मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १२२१ ते १२४०

दासोपंताची पदे - पद १२२१ ते १२४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१२२१
जायीन मी तया भूवना ! रे श्रीदत्ता ! श्रीदत्ता ! श्रीदत्ता !
तुझया निवास स्थाना !
अरे ! अरे ! कमळनयना आत्मयां ! आत्मयां !
अवधूता ! करीं करुणा ! ॥१॥धृ॥
पाहीन येकुदां नयनीं ! हें मन हें मन हें मन
विगुंतलें तव चरणीं. ॥छ॥
योगविद्वज्जनवल्लभा ! हे देवा ! हे देवा ! हे देवा !
जीवन्मुक्तां परमलाभा !
दिगंबरा ! भूवी दुर्लभ आनंद आनंद आनंद
पद पूर्ण; अलभ्यलाभा ! ॥२॥

१२२२
श्रमद सकळ साधन रे ! न करीं ! न करीं ! न करीं !
न करीं मीं येक वांचूंनि !
अवधूता तुझें चिंतन करीन ! करीन ! करीन !
तवनामामृतसेवन ! ॥१॥धृ॥
माझें जीविचें आरत पूरवीं ! पूरवीं ! पूरवीं !
सखया ! समस्ताविहित ! ॥छ॥
पाहिन चरण नयनी श्रीदत्ता ! श्रीदत्ता ! श्रीदत्ता ! धरीन हृदयभुवनीं !
चित्त गुंपलें सगूणी आत्मयां ! आत्मयां ! आत्मयां !
दिगंबरा तुमचा ध्यानीं ! ॥२॥

१२२३
सुदीनु जाहाला, सखिये ! सुंदरे ! सुंदरे सुंदरे ! श्रीदत्तु भेटला गोरिये !
आरत पूरलें बाइये ! श्रीदत्तें श्रीदत्तें श्रीदत्तें;
आतां नसे वगळी माये ! ॥१॥धृ॥
प्राणु वारीन साजणी ! सखिये ! सखिये ! सखिये !
योगिराया दत्तावरुनी ! ॥छ॥
हृदय आनंदें भरलें, बाइये ! वो बाइये ! वौ बाइये !
भिन्नत्व दत्तेंसीं मोडलें !
दिगंबरीं चित्त गुंतलें. पूडती पूडती पूडती
न परतें काहीं केलें  ! ॥२॥

१२२४
मनस वीकारी; बाइये ! श्रीदत्तीं श्रीदत्तीं श्रीदत्तीं
क्षणु येकु स्थीरु न राहे !
जन्मु वायां गेला वो ! सैये ! मानव्य मानव्य मानव्य
जाईं जणें. करणें काये ? ॥१॥धृ॥
अंतकाळीचा सोयेरा, श्रीदत्तें श्रीदत्तेंस श्रीदत्तें तेणेंसीं मज भेटि करा ! ॥छ॥
कामें व्याकुळ जाहाली ! सखिये ! सखिये ! सखिये !
तमसें वीकल पडली !
दिगंबरें वीण येकली साजणी ! साजणी ! साजणी !
कैसी राहो ? भ्रांति पडली ! ॥२॥

११२५
विषय विषम सरिता दुर्गमी दुर्गमी दुर्गमी
कामवेगें जातिसे, दत्ता !
केधवा पावसी ? अवधूता ! सखया ! सखया ! सखया ! सखया !
बहु मज होतिसे वेथा ! ॥१॥धृ॥
काये करूं मीं ? साजणी ! श्रीदत्तु श्रीदत्तु श्रीदत्तु
वेळु जाला न ये अझुणी ! ॥छ॥
कास मागों मी कवणा ? श्रीदत्ता ! श्रीदत्ता ! श्रीदत्ता !
न ये तुतें कैसी करुणा ?
सादु देयीं रे ! स्वजना ! ये देवा ! ये देवा ! ये देवा !
दिगंबरा ! कमळनयना ! ॥२॥

१२२६
पाये पाहावया आलियें ! श्रीदत्ता ! श्रीदत्ता ! श्रीदत्ता !
बहू मीं श्रमित जालियें !
कां तुवां दूर धेलियें ? आत्मयां ! आत्मयां ! आत्मयां !
कर्मा अधीन केलियें ? ॥१॥धृ॥
श्रमु सांगों मीं कवणा ? श्रीदत्तु श्रीदत्तु श्रीदत्तु
माझी न करीं वासना ! ॥छ॥
माझे अपराध गणितां, या मनें या मनें या मनें या मनें
गणीत नाहीं, बा अवधूता !
दिगंबरा ! करुणावंता ! आत्मयां ! आत्मयां ! आत्मयां !
उपसाहिजो समर्था ! ॥२॥

१२२७
॥ मल्हार. ॥ कांबोद. ॥
सुरप्रिया ! श्रीदत्ता ! अमरपती ! श्रीअवधूता !
योगनिधी ! परिपूर्ण ! सर्वज्ञा ! त्रीगुणमुक्ता ! ॥१॥धृ॥
सानंदचिद्घनानंता ! आत्रेया ! गुणवरदा ! ॥छ॥
अनुसूये नंदना ! दिगंबरा ! कृपेक्षणा !
कैं करिसी करुणा ? नीवारीं हे भववेदना ! ॥२॥

१२२८
तत्वदयामृतसारा ! योगेशा ! गुणसागरा !
ज्ञानप्रिया ! ईश्वरा ! मायातमसदिनकरा ! ॥१॥धृ॥
श्रीदत्ता ! योगदमूर्ती ! त्राहि गुरो ! परसंवित्ती ! ॥छ॥
तामस गुण संहारा ! ज्ञान जळाब्धि ! अपारा !
कैं येसी ? दिगंबरा ! निराकारसाकारा ! ॥२॥

१२२९
गुणमुक्ता ! सानंदा ! गुणनिधी ! अगाधा !
नित्य पदानंदतनु ! जय पूर्णाद्वयबोधा ! ॥१॥धृ॥
भवनदजनपोता ! त्राहि गुरो ! श्रीअवधूता ! ॥छ॥
योगप्रभाकरमूर्ती ! दिगंबरा ! स्वयंज्योती !
अगम्य तुझा महिमा ! करींपां भवनीवृत्ती ! ॥२॥

१२३०
चंचळ हें मन माये ! निश्चळ कैसें वो ! राहे ?
अवधूताचे माये हृदयीं धरूं न लाहें ! ॥१॥धृ॥
वीयोगु मज न साहे ! तुटे कवणें उपायें ? ॥छ॥
चंद्र तपे चांदणें; गायन जीवा न माने !
आंगी जळती चंदनें दिगंबरें वीण सुमनें ! ॥२॥

१२३१
नयनीं वाट पाहीन. कैं मीं तें रूप लाहीन
सावळें, अब्जनयन ? अखंड लागलें ध्यान ! ॥१॥धृ॥
आरत ये जीविचें; कैं मुख पाहिन दत्ताचें ? ॥छ॥
न दिसे येतां अझुणी; मनस गुंपलें सगूणीं.
प्राणाची मीं सांडणी करीन माये ! येथूंनि. ॥२॥
भेटि करा तेणेंसीं ! न साहे अर्थु मानसीं !
दिगंबरा ! कैं येसी ? तुजलागि जालियें पींसी. ! ॥३॥

१२३२
श्रोत्रांचें सुख नयनीं येउंनि भरलें साजणी !
तृप्ति जाली दर्शनीं; वासना न पवे धणी. ॥१॥धृ॥
सावळें रूप मीं पाहें. इतुला ही वियोगु न साहे ! ॥छ॥
देखणें मीं सांडीन; द्रष्टेपण नीरसीन;
आत्मा दिगंबरू मीं मातें दृश्य निरासें पाहीन ! ॥२॥

१२३३
करितां गुणश्रवण आसक्त जाहालें मन.
पाहीन कैं मीं चरण ? अवधूतु माझें जीवन. ॥१॥धृ॥
सुंदरू वो ! सावळा नेसला सोनेसळा;
भाळी तीळकु पीवळा; पाहीन दिगंबरु डोळां
अंतर माझें वेधलें; चैतन्य जडोनि गेलें;
दिगंबरीं मन गुंतलें; न सूटे काहीं केलें ! ॥२॥

१२३४
ब्रह्म केवळ साकार श्रीदत्ताचें शरीर;
व्यापिलें तेणें अंतर; मीपण गेलें नश्वर ! ॥१॥धृ॥
रूप अरूप जाहालें; अवधूत ब्रह्म सावळें. ॥छ॥
पाहातां पाहाणें पारुषे; द्रष्टत्व मारूंनि तें दीसे;
दृश्य चि अदृश्य विशेषें दिगंबर हें आभासें. ॥२॥

