१५२१
स्मरणीं गुंतलें मनस, परतेना. भेटि घ्यावया होतिसे वासना. ॥१॥धृ॥
अवधूत जीवन गोरिये ! विण तेणें मनस न राहे. ॥छ॥
दिगंबर सकळश्रमहरण; तयाचें कैं देखैन चरण ? ॥२॥
१५२२
सखी ह्मणे ::- चंचळ न करीं, मन ठांइंचें ठांइं दृढ धरीं. ॥१॥धृ॥
तेथें आंगें आंग भेटणें, आत्मयां ! दत्ताचें जाणणें. ॥छ॥
दृश्य दर्शन द्रष्टत्व सारिजे; दिगंबर अधिष्ठान लाहिजे. ॥२॥
१५२३
कृष्णश्याम कमळनयनें मन माझें हरिलें देखणें. ॥१॥धृ॥
मज तें चि तें ध्यान ध्यान लागलें; कैं देखैन स्वरूप सावळें ? ॥छ॥
दिगंबरें येणें वांचुन मज नावडे दुसरें वचन. ॥२॥
१५२४
सखि ह्मणे ::- तें मायिक सगूण; त्याचा योगु वियोगासि कारण. ॥१॥धृ॥
सांडि तो भ्रमु गोचरु; सेवी आत्मा दत्तु निरंतरु. ॥छ॥
दिगंबरीं द्वैत चि लटिक. योग, वियोग, सर्व हीं मायिक. ॥२॥
१५२५
आत्मा तो, तरि का हे आवडी ? जीवें घेतली सगुणाची गोडी. ॥१॥धृ॥
मज सांगपां उमजउंनि; रूप नावडे श्रीदत्तावांचूंनी. ॥छ॥
दिगंबराचे पाहिन चरण. नित्य प्रेम गुण सुखवर्धन. ॥२॥
१५२६
आत्मा चि जरि तरि आवडी; भेदु जालिया न विसरे गोडी. ॥१॥धृ॥
भेदें हीं तर्हीं परि आवडे. तया वेगलें मनस न पडे. ॥छ॥
दिगंबरीं भेदेसीं ऐक्यता वृत्यन्वयें पाहीं अखंडता. ॥२॥
१५२७
सरसजनयनु सावळा दृष्टीपासूंनि न वचे वेगळा. ॥१॥धृ॥
तें रूप सुखद; सेवनें, मीं चि तो, हें कैसें मज माने ? ॥छ॥
दिगंबरीं मीं मानस घालीन; नाइकें वो ! परावें वचन. ॥२॥
१५२८
अनुसरलिये वृत्तिसि आश्रयो आत्मा चि तरि गुणी अन्वयो. ॥१॥धृ॥
सांग स्थान कवण आनंदा ? भेदु भजतां अभेदु सर्वदा. ॥छ॥
उपजलिये वृत्तीसि कारण कार्य सहचर तत्त्व निर्गुण, ॥२॥
तें चि तें आनंदकर भान सदन्वयें सुख संस्फुरण. ॥३॥
सद्वयतिरिक्त तें सर्व अशेष, तरी प्रेम चि नव्हे तें साभार. ॥४॥
वृत्त्यन्वयें तें प्रेम भोगिसी. दिगंबरु आत्मा केवि नेणसी ? ॥५॥
१५२९
भेदु भजतां अभेदु चि आपजे.
