८६१
वियोगदुःखदावानळें मन पालटलें माये !
कयी कयी भेटि होइल ? वियोगु न साहे.
सावळें रूप आठवतां जळ नयनीं वाहे. ॥१॥धृ॥
अवो ! अवो ! मज बाइये ! चंदन न साहे.
नव्हे तापु तेणें शमनू; देह जळत आहे. ॥छ॥
चंद्र तो ही तपे तपिया खरतरु निदानी.
प्रतिक्षणीं मज आठवे, रूप बैसलें मनीं.
दिगंबरु कयी येईल ? पाहीन नयनी. ॥२॥
८६२
आनंदमयू अगूणगूणी ज्ञानयोगवासरमणी. ॥१॥धृ॥
तो आजि पाहुणा साजणी ! अवधूतु बोलैल आंगणी. ॥छ॥
दिगंबरु आत्मा स्वसूखदानी आजि देखैन सुदीनी. ॥२॥
८६३
नये अभिव्यक्ती अवधूतु गुणी. शब्द राहिले नीर्वाणी. ॥१॥धृ॥
तो भजों कैसा मी श्रवणी ? केवि पाहों स्वरूप नयनी ? ॥छ॥
दिगंबरु ध्यानी ध्यातां निर्वाणीं मन माझें वेचलें मीळणी. ॥२॥
८६४
गुणाचे निधान अवधूतु माये ! अनुभवें लक्षा न ये. ॥१॥धृ॥
तो आजि सावळा सुंदरु देखइन विज्ञानसागरू. ॥छ॥
दिगंबरें येणें मनस वेधीलें; भेदु नेणें, ऐसें जालें ! ॥२॥
८६५
जपध्यानमुद्रा न कळे वो ! ध्यान.
येणें हरिलें माझें मन. ॥१॥धृ॥
तेणेंसि राहिन येकली. अवधूतें भिन्नता मोडिली. ॥छ॥
दिगंबरु आत्मा स्ववृत्ती पाहे. पाहणयां मुळीं वो ! सखिये ! ॥२॥
८६६
जाणिवेची स्फूर्ति हरिली वो ! येणें अवधूतें निजगुणें. ॥१॥धृ॥
तो मज नयनीं दाखवा; भिन्नपण मारूंनी भेटवा. ॥छ॥
दिगंबरु माये ! निजरूपदानी तेणें मज गोविलें सगुणी. ॥२॥
८६७
तुंडी.
सजळ ही जळस्थळ हें निर्जळ चातका क्षितितळ वो !
जिवनेंविण बहु श्रमला; मनसें भ्रमतुसे अंत्राळी वो !
विण माधवें न करीं आशा; शोषिताहे तळमळ वो !
तयाची करुणा न धरे; धरितां वर्षे जळधरु जळ वो ! ॥१॥धृ॥
तैसी परि मज हो कां ? बाइये ! आळविन अवधुता वो !
करुणावचनीं सादु घालीं; कयीं देखईन येता ? वो ! ॥छ॥
धेनु वनीं तृण चारू चरतां, बव्ह बाळक घरीं वो !
क्षुधित जाहालें; न कळे पंथु; वोळली अमृत धारीं वो !
जाणोंनि अवसरु सुरभि धावे; वोळली अमृत धारीं वो !
दिगंबराचा पंथु पाहे मि वो ! बांधलियें संसारीं वो ! ॥२॥
८६८
वाटुली पाहातां कुठली गति; मज येकलें न सवे वो !
मुळापासुनि नेणसी काये मा ? मातें तुझी च सवे वो !
सांडूंनि गेलिसि विजनीं स्तनपा; धेली तळमळ जिवें वो !
कवणीकडे वास पाहों ? तुझा पंथु नेणवे वो ! ॥१॥धृ॥
अम्मा, अहं मम सादु घाली; श्रमा श्रमु चि निदान वो !
येतियां जातियां पुसों नेणें; बाळ मीं अज्ञान वो ! ॥छ॥
नाना योनिचे लागती पालव; ऐसें कां मज केलें ? वो !
कामु तपिया तपे खरतरु; शरीर बाळोंनि गेलें वो !
वनचरें बहु मानसें खेदिति; भय बहु उपजलें वो !
दिगंबरे ! तुवां जित चि सांडिलें; कवण कर्म फळलें ? वो ! ॥२॥
८६९
जळे सुटलिया अरे ! मीना ! वायां तळमळितासि रे !
पूर्वकर्म भोगा आलें; बोलु हा कवणासी ? रे !
अवधुतें मज सांडिलें आहे; प्रेत्नु काये ययासि ? रे !
क्षितितळीं जळो निडळ हाणों; न धरे धीरु जिवासि रे ! ॥१॥धृ॥
सिमिसिमीसिमि अममममा स्पंदती अधरोष्ट्र रे !
स्मरण करितां दिवा रात्रौ कोळ जालें शरीर रे ! ॥छ॥
तृण चारु काये चरसी ? हरिणा ! पावकें परिस्तृता रे !
अकाळीं मेघु कैंची सरिता ? वायां गेलासि वृथा रे !
दिगंबरें मज तैसें केलें; न साहे संसारवेथा रे !
वाट पाहें; परति न करी; काये करणें आतां ? रे ! ॥२॥
८७०
माझा विषयो न पुरे स्मरणें, न पुरे ब्रह्मज्ञानें रे !
ध्यानयोगें कारण नाहीं; काये करूं साधनें ? रे !
मोक्षु तो ही न धरी मनस; तपसु थोरु न मने रे !
अवधुता ! तुझी भेटी दुर्लभ; असइन सन्निधानें रे ! ॥१॥धृ॥
कृष्णवर्णा ! कमळनयना ! सांग येसील कयी ? रे !
निडळीं बाहे पथु पाहें; मातें घेउंनि जाये रे ! ॥छ॥
स्वजनजनधनवनिताभ्रमु घालिसी काये ? रे !
बहुत काळ तें चि जाहालें; आतां दाखवीं पाये रे !
हितविहित नेणें काहीं; वियोगू न साहे रे !
दिगंबरा ! तुझें स्मरण करितां हृदय फूटत आहे रे ! ॥२॥
८७१
वसंतु
श्रमला वीषयवृत्ती न पवे विरक्ती.
अर्थू सोषीं पूडती; दुःखा न दिसे मिति.
ऐसिया प्रतीती खेदु न धरीं चित्तीं. ॥१॥धृ॥
आपणा नेणोंनि भ्रमसी गव्हारा ! सांडी आत्मवीसरा. ॥छ॥
स्वजन जाहाले कित्ती शरीराभिव्यक्ती ? पुढें हीं तेचि गती.
आपुलें कवण आथी ? पडसी कां भ्रांती ? दिगंबरीं पावें रती. ॥२॥
८७२
सकळ स्वहित माझें येणें योगिराजें.
ऐसें मनसा मानिजे. आणिक न स्मरे दुजें.
अवृत्ती भजे. प्रेमें नीवसी सहजें. ॥१॥धृ॥
कामना करूंनि भ्रमिजत आहे; सत्य वीचारूंनि पाहे. ॥छ॥
आत्मा हृदयगतु, देहीं अवधूतू, द्वैतभावरहितू, केवळ गुणातीतु,
जाण, पां ! सिद्धांतू दिगंबरु अनंतू. ॥२॥
८७३
येकुदां येइंन भेटी. बोल, कां वो ! गोष्टी ?
कर्मे जाहालीं हिंपुटी, प्रतिक्षणीं बैसें उठीं.
सुख नाहीं पोटीं. जीत चि पडली तूटी. ॥१॥धृ॥
पंथू पाहीन, येसील कयी ? दुःख न धरवे ये हृदयीं. ॥छ॥
स्वरूप आठवे पोटीं. मन घालीं मीठी.
वियोगें वेदना उठी. कवण करील भेटी ?
माये ! उठाउठीं दिगंबरे आश वोखटी. ॥२॥
८७४
पडलें मनस भ्रांती; न ये रूपव्यक्ती;
बुडाली भेदमती; आटली अहंकृति;
माझी संवित्ती. कैसी हे तुझी रीति ? ॥१॥धृ॥
जाणिजे कैसें ? रे ! कमळनयना ! गुणवंतु न येसि गुणा. ॥छ॥
देहादि न दिसे भान निरालंबस्थान.
मीतुंपणा ग्रसन. सेवटीं कळली खुण.
कळलें नवीण ::- दिगंबरा तुं चिद्घन. ॥२॥
८७५
कवण जाणे हे माया ! मोहितासि काह्या ?
आत्मा तुं दत्तात्रेया. पाहिजे तें दृश्य वायां.
गुणभेदक्रीया अवस्था अव्यया. ॥१॥धृ॥
आपणा जाणोंनि लागला चि आहे.
येर भजन न साहे. ॥छ॥
अवस्थे अवस्था क्षीण. तदंग कें भान ?
तुरीयातीत, निर्गुण, स्वरूप सनातन,
आत्मचैतन्य दिगंबरा ! तूं कारण. ॥२॥
८७६
चाली भिन्न.
तपसें तापसु अत्री प्रतप्तु जाहालारे !
संतापें तो वन्ही क्षोभल्ला रे !
मूर्धा भेदुंनि प्रकटती ज्वालमाला; तो चि गगनभीतु भरल्ला रे !
संहारकु ऐसा जाणोंनियां वेगें
गुणातीतु गुणीं मिसलल्ला रे ! ॥१॥धृ॥
अरे ! दत्त प्रकटल्ला चिदानंदशिवंकरू. जनदयामृतसारें पूर्ण हा.
प्रळयवन्हिकुळां प्रशमीत ज्वाळा
काळाग्निशमनु अवतरल्ला रे ! ॥छ॥
स्वजनसहितु मग तो क्रिडता जाहाला रे ! उदधिमाजि प्रवेशल्ला रे !
भक्तचित्त निश्चळ कैसें ? पाहे. सदृढांप्रति व्यक्त भासल्ला रे !
मायाकृत रूप दाउंनियां दृष्टी स्वजनु दिगंबरें तारिल्ला रे ! ॥२॥
८७७
हृदयकमळीं व्यक्तु श्रीदत्तु देखिल्ला रे ! गुणकृत भेदू कोपल्ला रे !
शब्दातीतु चंचळचितग्रासी प्रळयोदधि जैसा भरल्ला रे !
आदि, मध्यु तया अवसान नाथी; मायाभ्रमु जेणें नीवटिल्ला रे ! ॥१॥धृ॥
दत्तु प्रकटल्ला रे ! सत्यानंतु, सुखात्मकु, अनुमानेंविण ज्ञानें वेधु हा.
निर्वाण योगधीर बुझती समग्र; येर नेणती खर नर पामरा ! ॥छ॥
प्रकटु अन्वयें गुणी सगटु शोभल्ला रे ! पृथग सन्मय भानें स्फुरल्ला रे !
सर्वातीतु, सर्वसहितु, चिदात्मा, भेदस्पंदु तेणें हरल्ला रे !
नित्यमुक्त युक्त जग दीसे; दृष्टी दिगंबरू अवघेचि जाहाल्ला रे ! ॥२॥
८७८
मल्हार.
सुंदरु आणि सावळा भाळीं टीळकु पीवळा;
पांघुरला सोनेसळा; कंठीं माळा सुमनाची. ॥१॥धृ॥
ऐसा कैं येसी ? सांग, पां ! कमळनयना ! बापा ! ॥छ॥
किरीटकुंडलांची झळाळ, लोपे दिनकराचें मंडळ.
बोलतां शब्द मृद मंजुळ दंशनी कीळ फांकती. ॥२॥
स्वभक्तजनीं प्रपुजीला; पुडती तेहीं चि परिवारला
परब्रह्म गुणपतळा; अतिकृपाळ ! दिगंबरा ! ॥३॥
८७९
वरहस्ता ! वरदमूर्ति ! मंत्रवीर्या ! पुण्यकीर्ती
नमन तुतें पुडतो पुडतीं; वरि वीनती करीतुसें. ॥१॥धृ॥
कैं येसी ? कैं येसी ? सिणलों गर्भवासीं दत्ता ! ॥छ॥
स्वभक्तजनचिंतामणी ! देवेशा ! देवशिरोमणी !
दिगंबरा ! अमृतवाणी मज निर्वाणी बोलपां ! ॥२॥
८८०
पितांबरु रूळे मागां; न संवरीतु आंगें आंगा.
गणसमुदाॐ सोडूंनी अवघा पुढें चि वेगां धांवतुं. ॥१॥धृ॥
ऐसा कै मीं पाहिन येतां मज लागून ?
हृदयीं आळंगीन ? प्राणु. वोवाळीन ? माझें योगधन, श्रीदत्तु निधान,
पाया लागइन, येतां मज लागूंन. ॥छ॥
नाभिवचनीं गर्जतु उचलूंनि दक्षिण हस्तु.
ह्मणे, मीं आलों रे ! समर्थु श्रीअवधूतु दिगंबरु. ॥२॥