दासोपंताची पदे - पद ६८१ ते ७००
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥
६८१
जपु करिता देह न दीसे. भूतशुद्धि सहजसि असे.
करावे न्यास कैसे. अंग येक हीन भसे. ॥१॥धृ॥
ऐसा ठक चि ठेलों देवा ! जपु कैसा जी करावा ? ॥छ॥
सर्वगत संपूर्णपण. कें घालावें आसन ?
दिगंबरीं मूर्ति ध्यान. तें रूपातें विस्मरण. ॥२॥
६८२
आत्मयांप्रति आन तें द्वैत मिथ्या भान; ऐसी प्रतीति जाणे मन.
तें स्मरैल देवत कवण ? ॥१॥धृ॥
हाती राहिली स्मरणीं; चाळावे कैसे मणी ? ॥छ॥
देॐ आत्मां सर्वही; तया दुसरा देॐ चि नाहीं.
स्मरावा कवणु कायी ? दिगंबरा ! हें सांगायीं. ॥२॥
६८३
देवा ! ह्मणौनि बोबायें; तो निर्दैव कवणु राहे ?
पाहतां त्याची सोये, तया दुसरा देॐ न साहे. ॥१॥धृ॥
आतां गर्जावें कवणें ? घोषु करितां लाजीरवाणे ! ॥छ॥
आत्माचि तो ईश्वरु. देॐ कवणु तया परु ?
निर्मळु दिगंबरु कां करावा च्चारु ? ॥२॥
६८४
कीर्त्तनीं ठेवीला भाॐ. तेथ वक्ताचि आत्मा देॐ.
श्रोतया न दिसे ठाॐ. दृश्याचा सम अभाॐ. ॥१॥धृ॥
आतां कीर्त्तन कैसें करणें ? आशंका धरिली मनें. ॥छ॥
श्रवणीं भजतां श्रूय तें केवळ अचिन्मय.
गुण कार्य मिथ्या ज्ञेय स्वस्वरूप चिन्मय. ॥२॥
प्रेम नूपजे गायनीं, विवेकु घेतां श्रवणीं.
दिगंबराचा अज्ञानी प्रेमाची असे खाणी. ॥३॥
६८५
देवपण प्रकल्पावें. गुण तयाचें स्मरावें.
वियोगदुःखें ध्यावें. पाठीं हृदय फोडावें. ॥१॥धृ॥
ऐसें प्रेम नलगे देवा. अज्ञान रडती मावा. ॥छ॥
कल्पनेचा देॐ पीता. सूतु आपणू नेणता.
उभयांचे धर्म गमितां प्रतिबिंबे वियोग वेथा. ॥२॥
ऐसें आपुलें अज्ञान ! देव भक्त रूपें जाण.
होये प्रेमाचें कारण. दिगंबरा ! कळली खूण. ॥३॥
६८६
देॐ कवणे दीशे पाहों ? मीं केउंता उभा राहों ?
संताचा धरीन पाॐ. माझा तोडा जी ! संदेहो. ॥१॥धृ॥
आतां प्रतीति आछछादावी. पूर्णता कें लपवावी ? ॥छ॥
प्रेम कैसें लाहे मन. सजळ होती नयन.
दिगंबरा ! भेदस्फुरण. नये तयाचें विस्मरण. ॥२॥
६८७
जाणोंनि भाउं देवा ? कीं नेणोंनि करूं सेवा ?
मी मज असतां ठावा, बोधु कैसा आछ्छादावा ? ॥१॥धृ॥
ऐसें सांगावें सुजाणीं. नूमजें मातें करणी. ॥छ॥
डोळे उघडूनि काये पाहावें ? डोळे झाकूंनि कवणा ध्यावें ?
दिगंबरु आत्मा जीवें जाणिलें असतां बरवें ! ॥२॥
६८८
अज्ञानें केलें कर्म; तें ज्ञाना करितां विषम.
जेवि ज्ञानाचे निजधर्म. अज्ञान अति दुर्गम. ॥१॥धृ॥
ऐसें जाणावें सुजाणीं ::- अधिकारा अधीन करणी. ॥छ॥
तमसातें आलोकु नाहीं. दीनकरु तम नेणें कहीं.
आतां निर्धारु हा हृदयीं ::- दीगंबरीं दुसरें तें वायी. ॥२॥
६८९
बहु प्रलपन नलगे करावें. आप जाणोंनि उगलें असावें.
पाठा करिजैल, तें ही बरवें. ऐसें अनुभवमत स्वभावें. ॥१॥धृ॥
बहु काये गुरुमुख करिसी ? जें होती, तेंचि आहासी रे ! ॥छ॥
नाहीं पाहाणें, देणें, घेणें, स्वस्थिती निश्चळ असणें.
दिगंबरुआत्मा भजणें, योगसार याहूंनि न मने. ॥२॥
६९०
योगसेवया श्रमतासि वायां. प्राणपंचक दमितासि काया ?
