मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ४२१ ते ४४०

दासोपंताची पदे - पद ४२१ ते ४४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


४२१
स्वगुणीं केवळ मन ठेवितां अखंड
निरंतरीं राहिली मी. तेणेंविण पर नेणें. ॥१॥धृ॥
मंत्रसारपद तयी मुख आठवे. परम निधान,
पावोनि बिभ्रम, वदनीं गुंपलें मन. ॥छ॥
प्रकाशकपर -- परब्रह्म न भजे लाभा. हेतु ही निर्मळ पादविना.
अरेरे ! गुणशीळा ! दिगंबरा ! देइं तें क्रीयेचे निवर्त्तन.
ध्यानीं मीं ध्यायिन तुझें रूप गुणपूर्ण. ॥२॥

४२२
गगनी पातळपणें न थरे प्रचंड निरंतर.
निर्गुण मे मज अनुभवें जाणें. ॥१॥धृ॥
सत्यसार सुखमयी स्थिति लागली. निवळलें सार.
न पवे मीं श्रमा. गुणीक जालें क्षर. ॥छ॥
विवेदक परम विकंप निरंतर प्रभा तात्विकी निर्मळें सत्वगुणें
मति चंचळ ते खाये, दिगंबरु देहीं तया कैचें बंधन ?
ध्यान कें साधन ? ऐसें मीची मज जाणें. ॥२॥

॥ काफी ॥
४२३
त्रिविध - तापु तपे तपनु हा वो ! परम भय दिसे आह्मां.
कवण दूरित - फळ ? वियोगु मि नेणें, कौण भेटविल आह्मां ? ॥१॥धृ॥
श्यामळ दावा वो ! सुंदर दावा ! ॥छ॥
जननि हा वो ! जनकु हा वो ! येणेंविण नाहीं आह्मां.
चरण धरिन आतां, न सोडि मिं सहसां. निजपद ठेविजे आह्मां.
देवा ! दिगंबर ! दासदयाकर ! सत्वर पावेल आह्मां. ॥२॥छ॥

४२४
भवसागरीं बुडतां कवण पावइल ?
सत्य सांग अवधूता ! जरी वो ! संडिसील.
आश करूं मीं कवणाची ? कवण सोडवील ?
नको नको ऐसें करूं. प्राण वेचतील. ॥१॥धृ॥
येइ; येइं रे ! येइं रे ! येउंनि भेटी देयीं. अद्वयानंदकंदा ! तुझा वेधु देही.
माये बापु तू श्रीदत्ता ! तुजवीण आनु नाहीं.
अंतकाळिचा सोयरा. आळंगीन बाहीं. ॥छ॥
दुःख करितां सोषोनि शरीर कोळ जालें.
कर्मवेगेंजन्मकूपीं जाउंनि पडिनलें.
मार्ग न कळे यावया. भ्रमित चित्त ठेलें.
दिगंबरा ! तुझें दीन कां मज सांडियेलें. ॥२॥छ॥

४२५
जन - स्वजन - वीजन - वन मी भ्रमताहें.
सोये न कळे दातारा ! तुझी. करूं काये ?
छाया, जीवन, विश्रांति येथें ते न पाहें.
भय उपजे मानसीं तें दुस्तर माये ! ॥१॥धृ॥
येइं; येइं रे ! येइं रे ! चिदानंदभाना !
परब्रह्म तूं सावळें दत्ता ! परिपूर्णा.
कृपापीयूषजळधारा ! अगुणगूणगूणा !
सर्व सुखाचें निधान तुझा वेधु मना. ॥छ॥
कामक्रोधाचा अडसरीं पाउल न धरवे.
नव्हे, नव्हे तो सूपंथु. मी जाइन जीवें.
अहं - सींहाची गर्जना. कुंजर मदु पावे.
दीगंबरा ! तुझी आशा ध्येली येणें जीवें. ॥२॥

४२६
वय वेचलें सकळ. निदान वरि आलें.
देहभावविगळीएत स्वजनीं सांडियेलें.
वातपित्तकफ तिन्ही येक वाट जाली.
बुद्धि विभ्रमें व्यापीली प्राण - प्रयाण - काळें. ॥१॥धृ॥
येइं; येइं रे ! येयिंर ! सद्गुरू ! योगिराया !
भक्तजन - सुरतरू ! अमीत - गुणवीर्या !
अपराधी मी केवळ लागयीन पाया.
माये बापु तूं आमची; झणें सांडिसी मायां. ॥छ॥
प्राण करिती स्पंदन; चैतन्य पारुषलें.
आठवणेचा हरासीं मन हें पांगुळलें.
तंद्रिकेचा समारंभू त्यावरि काये चाले ?
दिगंबरा ! ययालागी आतांचि आठवीलें. ॥२॥

४२७
अवस्था चौघीजणी बोलती अंगना वो !
अनसूये ! तुझा पुत्रु तो न राहे पाळणा वो !
यवया झेंप घाली ! न रंजे खेळणा वो !
यया स्वरसें सांतवी ! जे हे मनीं वासना वो ! ॥१॥धृ॥
येइं; येइं रे ! येइं रे बाळा ! कृष्णवर्णा !
तुझें पाहातां वदन दाटीताहे पान्हा.
करं स्वरस प्राशन, विश्रांति पावे मना,
आलिंगण देसी बाळा तया गुणहीना. ॥छ॥
अनसूया बोले सती तुह्मी वो ! रस नाना
सेवा. इच्छेचें रसीक माझा बाळु ताना.
यया अपथ्य होयील गुणी वो ! गूणहीना.
रसु न साहे परावा; यया देयि जाना. ॥२॥
येरिं बोलती सुंदरा अभ्यासु न लवी वो !
सकळ ही रस सम हे स्थिति बरवी वो !
मुखें घालुंनि स्तनातें झांकिती पालवीं वो !
येरु करी तद्रसपान; भेदासि नूरवी वो ! ॥३॥
अवधूतसंगें बाळा भेदु विसरली - या
अवृत्तीचें देखणें तन्मय पातली - या.
अवस्थांचा भेदु नाहीं स्ववृत्ती योगिराया.
दीगंबरें वीतूळलें तपस, भेदु, माया. ॥४॥

४२८
येकि बोलती अवस्था मीपण पारुषलें.
देह गेह सर्व भान नेणवे; काये जालें ?
वेग मोडले गुणाचे; मनस पांगुळलें.
व्यवहारीक न कळे. ऐसें वो ! येणें केले ? ॥१॥धृ॥
आत्मयां ! रामा ! रामा राम बिराम रामा !
तुझा संगु न साहावे वीषयकामकामा !
अद्वयानंदानंतानंतपुरैकधामा !
भवबंधमोचना ! दत्ता ! शुद्ध श्यामा ! ॥छ॥
येकी बोलतां बोलणें बोलु विसरलीया.
निर्विकल्पीं अखंडता पूर्णत्व पावलीया.
येकि चालती शरीरें करवीति क्रिया.
परतंत्रे व्यवहारू; गेला जन्मु वायां. ॥२॥
येकी अन्वयें तन्मय भान निबोधलीया.
व्यवहारी समाधान स्वरूप पातलीया.
दृश्य सकळ चिन्मय व्यवहार क्रीया,
दिगंबरें ऐसें केलें छेदिली मूळ माया. ॥३॥छ॥

४२९
हातीं धरूंनि स्वसूत्र नीजानंद पदीं
नीजऊंनी दत्तात्रेया, माता तत्व बोधी.
येरु न रंजे; तीचे निवृत्तिसि मानु नेंदी.
तयां दोघांचा संवादीं पारुषे मन बुद्धी. ॥१॥धृ॥
जो, जो, जो, रे ! तूं नीज बाळा ! अवधुता !
मनीं मानस घालूंनी डोळा लावि आतां.
अवस्थेचा संगु सोडीं स्वसुख सिद्ध घेतां.
गुणवृत्तीचें रंजन पुरे करि आतां. ॥छ॥
कर्मयोगी दुरावले; तयांसि नीज नाहीं.
हटयोगियां लागला मुद्राबंधु देहीं.
गोष्टि कायिसी येरांची जे बहु नित्य देहीं ?
दिगंबरा ! नीजरूपीं निश्चळु स्थीरु होयी. ॥२।

४३०
सखी बोले ::- वो ! ययासी नाहीं वो ! नीज नाहीं.
मायावी याचें रूप; क्रीडा बोधु देहीं.
सावधानु हा; ययासी नीदवीसि कायी ?
अनसूया ह्मणे ::- तूह्मीं सीकवा यासि काहीं. ॥१॥धृ॥
नीज, नीज रे ! नीज रे ! नीज, नीज, बाळा !
नीज वृत्ती नीजानंदी दत्ता ! लावि डोळा.
स्पंदु न करीं. गूणाचा बागूलु येईल काळा.
पंचवदनु पंचात्मा प्रपंचु तात वेळा. ॥छ॥
येरु बोले ::- वो ! सर्वथा नीजासि नीज नाहीं;
नीजरूप सर्व माझें; प्रपंचु येथ काई ?
नीजवृत्तीचे नीजणें आतां कवणें ठायीं ?
दीगंबरु सर्व नीज देहात्मकु देही. ॥२॥

४३१
माये ! बापा ! श्रीसद्गुरू ! येऊनि भेटि देयीं.
माझें मन उतावीळ; तुझा वेधु देही.
योगु न करीं, साधन तें नलगे काहीं.
पाये पाहोनि निश्चळु होयीन तये ठायीं. ॥१॥धृ॥
अवधूता ! दत्तात्रेया ! सद्गुरू ! देवदेवा !
तुझें नामानुस्मरण प्रेम प्रीय जीवा.
अळवीन वेळोवेळां आत्मयां पूर्णभावा.
नीजभक्तचिंतामणीं पावसील केव्हां ? ॥छ॥
ज्ञानसागरा ! सर्वज्ञस्वामी ! योगिराया !
सिद्धराजा ! मंत्रमूर्ती ! नीवारीं भेदुमाया.
नमो कालाग्निशमना ! दत्ता ! गूणवीर्या !
दिगंबरा ! कृष्णरूपा ! लागयीन पायां. ॥२॥

४३२
देहदेवालय आउठ हात ज्ञेय पंचभूतमय आकृती आलें.
येथें प्राणाचा आधारू; या मनाचा व्यापारू;
गुणकरण विकारु नवहि द्वारें. ॥१॥धृ॥
आत्मयां ईश्वरा प्रबोधु तो पुजारा. योगिया अवसरा जाणोनि आलें. ॥छ॥
धरणी ना जीवन; वायो ना गगन दहना नाहीं स्थान निरालंबीं.
अभावाची शोभा, चिद्वस्तूची प्रभा, बैसला ना उभा आत्मारामू. ॥२॥
स्वस्थिती आसन; चिद्वस्त्र परिधान; सन्मय निर्गुण बरवतसे.
निर्मळता चंदन; सुमन शुद्धमन; कामक्रोध गूण धूपियेले. ॥३॥
स्वानंदु उपहारु; मंत्रू ना उच्चारू; गुरुमुद्रा प्रकारु; तो सर्व होये.
अंतु नाहीं पारू; वर्णु नां आकारू.
ऐसा दिगंबरु प्रकटु जाला. ॥४॥

४३३
सुरतरु चिंतामणीचें जालीं ठेगणीं. दत्त तुझां गुणी दृष्टांतु नाहीं.
मंत्रबीजसार, अर्थाचें अंतर, गुणाचें मंदीर, कैं देखयीन ? ॥१॥धृ॥
सिणलिये दातारा; मीं न करिं येरधारा; येउंनि माहेरा; मज भेट देयीं, ॥छ॥
मोक्षाचें कारण; तूं जीवाचें जीवन; योगसारधन देवाधिदेवा !
डोळ्यांचा डोळा; तु ज्ञेय - ज्ञानकळा;
अवधारीं श्यामळा ! श्री - दिगंबरा ! ॥२॥

४३४
मोतियाचें पाणी माये ! लोटलें आंगणीं;
कारण - गणगुणी गुणासि आलें.
कांडणीं उधळा कर्पुरु गंधु गेला; तयाचा लागला वेधु मज. ॥१॥धृ॥
गुणवृत्ती बोधन माये ! बगळलें चैतन्य.
द्या कां वो ! मीपण मी पारुषली. ॥छ॥
सुमनाची कळा; मज नाणावो आडला;
माये ! मीं परिमळा गुंफयीन.
व्योमाची चालणी; मी चलैन त्याचा गुणी;
मीपण वो ! मधुनीं विसार पाहें. ॥२॥
मायेचें मापटें वो ! अनुमेयासि खोटें;
भरीन मीं आतुटें हृदयामाजी.
दिगंबरगुणीं गुंपलें साजणीं ! मन माझें परतोंनी ठायासि न ये. ॥३॥

॥ श्रीराग ॥
४३५
ऋषि - पुत्रांतें घेउंनी भ्रमतां विषयवनीं
अवधूतु हा तेथूंनि अदृष्ट जाला. वनफळाचें सेवन,
विषय माजीर, गुण भयद, सकळां भान भासतें जालें. ॥१॥धृ॥
श्रीदत्ता ! आरे ! दत्ता ! ये दत्ता ! ये रे ! दत्ता !
विष - वीषय - सेवनी भ्रमलों विभ्रमें गुणी.
सोडविता तुजहूंनी न दिसे येथें. ॥छ॥
आमृ ह्मणौनीं सेविला; पंचाननु तोचि
जाला; व्याळ - रूपें परतला; व्याळुही नव्हे.
काये होयील ? न कळे; लागले आमुचे डोळे;
चित्त भ्रमातें पावलें; कुंठलें जीणें. ॥२॥
खरतरु प्रज्वळला वन्ही ऐसा दीसे डोळां.
क्षणां येकाचि सकळां सुखदु गमे.
ऐसी करितां सोसणी; विश्रांति न दिसे मनी.
ऋषिपुत्र परतोनि पाहाती दत्ता ! ॥३।
येक करिती स्मरण; येकांतें लागलें ध्यान;
येक दुःखें आक्रंदन तेंचि जाणती.
स्वजन करुणाकरू पावला श्री दिगंबरु.
हेला - मातेंचि संसारु वेगळा केला. ॥४॥

४३६
वनक्रीडा संपादूनी बाळक गोविले गुणी;
दीपें आपुलां दर्शनीं पतंगु जैसे.
तयां सहीत मागुते चालतां दक्षिणापंथें,
जळधरीं प्रवेशते जाले श्रीगुरू. ॥१॥धृ॥
ये दत्ता ! ये रे दत्ता ! श्रीदत्ता ! ये रे ! दत्ता !
भवचक्रें हें भ्रमतां सकळ पावलो वेथा.
न तरवे हे सरिता तूजवांचूंनी. ॥छ॥
सागरु तो हा संसारु. नव्हे लौकीक जळधरू.
तरे, तारी तो सद्गुरु प्रगुप्त असे.
तेणेंवीण न तरवे; निश्चयो जाहाला जीवें.
परतले ते अघवे कवणे हेतू ? ॥२॥
शास्त्रावादी वादमुखे, कर्में दांभीक दांभीकें,
योगत्रासु अवेदकें प्रकट जाला.
आले ते तैसेचि जाती; गेले ते न परतती;
योगु हा लोपलै क्षीती ऐसें जाणोंनी. ॥३॥
नाभिप्रमीतु संसारु दावीतु ठाकला गुरू.
नग्न रूपीं अवतारु धरिला देवें. स्वर ! सुयोग ! युक्ती
धरूनि दोन्हीं हातीं या रे ! सांडा येथ भीति; बोलता जाला. ॥४॥
निश्चयीकां भक्ताप्रति प्रकाशी आपुली स्थिती.
भवभयाची नीवृत्ती केली तत्कालें.
गुणीं गुंपलें चैतन्य. तेंचि तें स्वरूप ज्ञान.
दिगंबरें स्ववेदन प्रकट केलें. ॥५॥

४३७
समळ हें दूरि करि; त्रिविधताप संहरि; मन माझें चरण दृढ धरी.
तुजविण संसारि कवण पां ! आह्मां तारि ?
कठिण न करीं; गुरो ! दया करिं. ॥१॥धृ॥
शरण मीं असें नानापरीं. उचित तें मज करिं दीनु जरी. ॥छ॥
बाळक मि तुं जननी. उदास न करि मनीं.
भय वाटे ये विजनी. पाहे नयनी.
निदान न करि मनी. कवणा लागों चरणी ?
दिगंबर निरंतर येईं ध्यानी. ॥२॥

॥ श्रीराग ॥
४३८
सकळ - तीर्थ - अवगाहन गूण - कीर्तन भवतम - संहरण वो !
क्षेतसेवनाहूंनि आगळें; पारु न कळें; ऐसें नामस्मरण वो !
प्रेम - परमपद - प्रापक, तत्व - वेदक, अनश्वर, योगधन वो !
भक्त - प्रेमळ अनुवाद; ते संत परिसते;
तेंचि अविद्यादहन वो ! ॥१॥धृ॥
न्या कां मज वो ! तया संगमा ! चिद्धनोपमा मळ हरतीत्रिगुण वो !
येर मृन्मय क्षेत्र; सगुणतीर्थ - जीवन; तेथें न रमे हें मन वो ! ॥छ॥
काशी द्वारकादीकें जळ जलना स्थळ स्थळ पानीय केवळ वो !
काम कल्पनांकुर आगळे; क्रोध पीकले; पोषे दंभाचे मूळ वो !
दिगंबराचें गुण - गायन तेथें जायीन; दोष हरती सकळ वो ! ॥२॥

४३९
करितां ययाचें गुणश्रवण - संकीर्त्तन भेदु विसरलें मन वो !
गुणी गुंपलें चित्त नूपडे; आन नावडें मातें योगसाधन वो !
क्रीया कर्म हें अनुबंधन श्रमवर्धन; तें मीं न करीं सेवन वो !
तेथेंचि वीरोनि जाइन मनें; येणें मीपणेंवायां बोला दूषण वो ! ॥१॥धृ॥
याति कूळ वो मातें न पूसा; अपरवशा तुह्मीं जा, जा येथूनि वो !
अवधूतगुणीं मी वो ! गुंपली; मती रातली; कूटिवदा पापिणी वो ! ॥छ॥
जनवादू तो मज न कळे; मन मातलें; आपपर वीसरलें वो !
गुणकरण - गण सकळ धर्म वीकळ तनुत्रय वीतुळलें वो !
विषम, समत्व, सम, साम्यता, अहं, ममता, दोषु देहीं नाडळे वो !
दिगंबरेंसीं ऐसें घडलें; द्वैत नाशलें; माझें मजचि नाकळे वो !

४४०
करितां ययाचें गुणगायन वो ! प्रीतीश्रवण वो ? प्रेमें नर्त्तन वो !
वेधलें तदंग चित्त चेतन वो ! गुणकरण वो ! लागलें ध्यान वो !
न भजें आणीक मंत्रसाधन वो ! योगसेवश्रमन वो ! कारण वो ! ॥१॥धृ॥
केधवां पाहीन मन - मोहनु ! करुणेक्षणु वो ! अब्जलोचनु वो !
श्रीदत्तु सावळां सुखवर्धनु वो ! गुणी अगुणु वो ! ब्रह्मसगूणु वो ! ॥छ॥
कयी कयी मीं दृष्टी पाहीन ? वो ! भेटि लाहीन वो ! सवें जायीन वो !
चरणजवळ मळमोचन वो ! सुखवर्धन वो ! तें मीं सेवीन वो !
मुखिचा उगाळु हातीं मागैन वो ! मुखीं घेइंन वो ! श्रमु सांगैन वो !
दिगंबरु हा माझें जीवन वो ! सत्वसगूण वो ! वेधलें मन वो ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP