१०८१
निशि ना दिवसु ऐसें अनुदित पाहालें;
रवि ना चंद्र; तेथें देखणें हारपलें. ॥१॥धृ॥
स्वप्न कीं मज जागृति न कळे. बोलतां बोलणें बोलें पारुषलें. ॥छ॥
सुषुप्तीचें सुख वीण सुषुप्ती भरलें.
तिहिचें जाणें दिगंबरें माझें हरिलें. ॥२॥
१०८२
अवनी, गगन, वायो, अनळ ना जीवन,
प्रपंच न दिसे, दृश्य, अदृश्य गगन. ॥१॥धृ॥
देहाची खुण न दिसे, वो ! सखिये ! उमजु उमजा नये. काये करू ? ॥छ॥
पाहातें पाहातां तेथें हारपलें पाहाणें.
दिगंबरीं अनुसरु जाणतें चि नेणणें ॥२॥
१०८३
डोळां न दिसे; परि देखणें अवघे.
पाहातां पाहाणें माये ते ही मज आडवें. ॥१॥धृ॥
सारा मीपण आंगीं न धरवे.
ययाचेनि अनुभवें गादलिये ॥छ॥
अभावें भासलें भावभावें मीं न धरीं.
दिगंबरी अनुसरु गुण वृत्ति न करीं. ॥२॥
१०८४
स्थूळ शरीर माझें हारपलें गगनीं.
गगन कवण मातें दाखवा कां नयनीं ? ॥१॥धृ॥
रूपें अरूप रूपस पाहातां
न ये, वीसरतां, घेतां, धरितां, मज. ॥छ॥
असेषा पारु माहीं. अगुण ना सगुण.
दिगंबरु प्रकटला ! नुरवी तें गगन !
१०८५
पाहें तें न दिसे. ऐसें काये नेणें. जाहालें ?
पाहाणें येउंनि मातें आंगेंसीं जडलें. ॥१॥धृ॥
सारा वो ! माये ! माझें पाहाणें ! पाहातां पाहातेपणें गादलिये ॥छ॥
त्रिपुटी न साहे. गुणी गदळली गमितां;
दिगंबरु प्रकटला तदभावसविता. ॥२॥
१०८६
आपणु चि दीपु दृष्टी आपणयां पाहाणें;
पाहातां पाहातां गुणें सूटलियें. ॥१॥धृ॥
यावरि जालें तें कैसेनि बोलवे ? जीवे मरों ! दैवें वाचलियें ! ॥छ॥
सुखाची जाणीव जाणे जाणपणें क्षरली.
दिगंबरीं उपरति सहज चि उरली. ॥२॥
१०८७
अभाव अपर दळीं जनमति क्रिडतां
ठक चि ठेलियें. येथें चंद्र ना सविता. ॥१॥धृ॥
पाहें तें दृश्य मीं माजि अघवें, पाहातें पाहाणें जीवें साडियेलें. ॥छ॥
काळु न गणवे माझी विपरीत कळना !
दिगंबरु दिसे, तइं अनुसरु मरणा ! ॥२॥
१०८८
अभावलेपणें रूप रूपलें. वो ! सखिये !
झाडितां न झडे माये ! काये करू ? ॥१॥धृ॥
आतांचे मज भान चि पढिये, डोळे भरूंनि माये ! पाहातिसें. ॥छ॥
विघरलें घृत तें चि कणिकासीं निखळ.
दिगंबर गुणहित गुणमय सकळ ॥२॥
१०८९
छायेचे कवण मान ? पाहेपां वो ! सखिये !
धरूंनि आपुली सोये अनुचरतां. ॥१॥धृ॥
येउंनि खांदी बैसली; पाहातां नयनु जाली; परति ने घेते. ॥छ॥
प्रतिबिंब बिंबित अनुगत जाहालें. दिगंबरीं दुजेपण अवघें पारुषलें. ॥२॥
१०९०
मुखीं दर्पण प्रतिबिंब जाहालें.
मुखीं मुख उमटलें, पाहातां न ये. ॥१॥धृ॥
मीं माझें जाणें; जाणपण न मनें;
मनस मारूंनि मने भोगितिसे. ॥छ॥
मतीचा गंगळु मातें न घाला वो श्रवणीं.
दिगंबरें न साहावे अवघी चि करणी. ॥२॥
१०९१
प्रतिबिंबी रविबिंब गुणगुप्त जाहालें.
पाहातां डोळस मेले; गवसे चि ना ! ॥१॥धृ॥
पाहिजे जवं, तवं तवं न कळे;
डोळस डोळसा डोळे चळती गुणी ! ॥छ॥
दिगंबर गुणवेधें सांपडलें श्रवणी
श्रवण गीळूंनि मनी स्थीरावलें. ॥२॥
१०९२
श्रवणी देखिलें रूप नयनी न धरवे;
नयन पावला खूण श्रवणी नाइकवे. ॥१॥धृ॥
ऐसें माये ! येक नवल चि जाहालें;
बोलणें बोलतां बोलें बगललिये. ॥छ॥
अवस्थे चूकवी आ गुणमती पाहातां
दिगंबर अवृत्ती सुखमय भजतां. ॥२॥
१०९३
सकल ऋषिपुत्र श्रीदत्तासमवेत बैसोनियां एकस्थानीं
योगें, भक्तिज्ञानें श्रीदतीं रंगलें; वदते जाले प्रीतिवचनी;
आनंदें डुल्लती; प्रेमें पुंजालले; योगामृते जाली धणी.
येक सर्वांहूंनि रूपी चि आसक्त; नित्य निष्ठा मूर्तिध्यानी. ॥१॥धृ॥
रे ! बापा ! सुखमय ! विश्व जालें, रे ! सप्त सागर सुखे भरले !
परमानंदा ! तुझें रूप सुखमय दृष्टी असतां देखिलें. ॥छ॥
येक ह्मणती ::- ‘ बापा ! तुझेनि वचनें स्तब्ध जाले करणगण;
गुणाचे व्यापार सर्व ही राहिले; निश्चळ जाहाले मन;
अवर्थेची प्राप्ती कधी चि न कळे; निमालें वृत्तिस्फुरण;
तुझा ठायीं आह्मीं कैसे मीसललों ? जीवनीं जैसे जीवन. ’ ॥२॥
येक ह्मणती :- ‘ आह्मीं आमुतें जाणतां मी मी ऐसें मात्र स्फुरण;
पुडती निर्धारितां आइके, योगिराया ! तूं सत्ता, चैतन्य !
आह्मी यंत्र, तूं बा ! यंत्री ! अवधुता ! विचेष्टों तुजअधीन !
अवयवा सारिखे वर्तो तुझा आंगीं ! न करूं स्वहितध्यान ! ’ ॥३॥
येक ह्मणती :- ‘ देवा ! आह्मीं प्रतिबिंबीं बिंबलों तुझेनि अंशे;
सगुण निर्गुण स्वरूप तुझे चि सकल; आह्मां दुसरी गति नसे;
भजतां गुणी गुण निर्गुणें वेगलीक काहीं नसे;
ऐसिया निष्टा सेवितां तुतें मां निवालों तव भक्तिरसें रे ! ’ ॥४॥
येक ह्मणती :- ‘ आह्मां रूप चि आवडे. करूं प्रत्यक्षत्वें ध्यान.
प्राणांहूंनि प्रीय, जीवासि आवडे सावळें कमळनयन.
मन लांचावलें; विवेकु न धरी; नेणों बा ! आह्मीं कवण ?
तूजवेगलें मनस कोठें चि न घलूं; तूं चि विश्रांतीचें स्थान, रे ! ॥५॥
अधिकाराचें बल लाहोंनि सकळ अनुवादले प्रीतियोगें.
मस्तकीं निजकरू ठेउंनि दिगंबरु मानीतसे समान अवघें.
प्रीतियोगें गुणें अधिकारें संप्राप्ति नव्हे. येकु येकामागें.
तथापि श्रीदत्ता ! सगूणु भक्ताप्रियु नित्य वर्ते दक्षसंगे. ॥६॥
१०९४
नाना शास्त्रकार करिती स्वमतें योग्यते अनुसार वादू.
येकांतें स्वयुक्ति; सूत्रार्थें चि येक; प्रमाण येकांसि वेदू.
बहिर्मुख जन सिद्धांत गमिती; नाहीं सत्यतत्वबोधू.
तयाचें बोलणें आहाच वाणें तेणें न गुंपती परम साधू रे ! ॥१॥धृ॥
बापा शब्दज्ञानी निष्ठा नाहीं रे ! वृथा श्रमकर होय देही !
सिद्ध आत्म तत्व नेणोनि प्राणिये कैसे पडले संदेही ? रे ! ॥छ॥
येम ह्मणती :- ‘ आह्मां प्रत्यक्ष प्रमाण. परशब्दीं विश्वासु नाहीं.
अनुमानाचें वाक्य न मनूं, सर्वथा उपमा न कवणाचें काई.
दिसे तें चि असे. विनाशें विनाशे. पुडती होणें नसे कहीं.
निमाला तरंगु पुडती न उमजे. कारण तें ठायिचें ठाईं रे ! ’ ॥२॥
येक ह्मणती;- ‘ शून्यीं आभासु भासला; अभावीं शून्य संचलें;
संयोगी आत्मत्व; वियोगीं शून्यता; मींपण शून्याकार जालें !
पुडतोपुडती कवणा जन्मु ? कें मरणें ? शून्यत्वा शून्यचि आलें !
शून्याप्रति कर्म हें मृषा सोसणी; केलें तें वाया चि गेलें ! ॥३॥
येक ह्मणती;- ‘ शून्य शून्य तें सर्वदा. तयातें आभास कायी ?
यालागि पंचक भूतांचें. साकार जीउ या वेगळा देही.
जैसें कर्म करी, तैसें फळ पावे; नीयंता कव्हणी चि नाहीं.
स्वर्गु तो चि मोक्षु; येरु तो संसारु; कर्मीं नांदे दोही ठायीं रे ! ॥४॥
येक ह्मणती;- ‘ विश्वकर्ता सर्वेश्वरु; जीउ तो नित्य संसारी;
अनादिसिद्ध दोघे ! तैसा चि प्रपंचु; भेदू चि सत्य सर्वत्रीं.
व्यवहारू येथ प्रमाण. थोरलें सत्य विश्व सर्वांपरी !
महाप्रळयीं ही परमाणुत्वें सर्व वर्ते ये नित्य अंबरीं ! ॥५॥
येक ह्मणती;- ‘ मायोपाधि सर्वेश्वरु; अविद्योपाधि जीवात्मा;
उपाविद्वयाचां मिथ्यात्वीं केवळ, कैंचा ईशु ? कैंचा आत्मा ?
गुणव्यतिरेकें पाहातां अधिष्ठान वेगळें तें रूपा नामा.
ग्णधर्म, कर्म, शरीर, ना भेद तीन्ही तया परब्रह्मा. ’ ॥६॥
येक ह्मणती;- सत्येंवांचूंनि सर्वथा भान असतासि नाहीं;
तरि जें सत्य ब्रह्म तें चि जीवेश्वरीं सत्य वर्ते दोहीं ठायीं
प्रकृतिद्वय हें विवर्त्तु जाणतां, अधिष्ठानीं भिन्न काइ ?
सत्ताभेदें सर्व ब्रह्म निरंजन; भेदु नये कोठें काहीं. ॥७॥
ऐसा करितां वादु जन्म चि लोटले. पुढें नाहीं संख्या जाण !
सद्गुरूचा संगु जयांसि घडला ते पावले यथार्थ ज्ञान.
तयाचेनि मतें शास्त्राचे अनुवाद येकदेशी खंडज्ञान.
