,
वीयोगु तो मग काइसा ? असद्वृत्तिचा फांटा. ॥छ॥
दृश्य शरीर तें वेगळें; ज्ञेय भान सकळ,
जाण तें. जाणतां अंतरीं जे जाणिवे मूळ.
गुणकृत सर्व लटिकें, निराकार, निश्चळ
जाण. दिगंबर संचलें निजरूप केवळ. ॥२॥
११७०
येरि ह्मणे ::-- अवो ! बाइये ! माझें मनस न परते.
अवधूतरूप सावळें; चित्त गुंतलें तेथें.
आठवे हृदयीं तेव्हेळीं प्रेम येतसे भरितें.
अद्वय सुख मज नावडे; झणें अनुवद येथें. ॥१॥धृ॥
तत्व योगामृत कारण चरण पाहीन नयनीं.
श्रीमुख साजिरें आठवे कैसीं कुंडलें श्रवणीं ?
किरीटतेज अलौकिक कैसें कोंदलें गगनीं ?
शशिसूर्यभाष मोडली दीप्ति विस्फुरे दशनीं. ॥छ॥
पीतांबरधर रूपडें मनीं रूपलें माये !
चंदनाची ऊटि साजिरी मज आठवताहे.
लल्लाटभरि गंध पीवळें तें वो ! उपमें न ये.
दिगंबर ऐसें नयनीं कें पाहींन सैये ! ॥२॥
११७१
येरि ह्मणे ::- चित्र माइक अनुरंजवी जना;
नादामृतरसें नीरवी; जेवि स्वप्नि ची वीणा.
जागृती तो भासु लटिका, ऐसें आणिपां मना.
सावधान होयीं गोरिये ! मृषा प्रपंचु शिवणा. ॥१॥धृ॥
सत्य तें योगविद जाणती; सत्य आवडे देवा;
सत्यें चि द्वैत आछादलें; वृथा मोहिसी मावा;
सत्य दृष्टी नव्हे वीषयो; गुणभान हें सर्वा.
सत्य मानूंनि हें वचन बोध उपजवी जीवा. ॥छ॥
मनबुद्धीसि अगोचर ऐसें सत्य तं पाहीं.
प्रतीति पावोंनि मनसें मग ठाइ कीं राहीं.
विषयवासना काइसी यये नित्य अद्वयीं ?
दिगंबरीं खुण बोधपां ! भ्रांतु न होसि कहीं. ॥२॥
११७२
येरि ह्मणे ::- ज्ञानसागरीं माझें चित्त हें लहरी.
वीरोंनि जातसे, बाइये ! परस्पंदु न करी.
अवधूतगुणीं गुंपलें मन परति न धरी.
तुझें प्रलपन गोरिये ! माझा श्रमु न हरी. ॥१॥धृ॥
कयी देखयीन सावळें रूप डोळस डोळां ?
मन माझें भ्रमताहे. वो तेणें आश्रयो केला.
अवधूत गुणसागरु परब्रह्म पूतळा.
येरु प्रलापु तो काइसा ? मज न लवीं चाळां. ॥छ॥
योगिराजीं मन रंगलें: परि पंकळें माये !
पूर्वदशेप्रति आणिका आतां सहसा न ये !
केवि परगुणु घेइल ? ऐसें जाणवताहे.
दिगंबरें वीण सखिये ! मज शब्दु न साहे. ॥२॥
११७३
येरि ह्मणे ::-- तुझा विषयो तेवि विषयस्थानी
अवस्थे पासूंनि जाहाला; ते स्फुरताहे गुणी.
निष्ठेसि स्थान तें नव्हे वो ! बोलु साचारु मानी.
स्वरूप जाणतां आपुलें तें न मळे गुणी. ॥१॥धृ॥
भ्रमभूत मन जाहालें ! तुज लागलें पीसें !
आत्मविश्रांति न पवसी येणें सगुणरसें.
रामु आत्मा नव्हे विषयो जया जाणतें नसे;
त्रीपुटीचा करीं विलयो; पाहे सह प्रकाशें. ॥छ॥
जाणिजे तें रूप अपर्ल ज्ञान तें तयावर.
जाण तें आश्रयो सखिये ! परब्रह्म चि सार.
दिगंबरपद निर्गुण, शिव, शुद्ध, अक्षर. ॥२॥
११७४
येरि म्हणे ::-- गुणावर्जिती लक्ष ठेउंनि काई ?
पाहिजे तें सुख बाइये तेथें काहीं चि नाहीं.
योगिजनप्रिय रूपडें कवळीन मीं बाहीं.
सावळें ब्रह्म निरंतर मज भरलें देहीं. ॥१॥धृ॥
माझें चि परि माझें नव्हे मन वेचलें माये !
आपण आप वीसरलें त्याचे पाहातां पाये.
उमजु न धरी; परतलें गुणी; आयासि न ये.
सगुणाचें सुख गोरिये ! मज सांगतां न ये ! ॥छ॥
ब्रह्म सुखाहुंनि आगळें मनीं लागलें पुरे.
वीसराची गोष्टि काइसी ? चित्त तेथें चि मरे.
नेणसी अनुभउ तवं, तुतें न मने खरें.
