मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद ८१ ते १००

दासोपंताची पदे - पद ८१ ते १००

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


८१
क्षितितळ सकळवीकळ जाली भ्रमतां
श्रीदत्तासारिखें रूप न दिसे वो ! पाहतां. ॥१॥धृ॥
गुंपलें मन नुगवे वो ! सखिये !
सकळ - शरिर - सोये पारूषली. ॥छ॥
श्रवणीं देखिलें, तैसें न ये दृष्टी भजतां.
दिगंबरीं अवृत्ति - प्रबोधु आइता. ॥२॥

८२
जनकुजननी, जन्मबीज तूं सकळां.
तरि कां लाविसी चाळा ? गुणकर्मविकळा ! ॥१॥धृ॥
काळ बहु मज भेटोनि जाहाले.
राहिलों तुझेनि बोलें दातारा ! ॥छ॥
योगु न करीं; नेणें साधन भूमिका.
दिगंबरा ! तुजवीण न भजे मीं आणीका. ॥२॥

८३
हृदय भूवन तुझी वसतीची भूमिका.
कैसेनि सद्गुरुराया देइजे तें आणीका ? ॥१॥धृ॥
न स्मरे तुजवांचूनि दुसरें.
प्रीति अभ्यंतरें दातारा ! ॥छ॥
दिगंबरा ! तुझां गुणीं गुणबुद्धि हरली.
स्मरणें गति जाली सुरवरां ! ॥२॥

८४
हृदयकमळमळरहित निवळलें.
देह ना देखणा तेथें सहजचि पाहालें. ॥१॥धृ॥
श्रीदत्तें दीनु सुदीनु सखिये !
निवळ मज मीं पाहें स्थीरावला. ॥छ॥
न चळे चंचळ मन चळ वृत्ती सुटलें.
चळण मिळुनि दिगंबरीं स्थीति राहिलें. ॥२॥

८५
स्वजनवीजननिरंजनजनका !
मज मीं पाहिन मनें; न भजवे आणिका. ॥१॥धृ॥
लागलें ध्यान मीं माजि सखये !
बोलतां बोलणें माये ! पारूषलें. ॥छ॥
करणचेतन चित्तचैतन्य सखिये !
दिगंबरगुणी गुणां बोधु न नये. ॥२॥

८६
असतां वो ! संसारीं हृदयकोशपुरीं
मी माझां मंदिरीं चोरटें आलें. ॥१॥धृ॥
माझें नेलें वो ! सुपाणीं माये ! मन - मोतीं चोरुनीं;
चिद्रत्नें आंगणीं विखुरलीं माये ! ॥छ॥
समाधीची पेटी माये ! मोडली खूण गांठी.
नदिसे मार्गु; कष्टी मी; काये करूं ? ॥२॥
मी माजी परवृती; वो ! चोरटें स्ववृत्ती.
दिगंबरें अवृत्तीतें धरियेलें. ॥३॥

८७
विषयरसक्षीण माये ! मन माझें चेतन
स्वारामी रमण करीत होतें. ॥१॥धृ॥
मज जाला वो ! संचारु; पडला अंधकारू;
गुणाचा व्यापारु प्रकटला माये ! ॥छ॥
जनजाया गुणभासू नेणों काये हा त्रिदोषु; कामाचा आवेशु; मीं काये करूं ? ॥२॥धृ॥
गुणियां योगेश्वरु माये ! बोलावा सद्गुरू; भ्रमु हा दिगंबरू उतरील माये ! ॥३॥

८८
जनधनयौवनजाया भूलि जाली आत्मयां; वरि पडलां विषयां; उतारु करा. ॥१॥
गगनाचें वो ! फळ माये ! दिसताहे रसाळ; पाणीं मृगजळ साचार ऐसे. ॥२॥
तुह्मी जा जा वो ! त्या स्थाना माये ’
अवधूतभुवना; सर्वज्ञु तो आणा गुणिया माये ! ॥छ॥
नुतरे वो ! स्वमती; कां करा आधावती ?
दिगंबरेंविण भ्रांति न निरसे माये ! ॥२॥

८९
देखिलें वो ! नयनीं; रूप भरलें माझां मनीं;
जिवें जिवामीळणीं येकत्व जालें. ॥१॥धृ॥
मीं न सोडीं वो ! तया; रातली अव्यया;
लौकीकु आणि क्रीया सांडीन गे ! माये ! ॥छ॥
रूपलें रूपीं मन; माये ! वेधलें चैतन्य; परवृत्तीचें दैन्य मी विसरली. ॥२॥
गुणाची जे हनी ते साहिन निदानी; दिगंबरमीळणीं विसरैन रूप. ॥३॥

९०
वियोगताप - वर्णु माये खरतरु तपे भानू; देहीं हूताशनु प्रकटु जाला ! ॥१॥धृ॥
मज न साहे चंदन; अवो ! चंद्रामृतपान; सुरसही गायन तें विष जालें ! ॥छ॥
जिवने बोळे तान; काये तेथें घृतपान ? क्षुधा अन्नेवीण तैसीचि माये ! ॥२॥
हरिलें तेवी मन; या दिगंबरें बोधन; विण तेणें हे प्राण वेचती माये ! ॥३॥

९१
भक्तजनप्रीयपंकजनयनु देखिला लोचनीं; माझा वेधला मनु.
देह गेह न स्मरे; देहिचा गुणू आत्मा अवधूतु प्राणामाजिचा प्राणु. ॥१॥धृ॥
जाइंन गे माये तया भुवना; पाहिन नयनीं मीं जळजनयना;
सावळें डोळस रूप आवडे मना; प्राणु वोवाळिन; माझी हेचि वासना. ॥छ॥
गेली न परतें; नये तेथूंनियां; क्षणु न विसंवें दत्ता ! योगिराया !
रूपलें मानस देहीं; न चळे क्रिया; दिगंबरु आत्मा मी भेटैन तया. ॥२॥

९२
गुणीं मन गुंपलें नुगवे माये; अनुगतचैतन्युभेदु न साहे.
श्रीदत्तीं मानस माझें मिसळत आहे; आतां मीं न राहें; त्याचे पाहिन पाये. ॥१॥धृ॥
रातलीये मीं वो ! तये सगुणीं; न धरीं लौकीकु गुण; गुंपले गुणी.
सुखरूप सखिये ! ययाची मीळणी; आनंदु न समाये तो त्रीभुवनीं. ॥छ॥
मननी मननें मति पांगुळली; भेदाची वासना माझी पारूषली.
तन्मय जाहालें गुणीं; भूली पडली; दिगंबरें आनंदपद पावली. ॥२॥छ॥

९३
योगिजनवल्लभ रूप सावळें पाहतां नयनीं येथें मन मावळे.
बुद्धि पारुषली; निजें नीज नीवले; डोळांचें देखणें तें वो ! जालें वेगळें. ॥१॥धृ॥
पाहिन गे ! माये तया सगुणा; वेधलें हें मन देहीं; न धरी गुणा.
गुंपली वो ! माझी मन - वासना; कैसी मी विसरों यया आनंदघना ? ॥छ॥
डोळांचें देखणें माझें हारपलें; दत्ताचा स्वरूपीं चित्त बुडोनि गेलें.
दिगंबर भेटीं भेटणें न कळे; मींतूंपण ग्रासूंनि रूप नीवळे. ॥२॥

९४
वाट पाहतां बहु सीणलियें वृथा स्पंदसी कां तूं बाहुलिये ?
माये माझी दत्तु नये, नये; आतां प्राणु येथूनि न रखें माये ! ॥१॥धृ॥
वेचलियें मातें धरा, धरा; येकवेळा जायिन तया माहेरा;
पाहिन नयनीं सर्वज्ञु सोयेरा; कवळीन बाहीं लीला - विश्वंभरा. ॥छ॥
डोळुले स्पंदती; खुणा जाणीतली; जीवाची जननीं दत्तु वोळखिली.
धावोनि गळ्या मीं वो !! झोंबीनली. दिगंबरें माझी आर्ति संपूर्ण केली. ॥२॥

९५
मृगजळ तें; जळ नव्हे; हरिणा ! वायां दृढविसी मनवासना.
जाग्रुती भोगिजे ऐसा नव्हे सीवणा; तैसा हा संसारभ्रमु जाईजणा. ॥१॥धृ॥
हर ! हर ! वेचलें, वय वेचलें ! सदनें स्वजनें धनें जन भूललें !
अहीत सोषितां हित अंतरलें ! पासींचि निधान; अंधा जेवि न कळे ! ॥छ॥
अथेंचि अनर्थु ऐसें जाणोनिया, सांडितो विभ्रमु जना जनत्व माया.
शरण रीघयीं येका दत्तात्रया. दिगंबरें वो ! नाशु तापत्रया. ॥२॥

९६
जन्म वेचले; कोटि काळ क्रमले पाठीं; भेटी भेटणें योगियां.
भक्तकरुणाकरा ! श्रीगुरो ! मोहेरा ! केवि पाहों मीं आत्मयां ? ॥१॥धृ॥
अरे ! तुझें नामस्मरण भेषज, तापत्रयहरण मोक्षबीज. ॥छ॥
जळो हें विषयसुख ! तुजवीण सर्व दुःख ! मूर्ख भजती तैसिया.
दिगंबरा ! तुझे नाम नित्य - स्मरण, प्रेमसाध्य, परम, प्राणियां. ॥२॥

९७
काम - क्रोधु हे जनी कृष्ण भुजंग दोन्ही गुणीं बांधती आत्मयां.
विष वीषयरसु विषमु त्रीगुणदोषु स्वासु तत्कर्म अक्रिया. ॥१॥धृ॥
अरे ! तूज वांचूंनि विष नूतरे; कामकल्पना - वेगु कैसेनि मरे ? ॥छ॥
सदन स्वजन जाया ऊर्मी लागती ईया; नित्य बाधिती आश्रया.
दिगंबरा ! तूजवीण मनीं न स्मरे आन; ध्यान लागलें अव्यया. ॥२॥

९८
विकळ चंचळ मन; कैसें करूं मीं ध्यान ज्ञान साधन; बाइये !
न कळे ययाची खूण; माडलें निर्वाण; प्राण प्रयाण; गोरिये ! ॥१॥धृ॥
अर ! पावे, पावे कमलनयना ! तुझा संदु लागलाय या मना. ॥छ॥
नदिसे वो ! येतां दृष्टी; प्राणु धरिला कंठीं; मन विकळ; गोरिये !
दिगंबरू वो ! आणा; दुःख न साहे; मना मान कठीण; सखिये ! ॥२॥

९९
जातां अविद्या - पुरे कामवेगाचें वारें धारे लोटी वो बाई - ये ये !
नेत्र भ्रमती दोन्ही; तृष्णा न तूटे; पाणी; गूणी गुंपली; गोरिये ! ॥१॥धृ॥
अरे ! देयी कास, सद्गुरो ! माहेरा ! परपारू पाववी, ज्ञानसारगा ! ॥छ॥
कर्म त्रिविद्ध भारी; भ्रमे आवर्तापरी; मारी अहि - तें प्राणियां.
दिगंबरा ! तूजवीण कास न धरी आन, प्राणु ही परी गेलियां. ॥२॥

१००
आप पारिखे जन हीतविषयीं वन भान सकळ, गोरिये !
सद्गुरू वांचूंनि कोणी आप्त न दिसे वनी गूणीं गुणघ्न, बाई - ये ! ॥१॥धृ॥
देवा ! तुजवीण निरास मानसीं; करितां विचींतन कपीं पावसी ? ॥छ॥
कर्मवासनावृक्षीं पाशबद्ध मीं पक्षी लक्षी गगन वीरळ.
दिगंबरा ! तुसी आश; तुजवीण सर्व वोस; क्लेशद अर्थ सकळ. ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP