मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे|
पद १४२१ ते १४४०

दासोपंताची पदे - पद १४२१ ते १४४०

दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
ॐ श्रीमदादिगुरवे सर्वज्ञाय स्वपक्षपालाय नमः ॥


१४२१
दोन्ही डोलुले सजल जलधर जाणवले.
मायेबापें सखिये ! हृदय वोळखीलें.
दिधलें वो ! आलिंगन; जीवें जीवा येकपण
भेटी भेटणें न दीसे स्वरूप स्थिर पूर्ण ॥छ॥
भेदु सारूंनी, सखिये ! श्रीदत्तु भेटी आला.
दिगंबरें भवश्रमु माझा वो ! दूरि केला. ॥२॥

१४२२
रूप स्मरतां अंतरीं, बाहिजु पारुषला;
जाले सजळ नयन; अधर स्पंदु आला.
न सवरे माझें मन; नामघोषें गर्जयीन.
येथ काइसा लौकीकु ? बाइये ! मीं नाचयीन ! ॥छ॥
गुणीं गुंपलें मनस, परति न धरी वो !
दिगंबरीं तन्मयता आनंदु अंतरीं वो ! ॥२॥

१४२३
गुणबुद्धीचें देखणें केवल पारुषलें.
अवधूताचें भेटणें मीपण मालवलें !
कैसें चित्त सांवरू ? वो ! लयगत न करू ? वो !
ज्ञानसागरीं वीरतां, वृत्तीसि वीसरू ? वो ! ॥छ॥
भान मोडलें सकल; स्वरूप नीवळलें;
दिगंबर परब्रह्म तें चि तें सर्व जालें. ॥२॥

१४२४
॥ चालि भिन्न. ॥
सकल सुवर्णगत अवधूतु, माये !
मत्रंसार नित्य जपताहें, बाईये ! तें वो !
बाईये ! तें वो ! न वीसरवे ! अद्वैतभावें, अवो ! बाईये ! तें वो ! ॥छ॥
दिगंबर हृदयस्थ चैतन्य माये ! अनुभवें प्रतिभासताहे.
गुणमुक्त, युक्त, व्यक्त, अव्यक्त, सैये !
गुणदृष्टी गुप्त बोलों काये ? बाईये ! ॥२॥

१४२५
सकळसंदेहमुक्त मन हें जालें,
अवधूतगुणीं मीसळले, बाइये ! तें वो !
बाईये ! तें वो ! परति न लाहे; गुणीं वेचताहे, अवो ! बाइये ! तें वो ! ॥छ॥
सखिये ! हृदय माझें सुखमय जालें. अवधूतीं मीपण विरालें.
दिगंबरीं अवृत्ती तन्मय जाली; त्रिविधें पारुषली; बाइये ! ॥२॥

१४२६
श्यामसुंदर सखिये ! कमळनयन, तेणें रूपें हरिलें हें मन,
बाइये ! तें वो !
बाइये ! तें वो ! कैसेनि लाहे ? तलमलिताहें; वियोगु न साहे;
वासना होये; अवो ! बाइये ! तें वो ! ॥छ॥
जिविचें जिवन माझें, मद्गत धन, परब्रह्म दत्त सगुण.
दिगंबर गुणहीन तत्वचिद्धन; तेणें माझें अंतःकरण बाइये ! तेंवो ! ॥२॥

१४२७
वियोगें याचेनि मज बहु क्लेश जाले.
दुःखें हृदय आंदोळलें, बाइये ! तें वो !
बाइये ! तें वो ! कैं सूख पावें ? योगस्वभावें, अवो ! बाइये ! वो ! ॥छ॥
बाह्य व्यापारीं मज संतोषु नाहीं. दत्तु देखैन आत्मा देहीं.
दिगंबर गुणभेदभाववीहीनू. दाखवा वो ! मीं मज हृदयीं बाइये ! तें वो ! ॥२॥

१४२८
॥ धानाश्री ॥
योगवर्मीं आसक्त होतें मन वो ! आत्मा ब्रह्म अखंड समाधान वो !
द्वैतशून्य सर्वत्र निरंजन वो ! सखियें येणें तें हरिलें चेतन वो !
माझें ज्ञान वो ! स्वस्फुरण वो !
अरे ! अरे ! कमळनयना ! रे ! रूप तुझें हरिताहे अंतःकरणा रे !
आठवसीं हृदयीं क्षणक्षणा रे ! तेणें योगाची सांडिली कल्पना रे ! ॥छ॥
आत्मज्ञानें न परतें माझें चित्त वो ! स्तब्ध झालें सगूणी आसक्त वो !
प्रेम स्पंदे, नयनी अश्रुपात वो ! दिगंबरानुस्मरणें गर्जत वो ! ॥२॥

१४२९
निर्विकल्पीं समाधिभंगु जाला वो ! गुणाध्यासें तो बोधु माझा हाला वो !
अवधूतु हा येथें कोठें आला ? वो !
याचा रूपीं रूपली चित्कला वो !
अरे ! अरे ! मनसमोहना ! योगिराजा ! कालाग्निशमना रे ! ॥छ॥
दृश्यत्यागें दर्शन स्वस्थ करीं वो ! तवं हा द्रष्टा मीपणा अंतरीं वो !
आत्मारामु; येणेंसीं काइसी चोरी ? वो ! दिगंबरू नवलमायाधारीं वो ! ॥२॥

१४३०
ब्रह्मस्थिती निश्चळलें माझें चित्त. वो ! तेणें रूप अवलंब केलें व्यक्त वो !
अतद्वादें नव्हे तें निरस्त वो !
आश्रयीता ब्रह्म चि सर्वगत वो !
अवो ! अवो ! बाइये ! सत्य जाण वो !
रूप याचें अरूप गुणहीन वो !
दत्तु रूप सावलें; भला नव्हसी करितासि मनोहरणा ! रे !
कृष्णश्यामा ! कमलनयना ! रे ! x ५
सनातन वो ! आलंगीन मी जीवाचें जीवन वो ! ॥छ॥
निर्विकल्प समाधिपरि तो सारा वो ! सविकल्पु ही वीषयो न करा वो !
स्वर्गादिक तें काइसा मातेरा ? वो ! मन माझें न सोडी दिगंबरा वो !
साकारा वो ! अक्षरा वो ! ॥२॥

१४३१
माझें ज्ञान ध्यान तूं अवधता ! रे ! जपु मुद्रा श्रीगुरो ! समर्था ! रे !
योगु नेणें. नव्हे मीं योगवेत्ता रे ! चित्त कोठें न रमे तुजकरितां रे !
नामघोषें मीं गर्जैन सर्वथा रे !
अरे ! अरे ! तूं देवशिरोमणी रे ! संचरलासी अवधूता ! माझा मनीं रे !
तेणें दुजीं न स्मरे करणी रे ! सांडिन जिऊ तुजवरि वोवाळूंनी रे ! ॥छ॥
जीवाहूंनी तूं प्रीयु होसी मना रे ! देवदेवा ! कालाग्निशमना ! रे !
दत्तमूर्ती ! कमळनयना ! रे ! दिगंबरा ! प्रमादमोहहरणा ! रे ! ॥२॥

१४३२
जिऊ माझा जीवें वोवालीन वो ! अवधूतू मीं हृदयीं धरीन वो !
पंचप्राणीं मीं आरती करीन वो ! योगिराजू सर्वस्व योगधन वो !
कैसें करूं ? वेधलें मन माझें वो ! चित्त येणें हरिलें योगिराजें वो !
आनें अर्थें तें सहसा नूमजें वो ! यया भेदु सांडूंनि आलंगीजे वो ! ॥छ॥
लवण जैसें तें न उरे सागरीं वो ! घटाकाश प्रवेशे पूर्णांबरीं वो !
प्रीति भारी मीं तेवि दिगंबरीं वो ! सामावैन ये विज्ञानसागरीं वो ! ॥२॥

१४३३
दृश्य, द्रष्टा, दर्शन, ऐसीं तीन्हीं रे ! न सरती देवाचा भजनीं रे !
गुणागुण न साहे त्यांचा गुणीं रे !
आत्मा दत्तु सेविसी कैसा ध्यानीं रे ? ॥१॥धृ॥
अरे ! अरे ! मनसा ! स्थीरू राहीं रे !
गुणें संगु सांडूंनि रूप पाहीं रे !
अवस्थांचा बोधु तो येथें कायी ? रे !
आश्रयातें जाणोंनि लीन होईं रे ! ॥छ॥
स्फूर्ति करितां, वीसरू दुणावे रे ! विसरें घेपे ऐसें तें तत्व नव्हे रे !
आंगें आंग चिन्मात्र जें अवघें रे ! दिगंबर आत्मत्वें अनुभवे रे ! ॥२॥

१४३४
॥ मारू धानाश्री ॥
दुःखदुरितसमळभवहरणा ! तापत्रयानळज्वाळशमना !
अविद्यागुणवनतृणदहना ! कृष्णश्यामा ! कमळनयना ! ॥१॥धृ॥
तुं चि तूं होउंनि असावें; माजि अंतर तें न साहावे.
देवरायें ऐसें करावें, मीं नुरऊंनि अवघें स्फुरावें. ॥छ॥
परमानंदबोधसुदीना ! गुणवर्जितसंपूर्णभाना !
योगिराया ! योगनिधाना ! दिगंबरा ! काळाग्निशमनां ! ॥२॥

१४३५
मायातमसहरण दिनकरा ! ज्ञानविज्ञानगुणजळधरा !
परमाद्वयसबोधचंद्रा ! स्वस्वरूपदानीं उदारा ! रे ! ॥१॥धृ॥
देवा ! तूंवीण आणिक नेणें. तुं चि ज्ञेय; तूं जाणणें,
ज्ञातें तूं सर्वत्र जाणें; दत्ता ! स्फुरतासि येणें मीपणें. ॥छ॥
सिद्धराजा ! राजीवनयना ! दुःखदुस्तरसंसारदमना !
तुझा योगु न कळे मुनीजना, दिगंबरा ! गुणनिधाना ! ॥२॥

१४३६
मंत्रवीर्या ! केवळ मंत्रमूर्ती ! तुझें स्मरण पावन त्रीजगती.
देवराया ! अमितगुणकीर्ति ! आदिगुरो ! श्रीस्वयंज्योती ! रे ! ॥१॥धृ॥
देवा ! तूं सर्व माझें ध्यान, जपु, तपसु, अनुष्ठान.
नेणें मंत्र, मीं नेणें विधान, सिद्धमूर्ती ! तुजवांचूंनि रे ! देवा ! ॥छ॥
मंत्रमया ! मंत्रसारा ! मंत्रहेतु ! मंत्रविस्तारा !
मंत्रफल तूं श्रीदिगंबरा ! तुजविण जपु न करीं दुसरा रे ! ॥२॥

१४३७
जपमाळा मीं न दह्रीं स्मरणी; मन ठेवीन अवधूत - चरणीं.
ध्यान, धारण, साधन, करणी, काहीं न मनें माझा मनीं,
दत्तु आत्मा हें जाणोंनी. ॥१॥धृ॥
गे ! बाइये ! येणेंसीं मीं दुसरें नेणें, मीपण तें हीं निरसलें जेणें.
ज्ञानें याचेनि मना ! नुरणें, निर्विकल्पनिराकारपणें. ॥छ॥
योग, मुद्रा, आअन, बंधू, नेणें मीं शास्त्रविवादू.
दिगंबरेंसीं न दिसे भेदु. आत्मा वो ! संपूर्ण बोधु. ॥२॥

१४३८
तुं बा ! जननी जनकु योगिराया ! अवधूता ! सांडिली कैसी माया ?
मजपाठीं लाविली माझी क्रीया. गुणीं गुंपलों ! नेणें उपाया ! ॥१॥धृ॥
रे ! देवा ! कां मज धरितासि दूरी ? आत्मा तूं बाह्यांतरीं.
माझें अज्ञान मज हें वैरी. तुतें पाविजे कैसियापरी ? ॥छ॥
बहु जन्म वेचले वायां वीण; मातें न घडे चि तुझें चिंतन.
कृपासागरा ! मीं तुझें दीन ! दिगंबरा ! देयीं संनिधान रे ! ॥२॥

१४३९
धिग्य, धिग्य माझें ज्यालें ! देवरायेंसीं अंतर पडलें.
नरदेह वायां गेलें, भोगीतां विषयसोहोले. ॥१॥धृ॥
गे ! बाइये ! शंकोंनि सरली माघारी; अवधूतेंसीं घडली चोरी.
मुख दाखऊं कवणिये परी ? माझें अज्ञान मज हें वैरी. ॥छ॥
मीं कवण ? आलियें कां वो ! येथें ? येथ धर्मु कवणु आहे मातें ?
केलें काये ? तें सांगों कवणाते ? दिगंबरभ्रमु जाला चित्ते. ॥२॥

१४४०
गुणवर्जित गुणा आणीलें, मज मीं ऐसें स्वतंत्र केलें.
कर्म लाउनि कां भ्रमवीलें ?
तुझी माव हे कव्हणा न कळे. ॥१॥धृ॥
रे ! देवा ! कवणें तुज सीकवावें ? तुज योग्य हें करणें नव्हे.
दीन आह्मी काये करावे ? करिसील, तें पडलें साहावें. ॥छ॥
आह्मां अज्ञानें कां आछादिसी ? विपरीत बोधें चेववीसी ?
उपराठें कां दंडितासी ? दिगंबरा ! करणी ऐसी कैसी ? ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP