८०१
वैराटिका. धावा.
बंधीं पडे बाळक; स्मरे जनका प्राण वेचले; जाइल क्षण एका.
तयावांचूंनि करुणा नये आणिका.
तैसि गति बा ! जाहली मज एका. ॥१॥धृ॥
दत्ता धाव रे ! धाव रे ! धावणया मायबापा ! सांडीसी झणें माया.
तुजवांचूंनि न स्मरे योगिराया ! भवबंधनीं पडलों गुणक्रीया. ॥छ॥
केवि राहों ? कवणे दिशा पाहों ? पंथु न कळे केउता आतां जावों ?
श्रमु जाहाला; न शके प्राणु राहो. दिगंबरा आठवे पूर्वस्नेहो. ॥२॥
८०२
वन्ही लागला; तपती करचरण. ज्वाळा कोळ पोळलें माझें मन.
कई वोळसी ? होईल तापशमन ?
किती पाहासी निदान ? केवळ मरण ! ॥१॥धृ॥
येई, येई, रे ! सद्गुरूराया ! येई.
मुख पाहिन नावेक; नावेक निश्चळु राही.
मायबापा ! घेउंनि मातें जाईं. वेळों वेळां लागत आसे घाई. ॥छ॥
कई बोळसी अमृतजलधरा ? जनवत्सला ! स्वभक्तकरुणाकरा !
दीर्घ आळवी; पावई दिगंबरा ! मायबापु, स्वजन तुं सोयेरा ? ॥२॥
८०३
दोन्ही नयनजळधर जळ द्रवती. देह पडले; वणवां अंगें जळती.
तुझा वियोगसाहणें दुःख कीती ? मंत्रराजा ! सद्गुरो ! मंगळमूर्ति ! ॥१॥धृ॥
दत्ता ! येईं रे ! येईं रे ! जगजनका ! हृदयीं पेटली दीपकळिका.
कईं पाहिन नयेनीं तुज येका ? देह न धरीं तुजविण पळघटिका. ॥छ॥
धर्म राहिले, कुंटले पंचप्राण. भ्रमु आकळी; कवणाची वावो आण !
दोन्ही पाये मी करीन प्रणाम. दिगंबरा ! न करी कठीण मन. ॥२॥
८०४
बहु काळ जाहाले; भेटी नाहीं. तुझें वदन नाठवे देवा ! हृदईं.
ऐसें कां बा ! करितासि ? परति घेईं.
होसी कठीणु; तरि म्यां कीजे काई ? ॥१॥धृ॥
येई, येई रे ! कमळनयना ! कृष्ण ! शामा ! सूरारिकुलमथना !
अवधूता ! स्वभक्तजनजीवना ! दयामंदिरा ! वियोगतापशमना ! ॥छ॥
कर्मयोग साहिले; नेणो किती शमदमादि साधन पुडतोपुडती ?
दिगंबरा ! न येसी मातें व्यक्ती. दृष्टी पाहीन अव्यया ! तुझी मूर्ती. ॥२॥
८०५
योगिराया ! राजया ! वरदमूर्ती ! कृष्णशामा ! सुंदरा ! पूर्णकीर्ती !
ज्ञानसागरा ! श्रीगुरो ! स्वजनपती ! हेंचि नाम स्मरेन दिवाराती. ॥१॥धृ॥
येइं ! येईंरे ! आत्मया ! पूर्णकामा ! दत्त मूर्ती ! अगम्य तुझा महिमा !
काळानळसंग्रासना ! सुनिःकामा !
मायामुक्ता ! भेटसी कईं आह्मां ? ॥छ॥
सिद्धराजा ! राजिवाकृतनयना ! मायामुक्ता ! वीमळगुणस्थाना !
ऐसीं नामें स्मरैन तुझीं नाना ! दिगंबरा ! परब्रह्म ! निरंजना ! ॥२॥
८०६
तुझा वियोगु तपिया तपे भानु. सर्व शरीरीं पेट हुताशनु.
भोगु कवणु ? न वचे कैसा प्राणु ?
अवधूता ! कईं हरिसील सीणू. ॥१॥धृ॥
आत्मयां रे ! वेगीं येउंनि भेटि देयी. तुजवांचूनि दुसरें मज नाहीं.
आणिकाचा न साहे हातु देहीं. ताप तीन्ही येक जाहाले हृदयीं. ॥छ॥
तैसी अवस्था तुजवीण मज जाली. दिगंबरा ! माझा बापु तुं माउली. ॥२॥
८०७
वाट पाहातां सीणले माझे डोळे. रूपिं आसक्त मनस पांगूळलें.
अवधूतु देखैन कवणे काळें ? धिग्य ! सकळ शरीर वायां गेलें ! ॥१॥धृ॥
बाइ ! येवो पद्मनयनरूप डोळां. कैं देखैन श्रीदत्तु सावळा ?
माझा मनीं आठवे वेळोवेळां. आदिगुरु माये जीविचा जीवाळा. ॥छ॥
गुणीं गुंपलें नूपडे माझें मन. आर्ति बहु प्रीती वेधले चेतन.
देह वीकळ जाहाले धर्मक्षीण. दिगंबरेंसीं करा वो समाधान. ॥२॥
८०८
तपे तपिया त्रिपुरनयनु. तेथें थिल्लर आटतां नलगे क्षणु.
आश धरूनी धरूनीं मरे मीनु. तैसें संसारसंभ्रमें धनीकु जनु. ॥१॥धृ॥
पामरा ! रे ! कां वायां करिसी आयासु ? क्या माप लागले रात्रिदिवसू.
सलें होईल येके चि क्षणें कळसू. सोडी धनमदु मायामोहपाशू. ॥छ।
स्वप्नराज्य भोगूनि काज कायी ? चेईलियांवरि काहीं चि नाहीं.
हातु झाडूंनि उरसी गेलां देहीं. दिगंबरेंवीण पडसी संदेही. ॥२॥
८०९
गुणश्रवणीं वेधलें माझें मन रे ! तेंचि हृदयीं लागलें नित्यध्यान.
वृत्ति वळितां हीं न वळे तेथूंन. कयी कयी तुझें होईल दर्शन ? ॥१॥धृ॥
आत्मयां रे ! कां दुःख बळें दुणावीसी ? प्रीति लाउनीं वियोगेम हाणतासी ?
अग्नीवीण जीवा संतृप्त करिसी ? तुझी आसक्ति न सुठे या जीवासी. ॥छ॥
दोन्ही डोळुले नेघती रूप आन. देहा सोडूंनि जावया करिती प्राण.
हीतविहीत विसरलें माझें मन. दिगंबरा ! आतां कीजो समाधान. ॥२॥
८१०
अनुजाग्रजतनूजजनजाया सकळें सुखाचीं सोयेरीं योगिराया !
काजा न येति निर्वाण पावलयां. व्यर्थ तयांची धरूनि काये माया ? ॥१॥धृ॥
सखया ! रे ! तूं माझा स्वजनु सांगती. अवधूता ! आत्मया ! मंगळमूर्ती !
तुझें स्मरण करीन दीवाराती. भेटि देइजो आमुतें पुडतो पुडती. ॥छ॥
प्रतिजन्मी सुहृदें जालीं नाना. परि तूं तो तूं चि; दुसरा असेना.
भूलि पडली; न कळे यया मना. दिगंबरा ! पुरे हे भववेदना. ॥२॥
८११
चंद्र कवणें अमृतें नीववावा ? क्षीरें क्षीराब्धि संतृप्त करावा ?
सूर्यो कवणे दीपकें वोवाळावा ? अवधूत भक्ती प्रसन्न करावा ? ॥१॥धृ॥
सखिये ! वो ! चित्त गुंतलें त्याचा ठायीं येरे अर्थे प्रयोजनु मातें नाहीं.
केवि दर्शन लाहीन यये देहीं ! कवळीन रूप तें दोहीं बाहीं ? ॥छ॥
व्योम कवणें उपायें बोलवीजे ? निर्विकल्पस्वरूप हा सहजें.
दिगंबराप्रति दुसरें नुमजे. यातें सगूण म्यां कैसेनि पाहिजे ? ॥२॥
८१२
अतिप्रीती बोलता चूकि जाली वो ! येणें प्राणवल्लभें प्रीति सोडिला;
दृष्टि काढिली; कळा वेचिली. ॥१॥धृ॥
बायि ! वो ! प्राणु देईन; भेटि करा. दत्तु न ये हृदयसेजारा. ॥छ॥
आर्त भारी भेटीचें; प्राणु देईन वो ! दिगंबरु जीवासि माये जीवन;
माझें चिद्घन ब्रह्म निर्गुण. ॥२॥
८१३
भवकृष्णसपे माये ! दंशिली वो ! तेणें वीषें विषयभूलि जाली हो !
मति कुंठली; गति मोडली. ॥१॥धृ॥
बाइये ! वो ! दत्तु भेटला मंत्रवेधी. निजदर्शनें छेदील आधिव्याधि.
सर्वोपाधि, भेदुबुद्धी. ॥छ॥
काम वेगळ हरें न निवारती वो ! दिगंबरें वांचूंनि जाली दूचिती;
भ्रमें भूलती; मोहो पावती. ॥२॥
८१४
निडळीं हातु ठेउंनि पंथु पाहिन वो !
अवधूतु न ये; हे कवण कारण ? ॥१॥धृ॥
बाईये ! वो ! नित्य लागलें तें चि ध्यान.
केव्हां पाहीन मीं देवाचें वदन ? ॥छ॥
दिगंबरीं आसक्ति ध्येली मनसें वो ! त्याची भेटि होईल कवणें दिवसें ? ॥२॥
८१५
निज प्राण देईन बळी आपुला वो !
अवधूतु आत्मविषयो जाहाला. ॥१॥धृ॥
बाइये ! वो ! दत्तीं वांचूंनि आन नेणें.
चित्त हेरियेलें येणें कमळनयनें. ॥छ॥
अहंभावो सांडीन सखिये ! येथुनी वो !
दिगंबरा ! आडिचे गूण तीन्ही. ॥२॥
८१६
बहुत काळ क्रमले; भेटि न दिसे वो !
माझें आरत पुरैल कवणें दिवसें ? ॥१॥धृ॥
बाइये ! वो ! दृष्टि पाहीन शुद्ध श्यामा,
अवधूता, आत्मयां, पूर्णकामा. ॥छ॥
दिगंबरें वांचूंनि मन न धरे वो !
तेणें वांचूंनि नलगे मज दूसरें. ॥२॥
८१७
॥ चाली भिन्न ॥
नये गूणा, अनुमाना, प्रतिध्याना वो !
दतु नेणवे मना, मुनिजना वो ! ॥१॥धृ॥
न ये धर्म गुणकर्मा, रूपनामा वो !
दिगंबरु महात्मा, जगदात्मा वो ! ॥२॥
८१८
न ये स्थाना, अनुमाना, गुणभाना वो !
प्रीति लागली मना; धरवेना वो ! ॥१॥धृ॥
करणसिंधू, परमानंदु वो ! ॥छ॥
न ये रूपा, न ये जल्पा, गुणकल्पा वो !
दिगंबरु प्रलोपा, न ये कंपा वो ! ॥२॥
८१९
जन, जाया, गुण, काया, धन वायां वो !
अर्थ सकळ माया. मजों कां ह्या ? वो ! ॥१॥धृ॥
स्वरूपानंदीं न चळे बुद्धी वो ! ॥छ॥
जनभान दिसे स्वप्त्य; क्षणें क्षीण वो !
दिगंबर परिपूर्ण, निरंजन वो ! ॥२॥
८२०
अवधूता ! गुणयुक्ता ! जनवंता ! रे !
तूं चि स्वजनशता गुणभर्ता रे ! ॥१॥धृ॥
परमानंदा ! अत्रीवरदा रे ! ॥छ॥
गुरुराया ! मीतवीर्या ! चित्सूर्या ! रे !
दिगंबरा ! आत्मयां ! सुरप्रीया ! रे ! ॥२॥