४८१
छेदिला भवपाशु जेणें, ज्ञान - योग - विवर्द्धनें,
पंकजलोचनें, अनसूयानंदनें; ॥१॥धृ॥
हें मन मोहिलें, हें मन. ॥०॥
मोहिलें निज रूप दाउंनि गुणा - गुण मति सगुणी,
सुख वर्द्धनी, श्रीगुरुचरणी; ॥छ॥
अव्यया द्वय योग धीरें सर्वदा गुण यीश्वरें,
श्रीदिगंबरें, स्वजन दयाकरें. ॥२॥
४८२
दत्तु हा प्राणासि प्राणु, आत्मसुख विवर्द्धनु,
सगुण निर्गुणू, भवभय मर्दनु. ॥१॥धृ॥
येणेंसीं रातली येणेंसी रा. ॥०॥
रातली योगिराया, चिन्मया, परमाव्यया,
दत्तात्रया, बहुजनआश्रया. ॥छ॥
सावळें रूप व्यक्त पाहोनि प्रीति गुंतली ये मनी,
दिगंबरचरणीं, देह गेह सांडूंनी. ॥२॥
४८३
योगियां गुण - कामधेनु, दत्तु मेघु सनातनु,
ज्ञान - विवर्द्धनु, पतितपावनू. ॥१॥धृ॥
तो मज दाखा, तो मज. ॥०॥
दाखवा वो ! मज ध्यान सेवनी, समळ मीपण सारूंनी,
तत्व प्रकाशुनी, श्रीदत्तु ये मनी. ॥छ॥
भेद - भान - विकार - हीनू, कामक्रोधविनाशनू,
दिगंबरु निर्गुणू, ब्रह्म सनातनू. ॥२॥
४८४
संसारीं भय भारी; मज तारीं रया ! श्रमु हरीं; सुख करीं; नीवारीं क्रीया.
भ्रमु वैरी मजवरी; तूं मारीं यया.
अधिकारी न विचारीं; मज करीं दया. ॥१॥धृ॥
स्वरामा ! निष्कामा ! तुं क्षमा करीं;
परमात्मा सर्वात्मा तूं आत्मा जरी. ॥छ॥
अवधूता ! गुणयुक्ता ! वीमुक्ता ! येईं.
संत्राता, गुणभर्ता तूं कर्त्ता देहीं.
दिगंबरा ! गुणधी ! अविकारा ! गुणधीरा ! पाहीं.
संसारभयहरा ! सुविचारा देयीं. ॥२॥
४८५
तुरुराया तव माया गुणक्रीया करीं;
सुरवर्या ! मितवीर्या ! दुर्जया जरी.
भवभाना गूणीगूणा प्रेरणां करीं.
तरि आह्मा तूं आत्मा कां घालिसी वरी ? ॥१॥धृ॥
समर्था ! गुणवंता ! तुं दत्तात्रेया.
तूं माता, तूं पीता समस्तां यया. ॥छ॥
निःकामा तूं आत्मा परमात्मा देहीं. तुजवीण पद आन भवभान नाहीं.
दिगंबरा सुखसारा गुणपरा कवी ? भवबंधु गुणभेदु अनुबंधु तयीं. ॥२॥
४८६
गुणलेशू, गुणदोषू, गुणपाशू, गुणीं;
गुणमाया - भ्रमु वायां, प्रतिछाया मनी;
गुणभासू आभासू त्रीदोषु जनी;
स्वस्थिती प्रतीती ते स्फूर्त्ती गुणी. ॥१॥धृ॥
अहमात्मा, चीदात्मा, सर्वात्मा सैये !
गुणचारी, गुणहारी, संसारीं यये. ॥छ॥
गुणवादीं, गुणभेदीं, अनुबंधी नव्हे.
गुणकर्त्ता, गुणभर्त्ता, गुणगोप्ता जीवें.
दिगंबरू, स्वस्थीरू, श्रीगुरु सवें.
मज काहीं भय नाहीं ये ठायीं शिवें. ॥२॥
४८७
॥ चालि भिन्न ॥
जनकजगजननीजंनका ! तूं आत्मयां ! रामां !
रमणशिळ वीसांवलें; तुझी पावले सीमा.
श्रमद भव - भवन कैचें तयां शुद्धनिःकामा ?
चळनहिन गगन जेवी ऐसी पावले क्षमा. ॥१॥धृ॥
जय गुरो ! कमळनयना ! गुणागुणगणविमथंना !
मंत्रविद्यंत्रवासां ! शुभाशुभद ! पविहरणां ! ॥छ॥
चरणगुण श्रवण करितां मनी मन न मरे वक्तां.
वादु प्रत्यक्ष ब्रह्म भ्रम श्रम नुरवी श्रोतां.
भजन जन - भय निवारी तुझें श्रीअवधूता !
झडकरूनि दीगंबरा ! मज देइंजे तें आतां. ॥२॥
४८८
श्रमदु मदु विषयसरिता कामु - कल्पना - धार
द्रवती गुण; गहन करणी; ओघ - वेग अपार !
प्रबळ बळ खळखळाळ; वाद - वचन - विस्तार;
सहज मज पतन आलें; कर्मघालणी थोर ! ॥१॥धृ॥
जय ! गुरो ! दत्तात्रया ! शिवा ! अमितगुणवीर्या !
स्वजनजनवरदमुर्त्ती ! निवारि हे माया. ॥छ॥
धनज - धन - धनद - भजनी मन मनहिन जालें.
स्वजन - जन - जनक - तनुजे चित्त धरूंनि ठेलें.
स्वपरपर परती न चरे; आंगें आंग लोटलें.
झडकरूंनि दीगंबरा ! कयीं करिसी वेगळें ? ॥२॥धृ॥
४८९
सिमिसिमित हृदय कोण ! लाभु जाहला भारी !
स्वजन, धन, जननीजनकें तीं पावलीं दूरी.
दुरितकर प्रखर परम सासुरें हें भारी.
कवण गुण ? कवण कर्म ? मीं पडलें घरीं. ॥१॥धृ॥
कवण ते परम सखी भेटि करील दत्तेंसीं ?
प्राण मीं वोवाळिन; चरण झाडीन केसीं. ॥छ॥
शरीर, कर, चरण तपती; प्रज्वलती ज्वाला.
नयन - जळधर - द्रवांशें संप्राशिती कळा.
किं विकळ चळचळती प्राण; मुख - स्पंदु लागला.
तुज कैसें दिगंबरा ! ऐसें देखवे डोळां ? ॥२॥
४९०
जनबंधो ! निर्गुण - तत्व - प्रकाशका ! सिमा तुझीं अपरां
गुण गण चरां. विपरीतुचि प्रकटे गुरू.
गुणत्रयवंतासि न कळे पारू. परब्रह्म तुं गुणरहितु परू ॥१॥धृ॥
राजिवा ! राजिवा ! कृत - बहु - गुण - लोचन स्वरूप तुझें.
ध्यान गुणयोगें प्रकटसी केधवां ? सुहृदबंधु !
ज्ञान - योग - युक्तां अचळ जो बोधू.
अन्यगुणभावीं मीं नव्हें सावधू. ॥छ॥
गुणकर्मछेदनज्ञानप्रभाकरा ! सुभक्तहीतषरा !
सुरगणधीरा ! वीषइक दुर्जन वीचारू
नुमजती; ते नेणती तुझा फरू.
दिगंबरा ! तुजहूंनि न दिसे थोरू. ॥२॥
४९१
गुणकृत - ध्यान - विधान - गुणात्मक - छेदन - योग - परा !
सुरगणसिद्धा ! वीजन कां सेविसी गुरू.
तुजहूंनि आणिकू न दिसे थोरू.
मनस मालवे तीये चेतने परू. ॥१॥धृ॥
भार्गव भार्गवप्रीय ! परम - दयाकर ! सगुण तुझें रूप न गणवे;
प्रकटचि जेधवां नुरवी भेदू. ज्ञान - योग - योगें विषय - प्रमादु
मायामय - भेदु नुरवी त्रीविधू. ॥छ॥
गुणीगुणभाननिदान - गुणांतक - वेदक - योगपरा.
भुवनवीषयद भजन विस्तारु. न संगसी मूळपद दाता गुरू.
दिगंबरा ! हरि - जसु भ्रमु गोचरू. ॥२॥
४९२
श्रीराग उजु
( चालि भिन्न )
अगम्य वेदन गुणीं चित्त चंचळ जालें.
न चले साधन जाण वों ! आत्मवीषयीं भ्रमु
भेदु सर्वत्रु हा. विषय बोधु सइये ! ॥१॥धृ॥
अनुभूय सकळा करणीं वो ! अनर्थकर परि नेणवो ! ॥छ॥
अनित्य नीत्य हें वस्तु - ज्ञान कुंठित जालें. असंगासंग विधान वो !
दिगंबरु वो ! नित्य मुक्तु सद्गुरु हा. आनंदप्रदु कइये ? ॥२॥
४९३
गुणकारी गुणभासु बा ! रे ! चिद्गुणें परिस्फुल्लतु रे !
खेल्लतु, झल्लतु रे ! जनमोहनु, गुणरंजनु,
गमितां रे ! दीगंबर आश्रइतां रे ! चिन्मय भजन बरवें ! ॥छ॥
४९४
देहत्व फेडी; गुणकंपा गीळी; ध्यान ध्येय नेणें.
न विचले योगी. चेतनां मुळीं घे. गुरूखूण बोधला रे ! ॥१॥
न धरवे स्वाश्रिता तन्मूळीं मननी शंकरु नेनवे. ॥छ॥
ममत्व मोडी. अनुमान अवाळी. दिगंबरु वो ! बाइये !
जयीं मिळे वो ! योगीं, साधनी सेविजे. न उरवी तो दुसरें. ॥२॥
४९५
अगुणें, अवधूतें, चित्त मोहिलें, योगिरायानें. ॥१॥धृ॥
श्रीशिवा मानस वेधलें, रातलें तया, वेधलें अतिमानें. ॥छ॥
कइं रे ! कइं येसी ? दिगंबरा रे ! देवराया रे ! ॥२॥
जति निवारीं माया हें गुणक्रिया; निवारी माया हे. ॥छ॥
॥ खंड ॥ प्रबंध ॥
४९६
आतूरपण बहु ! देखइन साजणी !
भवभयांतकु कइं आदिगुरु ? विषयविष सेवितां भ्रमली भारी माये !
तरि तया आणूनि चरण दाखवी. ॥१॥
हां वो ! जन - धन - ममता.
याची न धरी वो ! संगति वेचली वयसा. ॥छ॥
अरे तिया ईयं वैय्ये अय्याई येइ या
नियाई याई याई याई अय्या इये इया
आइये इइयम् वो इया इया. ॥छ॥
४९७
तो एक, सुरेशु, स्वानंद - सागरु, पाहीन मीं नयनी श्रमहरु,
परमसुखदायकु, देॐ दिगंबरु.
देखिला, मग पुरे, पाये न सोडीं. ॥२॥
चिंद श्रीराग
४९८
देवा येईं; दर्शन देईं; दीनु मि तुझा बहुभावें; अय्या !
पायां तुमचिया लागों; देवाधिदेवा ! दया करा.
स्वामि ! दावाजि पायां. ॥१॥धृ॥
श्यामळा ! करा दया वों ! दया ! श्यामळा ! ॥छ॥
ये हां हा ! योगियां ! देवराया ! मनमोहना !
दिगंबरा ! करि करुणा रे ! ॥२॥
४९९
॥ नामावली ॥
स्वानंदपदसार, भवभयहरणु, योगिजनमोहनु,
अगुणगुणांतकु, अवधूतु, दीननाथु,
तथोम् थोम् थोम् थोम् थोम् परात्पर स्वरूपा ॥१॥धृ॥
परमयाकर कईं पाहें ? तेणेंवीण मन हें क्षणु न राहे. ॥छ॥
वरदु, गुणेश्वरु, जगनगजीवनु,
मायातमोनाशनु, परमसुखंकरु, सुरनरमतीहरु,
तथोम् थोम् थोम् थोम् शिवदेव दिगंबरु. ॥२॥
॥ भिन्न ॥
५००
बाधकु भारी हा संगु; शरीरीं वियोगुतापु न साहावे.
नये, कां नये कमळलोचनु ? धेलें कठीण; करूं काये ? सैये ! ॥१॥धृ॥
दाखवा मुख; लागैन पायां. दाखवा मुख; लागैन पायां. ॥छ॥
दूरि न धरीं; उदास न करीं. येउनियां श्रमु हरीं.
कइं मीं, कइं पाहीन आत्मयां ? दिगंबर, देवराया, रैया ! ॥२॥