३०१
करण - गण - गुण - वर्जनाश्रय, ज्ञान - ज्ञेय - निरंजन,
भ्रमद - जनपद - भेद - नाशन, ध्यान - ध्येय - सनातन,
अखिळ, निर्मळ, नित्य, केवळ, ब्रह्म, स्सेव्य, पुरातन,
हृदगत - तमसापनोदन, नित्य, चेतन, वर्द्धन, ॥१॥धृ॥
देखिलें ! देखिलें ! नयनीं तव रूप देखिलें !
कमळलोचन, शुद्ध, श्यामळ, अगुणगुणभय, देखिलें ! येकलें. ॥छ॥
परमसार - विसांर - पार, विवर्जितात्मगुणाश्रय,
त्रिगुण - विरहित, धर्मवर्जित, कर्मदोषनिरामय,
विषयभ्रम - भवभाननाशन, केवळ पद, अव्यय,
दिगंबरा ! गुणपारवर्जित रूप तुझें सन्मय. ॥२॥
३०२
कर्मठांतें नाहीं अनुसरू; शाब्दिकांतें सर्वदा;
योगसेवा दुःख साधन; न भजे मी ते कदा.
तप सुतपिया तपे दिनकरु; वेदना करीं विविधा;
काये सांगों ? तुज काये मागों ? त्राहि अत्रीवरदा. ॥१॥धृ॥
प्रेम दे ! मज प्रेम दे ! सर्वसुखमय प्रेम दे !
परमानंदानंदकंदा ! सर्वदा मज प्रेम दे ! ॥छ॥
आत्मयां तुज जाणतां मज योगुसाधन कासया ?
पूर्णब्रह्मपुराण तूं; तरि भेदु कें परमात्मयां ?
सगुण निर्गुण भागु न करीं मीं; नावडे मज ते क्रिया.
दिगंबरा ! तुझें नित्य सेवन आवडे मना माझया. ॥२॥
३०३ ( भिन्न )
मुनिजन - सखया ! श्रीगुरुराया ! कैं भेटी देसी दत्तात्रेया रे ! ॥१॥धृ॥
सखया ! माझया ! अव्यया ! वियोगें न राहें तूझया रे ! ॥छ॥
हृदय दुखवत आहे. मन माझें निश्चळ नोहे. ॥छ॥
तुजवीण आन नलगे. जाण, दिगंबरा सत्य ह्मणौन. ॥२॥
३०४
पर निर्गुण जेथें भेद निमाला;
न पवे मन बुद्धि; माये ! वो ! वादु राहीला. ॥१॥धृ॥
देखणें निवारीं; मी माजि चोरीं;
सहज अवृत्ती सखिये ! तें तत्व विचारीं. ॥छ॥
माॐ अगाॐ भावीं लोपोनि गेला.
देॐ दिगंबरु सखिये ! मीचि वो ! जाला. ॥२॥
॥ माला गौडा ॥ [ भिन्न चालि ]
३०५
प्राणु ठेउंनि कंठीं वाटुली पाहे; उदास न धरीं; दावीं पाये. ॥१॥धृ॥
येईं मायें ? येई माये ! ॥०॥ उसीरु न करीं; येईं माये ! ॥छ॥
देवदिगंबरे ! तूंविण मातें येकलें नसवे. आण, येणें. ॥२॥
नामावळी ॥ भिन्न ॥
३०६
मानससुमन अर्पिलें पाईं. न भजें मीं साधन आणिक काहीं. ॥१॥धृ॥
शंकरा जन - शं कराया गुणगणदळन हरी क्रिया. ॥छ॥
इतुलेंचि साधन ना मनुचिंतन. देवदिगंबरा दाखवीं चरणा. ॥२॥छ॥
खंड प्रबंध
३०७
अरे ! करुणाकरु विनमिला यया, सुरवर - सेवितु, विराजितु वा,
श्यामतनु, श्रीरंजनु, पावनु ! संतापशमनु,
जगतीमाजी स्वजनकुळातिप्रियंकरु यया. ॥१॥
॥ ताल ॥
दिग् दिग् दां थडींकु ढिंकु ढिम ढिम झकझेकुकु
थारिनककिणकिण थारिकिटकुकुदां ज्ग ज्ग झें ज्ग ज्ग किण
किडिकिडिदा किडिकिडिदा किट्ट किट्ट
तो दिग् दिग् दिग् दिग् दाम् झक किले नक किण किण ॥छ॥
ऐसा जगदीह्सु, परेशु, नाथ, योगी - जनां शंकरु, गुरु,
अपारु, गुणातीतु, आनंदसाग्रु, निरंतरु,
येक, कारण, स्वरूपु, दत्त देखिला यया यया यया. ॥२॥
॥ स्वर ॥
निन्निदधमददनिदधम गमध गमध ग म ध नि सनिनिदधममगध.