दिगंबरकृपा जयां घडे, ते बा करिती त्यातें समाधान. ॥८॥
१०९५
प्रत्यक्षावांचूंनि जया नाथी ज्ञान, तेहीं बोलावें तें कायी ?
अभिमानें स्वयुक्ती देहो चि आत्मा, हें उचीत तयांचा ठायीं !
देहाचा अभावीं उरलें तें न कळे, प्रतीति जयासि नाहीं.
तेहीं शून्यवादू न जल्पावा. कैसा स्वमत्ताभिमानु देहीं ? ॥१॥धृ॥
रे बापा ! योग्यते अनुसार ज्ञान. काइसे तयां दूषण ?
अज्ञानांचां देहीं अभिमानु वोखटा; भ्रमांसि हो कारण रे ! ॥छ॥
वेदवादी, रत, कर्मट, ब्राह्मण क्रियाफळें आइकोनि,
कर्म चि जीवाचें कारण मानिती. पाहिजे ते तयालागूंनी.
प्रत्यक्षें, अनुमानें, शब्द उपामानें, व्यवहारीं पूर्ण ज्ञानी.
अनादिसिद्ध ते भेदु संपादिती. अभिमानाची ऐसी करणी ! ॥२॥
अधिष्ठान ज्ञानें पाहातां औपाधिक तयासि ठाॐचि नाहीं,
ऐसे जाणीतलें तयांतें चि कळे; ऐसिया करणें कायी ?
जीवेश्वर ते ही मिथ्या चि मानिलें. ब्रह्मीं आभासू चि वायी !
स्वमतीं अभिमानु; परयुक्ति न मने; त्यावरि प्रत्ययो देहीं. ॥३॥
निरस्ताभानासि ब्रह्म लयस्थान पुडती तेथूनी चि स्फुरे.
पाहातां काहीं न भसे; परि ते तन्मय असे, ऐसें ज्ञान जया बा रे !
तें विश्व ब्रह्म हें बोलती चतुर. सत्यांसि कैंचें दूसरें ?
बोल चि सर्वांचे आइकावे, गा ! परि साक्षात्कारु दिगंबरें ! ॥४॥
सासुरवास.
१०९६
संसार दुर्गमीं पडलो; अंधकारीं जालासे भ्रमु जीवासी.
मार्गु तो न कळे; असोनि गेले डोळे; कां गा ! देवा ! विसरलासी ?
अंतकाळीं येका तुज चि स्मरावें. बापु तूं माये आह्मांसी.
दत्ता ! दत्ता ! ह्मणौनि आळविताहें. मा सादु कवणे काळें देसी ? ॥१॥धृ॥
रे ! बापा ! दुःखाचें कां करितासि आह्मां ? अजूनि अंतर देसी !
माये ! बापा ! तूं सर्वथु; मीं रंकु; सांगों जावें कवणापासीं ? रे ! ॥छ॥
संसारसागरीं पडलों मीं दुस्तरीं. देवा ! तुझी कास मागें.
भक्तुचिंतामणी तारकु तूं ये जनीं, धावोंनि उडी घालीं वेगें !
तुझेनि नामस्मरणें बुडिजैतें केसणें; लघुत्व हें तूज लागे.
दिगंबरा ! जाण ! ध्यातुसें चरण, साडूंनि प्रयत्न अवघे, रे ! ॥२॥
१०९७
जन्मोजन्मीं आह्मीं तुझे चि, श्रीदत्ता ! गति ते नेणों दूसरी.
आह्मांलागि तुवां जन्म ही साहिले ! श्रमलासी देवा ! भारी !
तुजकरितां आह्मीं निश्चीत होतों. आतां कां धरितासि दूरी ?
इतुलयावरि आह्मीं काये कीजे ? दत्ता ! सांग झडकरी, रे ! ॥१॥धृ॥
बापा ! कर्मे कवणें तूटि जाली ? रे ! आह्मीं दुष्ट क्रिया कैसी केली ?
अपराधी तरि दंडू चि करणें मां. संगति वायां सोडिली, रे ! बापा ॥छ॥
वियोगें तुझेनि पतीत जाहालों; वरि पडलें दुःख अपार !
दुष्टांचेनि संगें माजले अवगूण; जालों अपराधपर !
ययापरि तुजसीं तूटी चि पडताहे; अंतरें पडलें अंतर.
ययाहूंनि जीवें मारिसी ते बरें ! बहु जाली मरमर रे ! ॥२॥
मुखाची वोळखि वीसरलें मन; आठउं मीं आतां काये ?
ऐसें सर्वांपरि निर्वाण पडलें; बा हृदय माझें फूटताहे !
तुझी प्रसन्नता आह्मीं अकिंचनीं लाहिजे कवणे उपायें ?
दिगंबरा ! आतां न करीं कठीण; तूं चि देॐ, बापु, माये. ॥३॥
१०९८
येक मनस चंचळ असतां करितां योगू चि नोहे.
मानस पडिभरु, कैंचे तें ध्यान केलें ? वृथा चि गेलें.
माळा, कमंडलु, गोमुखें, आसन, मुद्रा लाउंनि काये ?
न्यास, अंगचार, नाना मुद्रा, मंत्र, विक्षेपु खाये. ॥१॥धृ॥
रे ! बापा ! मनसा ! स्थीर राहीं; तुजवीण योगू चि वायां;
भूतशुद्धि, ध्येयध्यानाची खुण न चले साधनक्रिया, रे या ! ॥छ॥
मन स्थीर येक देहाचा संगु न धरूंनि ठाइ कें ठायीं
अपरयोगुगुणक्रियामंडणी नसतां ही चिंता नाहीं.
मारूंनि मनस मनोमूळ भजतां सत्य निरंजन देहीं.
दिगंबरें मन धरणें. साधनयोगें अपरें काज कायी ? ॥२॥
१०९९
काम, क्रोध, मद, मत्सर हृदयीं; वरि वरि मुंडण केलें
स्नान शौचविधु जपतां प्रणउ दंभे सर्व हरिलें.
महावक्यापद पदार्थशोधन वादा कारण जालें.
शांति येकि नाही; काइसा संन्यासु ?
जाणपण वायां गेलें, रे ! या ! ॥१॥धृ॥
संन्यासें फळ नाहीं. शांतिहीना गति कैची ?
आश्रमाभिमानें तरला कवणु ? मनसें हरावीं जनांचीं, रे ! या ! ॥छ॥
शांति सदा गुणनिवृत्ति असतां चित्ता उपरम होये.
अधिष्ठान ज्ञान मग तें सुलभ चि; जाणतां जाणोंनि जाये.
भेदाचें भान गेलें अभाॐनि; याहूंनि सन्यासु काये ?
दिगंबर परब्रह्म निरंजय शांतीसि जवळि आहे. ॥२॥
११००
मृत्तिके ! मज रक्षीं; तारीं दूर्वे ! उदका ! पवित्र करीं;
ज्योती ! तूं देॐ; रक्षीं तूं अनला ! सूर्य सेवा गायत्री.
इंद्रा, यमा, वरुणा प्रार्थूंनि गति मागेपीतरीं
मी तो कवणु ? देॐ तो कैसा ? नेणें जनु संसारीं, रेया ! ॥१॥धृ॥
भ्रमले गृहमेधी; न कळे चि तयां काहीं.
वेदवादरत कर्में करितां विश्रांति कोठेंचि नाहीं, रेया ! ॥छ॥
प्रापंचीक जन प्रपंचु भजती; ध्याती फळ प्रपंचु.
ज्ञानविरोधी सिद्धांतु गमितां वयातें होये वेचु.
सद्गुरु येकु तारी. कैचें पाल्हाळ मानी हा नीर्वचु ?
दिगंबराप्रति रिघ कां शरण; ब्रह्म तूं निष्प्रपंचु रेया ! ॥२॥