गुणीं असंगु तूं अव्यया. आत्मयां नलगे क्रिया. ॥१॥धृ॥
रे ! सहज चि साधन आहे. साध्य भजैल, तो न लाहे. ॥छ॥
मन धरिजे तें बंधन मनसा. मन सोडितां नये योगु कळसा.
आत्मयां तूं; जैसा तैसा राहें सहज; नलगे गुणदोषा. ॥२॥
इंद्रिया दमु वायां करणें. निजें निजचि जाणोनि असणें.
दिगंबरें मीं मज नुरणें. स्वस्थिती विरोनि जाणें. ॥३॥
६९१
थाटु, मांडु, माव, दृश्य पसारा, जाण, तयांप्रति नव्हे चि विकरा. ॥१॥धृ॥
केणें मतुळलें; ग्राहक नाहीं; ऐसीं कैसी पेठ ? हाणती डोयी ! ॥छ॥
दिगंबरेवीण न खपे आन. भूसांचा विकरा केउतें कण ? ॥२॥
६९२
बाह्य मौनी; जडु अंतरीं बोले ! मनस चंचळ; लावितो डोळें ! ॥१॥धृ॥
वेष देखोनियां बोधलें जन ! अंतरीचें ज्ञान कवणु जाणे ? ॥छ॥
आत्मा दीगंबरु न पडे ठायीं ! ऐसिया मूर्खाची क्रिया ते कायी ? ॥२॥
६९३
महां नदीचां बैसलां तीरीं; बकु नां साधकु; तयाची परी :: ॥१॥धृ॥
अंतरीं निर्मळ नाहीं गा ! देवा ! जनचि हें मावा रंजवावें ! ॥छ॥
आत्मा दीगंबरु जाणोनि आता, मायीक सकळ न मने चित्ता ! ॥२॥
६९४
नावे माजिचा निद्रितु जैसा, दूजा जाग्रुत तया सरिसा; ॥१॥धृ॥
तेवि तुंचि तारकु देवा ! बोधु, अबोधु काय करावा ? ॥छ॥
पाय धरूंनि आन मि नेणें, दिगंबरा ! सर्वहि जाणें. ॥२॥
६९५
शिष्य नव्हे; सेवकु नव्हे; पोटीं जन्मलों; ऐसें जाणावे. ॥१॥धृ॥
मातें काय श्रमवितासि ? भज्यभजकु कासया ह्मणविसी ? ॥छ॥
देवा ! पूर्विला आमुते ऐसें करी ::- दिगंबरा घालिं उदरीं. ॥२॥
६९६
काळाग्निशमना ! सुखदमूर्ती ! योगिराया ! गुरो ! अगम्यकीर्त्ती ! ॥१॥धृ॥
तुझें नाम माझां पडो श्रवणीं. निवारती भवसंताप तीन्हीं. ॥छ॥
दिगंबरा ! जया ! विज्ञानसिंधो ! सिद्धेशामरपती ! अनाथबंधो ! ॥२॥
६९७
भक्तचिंतामणी ! आत्मयारामा ! राजीवलोचना ! मंगळधामा ! ॥१॥धृ॥
तुझा वेधु मज लागो कां मनीं ! मनस चंचळ निवटो ध्यानीं ! ॥छ॥
सुभक्तवरदा ! योगनिधाना ! दिगंबरा ! परब्रह्म ! सगुणा ! ॥२॥
६९८
लीलाविश्वंभरा ! श्रीदेवदेवा ! देवगुरो ! सर्वअसर्वसर्वा ! ॥१॥धृ॥
तुझें ध्यान मज लागो नित्यशा. शुद्ध ! श्यामां ! गुरो ! परम ! पुरुषा ! ॥छ॥
मायाविवर्जित ! विज्ञानसारा ! माययुक्ता ! शिवा श्रीदिगंबरा ! ॥२॥
६९९
विश्वंभरा ! विश्वकारणरूपा ! दत्ता ! निर्विकल्पा ! आपस्वरूपा ! ॥१॥धृ॥
तुझा बोधु मातें सर्वदा राहो. मानसी वियोग नित्य न साहो. ॥छ॥
दिगंबरा ! योगिजनवल्लभा ! वरदमूर्त्ती ! सत्य ! स्वयंभा ! ॥२॥
७००
जगद्गुरो ! जगबंधविछेदा ! आत्मयां ! निर्गुणा ! पूर्ण ! अगाधा ! ॥१॥धृ॥
तुझें संकीर्तन प्रीय बा ! आत्मा; मोक्षासि हैतूक पुरुषोत्तमा ! ॥छ॥
दीगंबरा ! दीनु संसारहरणा ! कृष्णा ! श्यामा ! देवा ! कमळनयना ! ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 17, 2016
TOP