३०८
अखिला - भासा - भासुकु, नाशनु, भेदा, ज्ञानमूरती, हा श्रीगुरु राॐ.
भवतापुभेदी तो इंदु, सिद्धराजु, अक्षरपरु.
नरसुरगुरु, देॐ अवधूतु तो दिगंबरु.
अगूणु, श्रीवर्द्धनु प्रबंधें वचनीं स्तविनला यया यया यया. ॥३॥
३०९
केदार
गुणीं गुंपलें नुगवे माझें मन, कर्म नावडे; न करीं अनुष्ठान वो !
नित्य श्रवणें कीर्तनें भजवीन. प्रेमें आनंदली नृत्य करीन. ॥१॥धृ॥
आतां जन हें दुर्जन माये ! तयां निंदकाचें वदन न पाहें.
मूर्ख बोलोंनि करितील काये ? शंका न धरीं; न धरीं त्यांची सोये. ॥छ॥
यया लौकिका न धरी माझे मन. मज लागलें अखंड तुझें ध्यान वो !
दिगंबरे ! मज देयीं दर्शन. नित्य कीर्तन मीं करीन श्रवण. ॥२॥
३१०
धन, धनद, कनक, जन जाया, हें मायीक सकळ योगिराया रे !
विष, विषयीकरस, गुणक्रीया,
नित्य भजतां संसारु गेला वांया. ॥१॥धृ॥
आतां कैसेनि भेटसी मज दीना रे ? अवधूता ! गुणनिधाना !
तुझें रूप आठवें क्षणक्षणा, मातें वियोगाची न साहे वेदना. ॥छ॥
नद - गतू - जळ चळ ढळताहे. वय शरीरी तद्वत. करूं काये वो ?
हीत कांहीं न घडें येणें देहें. दिगंबरा ! तुझें आठवीन पाये. ।२॥
३११
देवा ! जळो जळो हें जनजाळ ! माया, ममत्व दुःखासि नित्य मूळ वो !
अशा कित्ती ? प्राशिजे म्रुगजळ.
स्वप्न, धन मृषा भोग ते सकळ. ॥१॥धृ॥
आतां कैसेनि भेटती ते साधू ? वो ! जयाप्रति न साहे द्वैतवादू;
जयां स्फुरे अखंड ब्रह्मबोधू; उपदेशु विज्ञानसागरसिंधु. ॥छ॥
आतां देह गेह जाहालें सर्व भारू. तत्वविषयीं पडला अंधकारू.
दिगंबरु न दिसे; काये करूं ?
आतां न दिसे वो ! आणीक आधारू. ॥२॥
३१२
बहू जन्म गेले वो ! वायांवीण ! आतां जोडलें श्रीदत्त सत्यधन वो !
करूं ययाची मीं कैसी जतन ?
अतिचंचळ भ्रमीत माझें मन. ॥१॥धृ॥
आतां मीपण धरूंनि काज नाहीं वो ! मनें वीरयीन ठायिंचें ठायीं.
भाव अभाव न भजे यये देहीं.
वृत्ति न साहे; जायील; करूं काइ ? ॥छ॥
कवण योग सुफळ जाले ! माये ! आत्मा अवधूतु मींचि माते पाहें वो !
दिगंबराची सांडियेली सोये. तया सोडूनि प्रपंचु मी न पाहें. ॥२॥
३१३
चालतां बोलतां तुझें रूप ध्यायीन; तें श्रीमूख ध्याईन.
सुंदर सावळें तें मीं दृष्टी पाहिन.
गर्जैन आनंदें; नाम तूझें गाइन. गूण गीतीं गाइन.
प्रेमाचें भरिते हृदयीं नित्य लाहिन. ॥१॥धृ॥
सखिये ! साजणी ! मन वेधलें माये ! चित्त गुंतलें माये !
याचेनि वीयोगे माझें मन न राहे. ॥छ॥
आसनीं भोजनीं तुझा संदु या मनारे !
तुझा वेधु या मना ! गुणाचें निधान तुं कमळनयना.
सद्गुरू ! दातारा ! भवदुःखहरणा ! तापत्रयहरणा !
दिगंबरा ! भाससी सगुण, निर्गूणा ! ॥२॥
३१४
चंचळ - जळ सरिता जाउंनि सागरा मीळे;
तया जलधरा मीळे. न परते पुडती तोय; तेंचि जाहालें.
पूर्व रूप, नाम तें सकळ बुडालें. भेद - स्पंद गळालें.
रथ्यागत सलील आतां कैचें वेगळें ? ॥१॥धृ॥
जाहालें बा ! तैसें आह्मां तुझेनी बोलें, कृपा योगें प्रबळें.
ब्रह्म तूं चिदात्मा; विश्व कैचें उरलें ? ॥छ॥
काष्टांचे विभेद समर्पिले. पावकीं रे ! अर्पिले पावकीं.
तोचि ते सकळ ऐसी प्रतीति लोकीं.
घुरें नीवडितां नये गंधु पातकी रे ! गंधु पातकी;
दिगंबरा ! तैसें आह्मीं वर्ततां लोकीं. ॥२॥
३१५
श्रीपादकमळें देवा ! दृष्टी पाहिन रे ! तें मीं ध्यानीं ध्याइन.
होउंनि भ्रमरु तेथें रुंजि करीन.
भोगीन मकरंदु; तें मज हो कां बंधन; परति मोडो तेथूंनि.
निमैल मन माझें; परि मी तेंचि मागैन. ॥१॥धृ॥
लागले वो ! ध्यान; मन गुंपले गुणीं; चित्त यये सगुणीं.
सर्वज्ञाचा नाथु मज भेटवा कव्हणी. ॥छ॥
नाम संजीवन तें पीयूषा आगळें, योगधारणा बळें,
मुक्तींचें कारण ऐसें हृदयीं मानलें.
तोचि करीं जपु; सत्वगुणें न चळें योगधारणाबळें.
दिगंबरा ! परब्रह्म तूं चि संचलें. ॥२॥
॥ चालि भिन्न ॥
३१६
विषयो गुणाचा गुण - संग - हीनू, सगुणु, त्रिगुणु, गुणक्षीणु. ॥१॥धृ॥
बाइये ! तो माझें धन जीवन जीवना तो माझें धन वो ! ॥छ॥
स्वजनत्राता तारकु माये ! दिगंबरु मीं मज पाहें. ॥२॥
३१७
मानसें मन पांचही प्राण संग न धरी निरंजन. ॥१॥धृ॥
बायीये ! तें माझें ध्यान दुर्मतिदहन; तें माझें ध्यान वो ! ॥छ॥
विलयो मनाचा करूनि पाहें. दिगंबरु सर्व होये. ॥२॥
३१८
चालि भिन्न
अवधूतु आत्मा बुद्धीसि प्राणु सावळा पद्मनयनु. ॥१॥धृ॥
बायीये ! तो माझें सुख सकळ. वेदक, तो माझें सुख वो ! ॥छ॥
देहें निराळा असंगु देही, दिगंबरु सर्व होये. ॥२॥
३१९
तूं माझें संध्या, जपू, विधान, हृदयगत ध्येय, ध्यान. ॥१॥धृ॥
रामा तूं माझे मन रे ! तुं माझें मन;
स्वजन, सुजना. ! ॥छ॥
तूं माझा बोधू, विषयविहीनू. दिगंबरु तूं मी आपणु. ॥२॥
३२०
देॐ देवाचा सुरतरु माये ! हृदयी कैसा स्थीरु राहे ? ॥१॥धृ॥
दत्ता तूं माझी प्राणु स्वजनु. सखया ! तूं माझा प्राणु रे ! ॥छ॥
गुणीं गुणाचा गुणनिधान दिगंबरु ब्रह्मपूर्ण. ॥२॥