१५६१
खर प्रखर किरणगण प्रतपती ! मीना काइसी ढिल्लरि विश्रांति ? ! ॥१॥धृ॥
आतां नित्य चिंती जलधरा; तेणें वोवलेन; मी जाईन सागरा. ॥छ॥
हें चि मनसा ! तुजप्रति सांगणें नित्य दिगंबरु अनुचिंतनें. ॥२॥
१५६२
पलें पल, पल, जातसें वयसा; कां रे ! न संडिसी पल पल ? मनसा ! ॥१॥धृ॥
पल, तृटि, लव लावीं कारणीं, अवधूता येकाचा ध्यानीं. ॥छ॥
दिगंबरें वीण विश्रांति न दिसे. हित, विहित, सकल तो परियसें. ॥२॥
१५६३
मृगजलीं तारूं घातलें, परद्वीपा जाउंनि लागलें;
अविनाश केणें भरलें; जाली भरणी; पुडती मुरडीलें. ॥१॥धृ॥
तेथें माजले मीन तळपती; केणें देखोंनि विलयो पावती. ॥छ॥
कर्णधारू मीं चि, मीं येकला; सूवायें पेलू चि लागला. ॥
दिगंबरें दृष्टी देखिला माझा उद्यमु; मनीं आनंदला. ॥२॥
१५६४
परद्वीपुनि आली भरणी; येथें वर पडि न करा कव्हणी.
केणें पडखर आइक श्रवणी. कोण साहिल मुदलाची हानी ? ॥१॥धृ॥
बहु बोलि कां मज न साहे. मनधरणिचा जनु पढिये ॥छ॥
जीउ द्या ! तरि वित्त दावीन ! पाहे तयाचे नयन चि फोडीन ! ॥
आंगें आंग युद्ध करीन ! दुजयाचें सर्वस्व हरीन ! ॥२॥
सर्वस्व आधीं देइजे; मग मीपण उघडूंनि पाहिजे;
दिगंबर चि अवघें लाहिजे; लक्ष लभु त्यावरि वारिजे. ॥३॥
१५६५
कासविचा पान्हा पीलिला; तो मुरवण देउंनि विरजिला;
गगनाचा डेरा भरिला; तेथें गुसलणी घातल आंबुला. ॥१॥धृ॥
कैसी मलपति गुसली गौळणी ? तीचा पालउ रूले धरणीं ! ॥छ॥
निस्सार भागु निवडला; सार नवनीत झेलिते वेल्हाळा.
सत्पाकीं सद्रसु आतला; ते दिगंबरू ह्मणे आपुला ! ॥२॥
१५६६
छाया माझी मजवरि परतली; पलें, तंवं तंवं पाठीं लागली;
ते म्यां उचलूंनि खांदीं घेतली; टाकीन मीं पैले पोकळी. ॥१॥धृ॥
बोलणें मज न साहे ! सिकवण नाइकें गोरिये ! ॥छ॥
छायेचा पिंजु मीं पीलीन ! तदन्वयो यावरि कांतण !
बहु पातल सेला विणवीन ! दिगंबरातें समर्पीन ! ॥२॥
१५६७
स्वप्नींचें सेत जागरीं पाहा ! पाहा ! पाहा ! खादलें पांखुरीं !
गगनावरि उभा सोंकरी हाणें गोफण, नुमटे पागारीं ! ॥१॥धृ॥
पाखुरवीं बहु नाडिलें; सांडीन सेत मीं आपुलें ! ॥छ॥
बहु काल होतें पडिलें ! आंग मोडूंनि तें म्यां वाहिलें !
कटिवण कित्ती छेदिलें ? ते क्लेश चि मातें फललें ! ॥२॥
पाखिरूवा कणस खातसे ! सोकरें, त्यामाजि न दिसे !
दिगंबरें केलें अनारीसें ! सेत खावों चि लागलें माणुसें ! ॥३॥
१५६८
दृष्टी पडलें, तें खायीन ! भेषज ह्मणिजे तें आइकैन !
क्षय, व्याधिचें करा हरण ! परमार्थीक तुह्मीं सज्जन ! ॥१॥धृ॥
जीवातें भ्रमु जाकली ! छाये न दीसे साउली !
मनाते भ्रमु जाकली ! दृष्टीतें भ्रमु जाकली ! ॥छ॥
भक्षीन कुपथ्य मीं अवघें ! अतिपथ्यावरि मज न सवे !
दिगंबरू ह्मणें ::- बरवें ! येणें पालटु होईल स्वभावें ! ॥२॥
१५६९
मृगजलीं उडी घातली ! बुडि देतां, सांगडि तूटली !
पडलों मीं आथि खलालीं ! थाकु न लगे रीता पोकली ! ॥१॥धृ॥
सांगणें काये ? कवणा ? मरणाची होतिसे वासना ! ॥छ॥
डोहीं तीरस्थ बुडालें ! माझें मीपण जातसे खलालें ! ।
दिगंबरें कैसें तारिलें ? माझें मरण मज भेटवीलें ! ॥२॥
१५७०
कोरडां नदीं विश्व बुडालें ! तेथें बुडोंनि मज म्यां काढिलें !
गगनीं तें नेउंनि ठेविलें !
माझें मज चि काहीं न कले ! ॥१॥धृ॥
चीत्त दुश्चित्त होताहे ! माझें मींपण तें कोठें आहे ? ॥छ॥
जलचरांची अतिशयें आटणी ! परि तें वांचलें तया ग्रसूंनी !
द्यापां ते कव्हणी आणुनी ! न राहें मीं तयावांचूंनी ! ॥२॥
मागु घेतां, विपरीत जाहालें ! माझें मजमाजि तें होतें संचलें !
दिगंबरें नकलेकाये केलें ? विश्व अवघें तारक भासले ! ॥३॥
१५७१
सर्व विसरलों तुमचेनि स्मरणें.
रूप पाहावया आसक्तु येणें मनें ! ॥१॥धृ॥
संसारपर जनीं असतां, बहू श्रमलिये बापा ! अवधूता ! ॥छ॥
दिगंबरा ! तुझेनि स्मरणें, योगु, साधन, तेंमज न मनें ! ॥२॥
१५७२
योगधन तूं मज येकु, श्रीदत्ता ! सिद्ध जालों मीं तुजकरितां ! ॥१॥धृ॥
संसारभय मज काइसें ? योगिराजीं विनटलों मानसें ! ॥छ॥
दिगंबरा ! परब्रह्मसाकारा ! आत्मा तूं विज्ञानसागरा ! ॥२॥
१५७३
जलीं जल चले चंचल लहरी; तैसा मीं भजें विज्ञानसागरीं ! ॥१॥धृ॥
आतां नामकीर्तन करीन ! तेणें आनंदें विलया जाईन ! ॥छ॥
दिगंबरा ! मीं तुजमाजि संचरें ! भिन्नपणें करूंनि उरें ! ॥२॥
१५७४
करुणामृतजलधरु बोलला ! दत्त हृदयभुवनि माये ! प्रकटला ! ॥१॥धृ॥
माझें चित्त विरोंनि जातसे. उरिजें अंग चि न दिसे ! ॥छ॥
दिगंबराचें होतां दर्शन, भेद त्रिविध जाती वितुलोंन ! ॥२॥
१५७५
ज्ञानासगरा आलें भरितें. तारू पेलिलें मनस हें तेथें. ॥१॥धृ॥
आतां रत्नघेटासि जाईन; तेथें माझे सखे स्वजन. ॥छ॥
दिगंबरा ! तूं माजा तारकु; पारु पावविता नाहीं आणिकु. ॥२॥
१५७६
जलीं जल विरे, जैसी लहरी; तारु चालतसे तैसीया परी. ॥१॥धृ॥
आधिं निगुणीं होये मीलणी. मग तें पद समीप तेथूंनी. ॥छ॥
दिगंबरें तारूं बुडउंनि तारिलें. म्यां तें द्वीप रत्नमय देखिलें ! ॥२॥
१५७७
परद्वीपीं केणें भरीन कृष्णश्याम कमलनयन. ॥१॥धृ॥
बहू भाग्यें सूकाळु जाहाला ! दत्तु त्रीजगती प्रकटला ! ॥छ॥
दिगंबराची आली भरणी वरपडि न करावि कव्हणी ! ॥२॥
१५७८
येक मनस आपुलें देइजे; मग टाके तें केणें भरिजे. ॥१॥धृ॥
बहु दुरूंनि आणिलें सूवर्ण केणें मंत्र आगम लक्षण. ॥छ॥
दिगंबरें विण ग्राहक न कले; पासीं मिनले, ते जन आंधले ! ॥२॥
१५७९
प्रेम ठेउंनि नाम घ्या ! घ्या ! रे ! गुणकीर्तन बहुगुण साजिरें ! ॥१॥धृ॥
आतां हें न ये पुडती संसारा ! परतोंनि मागुती ! ॥छ॥
दिगंबराचें नाम पावन; अतिदुर्लभ गुणसंकीर्तन ! ॥२॥
१५८०
शुद्ध, सात्विक, अनन्यमनस, योग्य सुवर्ण हें असे तयांस ! ॥१॥धृ॥
येरे न करा वरपडी ! मीं मुख मांदूस नूघडीं ! ॥छ॥
दिगंबराचें हें सुवर्ण ने चोरूनि, तयासि पतन. ॥२॥