मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|गज्जलाञ्जलि|
मिळेना अन्तरीं तूझ्या मला...

गज्जलाञ्जलि - मिळेना अन्तरीं तूझ्या मला...

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


मिळेना अन्तरीं तूझ्या मला थोडाहि ओलावा
म्हणूनी तूज सोडावें, न तू हा बोल बोलावा.
दिव्याची दाहक ज्योती पतङगा चाळवी भोती,
न त्याला स्वास्थ्य देवो ती, तरी तो गोड दुष्टावा.
पुन्हा का मोकळीं रानें स्मरावीं पञ्जरस्थाला ?
धन्याला मात्र हा जाणे ऐमानी बोलका रावा.
न सोडी, सारखी ओढी स्वरूपाची तुझ्या गोडी;
न केवी धाव घे धेनू हरीचा ऐकतां पावा ?
धनुष्यें - बाण घेवोनी खडे डोळे तुझे दोन्ही,
म्हणूनी काय गे कोणी न याचें प्रीतिच्या गांवा ?
रिघाया वाणवर्षावीं भितो जो पौरुषाभावी,
न त्याने मात्र या क्षेत्रीं चुकूनी पाय टाकावा.
जशी तू दाविशी भीती तशी ही वाढते प्रीती.
‘नको’ चा अर्थ ‘हो’ ऐसा मजेचा बायकी कावा !
न होवो फायदा काही, न त्याचा लोभ थोडाही;
न थाम्बे हा परी धन्दा, निखन्दा यास वन्दा वा.
हृदीं तो भाव मी ठेवीं शिलेची जो करी देवी,
त्यजूं तो साङग, मी केवी ? वृथा कां माण्डिशी दावा ?

२७ जून १९१९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP