१३६१
तुज नित्येशा आठउं, मन चि स्थीर नाहीं !
विसरों मीं कैसी ? देवा ! तुझा वेधु देहीं !
आतां कैसें बा ! करावें ? नुमजे मज काहीं !
अवधूता ! मायेबापा ! घेउंनि मज जाइं. ॥१॥धृ॥
येइं रे ! ये रे ! ये रे ! दत्ता ! योगिराया !
मज दुस्तरा न तरवे तुझी शक्ति माया ! ॥छ॥
जाणों तरि, तुं गुणातीतु; गुणीक ज्ञान माझें.
नेणों तरि, तुं चि आत्मा; चिन्मय रूप तुझें !
जपों तरि त्या मातृका केवळ मंत्रबीजें.
दिगंबरा ! तुं निर्मळु. न साहे तूज दुजें ! ॥२॥
१३६२
आलविन; सादु देइं, येइं रे ! दत्तराया !
मन माझें उतावीळ; लागइन पायां !
पापा तापनिवर्तक, निरसैल माया !
आत्मयां ! निजरूपा ! दूरावीसि वायां ! ॥१॥धृ॥
आत्मयां ! रामा ! येइं रे ! येइं रे ! देवदेवा !
वियोगतापु भारी; न साहावे जीवा ! ॥छ॥
जन्मोजन्मीचा सोयेरा देवा ! तूं चि देहीं;
तुजवीण आठवावें आणीक सांग, काई ?
दिगंबरा ! दिनपती ! हृदयीं स्थीरु राहीं.
आठवाची खूण मोडी; त्यावरि भेटि देइं ! ॥२॥
१३६३
गुणश्रवण करितां, हें मन पारूषलें !
अवधूता ! तुझां रूपीं चेतन पांगुललें !
भान मानसगोचर; नेणवे, काये जालें ?
दृश्य दर्शन द्रष्टत्व मी माजि वितुळलें ! ॥१॥धृ॥
अद्वयानंतानंदा ! सद्गुरु ! देवराया !
तुझें नाम तारक केवल, ज्ञानसूर्या !
अवधूता ! कृपानिधी ! अमितगुणवीर्या !
तुज येकें वीण सर्व दुःखमूळ, वायां. ॥छ॥
तुज करितां नमन, हें मन मालवलें !
ज्ञेय, ज्ञान, ज्ञातेपण वितुळोनि गेलें !
शुन्य अशुन्य निरसूनी स्वरूप पूर्ण जालें !
दिगंबरा ! तुझें प्रेम ऐसें गुणासि आलें ! ॥२॥
१३६४
पाहों जायें तों, नयनी रूप चि भासताहे.
आइकावें तें श्रवणी शब्दें विण काये ?
मनें ध्यावें तें मानस कलित होये.
अवधूताचें रूप कैसें जाणों ? माये ! ॥१॥धृ॥
आत्मयां ! दत्ता ! पाहों तुझी मीं कोण दीशा ?
तूं बुद्धीचें कारण; गोचरु होसि कैसा ? ॥छ॥
बोलों शाब्दीक बोलणें, तें मज आकळेना !
शास्त्रांचा विरुद्ध भावीं भाॐ चि उमजेना !
आधि आपण जाणोंनि करिन तत्वज्ञाना !
दिगंबरें सांगितलें तें आतां पालटेना ! ॥२॥
१३६५
अवस्थांचा पाहें मुळीं, तेथें मीं चि आहें.
भानअवस्थागोचर तो प्रपंचु माये !
ययावेगळें पाहिजेसें स्थान चि कोण आहे ?
‘ देवा ! देवा ! ’ ह्मणती जन; तो देॐ कोण ? काये ? ॥१॥धृ॥
राहीं रे ! राहीं ! नावेकु ! स्थीरु राहीं !
आप जाणोंनि, तद्दृष्टी देवासि मग पाहीं ! ॥छ॥
गुणदृष्टीचें जाणणें भ्रमु तो स्वप्न वायां !
गुणनिरासें निरसे प्रपंचु, भेद, माया.
अधिष्ठान तें चि सत्य, नातळे जेथ क्रीया.
भेदु नाहीं दिगंबरा ! दत्ता ! योगिराया !
१३६६
चंचळ मन माझें, स्थीर नव्हे; मीं आतां काये करूं ?
दत्तासारिखें रूप जाइल हृदयीचें; काये करूं ?
कवण कर्म माझें केवळ विपरीत ? काये करूं ?
साधनें विण मज संतोषु जाणवे; काये करूं ? ॥१॥धृ॥
दैव कवण ? मन विवेकहिन भ्रमे; काये करूं ?
त्यागु नुपजे मनी; आसक्ति बहु गुणी; काये करूं ? ॥छ॥
देह वेचलें; वय जातसे सरसरां ! काये करूं ?
संगु पडला देहीं; नाशकु अवघा ही; काये करूं ?
दिगंबरेसि नित्य अंतर पडताहे; काये करूं ?
दुःख विचारितां हृदय फूटताहे; काये करूं ? ॥२॥
१३६७
कामें व्याकुळ माझें मानस परते ना ! काये करूं ?
सर्व शरीरसूख दत्तेंवांचूंनी मीं काये करूं ?
देह जाइल क्षणभंगुर; मग माये ! काये करूं ?
धिग्य शरीर माझें ! प्राण निरर्थक ! काये करूं ? ॥१॥धृ॥
भेटी नव्हे श्रीगुरुचरणी; आतां काये करूं ?
प्राण विकळ; मन करिताहे तळमळ; काये करूं ? ॥छ॥
शब्द लागती; माझें हृदय शरीर कडतरे; काये करूं ?
दत्तेंवांचुंनि येरू अर्थु विनश्वरु; काये करूं ?
दिगंबरें वो ! येणें हरिलें मानस; काये करूं ?
येरें योगें मज काज न दिसे; मीं काये करूं ? ॥२॥
१३६८
तुझी वाट पाहे डोलुले भरि; आतां कयीं येसीं ? ॥
माये, बापु, देॐ तुं तरि; आत्मयां ! कयीं येसीं ! ॥
चित्त भ्रमित जालें तुजवांचूंनि; बापा कइं येसी ? ॥
सत्य सांग, देवा ! आजि चि पासूंनि कइं येसी ? ॥१॥धृ॥
भव विजन वन गेलासि सांडूंन; कइं येसी ?
दुःख भारि मज होताहे; श्रीदत्ता ! कइं येसी ? ॥छ॥
आशा धरिली मनें; कैसें होइल ? नेणें; कइं येसी ?
काम, क्रोध वरि पडताति दूर्जन; कइं येसी ?
देह जाहाले क्षीण; पावले अवसान कइं येसी ?
दिगंबरा ! तुझें करिताहें चिंतन; कइं येसी ? ॥२॥
१३६९
कमळनयनरूप आठवे मनी; मज खंति वाटे.
माहेर माझें तें वो ! दुरि पडलें; भारी खंति वाटे.
दत्ताचे गुण श्रवणी पडतां, मज खंति वाटे !
काळ गेले बहु; परति नदिसे; आतां खंति वाटे. ॥१॥धृ॥
दत्ता ! तुझी मज भारि सलगी; मनी खंति वाटे.
किती आठउं गुण ? लागलें मज ध्यान; खंति वाटे. ॥छ॥
पाये धरिन; मीं वो ! येइन; तुझी माये ! खंति वाटे.
बाधक परजन; वियोगु न साहे मन; खंति वाटे.
दिगंबरे ! तूं माउली मज; तुझी खंति वाटे.
येर विषयविष सेवितां, मज तुझी खंति वाटे. ॥२॥
१३७०
दत्तेवांचुंनि काळ चळले चंचळ चळ जन्म नाना.
वीष विषयसुख नेणणें मीं सकळैके भोग नाना.
ताप त्रिविध; मोटी लागली चटपटी भ्रमु नाना
नित्य करिन नामस्मरण; नेणें आन योग नाना. ॥१॥धृ॥
पाये पाहिन तुझे पार्षदपति ! पद्मलोचना ! रे !
तुंचि सहज सारस्वरूप नीरजनयना ! रे ! ॥छ॥
लोचना ! रे ! ॥छ॥
कर्मज क्षय क्षीण क्षणीक क्षरे, क्षणु जाणवेना.
धिग्य शरीर माझे जाइल कइं ? मज जाणवेना.
दत्ताचे पाये माये ! पाहिन कइं ? ऐसें जाणवेना.
दिगंबरेंसीं घडे संगति, तरि दुःख जाणवेना. ॥२॥
१३७१
चंचळ चळ मन निर्फळ करी अनुस्पंद नाना.
विष विषयरस सेउंनि भजे मति भेद नाना.
ज्ञान विकळ करि साधन तळमळ योग नाना.
गुरूवांचुंनि कष्ट वाउगी खटपट सांडी, मना ! ॥१॥धृ॥
नामस्मरण करि सांडुंनि भरोवरि क्षणक्षणा.
जन्ममरण दुरी होइल जीवपण क्षणक्षणा. ॥छ॥
शास्त्रश्रवण वादवर्धन, परि रूप चोजवेना.
दिगंबरेंवीण तत्वविषयीं ज्ञान चोजवेना. ॥२॥
१३७२
चंचळ चळ वय, जातिसें भवपुरें देवराया !
सकळ स्वजन जन विण तुज निर्जन देवराया !
गुणी गुंपले, क्षीण करणें गुणगण, देवराया !
पाव ! स्वजनु बंधु बाधकु भवसिंधु देवराया ! ॥१॥धृ॥
श्याम सगुण रूप सुंदर अरे ! तुझें देवराया !
चातकु मीं; कइ वोळसी जळधरू ? देवराया !
दिगंबरा ! तुझें बाळक मीं; पाव देवराया ! ॥२॥
१३७३
आदिरूप, शिव, नित्य, निरंजन ब्रह्म जो ! जो !
आनंदवर्धन सर्वासि कारणस्थान जो जो !
सन्मय शुद्ध सदोदित चिद्धनसार जो ! जो !
तो निजपालणा परि यें हे अनसूया जो ! जो ! जो ! जो ! ॥१॥धृ॥
जो ! जो ! जो ! जो ! जो ! जो ! जो ! निर्गुणब्रह्म जो ! जो !
तो तुं रे ! अवधूता ! निज, निज, जो ! जो ! जो ! जो ! ॥छ॥
नित्य, निर्मळ, कार्यकारणविरहिततत्त्व जो ! जो !
अत्रिवरदरूप जेथूंनि चिद्रूप तें चि जो ! जो !
योगी श्रमती, जेथें मानस न धरवे, आश्रयो, जो ! जो !
तो चि दिगंबरु अनसूयाकुमरु नीजवी जो ! ॥२॥
१३७४
सेरखदिरसर्पसंगति घडलीसे चंदना ! रे !
पासीं लसनराशि; कें गुणें उरसी ? चंदना ! रे !
हृदय कठिण करीं; परगुण न धरीं चंदना ! रे !
गुणा भुलसी तरि, पडसील बोहेरि चंदना ! रे ! ॥१॥धृ॥
अरे ! रे ! रे ! रे ! रे ! रे ! परिस तुं सज्जना ! रे !
खळसंगु असतां साधुत्व काय उरे ? सज्जना ! रे ! ॥छ॥
शिला, पानीय, वरि घसणी पडतीसे चदना ! रे !
करवत, कुठार, तुज चि लागि पैल चंदना ! रे !
घालुंनि दहनावरि पाहों पाहाती थोरी चंदना ! रे !
दिगंबरावांचूंन न धरीं आन साधु चंदना ! रे !
१३७५
मुखारी.
आतां होतें पाहातां नाहीं; भक्तपण तें जालें काई ?
दे गां ! देवा ! माझें मज; ठेविन हृदयीं. ॥१॥धृ॥
संतु ऐसा कैसा ? ऐसा कैसा ? परवित्तीं तुतें आशा.
हृदय भेदिलें तुवां, ठकिलें मनसा. ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- भलें ! तुझें आलें, माझें गेलें !
पालटु जाहाला आतां पुडती न बोले. ॥२॥
१३७६
देवपणीं प्रेम नाहीं, गोड नलगे तें ये देहीं.
माझें मज दे भक्तपण; चाळविसी कायी ? ॥१॥धृ॥
संगु न साहावे, न साहावे; न दिसे जीवासी बरवें.
अवधूता ! तूं समर्थु; कवणे बोलावें ? ॥छ॥
दिगंबरू बोले वचन ::- आधीं दे तें देवपण;
पाहातां दोघांचें गेलें सांडि प्रलपण. ॥२॥
१३७७
आतां होतें; काये पां जालें ? भान हें कवणें नेलें ?
कैसें करूं देवार्चन ? देखणें मोडलें ! ॥१॥धृ॥
शब्द न ये वदतां, न ये वदतां; नूमजे भेदु या चित्ता !
विहित लोपलें; मज लागली अवस्था. ॥छ॥
दिगंबरु ह्मणे :: - राहे ! जें जेथें तेथें चि आहे.
पाहातां गाहालें; आतां विसरोनी पाहे. ॥२॥
१३७८
नित्य करितां देवार्चन, तेथें होतें कर्तेपण;
नेणवे, जाहालें कायी ? न दिसे मीपण. ॥१॥धृ॥
धिग्य अरे दैवा ! अरे ! दैवा ! न चले देवाची सेवा;
उघडूंनि काये करूं ? झाकिन तें मावा. ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- कायी वेचलें तें माझां ठायीं ?
झणें आतां प्रलपसी, उगला ची राहीं. ॥२॥
१३७९
नित्य करितां संकीर्तन, येथें होतें दुजेपण;
हृदयीं प्रेमासि मूळ हारपलें धन. ॥१॥धृ॥
धिग्य, अरे ! मनसा ! अरे ! मनसा ! भक्तिभाॐ आला कळसा;
क्षयो लागला जीवासीं दिवसें दिवसा ! ॥छ॥
दिगंबरु ह्मणे ::- राहीं; कैसें होतें तुझां ठायीं ?
वायां वीण बोलतासी; उमजोंनि पाहीं ! ॥२॥
१३८०
सत्य बोलतां शंका नाहीं, अह्मीं पूर्वीं होतों काई ?
भेदिलें कवणें ? पुढें पडले संदेहीं. ॥१॥धृ॥
सांग सत्य, देवा ! सत्य, देवा ! वचन न बोले मावा;
अपराधी करूंनि ऐसा मग तो दंडावा. ॥छ॥
तापत्रय भोगी वेथा, तुजवीण कवणु आतां ?
दिगंबरा ! चूकि जाली; न वदें सर्वथा. ॥२॥