॥ वैराटिका ॥
५०१
आळवीसी, तरि येइन. बोल ह्मणसील, तरि बोलैन. ॥१॥धृ॥
नातरि उगलचि असैन पासीं. नव्हे इतुलेनि मी परदेसी. ॥छ॥
पाहे ह्मणसील, तरि पाहीन. दिगंबरा ! तूझी आण ! ॥२॥
५०२
हात उचलीसी, तरि मगैन. पाये दाविसी, तरि लागैन. ॥१॥धृ॥
नातरि उगलाचि पाहिन वदन. देवा ! सलगी न करीं बहूं, जाण. ॥छ॥
दिगंबरा ! तूजपासीं नित्य असतां, नव्हे परदेशी. ॥२॥
५०३
माग ह्मणतिलयां काय मागों ? सांग ह्मणतिलयां काय सांगों ? ॥१॥धृ॥
दत्ता ! केववळ मीं अज्ञान. पासीं उगाचि उगियां असैन. ॥छ॥
दिगंबरा ! तुझी आण. मातें इतुलाचि विषयो ह्मणौ. ॥२॥
५०४
दृष्टि करिसील, तरि धायीन. दोन्हीं चरण अवलोकीन. ॥१॥धृ॥
दत्ता ! इतुलेंचि मातें पुरे. पासीं असैन मीं अंतरें. ॥छ॥
दिगंबरा ! तूं सर्वज्ञु. कइं हरसील माझा सीणु ? ॥२॥
५०५
माग ह्मणसील, तरि मी नेघें. सांग ह्मणसील, तरि न संगें. ॥१॥धृ॥
दत्ता ! उगलाचि असैन पासीं, तुझा ह्मणउंनियां, परियेसी. ॥छ॥
दिगंबरा ! सत्य जाण ::- आन विषयोचि न धरी मन. ॥२॥
५०६
ये ह्मणसील, तरि धांवैन. जाय ह्मणसील, तरी मरैन. ॥१॥धृ॥
दत्ता ! परतोनि नाहीं पाहाणें रे ! तुज वांचूंनि दूसरें नेणें ! ॥छ॥
दिगंबरा ! तुझा ठायीं मन दीपलेंचि; परति नाहीं. ॥२॥
५०७
लक्ष ठेउंनि तुझा वदनीं ठेलों पाहातु मीं दूरूनी. ॥१॥धृ॥
दत्ता ! आळविसी केधवां ? श्रमु हरैल तेणें अघवा. ॥छ॥
दिगंबरा ! मी पैं दीन. माझें झणें पडो विस्मरण. ॥२॥
५०८
दीन किंकर, मीं सेवक, अति दुर्बळ, तुझें रंक. ॥१॥धृ॥
माझें न करीं रे ! विस्मरण. वरि पडैल परम निर्वांण. ॥छ॥
अवधारीं दीगंबरा ! तुजवांचूंनि नेणें दुसरा. ॥२॥
५०९
धणी असोंनीं परदेशी, सांगों मीं कवणापासी ? ॥१॥धृ॥
दत्तें कठिण केलें माये ! अझुणीं हा प्राणु न जाये ! ॥छ॥
दिगंबरा ! मीं लेंकरूं. मज लागला वैश्वानरू. ॥२॥
५१०
योगिराजु माउली मातें वनीं सांडूंनि गेली. ॥१॥धृ॥
ऐसें ललाट माझें उणें ! काये कैसें आतां करणें ? ॥छ॥
दिगंबरा ! तूं निष्ठूरू. आतां कवणासि घालुं भारु ? ॥२॥
५११
भाते लागले शरीरीं. लोटती नयनीं धारा. ॥१॥धृ॥
मातें बुझावी कवण ? देवें मन केलें कठीण. ॥छ॥
दिगंबरा ! सत्य जाणें ::- प्राणु देयीन मी स्मरणें. ॥२॥
५१२
पाहेपां ! गा ! वीचारूनी; आह्मा कवणु दुसरा धणी ? ॥१॥धृ॥
कट्टा वीसरु पडला कैसा ? जाहाली परम निराशा. ॥छ॥
दिगंबरा ! तूं सर्वज्ञु. तुतें उपदेशी कवणु ? ॥२॥
५१३
पंथु पाहातां गेले डोळे. दुःखे हृदय प्रज्वळलें. ॥१॥धृ॥
ऐसें कैसें कठिण मन ? अवधूता ! करिसी निदान. ॥छ॥
दिगंबरा ! चिंता नाहीं. आतां सुविष देऊंनि जायी. ॥२॥
५१४
कैं देखैन तुझें पाय ? आणिकांचा हातु न साहे. ॥१॥धृ॥
माझी माये तूं श्रीदत्ता ! जन्मु गेला वाट पाहतां. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें ध्यान येणें वेचती माझें प्राण. ॥२॥
५१५
तूं बा पूर्वीचा सांगाती. देतासि कवणा हातीं ? ॥१॥धृ॥
दत्ता ! न करीं रे ! निर्वाण. तूच वांचूनि कवणाचें कवण ? ॥छ॥
दिगंबरा ! तूं ईश्वरू. आह्मी तुझा अंश विस्तारू. ॥२॥
५१६
तूं बा बहुतांचा सोयेरा. मातें मीं येकु, तूं दूसरा. ॥१॥धृ॥
दत्ता ! कैसें घडलें, पाहे. येथें ममता प्रसंगु काये ? ॥छ॥
दिगंबरा ! मीं अज्ञान. तूं ज्ञानाचें कारण. ॥२॥
५१७
भेटि देसील, तरि तूं येइं. नाहीं तरि ठाइं का राहीं ? ॥१॥धृ॥
तुझी लपणी कळली आह्मासि. आत्मयां केउता गेलासीं ? ॥छ॥
दिगंबरा ! तूं सर्वही. आड करिजेसें काहींचि नाहीं. ॥२॥
५१८
वाट पाहतां लाजिरवाणें. काहीं घेणें ना मागणें. ॥१॥धृ॥
दत्ता ! नाम अमृतसार. तेणें प्रेमें पूर्ण शरीर. ॥छ॥
दिगंबरा ! न करीं आशां. भेटि अरिष्ट या प्रेमरसा. ॥२॥
५१९
नित्य करितां गुण कीर्तन, तेथें पांगुळ जालें मन. ॥१॥धृ॥
आतां उठवावें कवणें ? देवा ! तुझें ही चले करणें. ॥छ॥
दिगंबरा ! न मगें भेटी. झणे होइल तयासि तूटी. ॥२॥
५२०
बहु जन्माचें साधन प्रेम संपडले निधान. ॥१॥धृ॥
जे यत्नें ठेविन ठेवा. नाम तूझें श्रीदेवदेवा ! ॥छ॥
दिगंबरा ! तुझी भेटि यया उपरी आतां खोटी. ॥२॥