तरि, भेदें चि कां हें न सेविजे ? ॥१॥धृ॥
माझें मनस गुंपलें सगुणीं; नुगवे तें शब्दश्रवणीं. ॥छ॥
दिगंबराची पाहातिसें वाटुली; माझी मनोवृत्ति तेथें गुंपली. ॥२॥
१५३०
आत्मान्वयें सेवितां साकार, सेविलें होणें तत्व निराकार. ॥१॥धृ॥
परि जाण प्रपंचु तद्वतू; जग ब्रह्म, आत्मा शाश्वतू. ॥छ॥
दिगंबर आठवें, वीसरें; ब्रह्म जाणिजे अद्वय खरें ! ॥२॥
१५३१
विश्व ब्रह्मत्वें भजतां, सखिये ! द्वैत प्रेम मीं तैसें न पाहें. ॥१॥धृ॥
माझें मन गुंतलें आवडी; तें दत्ताचे पाये न सोडी. ॥छ॥
तरि विश्व हें मिथ्या मानीन; दिगंबरू सदन्वयें ध्यायीन. ॥२॥
१५३२
देश, काल, नाम, परिच्छिन्न, रूप भजतां देवाचें सगुण. ॥१॥धृ॥
योगविगोगातें लोंभासति, सुखदुःखद ते पुडतोपुडती. ॥छ॥
नित्यानंदपद तें निर्गूण सेवीं दिगंबर सनातन. ॥२॥
१५३३
योगें आनंदु सगुणी जाहाला; तो ब्रह्मानंदाहूंनि आगळा ! ॥१॥धृ॥
ऐसा प्रत्यक्षु अनुभउ आमुतें दत्त सावलें परब्रह्म बोलतें ! ॥छ॥
वियोगें हीं करितां स्मरण, तें चि होताहे प्रेमविवर्धन ! ॥२॥
प्रेमें जाला तो आनंदु भोगितां, वाटे विक्षेपु ब्रह्मात्मकथा ! ॥३॥
दिगंबरातें मीं न सोडीं; माझें मन गुंपलें आवडी ! ॥४॥
१५३४
सखी ह्मणे ::- बलवंत, प्राचीन, तुझें ऐसें चि आहे कारण.॥१॥धृ॥
आतां इच्छा ते करीं बाइये ! अवधूतु परब्रह्म गोरिये ! ॥छ॥
विण सागरें सैंधव न विरे; ऐसें असैल काहीं येक खरें !॥२॥
हित, अहित, सरिता न पाहे; सागरा चि माजि मिळों पाहे. ॥३॥
तैसें असैल काहीं कारण, दिगंबराचें करितां सेवन. ॥४॥
१५३५
बंधु हा मज, तरि तो मीं साहीन ! निरंतरु ऐसा चि मागैन ! ॥१॥धृ॥
मीं हीत वीहित न मनीं; न स्मरें दत्तावांचुनी. ॥छ॥
संत हांसती, तें मीं साहीन ! अवधूताची दासि होइंन ! ॥२॥
दिगंबरीं प्रीति रातली; आतां मीं मज नव्हे आपुली ! ॥३॥
१५३६
तुझी दासि बहुतां काळांची नव्हें कामाळू, जाणतासि ठाइंची. ॥१॥धृ॥
बैस ह्मणसी तेथें बैसेन. दोन्ही चरण नयनीं पाहिन. ॥छ॥
पुरे उछिष्टु येकू चि कवळू ! दिगंबरा ! मीं नव्हे भुकाळु ! ॥२॥
१५३७
थोटें पांगुळ तुझें मीं दासिरूं, मागें उच्छिष्टु पसरूंनि पदरू ! ॥१॥धृ॥
दत्ता ! आंगण झाडीन कबरी ! शरीरें लोलैन भूमीवरी ! ॥छ॥
द्वार सांडूंनि हें दिगंबरा ! तुझी आण न वचें परघरा ! ॥२॥
१५३८
थोटें, पांगूळ, मीं मूक, बधिर, तुझें रूप चि पाहिन साकार ! ॥१॥धृ॥
मातें “ उठि ” न ह्मणा कव्हणी ! दत्तें बैसविलें मज ये स्थानीं ! ॥छ॥
क्लेश न करवे मातें, दातारा ! आंगहीन मीं जाण दिगंबरा ! ॥२॥
१५३९
ज्ञान करूं, तरि अंग चि न कले; कळलें, तरि मनस नातले ! ॥१॥धृ॥
तुझें रूप धणीवरि पाहीन ! तेणें वांचूंनि न रमे हें मन ! ॥छ॥
ध्यान तुजवीण मनस न धरी ! दिगंबरा ! मीं आणिक न करीं ! ॥२॥
१५४०
दत्तें ! कुरंगिणी ! मीं तुझें पाडस; पाशबद्ध, चंचळ करी मनस. ॥१॥धृ॥
आतां धांव घे मजकारणें ! छेदीं गुणकृतें भवबंधनें ! ॥छ॥
दिगंबरे ! न कळे तुझा अवसरू ! वाट पाहातिसें ! न धरी मज धीरू ! ॥२॥