६०१
ज्वरें वदन विटाळलें; पय पानीय कडुवट जालें.
तमोगूणे शरीर जळे; तयां न साहाती सोहोळे. ॥१॥धृ॥
माळ तोडिली गळांची. कैसा धावतुसे उघड चि ? ॥छ॥
उपदेशु वैरी होये. शब्दमात्र न साहे.
दिगंबरा ! करणें काये ? तो चूकला तुझी सोये. ॥२॥
६०२
कां गा करितासी खरखारा ? गुरु येक कीं ते तेरा ?
तैसा स्मरैन दिगंबरा. मी न स्मरे दूसरा. ॥१॥धृ॥
आतां निंदा करिसील काह्या ? देॐ येक. येर ते माया. ॥छ॥
प्रिय येकू कीं दूसरा ? सती भजे प्राणेश्वरा.
आळवीतां दीगंबरा, कोण्हीं न करावा खरखरा. ॥॒॥
६०३
शिवगणीं पूजिला विष्णु वैष्णवीं त्रीनयनु.
पाहा येणें भेटती आनु. दाहां देवांचा कवणु गणू ? ॥१॥धृ॥
जना सांडीं रे ! ते युक्ती. “ एको देव ” ऐसी श्रुति. ॥छ॥
जेथें भजिजे तेथें एक देओ. दुजा नाहीं आणीकु.
दिगंबरु येकानेकु; जना ! न करी रे ! कुतर्कु. ॥२॥
६०४
संसार भरली सांत. जन बहुविध मिनलें तेथ.
क्रियाफळ कणें भरिलें वित्त. हीत वेचूंनि अहित समस्त. ॥१॥धृ॥
अर्थलाभु मुदलाचि तुटी. धनें धनिक जाहाले जन कष्टी. ॥छ॥
नाना योनी ठेविले ठेवो सुख दुःख न चि बघवे.
दिगंबरेसीं अंतर बरवें. धूर होती तयां तेंचि फावे. ॥२॥
६०५
संतारवणिजे निघाला; हितसंग्रहो घरीं विसरला;
आयुष्याचा विकरा केला; अर्थु अनर्थु जोडी जोडला. ॥१॥धृ॥
आतां लाभु भज रे सुजाणा ! येकां आयुष्य वेचणें पुरेच ना. ॥छ॥
आत्मपणी भेटिला अर्थु, एसा बोलतां कवण पुरुषार्थु ?
दिगंबराचा मोडला पंथु. कोण्ही विकरां न भजे परमार्थु. ॥२॥
६०६
विषय - विषय - विषम - गुण - सरिता संसारु भरला चि रीता.
जळमळीत नीतळ जळ पाहातां मृगजळ काये येइल हातां ? ॥१॥धृ॥
तेथें काये तरसी ? सुजाणा ! जाणवलियां जागरी जेवि सिवणा ॥छ॥
सन्निपाताची दृष्टीचि भरली. भाग्य ह्मणिजे ते अवघीचि भूली.
दिगंबराची सोये चूकली. लाभु लटिका ते हाणीचि जालीं. ॥२॥
६०७
धन, कनक, सदन, जन, जाया क्षणक्षणा पाहातासि वाया !
माप लागलें मनुज - देह - वया.
पाहे स्वहीत. काये म्यां केली क्रीया ? ॥१॥धृ॥
जन्ना सांडि रे ! दुराशा. बोले भय देहवय आले कळसा. ॥छ॥
काये यौवन पाहासी शरीरीं ? लेणें कनक कानक वरि वरि.
स्थिर आयुष्य न दिसे संसारीं. काळु जवळि पावला. सोये धरी. ॥२॥
कीट, भस्म ययाचे अवसान. अन्नमय हें घातुक, सत्य जाण.
दिगंबराप्रति रिघपां ! शरण. देहा सेवटीं अचूक आहे मरण. ॥२॥
६०८
घ्राण छेदूनि मोतीं सुपाणी, कर्ण खांडूंनि कुंडलें दोन्ही,
घालावीं कवणे खानीं ? मीं बरीं जाली दिसताहे जनी. ॥१॥धृ॥
रे ! वय गेलें; अर्थु मिळाला. भोगा न ये + + + + प्रति गेला.
डोळे फोडूनि दर्प + घेइजें. आतां स्वमुख कासेन विलोकिजे ?
दिगंबरेंवीण जें जें कीजे, तेणें आपुलें स्वहीत न मनिजे. ॥२॥
६०९
मळ मूत्रांचा देह पेटारा. क्रीम कीटक खाती धरधरा.
माजि रिघोनि धरिसी अहंकारा !
आप विसरोनि भुलसी गव्हारा ! ॥१॥धृ॥
रे ! आतां सोये धरी लवलाहे ! देह नरक नरकप्रद आहे. ॥छ॥
मळपात्रचि जाहालासि काह्या ? मळपदप्रद करितासि क्रीया.
दिगंबरेंवीण न भजे विषयां. मळ पवूचि भोगिसी कासया. ? ॥२॥
६१०
मळ मूत्र आपुलां शरीरीं. स्त्रीसंयोगु तयाचि परी.
तनु जाये घेतासि वरी. कर्म करिसी ते नरक सामग्री. ॥१॥धृ॥
जना वीवेकु धरि कां मनीं. वाया श्रमसी आयागमनी. ॥छ॥
जो देदो तो ऐसाचि जाये. जे क्रिया ते तेचि ते आहे.
पुढें आवधी मी न पाहे. दिगंबरेंविण भ्रमातासि काये ? ॥२॥
६११
हीत ह्मणौनि धन जोडिले. आड प्राचीनं भोगासि आले;
तें कैसेनि ह्मणिजे आपुलें ? क्रियमाण चि खोटें घडलें. ॥१॥धृ॥
ऐसा अर्थें अनर्थु जाला ! वीण पारखी जनु ठकला ! ॥छ॥
अर्थु ना ते क्रीयमाण. तणे घडताहे दुष्टाचरण.
द्रव्य दुःखाचें कारण. ऐसें नेणती चि अज्ञान. ॥२॥
अर्थसाधनी दुःख चि साधे. संरक्षणीं दुःखचि नांदे.
व्ययीं दुःख उरे न - सुधें. दिगंबरु न कळे प्रमादें. ॥३॥
६१२
आदि गुरूवीण संदेहो न तुटे. आदि गुरूवीण तत्व न प्रकटे.
दुजें दैवत न घटे, न घटे. आदि गुरूवीण माया न निवटे. ॥१॥धृ॥
ऐसी गुरु देवता पूजावी; जपावी; हृदयीं धरावी. ॥छ॥
आदि गुरूवीण न पविजे पारु. आदि गुरूवीण न कळे विचारु.
आदि गुरू हा मज दीगंबरू; जया स्मरतां नेणिजे संसारु. ॥२॥
६१३
गुरु सांडूंनि तीर्था जाणें; तयीं परतोनि का मग येणें ?
दावितां मुख लाजिरवाणें ! विभचारिणीचे जळो जीणें ! ॥१॥धृ॥
क्षोभु न करीं रे ! सुजाण ! भानु देयीं माझया वचना. ॥छ॥
आन मोक्षासि द्वारचि नाहीं. बहु देवतें भजोंनि काज कांहीं . ॥छ॥
जाली असतां प्रतिती हृदयीं, दिगंबरेंवीण अतःपर कायी ? ॥२॥
६१४
ग्राम निर्गमा येक चि द्वार. चुके तें; तयीं बहु मर मर रे !
श्रमु भ्रमतां भ्रमतां निरंतर. सेखीं गति ते न दिसे अतःपर. ॥१॥धृ॥
तैसी गुरूवीण सुटिका नाहीं. देव इतर भजोंनि काज कायी ? ॥छ॥
काळीं पवित्र षड्स मिळे अन्न; जेवणारासि न कळे वदन रे !
येरां करणातें चि स्वकरूंन अर्थु कवण वायां श्रमकरण ? ॥२॥
तैसें गुरुवीण येकें जालें. कये करिती देव मिळाले ?
योग तपस वायां गेले. दिगंबराची महिमा ते नकळे. ॥३॥
६१५
दुजा कवणु गणिजे दीनत्राता ? सूर्ये वांचूनि निसिमान हत्तीं ?
आदिगुरू अगुण गुण भर्त्ता, त्याचें महिन्न न वर्णवे आतां. ॥१॥धृ॥
ऐसा भजनीं भजिजे आदिगुरू. तेणें उतरिजे भव - पर - पारू. ॥छ॥
देवदेवाचे सामर्थ्य तें हीं गुरूप्रति जना ! न चले चि कांहीं.
सत्यावरि तपे असत्य काई ? ऐसा दिगंबरु धेला हृदयीं. ॥२॥
६१६
कृपेवाचूंनि शब्दे न तरिजे. पोथी पुस्तकें तें कर्म नुमजे रे !
अभिमानु तो कासया धरिजे ? शंका सांडुंनि श्रीगुरु भजिजे. ॥१॥धृ॥
जनां याहुंनि बोलणें नाहीं. गुरुवाचूंनि कवणीं भरी दोहीं ? ॥छ॥
चाड निबिड जीणें चतुर तें सांडी; जाणिव भज सद्गुरूतें.
युक्तीवादु न सरे जाण येथें. दिगंबराप्रति अवघें विसरतें. ॥२॥
६१७
खदिरारंण्य बदरीजोगें अरिसवजडें सहज प्रसंगें.
तेथें चंदनु कव्हणे योगें उगवला संगति - लागें ? ॥१॥धृ॥
परि तो न धरी परगूणातें. तैसें माणुस कैं पाहिन तें ? ॥छ॥
तया सीलेसी पडली गांठी. येतां - ही - अंगा तूटी;
पर गुणू न धरी पोटीं; जाळिला ही परि सेवटीं. ॥२॥
संगु हो कां भलयातैसा; परि न चळे जो विश्वासा.
दिगंबरीं अद्वय - रसा तो साधु; नव्हे तरिकैरा ? ॥३॥
६१८
दिव्य कर्पुरू कस्तुरि चोवा केतकी दळ चंपकु मुरवा रे !
चंदनाचा करूंनि मेळावा, किजेल सणाचा माझारि ठेवा. ॥१॥धृ॥
परि तो निघे परगूणाते; स्व - गूणें वेधी xरातें. ॥छ॥
ऐसें माणुस पुरेगा ! देवा ! जे न धरी गूणु परा - वा, स्वगूणें वेधी सर्वा. ॥२॥
क्रोधियाचें वदन पाहातां हरे साधूची साधुx.
दिगंबरा पुरे आतां संगु तयाचा सर्वथा. ॥३॥
६१९
सुगरणी केलीं अन्नें. षड्रसें भरलें भाणें.
वरि विटाळलें वमनें. सेवावें आतां कवणें ? ॥१॥धृ॥
तैसें क्रोधें जी ! देवराया ! जाणपण जातसे वाया.
करीं दंड, कुमंडलु, माळा; ललाटीं त्रिपुंड्रु टीळा;
सन्यासी योगी जाला; क्रोधवंतु वायां गेला. ॥२॥
वर्ण, वेषें न तरि - जो. नाट्य, नटु, नटी तद्वतु बुझे रे !
दिगंबरा ! कळलें; तुझें नित्य भजन गुणीक न पविजे. ॥३॥
६२०
क्रोधाचा हृदयीं सांटा; जपु करीतसे करंटा रे !
मन धावें बारा बारा वाटा. ऐसा जन्मु वो वोखटा ! ॥१॥धृ॥
कट्टा याहूंनि मरणें भलें देह जितचि वायां गेलें. ॥छ॥
कल्पनेचा वाहे पुरीं. सुषुप्ति हृदय भरी.
जपु ध्यान ऐसिया वरि. तें न सरे दीगंबरीं. ॥२॥