विश्रांती पावले सुरवर येणें श्रीदिगंबरें. ॥२॥
११७५
येरि ह्मणे ::-- महाजन वो ! तुतें हांसती बोला,
विषयीं सांडूंनि विषयो तुवां आगळा केला.
अवथेचें भानगोचर स्वप्न घेउंनि गळा
भ्रमभूतपणें बोलसी. काहीं नेणसी कळा. ॥१॥धृ॥
पांच भूतें तुज लागलीं ! अहंकार माय हो !
झणें पंचात्मक सेविसी; महाखेचरु डोहो.
स्ववृत्ति झाडणी करितां कोण शकैल राहों ?
परब्रह्म आणि सावळें, तरि तें काये देहो ? ॥छ॥
सांडूंनि आपुलें स्मरण वृथा बोलसी ज्ञान.
स्वप्न कीं भ्रमु हा ? बाइये ! भूत लागलें आन.
जाणोंनि आपणां आपण प्रलपति सज्ञान.
दिगंबरसुख बोलसी तयाहूनि तें आन. ॥२॥
११७६
येरि ह्मणे ::-- मज लौकिकें माये ! नाहीं वो ! काज.
मज मी जाण; तें जाणणें तिये जाणिवे बीज.
अवधूतरूप गोरिये ! जीवीं बैसलें मज.
हृदयीचें सुख नेणसी; भ्रमु जाहाला तूज. ॥१॥धृ॥
सत्य तें चि मज कळलें मी अंशु, तो अंशी;
कारणीं कार्य अनुचरे. ते चि गति तयासी.
पूर्व मज अनुस्मरलें विसंबैन मीं कैसी ?
वृथा तुझें जाणपण वो ! मज न ये मनासी. ॥छ॥
कमळनयनाचें स्थळ स्थू वर्जित माये !
जेथ गणसंगु सखिये ! अपरमितु आहे.
ब्रह्मनिष्ठे जन सेवक नित्य वंदिती पाये.
दिगंबरा तया नेणसी. तुतें सांगणें काये ? ॥२॥
११७७
ब्रह्म निराकार निर्मळ नित्य पाहिजे डोळा;
ब्रह्मसुख विक्षेपक ऐसा सत्य सोहोळा.
भोगितां द्वैत भासे. परि चिदखंड ते कळा.
पाहीन रूप तें नयनीं; जायीन त्या स्थळा. ॥१॥धृ॥
काये सांगों गुज ? गोरिये ! तु वो ! नेणसी माये !
सर्वज्ञ नेणती पारू वो ! ऐसें नवल आहे.
ब्रह्मनिष्ठाहूंनि आगळा तो चि तें पद लाहें.
अनुभवी खुण जाणती; बहु बोलणे काये ? ॥छ॥
येर मायामय, सगुण तैसें न ह्मण माये !
ब्रह्मप्रकाशक रूपडें गुणकरण सैये !
चिन्मात्र तें चि मूळ सावळें तया आगळें आहे.
दिगंबरीं विरुद्धांसि हीं नित्य येकत्व होये ! ॥२॥
११७८
परब्रह्मानंदु सावळा मज दाखवा डोळां !
योगीजनवरवल्लभू जीवन जीवाला !
जीउ प्राणु बलि देयिन संसारू सगळा !
दत्तेवीण मज न गमे. झोंबैन मीं गळां ! ॥१॥धृ॥
जय जय जय वरदा ! चिदव्यया ! रामा !
तुं चि परब्रह्म केवळ ! दुजें न लगे आह्मां.
योगियांचें योगधन; तूं निरोपम निःकामा !
अवधूता मनो बुद्धि हे माझी गुंपली तुह्मां ॥छ॥
भक्तजन सुरपादपा ! जया ! आनंद कंदा !
योगधन तूं बा ! अव्यय, अरे ! अत्रिवरदा !
अंटादिमध्य विवर्जिता ! जया ! अत्रिवरदा !
दिगंबरा ! जनशंकरा ! अगोचर तुं वेदां ! ॥२॥
११७९
पादांबुजरसरतु मीं नित्य भ्रमरू भवें,
रुंजि करी. गुणी गुंपलेंयेणें आत्मस्वभावें.
सांपडला पुरे संपुटी; मग वेगळा नव्हे.
तेथें चि भेदु हारविन; उरि नेठवी जीवें. ॥१॥धृ॥
जय जय सुखसागरा ! जया ! अपारपारा !
चरणानुचरु भ्रमरु गुणीं नाश्रयी परा.
गुणु गुणु गुणु करितां, अगा ! पुरुषेश्वरा !
वृत्ति विसरलों ! षट्पदु तरि जीत चि मारा ! ॥छ॥
आसक्त जाहालें मन हें, तुझें लागलें ध्यान.
पादपद्मीं विसावले माझे करणगण.
तेथूंनि परति धरितां करीं भेदहरण.
दिगंबरा ! परमात्मया ! तुझें रंक मीं दीन. ॥२॥
११८०
देह देवालय; देॐ आत्मा अवधुतु;
प्रकटु जाहाला भाॐ अर्पीन समस्तु. ॥१॥धृ॥
पाहिन वो ! पाहिन वो ! देवीं देवपणें स्थिती राहिन वो ! मी ॥छ॥
बाहीजु भीतरु देवें भरला गे ! माये !
दिगंबरु अवघे न अवघा चि होये. ॥२॥