१२३५
लक्ष ठेवीन चरणीं; गोवीन मनस गूणी;
रूप देवाचें माये ! धरीन अंतःकरणीं. ॥१॥धृ॥
मनसा ! रे ! तुं स्थिर राहीं ! रूप दत्ताचें पाही ! ॥छ॥
देहाचें मज नाहीं वो ! प्राणाचें मज काहीं वो !
दिगंबरें वीण सखिये ! न धरीं मीं हृदयीं वो ! ॥२॥

१२३६
संत संगें धावतां, श्रमली वाट पाहातां !
श्रीदत्तु आत्मा सखिये ! नव्हे नयनी आपैता. ॥१॥धृ॥
आतां सांडीन पाहाणें; द्रष्टत्व तुज कारणें. ॥छ॥
मनसें नूरोनि राहीन; बुद्धि निरसोंनि पाहीन
आत्मा दिगंबरु सखिये ! जीवें जीउ आळंगीन. ॥२॥

१२३७
भैरव ॥ मल्हार ॥ देशी ॥
सकळ ही दृश्यभान नाशोंनि गेलें गे ! माये !
अवधूता दृष्टी पाहातां, अबोधु जाये !
तेणें गुणें द्रष्टत्व तें हीं हाले, गे ! सैये !
हा देखियेला. न सोडीं आतां जाण गोरिये ! ॥१॥धृ॥
सकळां सुदीनु आजि आला ! श्रीगुरुराॐ भेटीसि आला !
भेदु पैं गेला ! ॥छ॥
परतर भानहीन भासलें सुखद पूर्ण. तेथें भवभान तें ही तद्वत जाण.
देवदिगंबरीं निमग्न जालें हें मन;
या प्रपंची न धरे यत्नें ही परि माझे ज्ञान. ॥२॥

१२३८
भवनदगत जळ न वळे दुःखद पूर्ण;
वरि कामवातें भ्रमित न धरी यत्न.
अवधूतें वीण न पवे मीं पारु जाण.
या गुणपूरु, दुस्तरु माना येथें तरण. ॥१॥धृ॥
आत्मा दत्तु वो ! आजि आणा !
मीं विण तेणें न धरीं प्राणा ! जीउ न धरे जाणा ! ॥छ॥
रजतमकृत कर्म बाधी जलचरीसम.
मन पावे दुःख परम; न धरी शम. अतिशयें जालें मज सर्व विषम.
श्रीदिगंबर देॐ कैं मातें करील प्रेम ? ॥२॥

१२३९
भिन्न.
श्रमद विषय मतीहरणा ! हा रे ! भयहरणा !
तुझा पंथु न कळे यया मना ! आतां पाये दाखवीं पुण्यचरणा !
कृष्णवर्णा ! गुणसंगु हा साहावेना हे वेदना ! अरे ! देवा ! ॥१॥धृ॥
सांग, सखया ! कई येसी ? हा रे ! भेटी देसी ?
मीं दीन येकलें परदेशी ? कां देवा ! वियागें हाणितासी ?
दंडितासी ? दुःख देसी ? नयेसी; साहों मीं कैसी ? ॥छ॥
न कळे न घडे काहीं क्रिया, हा रे ! देवराया !
हा ही देहो गेला कीं कैसा वाया ? काये कैसें होईल जीवा या ?
योगिराया ! देवा ! दिगंबरा ! रे ! करीं दयारे ! छेदीं माया ! ॥२॥

१२४०
देशी.
न रमे श्रीदत्ता ! तुजवांचूंनि घडी; न रमे सखयावांचूंनि घडी.
आतां येइन मीं संगें, वरदा ! पाये न सोडीं. ॥१॥धृ॥
बहुभाग्यें गुरू मज जोडिलासि तुं सद्गुरू मज जोडिलासि तूं.
दत्ता ! पाहातां सोये श्रमली बहु; न कळे पंथु. ॥छ॥
जननी, जनकु, गुरू, तूं माझा सखा; जनकु, गुरू, तूं माझा सखा;
देवा ! दिगंबरा ! तुंवांचुनि मीं नेणें आणिका ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP