दासोपंताची पदे - पद १८१ ते २००
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥
१८१
योगिराजा ! परमात्मया ! रामा ! राम विश्राम तूं; परम निःकामा ! ॥१॥धृ॥
तुतें चूकलों, गा ! सत्य जाण; अतेव पावलों जन्ममरण. ॥छ॥
दीगंबरा ! परब्रह्म ! सगूणा ! सर्वरूपा ! शिवा ! संतापहरणा ! ॥२॥
१८३
सिद्धराजा ! परब्रह्म ! अगाधा ! बाध - मुक्ता ! गुरो ! आत्मया ! शुद्धा ! ॥१॥धृ॥
आह्मीं चूकलों, गा ! देवराया ! अतेव मोहलों तव मायया. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें न कळे ध्यान. ज्ञान विज्ञान तूं पूर्ण चैतन्य. ॥२॥
१८४
दत्तमूर्ती ! जगब्रह्मविस्तारा ! सार सर्वत्र तूं; विज्ञानसारा ! ॥१॥धृ॥
तुतें चुकलों, गा ! विषयवृती; त्राहि देवा ! परब्रह्म मूर्ती. ॥छ॥
दिगंबरा ! परब्रह्म तूं सार पारवीवर्जीत, पूर्ण, अक्षर. ॥२॥
१८५
कृष्णरूपा ! परब्रह्म ! निःकामा ! नाम तूझें, परमात्मया ! रामा ! ॥१॥धृ॥
दुर्लभ गा ! लोकत्रयीं; त्याहूंनि दुसरें पर नाहीं. ॥छ॥
दिगंबरा ! तुझें स्मरण देही देहत्व - नाशन परम अदेहीं. ॥२॥
१८७
मोक्षरूपा ! मनबुद्धि - विश्रामा ! काममुक्ता ! नंत - गुणकीर्ति - महिमा ! ॥१॥धृ॥
कमळनयना ! कृपाळुवा ! भक्तजनवत्सला ! देवदेवा ! ॥छ॥
दिगंबरा ! तुझें स्वरूप शिव, व्यक्त जालें परब्रह्म निरवैव. ॥२॥
चालि भिन्न
१८८
सुमनाची सेज काइसी खरा ? खर निखर तें; परुतें सारा ! ॥१॥धृ॥
सार बोलवेना; मनें उमगेना; निजसुखसार बोलवेना. ॥छ॥
दिगंबर ये स्वरूपसार; येर मायामय सर्व निसार. ॥२॥
१८९
रावां बोले तो बोलिका काये ? आत्मसंवित्तीवादु न साहे. ॥१॥धृ॥
राहे आपरूपीं जना ! निर्विकल्पीं परोपरि. ॥छ॥
दिगंबर निजस्वरूपसत्ता. पुरें हें बोलणें. पारुषो आतां. ॥२॥
१९०
नामघोषें जनु वाजवी टाळी. पावलीं पातकें जाती अंत्राळीं. ॥१॥धृ॥
मुळीं भेदु नाहीं; साधन येथ कायी अतःपर ? ॥छ॥
दिगंबरनामस्मरणतारूं तरिजे रोकडा भवसागरू. ॥२॥
१९१
जपु नेणें; मज न कळे टाळी. टाळूंनि मानसें लागलों मूळीं. ॥१॥धृ॥
मूळ सोडवेना; ने घे जीवपणा, माझें मज. ॥छ॥
दिगंबरें हेंचि वर्म मी जाणें. जाणत नेणणें जाणणें नेणें. ॥२॥
१९२
सुजन कैसा ? हंसुका जैसा. अर्थसारू भजे; इतरु भेषा. ॥१॥धृ॥
दिगंबरूसार चतूर घेती. येर ते पामर खूण नेणती. ॥२॥
१९३
रिवरिचें जेवण; साखर वाढा. नाम संकीर्तनीं टाळ्य़ा गोडा. ॥१॥धृ॥
मुढा घोटवेना; नुमजे प्रीति; मना अहंकृती. ॥छ॥
दिगंबरनाम स्वताचि गोड. टाळी वाजवणें त्यावरि कोड ! ॥२॥
१९४
आजिचा सूदीन ! लागैन पाया; नयनीं देखिलें श्रीयोगिराया. ॥१॥धृ॥
क्रिया पालटली. विषयमति मेली. ॥छ॥
दिगंबरा ! तुझे पादचि सार. अक्षयी सुख तें तेथ अपार. ॥२॥
१९५
विषयांचा लाभु रे ! न मनी प्राणियां !
देह नाशवंत; कवण आश्रयो तया ? ॥१॥धृ॥
अति स्वार्थु वोखटा अर्थकामवीषयीं.
अर्थेचि अनर्थु; सत्य आणिकें नाहीं. ॥छ॥
दिसतें सकळ रे ! मायावी सर्वथा.
दिगंबर सत्यतत्व, जाण, तत्वता. ॥२॥
१९६
प्रमीत हे जीणें; रे ! नीदानी मरण. कवणाचें धन जन जाया स्वजन ? ॥१॥धृ॥
भ्रमु सांडीं मानसा. तुतें तुंचि सोयरें. विचारें पाहातां, तुतें नाहीं दूसरें. ॥छ॥
स्वप्नींचें जाग्रतें रे ! वाउगी कल्पना. दिगंबरेंवीण सत्य न दिसे या मना. ॥२॥
१९७
मनुजशरीर रे ! मोक्षाचें कारण. वाया हें जातसे; करीं हीतसाधन. ॥१॥धृ॥
धिग्य जन्म वेचला, माझें मीं हे सोषितां. वयाचा नीदानीं तुझा तूंचि सर्वथा. ॥छ॥
कवणाचें धन रे ! यौवन रे ! मायिका ! दिगंबरेंवीण, सत्य ! न भजें आणीका. ॥२॥
१९८
जातयां येतयां मीं पुसेन वाटुळी. दूरदेशी दत्तु माये ! माझी माउली. ॥१॥धृ॥
कवीं जाइन माहेरा आपुल्या ! साजणी ! कमळनयनरूप आठवे मनी. ॥छ॥
कवळीन रूप दोहीं बाहीं सखिये ! दिगंबरीं भेटि कै होईल ? गोरिये ! ॥२॥
१९९
कमळीं कमळ वो ! कमळनयना !
पाहें नीडाळुंनि कमळकोशीं वासना. ॥१॥धृ॥
कमळीं पूजा कमळा. कमळा वल्लभा तुझी.
कमळीं कमळें सर्वदा तुझां वसतुकां माझीं. ॥छ॥
कमळीं कमळें रे ! स्फूरती सर्वदा.
दिगंबरा ! तूझें ध्यान लागलें सदा. ॥२॥
२००
पाहिजेसें रूप; ना लाहिजेसें केवळ.
मृगातें मायीक मिथ्या आभासे जळ. ॥१॥धृ॥
तैसें दृश्य लटिकें. येथें माॐ न धरीं.
अवस्था - जनीत मान मना ! विचारीं. ॥छ॥
दृश्य, दर्शन, रे ! द्रष्टत्व सांडुनी,
दिगंबररूप पाहे आपुलां स्थानीं. ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 17, 2016
TOP