२०१
जनवन भ्रमतां श्रमली येतां जातां मीचि मीं येकलीं. ॥१॥धृ॥
पाहिन कमळनयना; तेणें माझी हरैल वेदना. ॥छ॥
सर्वही दुःखाचें कारण. दिगंबरु माझें वो ! जीवन. ॥२॥
२०२
दिनें दिनु पावली क्षिणता. वय गेलें विषय स्मरतां. ॥१॥धृ॥
पाहिन सुखाचें कारण अवधूतरायाचें चरण. ॥छ॥
जीतचि मुक्तीचें साधन दिगंबरा ! तूमचे चरण. ॥२॥
२०३
तो दिनु कयी मी लाहिन ? देवा ! तुतें हृदयीं पाहिन. ॥१॥धृ॥
साधन न करीं दूसरें अवधूता ! तुझेंनी विसरें. ॥छ॥
कर्मज शरीर न धरीं. दिगंबरू पाहीन अंतरीं. ॥२॥
२०४
भवपुर भ्रमतां श्रमली; आपुलयां प्रति मीं चूकली. ॥१॥धृ॥
जायिन श्रीदत्तभूवना; भेटयीन माये मीं स्वजना. ॥छ॥
दिगंबरु ते माझी माउली, श्रमहर सुखद साउली. ॥२॥
२०५
भोगें क्षीण शरीर वेचलें; काम क्रोधं प्रबळ जाहाले. ॥१॥धृ॥
तें जिणें जळो रे ! पामरा ! अहंमती न धरी शरीरा. ॥छ॥
अंतकाळु मांडलां समयी. दिगंबरु नाठवे हृदयीं. ॥२॥
२०६
मनस हें मानसीं मातलें. स्व - स्वरूप तयासी न कळे. ॥१॥धृ॥
पाहिन तुमचे चरण. तेणें मन होईल उन्मन. ॥छ॥
दिगंबरा ! तूं माझी धारणा, योगमुद्रा, समाधी, चेतना. ॥२॥
२०७
मागें मागें येयीन येकली. अवधूता ! बापु तूं माउली. ॥१॥धृ॥
तूंविण नेणें मी दुसरें, मनें, मती, मानसें, शरीरें. ॥छ॥
संगें संगु - संसार - छेदन; दिगंबरा ! सत्य हें वचन. ॥२॥
२०८
कर्म - कूप - कुवाडां पडली. अवधूता ! तुज मीं चूकली. ॥१॥धृ॥
होयिल प्राणाची सांडणी. तुजवीण नाहीं बा ! कव्हणी. ॥छ॥
दिगंबरा ! निवारी वेदना भवदुःख संसार कल्पना. ॥२॥
२०९
॥ चालि तेचि हे चौचरणी ॥
अद्वय - ब्रह्म, स्वरूपत्वें रूपस; श्रमती जया लागूनि तापस;
योगी योग सेविती बव्हस; येथें वो ! माझें गुंपलें मनस. ॥१॥धृ॥
पाहिन नयनी सखिये ! मन माझें वेधले बायिये !
देहावरी न ये वो ! गोरिये ! येणें ज्ञाणें कुठलें वेसिये ! ॥छ॥
मुमक्ष जयालागोनी श्रमती; मुक्त जेथें आनंदु भोगिती;
भक्तजन सगूण भजती; दिगंबरु पाहाती पूजिती. ॥२॥
२१०
प्राचीन कैसें ? तें न कळे, सद्गुरूसी अंतर पहिले.
आठवती हृदयीं पाउलें. मन माझें जाहालें आंधळें. ॥१॥धृ॥
मी पाहिन कमळनयना; लागयीन, न सोडीं, चरणा.
न साहे वो ! वियोगवेदना. मज दुजी न करी कामना. ॥छ॥
कर्म - भूति कर्मासी कारण; येणें देहें नव्हे वो ! साधन.
संगयोग बाणले गहन. दिगंबरीं न स्फुरे चेतन. ॥२॥
२११
कर्मयोग श्रमली सोषितां माझें तुझें दुःखाची सरिता.
वय गेलें विषय भोगिता. अंतकाळ पावला सर्वथा. ॥१॥धृ॥
मि पाहिन देवाचें वदन मायेबापु माझें वो ! स्वजन.
हितकर, गतीचें कारण, आतां तर्हीं रिघैन शरण. ॥छ॥
लक्ष - लभु जाला, तो न मनी. देह नाहीं मज हें येथुनी.
आत्मारामु दाखवा नयनीं. दिगंबरीं करा कां मीळणीं. ॥२॥
२१२
विषयसुख दुःखासी कारण. विषयभ्रमु श्रमाचें साधन.
विषयवृत्ति अवृत्तीबंधन. विषय मीं वो ! न करी सेवन. ॥१॥धृ॥
मीं जायिन तया वो ! मंदिरा; भेटइन श्रीदत्ता माहेरा.
विषयो मी न भजे दुसरा. अर्थभोगु न साहे शरीरा. ॥छ॥
चंदन - पोळी, वो ! चांदिणे, न रुचती मधूरें गायनें.
दीपें दीपां लागलीं दूषणें. दिगंबरीं रंगलें जाणणें. ॥२॥
२१३
डोळाचें मीं काढीन देखणें. दृश्य सर्व हाणैन गगनें.
प्राणेसीं वो ! न करी साजणें. देह माझें नेलें वो ! कवणे ? ॥१॥धृ॥
मि पाहिन नयनें - वाचुनी मीपण आंगिचे फेडुनी.
शब्दब्रह्म नावडे श्रवणीं. गति माझी नेणती कव्हणी. ॥छ॥
गगन गीळिलें गगनें. गणो नये जाणिवा जाणणें.
गुणीं गुण ग्राशिलें अगुणें. दिगंबर महिम्न येसणें. ॥२॥
२१४
श्रवणें भेदलें अंतर. नयन वो ! जाहाले तत्पर.
दृश्य तेथें निमाले गोचर. काय नेणों जाहालें शरीर ? ॥१॥धृ॥
पाहीन प्रपंच नयनीं. लावा कां वो ! सुमनें गगनीं !
बंध्यापुत्र भेटवा साजणीं ! मृगजळ भरा कां रांजणीं ! ॥छ॥
मीपण निमालें बोलणें. मन माझें हरिलें अगुणें,
चैतन्य, अचैत्य, चेतनें. दिगंबरीं तन्मय असणें. ॥२॥
२१५
मनीं मन मानस माळवे. आपपर नेणवे, नेणवे.
मीपण असोनि नाठवे. अतःपर कैसें वो बोलवे ? ॥१॥धृ॥
मी सांडीन लौकीकु येथूनी. अवधूतीं जाली वो ! मीळणी.
प्रपंचु नाइकें श्रवणी. गुणीं गुणें गुंपलीं अगुणीं. ॥छ॥
नेणपण निमाले जाणणें. ठायें ठाॐ मी मज भोगणें.
हा ही बोलु न साहे बोलणें. ऐसें दिगंबराचें करणें ! ॥२॥
२१६
श्रवणीं आनंदु माये. नयनीं तो कैसा पाहे ?
आणितां गुणासि न ये आत्मा वो ! माझा सैये ! ॥१॥धृ॥
काये मीं करूं वो ! आतां ? मन वेधलें श्रीदत्ता.
वय सरली सरीता अर्थ काम हे ध्यातां ध्यातां. ॥छ॥
अरि मीत्रसम जाले. देह हें निदाना जालें.
दिगंबरु कवणे काळें देखतील हे माझे डोळे ? ॥२॥
२१७
गुणी गुपलें चैतन्य. विसरळें पाप पुण्य.
लागले वो ! याचें ध्यान, न करी तें देही स्थान. ॥१॥धृ॥
अझुणी न ये, वो ! न ये, आत्मा. मीं करूं काये ?
जाणवा तयाची सोये. पाहिन नयनीं पाये. ॥छ॥
धर्मु नेघती नयन विरता हे माझे मन.
अति प्रीती; येकपण, दिगंबरीं समाधान. ॥२॥
२१८
रूप नाहीं; कैसी पाहों ? निरालंबीं केवि राहो ?
जीवहानि जीवीं साहे. फेडा का वो ! हा संदेहो. ॥१॥धृ॥
वेधलें माझें वो ! मन. न कळे ययाचे ध्यान.
गुणी गुणीक बोधन. न सरे ते जाले क्षीण. ॥छ॥
भेदु नाहीं; भजों कैसी ? भान न साहे ययासी.
दिगंबरु हा सर्व - देशी. भजतां भेदूचि ग्रासी. ॥२॥
२१९
न करीं मीं येरधारा. श्रमु जाला जी माहेरा.
मायेबापु तूं दातारा ! आनु नेणें मीं दूसरा. ॥१॥धृ॥
वय गेले; वाये शीण. नलगेचि तुझें ध्यान.
भ्रमभूत माझें मन. योगु नेणें मीं साधन. ॥छ॥
पाये पाहिन नयनीं; रूप तूझें नीडाळूनी;
दिगंबरा सत्य मानी. न करीं आणीक करणी. ॥२॥
२२०
जन - वन - भान - माया, धनद - स्वजन - जाया,
करण - कारण - क्रीया, दूरी करीं योगिराया. ॥१॥धृ॥
कां दुःखाचे करिसी ? माझें मातें न दवीसी ?
आत्मया कें लपसी ? अवघेंचि तूं अवघा होसी. ॥छ॥
सांडूं तरि कैसें काये ? धरूं ते तरि कोठें आहे ?
दिगंबरा ! नेणें सोये. करणें तें वायां जाये. ॥२॥