१४१
अनंत, अद्वैत, भासविहीन, अचलस्वरूप, शिव, परमकल्याण. ॥१॥धृ॥
देखिले रे ! दत्ता देखिले रे ! स्वरूपें स्वरूप आह्मी आपुलें रे ! ॥छ॥
अलक्ष, अमोघ, गुणवीरहीत, दिगंबर प्रकटले; न उरवी द्वैत. ॥२॥
१४२
समूर्त, अमूर्त, अतिसुखभान, श्रीदत्ताचें रूप देखिलें सगूण. ॥१॥धृ॥
श्यामळरे ! कृष्ण श्यामळ रे ! नयन रूप श्यामळ रे ! ॥छ॥
सगूण, निर्गूण, पद सुखभान, दिगंबररूप, द्वैतभाव - विलक्षण. ॥२॥
१४३
चरणस्मरण ! भवनिर्दळन ! श्रीदत्ता ! सद्गुरो ! तुझें परमकल्याण. ॥१॥धृ॥
लाभलें रें ! आह्मा लाभलें रे ! आजन्म न सूटे. प्रेम संचरले रे ! ॥छ॥
सगूण, त्रीगूण, गुणवीरहीत, दिगंबरा रूप तुझें भजती ध्यानस्थ. ॥२॥
१४४
हृदय विषयपुर जालें माय ! श्रीदत्ताचें रूप आतां तेथ कैसे आहे ? ॥१॥धृ॥
चंचळरे ! मन चंचळ रे ! योगेंवीण जाले अति चंचळ रे ! ॥छ॥
न येवोनि राहे मन माझें माये ! दिगंबरें कवळिलें ! मग करी काये ? ॥२॥
१४५
हृदयीं माध्यानी मन करी जपमाळा;
चाळितुसे मणी; वाचा नांगवे तोडाळा. ॥१॥धृ॥
वेचलें रे ! वय वेचलें रे !
लाहोनि मानव्य वायां दधडिले रे ! ॥छ॥
साधनी ना भोगी देह वायांचि गेले.
दिगंबरेवीण प्राणी ऐसें नागवलें. ॥२॥
१४६
हृदय सराग; करीं जपमाळा;
काम क्रोध देहीं; वाचे ग्रामणीचा चाळा. ॥१॥धृ॥
नाशलें रे ! मन नाशलें रे ! जीतचि शरीर; मन नाशले रे ! ॥छ॥
श्रवण श्रमद दमु तो आंगीं न साहे. दिगंबरा ऐसे जन;
योगु तया काये ? ॥२॥
१४७
संगविहीन, परभंगविवर्जित, योगसार्श्रवणा ! ॥१॥धृ॥
न माने; न मनवेल रूपनामाने; न मनवे.
निःसीम निर्ममि प्रबोधु तो प्राणियां; ॥छ॥
योगजनीत सार भोगविवर्जन दीगंबर स्वजना. ॥२॥
चालि भिन्न
१४८
अगणितु, अद्भुतु, अच्युतु, अविकारी, अद्वैतु; आ ::- ॥१॥
अपरांपरु. ॥१॥ निर्जन, निर्गुणनिधान, निरवैव, गुणगणी;
॥ आ ::- ॥०॥ शाश्वत, सचराचरु, सर्वा अतीतु; ॥ आ ::- ॥
ज्ञानविज्ञानद, गुरू ऐसा दिगंबरु. ॥ आ ::- ॥०॥२॥
१४९
अनुकंपामृतधारा ! गति कुंठली पामरां.
श्रीगुरू वोळला घनु; नुदवी, नुरवी, परा. ॥१॥धृ॥
आतां हृदय भरलें माये ! मनस गळीत, गळीत, विगळीत;
त्रिगुणवीहीन ठेलें. ब्रह्मानंद भरीत आतां. ॥छ॥
आनंदानंतानंदा ! शंकरा ! पूर्णबोधा ! दिगंबरा !
दीनपती ! पूर्णानंदापदा ! ॥२॥
१५०
प्रतिक्षणी क्षणक्षणा मजआगळी वासना.
भेटीचे आरत माये ! न पडे विसरु मना. ॥१॥धृ॥
आतां मन हें नव्हे वो ! माझें; जालें विपरीत !
तेणेंसीं जडोनि ठेलें; न भजे आन विहीत. ॥छ॥
अद्वया ! गुणातीता ! आत्मयां ! अवधूता !
दिगंबरा तूजवीण सकळ मन वृथा. ॥२॥
१५१
बहुकाळ भेटि नाहीं; मन गुंपलें वीषयीं.
अवधूता ! तूं माउली; एकुदां भेटिसि नेईं. ॥१॥धृ॥
आतां, नधरे धीरु वो ! मातें. न कळे स्वहीत,
विहीत. अहीत नयनी लोटती धारा हृदयदुःखभरीत. ॥छ॥
आत्मया ! दत्ता ! येईं; येकूदां भेटी देयीं; देवदेवा !
दिगंबरा ! हृदयीं भेटसी कयीं ? ॥२॥
१५२
प्रतिदिनीं प्रतिक्षिणी भासतांसि, अंतःकरणीं.
आणितां विसरू नये. न गमे विषयो मनी. ॥१॥धृ॥
आतां, मजसी भुलली माये ! चित्त विपरीत.
बोधन बोधासी न ये; न कळे हीत विहीत. ॥छ॥
आशंका नुरे भावें; बोधली येणें जीवें.
दिगंबरु आत्मा सैये ! जिविचा जिवनु जिवें. ॥२॥
१५३
सावळा डोळसु माये ! ध्यानीं चिंतनीं मीं पाहें.
अरती विरती याची न कळे; प्रतिती नये. ॥१॥धृ॥
आतां, मज मीं भुलली जीवें. खुण विपरीत !
बोधनु अपर ठेलें. देखणें दृश्यसहीत. ॥छ॥
देखिला दृष्टीवीण; रूपीं गुंतलें हें मन;
दिगंबरु आत्मा येणें गुणिका प्रकटे निदान. ॥२॥
भिन्न चाली
१५४
गुणी भजता भाव ना भेद मति पारूषली.
अवधूताचें दर्शन, दृष्टि मावळली; गुणमति मावळली. ॥०॥१॥धृ॥
जिवीचें आरत कांहीं गुज बोलयीन.
रूप हृदयीं सखिये ! बाहीं कवळीन. ॥छ॥
गुण ययाचे निर्गुण, ऐसें मी वो ! काये जाणें ?
दिगंबरीं अनुसरु; कुंठें बोलणें. ॥२॥
१५५
हा वो ! देहीचा देखणा; येणेंसीं मीं काये चोरूं ?
मन माझें हें चंचळ; कैसें काये करूं ? ॥१॥धृ॥
जीवीचें आरत ऐसें कयी पावयीन ?
अवधूताचा चरणी माळवैल मन. ॥छ॥
मन जाये वो ! जेथ हें; तेथवरि तोचि आहे.
दिगंबरु आत्मा; तेथ मन मरोनि जाये. ॥२॥
१५६
बहु दिवस क्रमले; सखिये ! मी काये करूं ?
भेटी न ये अवधूतु; याचे पाये धरूं. ॥१॥धृ॥
भेटीचें आरत माझें परिपूर्ण करा.
मन माझें उतावीळ; पाहिन माहियेरा. ॥छ॥
वाट पाहतां कुंठली गति, मति, आठवण.
दिगंबराचें भेटणें मनीं मारूंनि मन. ॥२॥
१५७
सुख नाहीं वो ! शरीरीं; तापत्रय बाधिताहे.
अवधूतें वो ! संडिली; आतां करूं काये ? ॥१॥धृ॥
कठीण येसणे ऐसें; मी वो ! काये जाणे ?
बुझविजे अवधूतु अंगें कवणें ? ॥छ॥
प्राणप्रयाणसमयीं आतां मज भेटि देइं.
दिगंबरा ! तूजवीण मज कव्हणी नाहीं ? ॥२॥
१५८
देह, गेह हें पारिखें जन, धन, वन, जालें;
अवधूतेंवीण सुख दुःख परतले. ॥१॥धृ॥
न धरीं शरीर; आतां मी जाति असे.
संगु न सोडीं माहेरा ! मज मांडलें ऐसें. ॥छ॥
देह जायील; न चुके; येणें मज चाड नाहीं.
दिगंबरु, आत्मारामु पाहिन हृदयीं. ॥२॥
१५९
प्राणाचें मज नाहीं वो ! या जिवाचें मज नाहीं वो !
स्वजनजनितभय देहीं वो ! नयनीं भरलें रूप दोहीं वो !
डोळां भरलें रूप दोहीं वो ! कवळिन दोहीं बाहीं वो ! ॥१॥धृ॥
देव हरे ! देव हरे ! देव हरे ! देव हरे ! देव हरे ! देव हरे !
देवारे ! देवारे ! देवारे ! रे ! रे ! रे ! रे ! रे !
तुजविण मातें क्षण न सरे ! ॥छ॥
मानस मीपण वरियलें; मन मनाप्रति चोरियेलें;
मन मनाप्रति चोरियेलें.
देहादि सकळ सारियलें; दिगंबरसुख माये ! भोगियेलें. ॥२॥
१६०
बोलें बोलणें मज मानेना. शास्त्रश्रवण तें वो ! मज मानेना. ॥०॥
सद्गुरूवांचुनि पढियेना. योगाची मति उपजेना.
साधनबुद्धि मनीं उपजेना. श्रीदत्तु आठवे मनी क्षणक्षणा. ॥१॥धृ॥
पाउलें, पाउलें, पाउलें, पाउलें,
सावळें पाउलें, देवारे ! रे ! रे ! रे ! रे ! रे !
देवारे ! देवारे ! आठवति मनी तुझें पाउलें. ॥छ॥
ध्यानधारण मज उपजेना. जपु तपसु मज उमजेना. ॥०॥
देह अदेह प्रति प्रति भासेना. दिगंबरीं मीपण उमजेना.
दिगंबरीं बोधन उमजेना. पुरे सखीये ! अनुभवकल्पना. ॥२॥